राम मंदिराच्या नावाने पैसा गोळा करणाऱ्यांना पायबंद घाला – मुग्धा कर्णिक

सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने लोकवर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू झाली आहे. पण ही वर्गणी गोळा करताना कायदा धाब्यावर बसवला जात असल्याचा आक्षेप घेत राज्य सरकारने यावर कारवाई करण्याची मागणी मुग्धा कर्णिक यांनी केली आहे.;

Update: 2021-02-08 08:21 GMT

राममंदिराला लागणाऱ्या कथित अकराशे कोटीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक निधी गुंडगिरी करून किंवा भाविक भावूकगिरीच्या आधारावर जमा होणार आहे. फक्त संघ भाजपच्या सदस्यांकडून शंभर रुपये आले असते तरीही अकराशेपेक्षा अधिक कोटी जमा झाले असते, असा हिशेब स्पष्ट आहे. तरीही लोकांकडून बेहिशेबी फंडात, धर्मादाय आय़ुक्तांची परवानगी वगैरे न घेता दारोदार फिरून पैसा जमा केला जातो आहे. याला विरोध जागरूक नागरिक स्वतःच्या पातळीवर करीत आहेत. पण राजकीय पक्ष मात्र झोपून आहेत. जेथे विरोधी सरकारे आहेत तिथेही नको बुवा देवाच्या नावाने पैसा जमा केला जातोय त्याला विरोध करायला, अशी बोटचेपी भूमिका घेतली जाते आहे.

खरेतर हा बेकायदा निधी गोळा करणारे लोक केवळ भारतीय जनता पक्षाचे सदस्य किंवा रास्वसंघाचे स्वयंसेवक आहेत. याला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या माधमांतून क्रियाशील विरोध केला पाहिजे. देशात सारी सामान्य जनता ओढगस्तीत असताना दारोदार जमावाने जाऊन पैसा गोळा करणे हा कायदा सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात ठोस पावले उचलायला हवीत.

भटक्या कुत्र्यांच्या झुंडीला गाडीत भरून न्यूटर करावेच लागते. सर्वांनी महाराष्ट्र सरकारला हे आवाहन करायला हवे. देशाचा गृहमंत्री झालेला गुंड तुम्हाला संपवायची भाषा करतो आणि तरीही तुम्ही त्यांची धार्मिक आडोशाने चाललेली चढाई पाहूनही गप निवांत रहाता. आहे त्या पैशावर यांची माजोरी भाषा केवढ्या थरावर आहे. आणखी काही हजार कोटींचा पैसा यांच्या हातात जनतेकडून आला तर हे तुमचे राजकीय शिरकाण करतील ही गोष्ट तरी निदान लक्षात ठेवा. ऐंशी नव्वदच्या दशकांपासून यांनी लोकांच्या खिशात अय़ोध्येच्या नावाने बेहिशेबी पैसा गोळा केला. जितके जमले त्याच्या निम्म्याचातरी हिशेब आहे कां? अजूनही खिसा कापत आहेत, मग गळे कापतील.

रामाच्या नावाने पैसा देणाऱ्या बावळट भाविकांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचे समाधीस्थळ बांधण्यासाठी, सर्वनाश करून घेण्यासाठी पैसा देता आहात. तुमच्यापासून तुम्हाला कुणीच वाचवू शकणार नाही. जागे व्हा. पैसे मागायला आलेल्या संघींना-मोदाडांना हाकलून लावा.

Tags:    

Similar News