"स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि काही विकृत बौद्ध बांधव" - विश्वास कश्यप

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीत गायले नाही किंवा त्यांच्यावर गीत गाण्यास नकार दिल्याचे कारण देत बौध्द समाजातील काही लोकांनी विकृत आणि जहाल मत व्यक्त केले. त्याबद्दल निवृत्त पोलिस अधिकारी विश्वास कश्यप यांनी परखड भाष्य केले आहे.;

Update: 2022-02-13 12:00 GMT

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या प्रसंगी काही बौद्ध बांधवांनी अतिशय विकृत आणि जहाल मनोगत समाज माध्यमांवर व्यक्त केले. त्याचे एकमेव कारण असे सांगितले जात आहे की, लता मंगेशकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित कोणतेही गीत गायले नाही किंवा त्या संदर्भातील गाणे गाण्यास नकार दिला याबाबत निवृत्त पोलिस अधिकारी विश्वास कश्‍यप यांनी गेलेले परखड भाष्य.

किती बालिश आणि फुटकळ विचारधारेची आहे ही मंडळी. लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांवर गीत गायले नाही म्हणजे आपण एक प्रकारे बाबासाहेबांचा अपमानच करत नाही का ? बाबासाहेबांचे जागतिक पातळीवरील उत्तुंग कार्य आणि लता मंगेशकर यांचे तीन चार मिनिटाचे एक गाणे, अशी तुलना करून आपण किती दीड शहाणे आहोत हे धडधडीत दाखवीत आहोत .

लता मंगेशकर यांनी बाबासाहेबांचे गाणे गाण्यास नकार दिला. एकवेळ ही बाब मान्य जरी केली तरी या घटनेचा साक्षीदार कोण आहे ? ही घटना कधी घडली ? कुठे घडली ? त्यांच्यासमोर गीत घेऊन जाणारी व्यक्ती कोण होती ? याचे कोणाकडे तरी विश्वसनीय उत्तर आहे का ? कुणाच्या तरी विकृत डोक्यातून ही कपोलकल्पित घटना बाहेर येते काय आणि त्यावर प्रतिक्रिया येतात काय ? सगळाच बालिशपणा.

लता मंगेशकर यांनी प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत गाण्यास नकार दिला असे काहींचे म्हणणे आहे. परंतु असे म्हणतात की, ज्यावेळी लता मंगेशकरांनी प्रल्हाद शिंदे यांचा आवाज ऐकल्यावर त्यांना स्वतःहून भेटावयास बोलावले होते. त्यावेळी प्रल्हाद शिंदे पान खाऊन कसल तरी व्यसन करून हलत-डुलत येत असल्याचे लता मंगेशकर यांनी पाहिल्यावर त्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला, यावर सुद्धा बोलले पाहिजे ना. आता ही घटना सुद्धा खरी की खोटी कोण ठरवणार ? असो .

बौद्धांसारख्या सुशिक्षित समाजात इतका मूर्खपणा , बालिशपणा आणि शुद्रपणा दिसावा ? जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या तथागत बुद्धांचा धम्म आचरणात आणणारे आणि प्रकांडपंडित , विद्वान बाबासाहेबांचे अनुयायी असणारे असे कसे असंवेदनशील असू शकतात ? ९३ वर्षीय लता मंगेशकर यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे तुम्ही कोणती मानवतावादी मूल्ये जपत आहात ?

एक धम्म बांधव म्हणून आपणास नम्र विनंती आहे की , दुसऱ्यांच्या वैयक्तिक बाबीवर, दुसऱ्यांच्या धर्मावर टीका टिप्पणी करू नका. स्वतःला अति शहाणे समजू नका . कशाला आपल्या बौद्धिक दिवाळखोरीच दर्शन घडवित आहात ? कशाला जातीजातीमध्ये द्वेष तयार करीत आहात ? असल्या दहा-बारा मूर्ख व्यक्तींमुळे सगळ्या बौद्ध समाजाला बदनामी सहन करावी लागत आहे .

सगळ्यात वाईट वाटते ते म्हणजे कॉलेजची डिग्री आहे म्हणून स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या मंडळींचे. ते सुद्धा अशा पांचटपणाला विरोध करत नाहीत. उलट अशा पोस्टचे समर्थनच करतात. अशावेळी तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग ? चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची तुमच्यात धमक नाही का ?

सुशिक्षित मंडळींना या अडाण्या लोकांचे नेतृत्व स्वीकारावयाचे आहे का ? सुशिक्षित मंडळी जाहीररीत्या असल्या विकृत पोस्टला कधीतरी विरोध करणार आहात की नाही ? की फक्त आपल्या तथाकथित हस्तिदंत मनोऱ्यात बसून मला काय करायचे आहे असे म्हणून गप्प बसणार आहात ? लक्षात ठेवा जर तुम्ही विरोध करणार नसाल तर तुम्ही सुद्धा बालिश आणि विकृत ठरता याचे भान ठेवा. त्यामुळे अशा धर्मांध पोस्ट करणाऱ्या काही मंडळींचे फावते, अशी विकृत मंडळी फालतू गोष्टी समाज माध्यमांवर टाकून जातीय विद्वेष पसरवित आहेत.

लता मंगेशकर ब्राह्मण समाजाच्या नसून सुद्धा त्यांना हाणून मारून ब्राह्मण करून तुमचा ब्राह्मणद्वेष कशाला दाखवताय ? तुमचे अज्ञान, तुमचा अभ्यास अशाप्रकारे दाखवून स्वतःचे हसे का म्हणून करून घेताय ?

