...पर ये 'मलेरिया' फैलाता कौन है, आमिरभाई?

सध्या लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाबाबत उलट सुलट चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. मात्र, लाल सिंह चढ्ढा या चित्रपटामधील पात्रांना सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे व्यक्त करताना अडचणी येत आहेत का? वाचा लेखक श्रीरंजन आवटे यांनी या चित्रपटाबाबत व्यक्त केलेलं मत;

Update: 2022-08-17 02:13 GMT

पुण्यातल्या सहकार नगरमधल्या रिक्षातून 'लाल सिंह चढ्ढा' पाहू नका, अशा घोषणा झाल्याचं वाचल्यापासून हा सिनेमा पाहण्याविषयी अधिकच उत्सुकता वाटली. 'बहिष्कार करा' चे टाहो ऐकू येत असल्याने अखेरीस काल आवर्जून थिएटरला जाऊन सिनेमा पाहिला.

'फॉरेस्ट गम्प' मी पाहिलेला नाही; पण पाहणाऱ्यांनी हे उत्तम अडाप्ट केला असल्याचं म्हटलं आहे. फॉरेस्ट गम्पचे अधिकृत संकेतस्थळ असो की ऑस्करचे अधिकृत हँडल, इथं सिनेमाची पाठराखण केली गेली आहे, विशेष दखल घेतली आहे. अद्वैत चंदन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे तर अतुल कुलकर्णी सारख्या संवेदनशील माणसाने पटकथा लिहिली आहे. सिनेमॅटोग्राफी तर इतकी उत्तम आहे की डोळ्यांचं पारणं फिटतं. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेलं सुरुवातीचं गाणंही छान आहे आणि तरीही हा सिनेमा मर्मस्थळ भेदू शकत नाही किंवा कुंपण लांघू शकत नाही !

'लाल सिंह चढ्ढा' या माणसाच्या आयुष्याचा आलेख सांगताना आणीबाणी, शीख दंगल, रथयात्रापासून ते अगदी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापर्यंतचे संदर्भ येत राहतात. अगदी शेवटी लाल सिंह धावताना मागे विद्यमान सरकारचं लाडकं पोस्टर दिसतं. १९७७ ते २०१८ या कालावधीतल्या कळीच्या घटना येतात मात्र पुसटसा संदर्भ घेऊन. त्याविषयीचं नेमकं म्हणणं काय आहे, ते कुठंच स्पष्ट होत नाही. या घटनांमध्ये उठून दिसतो तो २००२ चा अभाव ! शीख नायक असलेला लाल सिंह दंगलीतून कसा बचावतो, या संदर्भातला एक ज्वलंत प्रसंग दिसतो बाकी बाबरी पतन आणि गोध्रा यावेळी मुस्लीमांना कशा प्रकारे टार्गेट केलं गेलं, काय प्रकारचा नरसंहार केला गेला, याविषयी पुसटसाही संदर्भ देणंही टाळलेलं आहे.

२०१० साली करण जोहर दिग्दर्शित शाहरुख खान अभिनित 'माय नेम इज खान' हा सिनेमा प्रदर्शित झाला. याचं उपशीर्षक होतं 'माय नेम इज खान, ॲण्ड आय एम नॉट अ टेररिस्ट'. इथे लाल सिंह चढ्ढामध्ये 'माय नेम इज खान ॲण्ड आय ॲम नॉट अगेन्स्ट यू (सरकार)' अशी एक अदृश्य टॅगलाइन आहे ! आमिर खानला असं करावं लागणं याची कारणं अर्थातच चित्रपटबाह्य/ कलाकृतीबाह्य आहेत.

२००२ च्या राज्यसंस्था प्रायोजित दंगलींविषयी या अगोदर आमिर खान शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत बोललेला आहे. नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी झालेला आहे. मात्र २०१५ ला देशात असहिष्णुता वाढते आहे, या त्याच्या वक्तव्यावर भाजप आणि कंपनीनं त्याला प्रचंड टार्गेट केलं. त्याचं आर्थिक नुकसान होईल, याची तजवीज केली. स्वाती चतुर्वेदी लिखित 'आय एम अ ट्रोल' या पुस्तकात त्यावर स्वतंत्र लिहिलेलं आहेच. त्यानंतर आमिरने अतिशय सावधगिरी बाळगत हा सिनेमा प्रोड्युस केलेला आहे, हे लक्षात येतं पण त्यामुळं 'स्टेटमेंट' पर्यंत पोहोचताच आलेलं नाही !

त्यामुळं आमिरची तगमग लक्षात येते; पण कलाकृती ती तगमग संक्रमित करण्यात पुरेशी यशस्वी ठरत नाही. मजहबच्या पलीकडं जाण्याचा सूचक संदेश ती देते; पण त्यातली राजकीय गुंतागुंत मांडताना तिची दमछाक होते. दंगल म्हणजे काय, हे न कळणा-या पोराला शहरात दंगल पेटल्यानंतर 'मलेरिया'ची साथ आलीय म्हणून घराबाहेर पडू नकोस असं काळजीनं सांगणारी आई दिसते ! मात्र 'मलेरिया' ची साथ कोण पसरवतं आहे, याचं उत्तर सिनेमा देत नाही. त्या प्रश्नाला बगल देत सिनेमा पुढं जात राहतो.

ये मलेरिया कौन फैलाता है, आमिरभाई ? हा प्रश्न विचारुन मला आमिरला आरोपीच्या पिंज-यात उभं करायचं नाहीये. तीस्ता सेटलवाड आणि आर बी श्रीकुमार यांना कोणताच गुन्हा नसताना तुरुंगात डांबलं जात असलेल्या काळात आमिरला जाब विचारण्यात फार काही अर्थ नाही, याची मला कल्पना आहे. 'लाल सिंह चढ्ढा'वर पूर्वनियोजित बहिष्कार आणि 'काश्मीर फाइल्स'चा राजाश्रयी जयजयकार अशा दुफळी झालेल्या काळात आपण आहोत, याची जाणीव मला आहे.

हा सिनेमा फ्लॉप ठरेल, ठरतो आहे, हे स्वच्छ दिसतं आहे मात्र मुद्दा बॉक्स ऑफिसच्या पलीकडचा आहे. २०२२ साली 'मलेरिया' विषयी बोलता येत होतं; पण 'मलेरिया' कोण पसरवत होतं, हे सांगता येत नव्हतं, अशा घनघोर काळ्याभोर ढगांच्या छायेत देश होता, याचा दृकश्राव्य दस्तावेज म्हणजे हा सिनेमा. हा सिनेमा या अर्थाने महत्वाचा आहे. हा दोषारोप नाही, आरोपपत्र नाही, सिनेमाच्या निमित्ताने केलेली एक छोटी नोंद आहे !

सिनेमाच्या सुरुवातीला आणि शेवटी भिरभिरणाऱ्या पिसासारखा हा देश स्वच्छंदी विहरेल ही आशा आहेच; पण ते आपोआप होणार नाही, हेही लक्षात ठेवायला हवं.

Tags:    

Similar News