Mahatma Phule Jayanti : क्रांतिसूर्य जोतिबा फुले...

भारतीय इतिहासातलं असं एक सोनेरी पान जे उलगडल्याखेरीज आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणं वा त्याचा विचार करणं केवळ अशक्य. बुद्ध आणि कबीरानं जन्माला घातलेल्या तत्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतीचा आधार कुणी दिला असेल तर तो फक्त जोतीराव आणि त्यांची सहचरिणी सावित्रीमाई फुले यांनीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस बांधला. महात्मा फुले जयंती दिनी लेखक कबीर वैभव छाया यांनी किलेली मांडणी..

Update: 2022-04-11 02:40 GMT

तात्यासाहेबांचा जन्म एका सधन कुटूंबात झाला. वडिल गोविंदराव पीढीजात फुलांचा व्यवसाय करणारे. पुण्यातील फुलांच्या बाजारपेठेवर प्रचंड दबदबा राखून असलेले. मुळचं आडनाव गोरे पण फुलांच्या व्यवसायामुळे फुले नावाची उपाधी अंगी आली आणि कालांतराने तेच आडनावही झाले. गोविंदराव फुलबागांचे मोठे बागायतदार. लाख दोन लाख रुपयाची सहज उलाढाल करणारे शेतकरी आणि व्यापारी. घरी-शेतीवर नोकर चाकर असा चांगला रूबाब गोविंदरावांच्या ठायी होता. जोतीबांचा जन्म झाला आणि अवघं नऊ महिन्यांचं वय असताना जोतीबांच्या आईचं निधन झालं. पुढे जाऊन गोविंदरावांनी दुसरा विवाह केला. चिमाबाई (पूर्वीचं नाव विमला) जोतीरावांच्या सावत्र आई बनल्या. त्यांच्याच देखरेखीखाली जोतिबांचा सांभाळ, जडणघडण सुरू झाली.

जोतिराव लहानपणापासून खमक्या आणि स्ट्रेट फॉरवर्ड स्वभावाचे होते. ब्रिटीश राजवटीविरोधात जर लढायचं असेल तर आपण आपलं शरिर कमावलं पाहीजे. सदृढ शरिराशिवाय कोणत्याही प्रकारचे सामाजिक प्रबोधन करणं शक्य नाही ही त्यांच्या मनी असलेली प्रबळ भावनाच त्यांना उस्ताद लहुजींच्या आखाड्यात घेऊन गेली. लहुजीबाबांच्या देखरेखीखाली तरूण जोतीरावांची कसरत सुरू झाली. जोर-बैठका वेगात होऊ लागल्या. गुडघे, पोटऱ्या, खांदे, दंड बळकटीकरणाचे व्यायाम सुरू झाले. सूर्यनमस्काराचे जोर शंभर-शंभरात सुरू झाले. म्हणता म्हणता जोतिरावांची प्रकृती एकदम बलदंड होऊ लागली होती. शरीर काटक, सडपातळ असले तरी मजबूत स्नायू आणि पिळदार मांसल बनलं होतं. मग तालीम सुरू झाली कुस्तीची. या कुस्तीच्या तालमीत त्यांचे साथीदार असायचे ते धोंडीबा, सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर. हे सर्व साथीदार जोतीरावांच्या सामाजिक चळवळीतही अखेरपर्यंत साथीदार म्हणून वावरले. यांपैकी धोंडीबा राऊत हा उस्ताद लहुजी यांचा मुलगा. धोंडीबा लहुजींना कुस्तीचा आखाडा चालवण्यास सहकार्य करी. त्याचं शिक्षण जोतीरावांच्याच शाळेत झालं. वडिलांच्या पश्चात धोंडीबानंच कुस्तीचा आखाडा चालवला. एवढंच नव्हे तर जोतीबांच्या सांगण्यावरून जोतीरावांच्या शाळेत शिकायला येणाऱ्या हरेक विद्यार्थ्याला त्यांनी कुस्तीसोबत सर्व प्रकारची प्रशिक्षणं दिली. चांगल्या शरिराशिवाय आपण कोणतंही कार्य तडीस नेऊ शकत नाही याची जोतिबांना पूर्ण जाणीव होती. नुसतं शरिर असून फायदा नसतो. हाती शस्त्रं चालवण्याची कलाही अवगत असलीच पाहीजे. म्हणून त्यांनी उस्ताद लहुजींकडून आधी दांडपट्टा, तलवार, नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं. कालांतराने बंदुका चालवणं आणि कुस्तीचे सारे डावपेच शिकून त्यात निपूण झाले. जोतिराव उत्तम नेमबाज होते. पण ते फक्त विद्या म्हणून त्यांनी आत्मसात केलेलं एक शास्त्र. तसं त्यांच्या घरी दोन बंदुका आणि काही गुप्त्या असत. त्यांचा वापर त्यांनी कधी केला नाही. पण बोथाडी फिरवणं, लाठी-काठी, दांडपट्टा चालवणं, पट्टा फेकणं, शिस्त धरणं, नेम धरणं यात ते प्रचंड पारंगत होते.