ब्राह्मणांना शिव्या देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? किंवा बहुजनांना सत्य, इतिहास, भूगोल सांगून त्यांना शहाणे करण्याच्या नादात आपल्या समाजाचे दुश्मन कशाला वाढवून ठेवताय? बहुजन पाहतील की त्यांना काय करायचे ते. त्यांना सुधारण्याचा ठेका घेतलाय का आपण ? आता आहेत की त्यांच्यात पण शिकलेली मंडळी, बघून घेतील ते त्यांचं.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या काळात एका नेत्याने आपल्या समाजाविषयी जाहीर विधान केले होते. घरात नाही पीठ तर कशाला हवे यांना विद्यापीठ? मित्रांनो तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत फारच कमी फरक पडला आहे . आम्ही अजूनही पिठासाठी कष्टच करतोय. समाजातील फार कमी मंडळी पुरणपोळी खात आहेत. बाकी आजही बहुसंख्य लोकांना पिठाचीच काळजी आहे, असे असून सुद्धा दुसऱ्या समाजावर आम्ही कशाला टीकाटिपणी करतोय .

पहिल्यांदा आपल्या घरात बघा. मग आपल्या समाजाचे बघा. आपल्यात सुधारणा होऊ द्या. आपण अतिशय प्रामाणिक काम केले, तरीसुद्धा आपल्या दोन पिढ्या जातील इतके काम समाजासाठी करणे अजून बाकी आहे, असे असूनसुद्धा दुसऱ्यांची धुनी आम्ही का धुवत आहोत ?

महामानव बाबासाहेबांनी आपल्या लेखणीने समाज आणि देश बदलला. त्यांनी ब्राह्मण द्वेष कधीही केला नाही. बाबासाहेबांचे अनेक अनुयायी आणि सहकारी ब्राह्मण समाजाचे असून सुद्धा आम्ही ब्राह्मणांना का म्हणून शिव्या घालतोय ?

दलित पॅंथरची गरज त्याकाळी नक्कीच होती. आता मात्र नक्कीच नाही. आमचा नेहमी गोंधळ होतो की पँथर हा दलित कसा असू शकतो ? पँथर हा पँथरच असला पाहिजे. तो दलित असूच शकत नाही. अमेरिकेतील ब्लॅक पॅंथरच्या धर्तीवर महाराष्ट्रात दलित पॅंथरची स्थापना होऊन सुद्धा दलित हे नाव खटकते .

दलित पँथरच्या " पुण्याई " वर सध्याच्या काही तथाकथित नवनेतृत्वानी पँथर होण्याचा प्रयत्न करू नये. जास्तीत जास्त संविधानिक मार्गानेच लेखणीचा वापर करून लढा दिला पाहिजे . अंगावर पोलिसांच्या केसेस घेऊन कोर्टाच्या तारखांना हजर राहणे हे कोणत्याच दृष्टिकोनातून आम्हाला परवडणारे नाही .

स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या बौद्धांनी अशा लोकांच्या नादी लागू नये . सध्या बौद्धांचे अनेक तथाकथित नवनेतृत्व हे फास्ट फूड सारखे तयार होत आहे . चमकेशगिरी करीत असताना चळवळीचा आणि बाबासाहेबांबद्दल अभ्यास नाही , बुध्द समजणे तर फारच दूर साधी बुद्ध वंदना पाठ नाही. विचारधारेत प्रचंड गफलती आणि गोंधळ.

काही बौद्ध मंडळींचे वर्तन, भाषा, लिखाण हे तालिबान्यांसारखे वाटू लागले आहे. आपण तथागत बुद्धांचे अनुयायी. हिंसा मग ती शब्दांची का असेना चालत नाही हो.

बौद्ध समाजाने आता आपले जास्तीत जास्त उद्योगपती कसे तयार होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. आमच्या समाजातुन टाटा, बिर्ला, गोदरेज, कल्याणी किर्लोस्कर, बजाज कधी तयार होणार आहेत ? लता मंगेशकर यांना वाईट बोलून तयार होणार आहेत का ?

बौद्ध समाजात महामानव बाबासाहेब आंबेडकर सोडले तर अन्य कोणाला भारतरत्न मिळाले आहे का हो ? पद्मविभूषण , पद्मभूषण , खेलरत्न , दादासाहेब फाळके पुरस्कार किती जणांना मिळाले आहे ?

माझ्या माहितीप्रमाणे बौद्ध समाजात नामदेव ढसाळ यांना पद्मश्री आणि सोव्हिएट लँड नेहरू अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गंगाधर पानतावणे, छायाचित्रकार सुधारक ओलवे , उद्योगपती कल्पना सरोज, संपत रामटेके यांना पद्मश्री मिळाली आहे. ( चुकून एखाद दुसरे नाव राहिले असेल तर क्षमस्व . )

दर दोन तीन वर्षांनी आमच्या समाजातील एखाद्याला तरी उच्च प्रतीचा पुरस्कार का मिळू नये? यासाठी आम्ही काय प्रयत्न करीत आहोत? फक्त ब्राह्मणाला शिव्या घालून ते मिळणार आहे का ?

आमच्या समाजातील किती जणांना नोबेल आणि मॅगसेस पुरस्कार मिळाले आहेत? बौद्धांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार किती जणांना अशा उच्च प्रतीचे सन्माननीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत?

समाजाला मिळालेल्या पुरस्कारांची टक्केवारी हीच त्या समाजाची प्रगती आणि तिचे मूल्यमापन समजले गेले पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे.

बौद्ध समाजातील सजग आणि सुशिक्षित लोकांना कळकळीची नम्र विनंती आहे की, कोणतीही भीडभाड न ठेवता बौद्ध आणि इतर समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या डुप्लिकेट बौद्धांचा प्रखर विरोध करावा. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत .

जय-भीम !!!

आपला धम्मबांधव , adv. विश्वास काश्यप ,
माजी पोलिस अधिकारी , मुंबई .

Tags:    

Similar News