बाळासाहेब थोरात, सत्ताधाऱ्यांना भिडत आहेत जोरात

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवडच करण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष गोंधळल्याची टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचं भिजत घोंगडं असलं तरी बाळासाहेब थोरात अचानकपणे जोरात निघाले आहेत. ते नेमकं कसं? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा लेख

Update: 2023-07-22 10:21 GMT

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष काय भूमिका घेतो, सरकारला कुठल्या मुद्द्यांवर अडचणीत आणतो, याविषयीची चर्चा होत असते. मात्र, अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला तरी अजून विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचं पद रिक्त आहे. विरोधकांमध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या आता काँग्रेसची आहे. त्यातच ज्येष्ठ म्हणून बाळासाहेब थोरात यांच्यावरच सध्या अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आल्याचं दिसतंय.

गेल्या महिनाभरात देशात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. एकीकडे मणिपूर पेटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सरकारकडून चकार शब्द काढला जात नाही. महाराष्ट्रात भाजपने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करत राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत विरोधी पक्षाने आधी पाटणा येथे आणि त्यानंतर बंगळूर येथे विरोधी पक्षाची बैठक घेत मोदी विरोधात रणशिंग फुंकले आणि या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं. पण दरम्यानच्या काळात अजित पवार यांच्या बंडानंतर काँग्रेस मुख्य भूमिकेत आला आणि काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. या सगळ्या घडामोडी मध्ये काँग्रेस अचानक मुख्य भूमिकेत आल्याने विरोधी पक्ष नेते पदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात झाली. दरम्यान बाळासाहेब थोरात अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

तसं पाहिलं तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. त्याची पहिली प्रचिती कर्नाटक मध्ये मिळालेल्या विजयाने झाली. त्यानंतर आपलं पुढचं लक्ष राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेश हे ठेवण्यात आलं आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी आघाडीच्या बैठकीकडे पाहिलं जातं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेला उत्साह महाराष्ट्र काँग्रेस मध्येही पहायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर विरोधी पक्षाला आवाजच राहणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झालं आणि अचानक शांत आणि संयमी नेते अशी ओळख असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सोयाबीन, कापूस यांची खरेदी, खतांचा साठेबाजार आणि बियाण्यांमधील बोगसगिरी यावर बाळासाहेब थोरात यांनी आक्रमकपणे हल्ला चढवला. त्यानंतर बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न विधानसभेत चर्चेला आला. त्यावेळीही सरकारकडून दिशाभूल करणारे उत्तर दिले जात असताना बाळासाहेब थोरात यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. मणिपूर घटनेवरूनही बाळासाहेब थोरात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

बाळासाहेब थोरात एरव्ही शांत असतात. मात्र अजित पवार यांच्या बंडानंतर रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदाची चाचपणी हायकमांडकडून सुरु असतानाच थोरात यांचे आक्रमक रुप राज्याला पहायला मिळाले. विरोधी पक्षाची स्पेस भरून काढण्यासाठी काँग्रेसमधील इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा बाळासाहेब थोरात आक्रमक झाले आहेत.

तसं पाहिलं तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, आमदार यशोमती ठाकूर यांच्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत आहे. मात्र या सगळ्यांपैकी आमदार यशोमती ठाकूर आणि बाळासाहेब थोरात हे जास्त आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शांत, संयमी नेतृत्व अशी ओळख असलेले बाळासाहेब थोरात अचानक आक्रमक झाल्याने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्याची शक्यता वर्तवली आहे.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन पहिला आठवडा संपला. मात्र काँग्रेसने अजूनही विरोधी पक्षनेता निवडलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविना महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. याआधीही काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद होते. तेव्हाही नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसचं असंच भिजत घोंगडं ठेवलं होतं. त्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसला. त्याच प्रकारे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाचं भिजत घोंगडं ठेऊन पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचं भिजत घोंगडं पडलं असलं तरी बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते पदी जोरात झेप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या विरोधी पक्ष गोंधळलेला दिसत असला तरी काँग्रेसने विरोधी पक्षनेत्याची निवड करून सभागृहाला विरोधी पक्षाचा आवाज द्यायला हवा. त्यासाठीच बाळासाहेब थोरात यांनी आक्रमकपणे आपण या पदाला न्याय देऊ शकतो, असे संकेत देत आपल्या आक्रमकपणाची झलक दाखवली आहे.

Tags:    

Similar News