तसं पाहीलं गेलं तर पुरूषार्थ ही संकल्पना प्रचंड भारतीय संकल्पना आहे. ज्यात पुरूषानं शरिराचं बळ एखाद्याच्या दमनासाठी वापरणं हे गृहित धरलेलं असतं. पण जोतिरावांनी हा समज सर्वात आधी पुसून काढला. आपलं बलदंड शरिर हे उत्तम आरोग्याचं प्रतिक आहे हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केलं. खरं पाहीलं तर आज व्यायामशाळांत जोतिबांचे फोटो इन्स्पिरेशन म्हणून लावायला काही हरकत नसावी.

जोतिरावांचं रुप अतिशय देखणं होतं. डोळे पाणीदार आणि तेजस्वी होते. उंची साधारण सहा फुटाच्या आसपास असावी. त्यामुळं भव्यता ही काही औरच असायची. जोतिबांना दाढी मिश्या वगैरे वाढवून राहण्याची बिल्कूल सवय नव्हती. जमदाडे नावाचा न्हावी नियमितपणे येऊन त्यांची दाढी कापत असे. मिशी एका कट मध्ये असे. केसही कधी वाढलेले नसायचे. ते रोज सकाळी उठत. दुधात शिळ्या भाकऱ्या चुरून न्याहारी होई मग हातात मोठी काठी घेऊन त्यांचा मॉर्निंग वॉक सुरू व्हायचा. सकाळच्या मॉर्निंग वॉकला जाताना पायघोळ अंगरखा, धोतर, लांब काठी सोबत असे. कपड्यांचा रंग मात्र पांढरा असायचा. कधी कधी सकाळी बाहेर फिरायला निघताना ते घोड्यावर निघत असे. हा शिरस्ता त्यांना लकवा मारेपर्यंत कायम होता. जोतीबा जेव्हा केव्हा बाहेर निघत, लोकांना भेटण्यासाठी तेव्हा कधीच गबाळे किंवा साध्या पेहरावात बाहेर निघत नसत. बंडी, लांब कोट, तांबड्या रंगाची खास फुले पगडी बांधलेली, कोटाला लेखणी, पायात मोजडीसारख्या वहाणा, उंची धोतर ते ही कडक इस्त्रीचं, खांद्यावर जरीचं उपरणं असे. अशा शानदार पेहरावातला माणूस जेव्हा पुण्याच्या रस्त्यावरून चालत असेल तेव्हा बघणाऱ्यांच्या नजरा काय विचार करत असतील याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. जोतिरावांच्या साथीनं सावित्रीमाई सुद्धा अगदी भव्य वाटायच्या. त्या अंगावर अलंकार नेसत नसत. गळ्यात काळ्या मण्यांमध्ये सोन्याचा एक मणी असलेलं मंगळसुत्र असायचं. कपाळावर कुंकू पण त्यांच्या साड्या आणि चोळ्या मात्र उंची असत. पण अनेकदा त्यांच्याबद्दल लिहीताना अनेक लेखकांनी मुद्दाम त्यांच्यावर साधेपणाचा आरोप करत त्याचं ग्लोरिफिकेशन केलेलं आढळलं आहे. आपले कपडे चांगलेच असावेत असा दोन्ही उभयंताचा विचार असे. सावित्रीमाई जेव्हा शाळेला निघत तेव्हा त्या सोबत एक एक्स्ट्रा लुगडं ठेवत. आता ते का ठेवत याबद्दल वेगळं सांगायला हवं का?

जेव्हा कुणी एखादी गरिब, पीडीत स्त्री सावित्रीमाईंच्या घरी येई अन् तीचं मळलेलं, फाटकं लुगडं त्यांना दिसे तेव्हा माई त्यांना स्वतःचं लुगडं, चोळी देऊन परत पाठवत असे.

आज जोतिरावांचं अनेक फोटो उपलब्ध आहेत. पण त्यातील एकच फोटो खरा आहे ज्यात जोतीबा एका खुर्चीवर बसलेले असून डोक्यावर पगडी आहे. त्यात त्यांच्या दाढीचे थोडेसे खुंट वाढलेले आहे. त्यामुळे शासनमान्य असा तो एकच फोटो. त्यांच्या बाजूला टेबल होता की नव्हता हे ठाऊक नाही. कारण जेव्हा तो फोटो मिळाला तेव्हा अतिशय जीर्ण अवस्थेत होता. त्यावर हळद कुंकवाचे डाग होते. तेलाचे डाग होते. फोटो प्रोसेस करून मग एक फायनल कॉपी तयार केली गेली. दूर्दैवानं सावित्रीमाईंचा अधिकृत फोटो उपलब्ध नाही. जोतीबा बरेच काही होते. आदर्श शिक्षक, सहचर, उद्योजक होते.

आज ११ एप्रिल, तात्यासाहेबांची जयंती. तात्यासाहेबांच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने हा छोटासा प्रपंच क्रांतिसूर्य मधून साभार...

वैभव छाया..

Tags:    

Similar News