2014 पूर्वी जगात भारतीय माणूस दिसला की लोक थुंकत होते का? – हेमंत देसाई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद ताजा आहे, त्यातच त्यांनी आणखी एक वक्तव्य केल्याने टीका होते आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी राज्यपालांना काही परखड सवाल विचारले आहेत.;
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्याने निर्माण झालेला वाद ताजा आहे, त्यातच त्यांनी आणखी एक वक्तव्य केल्याने टीका होते आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी राज्यपालांना काही परखड सवाल विचारले आहेत. हेमंत देसाई यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार...
"उत्तराखंडचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले प पू भाज्यपाल महोदय! रोजच्या रोज त्यांची मुखगंगा वाहतच असते...नागपूरमध्ये भाषण करताना भाज्यपाल म्हणाले की, 'भारताला अनेक वर्षांनंतर प्रथमच आत्मनिर्भर पंतप्रधान लाभले आहेत.' याचा अर्थ, आजवर वाजपेयींसह सर्व पंतप्रधान हे परनिर्भर होते... मोदीजी 20-20 तास काम करतात, असेही ते म्हणाले. नेहरू 17-17 तास काम करायचे, असे म्हटले जात होते. मग मोदींनी त्यांच्यापेक्षा जास्त तास काम 'करायला' नको?... देश आता अधिक गतीने प्रगती करत आहे, असे 'होशियार' महोदय म्हणाले. प्रत्यक्षात एनडीएपेक्षा युपीएच्या काळात अधिक गतीने प्रगती झाली आहे.
पूर्वी जगातील नेते आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीवर हात ठेवायचे. आज मोदी हे जगभरातील नेत्यांच्या पाठीवर हात ठेवतात, असे होशियारींनी सांगितले. वास्तविक केनेडी आणि नेहरू, नासेर आणि नेहरू, टिटो आणि नेहरू यांचे अतिशय जवळचे संबंध होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांचा दबदबा होता. बांगलादेश युद्धाच्या वेळी इंदिरा गांधींनी निक्सन आणि किसिंजर यांच्यावर मात केली होती. राजीव गांधी यांची अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील पहिलीच पत्रकार परिषद विलक्षण गाजली होती. अमेरिकेतील राजकारणी आणि मीडियाने त्यांना तेव्हा डोक्यावर घेतले होते. मनमोहन सिंग यांच्या विद्वत्तेबद्दल बुश आणि ओबामा या दोघांनाही मनापासून आदर होता. यापैकी कोणीही नेता वा भारताचे अगोदरचे पंतप्रधान जागतिक नेत्यांसमवेत झोपाळ्यावर बसले नाहीत. त्यांनी एकमेकांना कडकडून मिठ्या मारल्या नाहीत अथवा एकेरी हाक मारली नाही. तरीही जागतिक राजकारणात नेहरू, इंदिरा, राजीव प्रभृती नेत्यांचा प्रभाव होता.
मोदींच्या आधी विदेशांत भारतीयांना किंमत नव्हती, मोदींमुळेच भारताचा जगात गौरव वाढला, असा शोधही काळ्या टोपीवाल्याने लावला आहे! होमी भाभा, विक्रम साराभाई, जगदीशचंद्र बोस, मेघनाथ साहा, सी एन आर राव, जयंत नारळीकर, शांतीस्वरूप भटनागर, शंकर आबाजी भिसे, श्रीनिवास रामानुजन, सर विश्वेश्वरय्या, प्रफुल्लचंद्र राय, सत्येंद्रनाथ बसू, नरेंद्र करमरकर, श्रीराम अभ्यंकर, अनिल काकोडकर, अमर्त्य सेन, जगदीश भगवती, रविशंकर, सत्यजित राय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी जगात भारताचे नाव उंचावण्याची कामगिरी केली नाही? जेआरडी टाटा, नंदन नीलकेणी, नारायणमूर्ती, स्वराज पॉल यांनी भारताचे नाव मोठे केले नाही? 2014 पूर्वी जगात भारतीय माणूस दिसला की लोक थुंकत होते आणि आज भारतीय माणूस दिसला रे दिसला, की लगेच त्याच्या गळ्यात हार घालायला लोक धावत सुटतात? देशापेक्षाही मोदी हे नाव मोठे झाले आहे का? मोदींच्या अगोदर भारत अस्तित्वातच नव्हता? शून्याचा शोध लावणार्या भारताला शून्य किंमत होती? भारताचा तेव्हा विषकाल सुरू होता? भाज्यपाल महोदय, हमें जवाब चाहिये!..."