शिवसेनेतील बंड हा मोदी-शहा यांचा लाँगटर्म कार्यक्रम आहे का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण हे सत्तेसाठीचे बंड आहे की, यामागे काही लाँगटर्म कार्यक्रम आहे? याचे ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी केलेले विश्लेषण वाचा..
"भाजपचा डाव अशा शीर्षकासह ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी या लेखाची सुरूवात केली आहे. तसेच यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, हा लेख कृपया व्हायरल करा जेणेकरून ती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सेना आमदारांपर्यंत पोचेल. कुणी सांगावं, ही पोस्ट वाचल्यानंतर त्यांची मतं वा भूमिका बदलेलंही.
आजचं चित्र असं आहे की विधानसभेतील शिवसेना आमदारांपैकी दोन तृतियांश पेक्षा अधिक संख्येने आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. साहजिकच विश्वास प्रस्ताव वा अविश्वास प्रस्ताव आला तर हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मतदान करतील. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार कोसळेल.
त्यानंतर दोन शक्यता आहेत.
१. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन होईल.
२. एकनाथ शिंदे यांचा गट आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा करेल.
दुसरी शक्यता महत्वाची. कारण त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण होईल आणि त्यासंबंधात निवडणूक आयोगाचा (अर्थात मोदी-शहा यांचा) निर्णय महत्वाचा ठरेल. त्यासंबंधात दोन शक्यता आहेत.
१. शिवसेनेचं धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं जाईल
२. हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला वा पक्षाला मिळेल.
२०२४ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडे धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह असणार नाही.
या निवडणुकांमध्ये शिंदे आणि ठाकरे या दोघांचंही बळ निम्म्यावर येईल. म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचे २० आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे २० आमदार निवडून येतील.
महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही सेनांचं अस्तित्व मिटू लागेल.
भाजप स्वबळावर राज्यात सत्तेत येईल. आणि विरोधकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांचं वजन अधिक असेल.
पुढच्या निवडणुकांमध्ये शिंदे आणि ठाकरे या दोघांच्याही सेनेचं अस्तित्व केवळ नाममात्र उरेल. कारण शिंदे असोत की उद्धव ठाकरे दोघांकडेही स्वबळावर राज्यात पक्ष उभारण्याची व्हिजन आणि मतदारांना आकर्षित करण्याचं बळ नाही.
शिंदे असोत की ठाकरे, कुणाचीही शिवसेना नेस्तनाबूत करणं हाच फडणवीस म्हणजे मोदी-शहा यांचा कार्यक्रम आहे.
याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जबाबदार असतील."