पैसे मिळवण्यासाठी किर्तन आणि महाराज होण्याचे धंदे : शरद तांदळे
सध्या महाराज बनवण्याचे क्लासेस घेण्याची वेळ आलीय. यात फूल पैसा आहे, कारण 80 टक्के जनता आपल्यासारखी बावळट आहे. पैसे मिळवण्यासाठी कीर्तन आणि महाराज होणं हे दोन धंदे खूप चांगले आहेत``, असा उद्योजक शरद तांदळे यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळं महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात हलकल्लोळ माजला आहे. समाजमाध्यमांमधे मोठं समर्थक आणि विरोधकाचं द्वंद पेटलं आहे.
पुरुषोत्तम महाराज पाटील दादा यांनी उद्योजक शरद तांदळे यांची दिड मिनिटाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर शेअर केली आहे. यामधे पुरुषोत्तम महाराज म्हणतात, Sharad Tandale आपण उद्योजक ,लेखक आहात तुमचे द आंत्रप्रेन्यूअर हे पुस्तक वाचून छान वाटले पण तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाला आहात हे खालचा व्हिडीओ पाहून समजले , आणि फाजील आत्मविश्वास वाढला आहे तुमचा.
शरद तांदळे या व्हिडीओत म्हणतात, "खेड्यात पाच पंचवीस लोकं एकदा बाबा म्हणून पाया पडले की अख्ख गाव पाया पडतं. त्याला खूप हुशार असण्याची गरज नाही. खूपच काही झालं तर शेवटी म्हणायचं 'हरे राम' किंवा हरे कृष्णा की संपलं. त्यापुढे जाऊन बोला पुंढली का वरदे म्हणायचं, सगळे लोक म्हणतात याला लईच कळतंय. शेवटी हरीपाठातील एखादा डायलॉग पाठ करायचा. हा धंदा लई सोपा आहे. हरिपाठ खूप सोपा धंदा आहे. मी असले बिझनेस आधी शोधत होतो."
"खेड्यापाड्यामध्ये पारायणाचे कार्यक्रम खूप चालतात. आपल्याकडे व्याख्यानं आता आता होत आहेत, तेही अनेकदा होत नाहीत. दुसरीकडं तुम्ही किर्तन पारायण म्हणा, अख्ख गाव उभं. 5-5 लाख रुपये मिळतात, धंदा सोपा नाही. आळंदीत याच्या संस्था आहेत. तिथं महाराज बनतात, मला हे नंतर कळालं. याचीही एक शाखा घ्या असं मी म्हटलं होतं. जनताच तशी झाल्यावर काय करावं. महाराज बनवण्याचे क्लासेस घेण्याची वेळ आलीय. यात फूल पैसा आहे, कारण 80 टक्के जनता आपल्यासारखी बावळट आहे. पैसे मिळवण्यासाठी कीर्तन आणि महाराज होणं हे दोन धंदे खूप चांगले आहेत." असंही त्यांनी म्हटले आहे.
यावर पुरुषोत्तम दादा पाटील म्हणतात, महाराष्ट्र ओळखला जातो तो वारकरी संप्रदाय ,संतविचार यांच्यामुळे . कीर्तनकार ,वारकरी संप्रदाय ,आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था याबद्दल तुम्ही जे अपशब्द बोलला आहात त्याचा मी भक्तीशक्तीसंघ BSS च्या वतीने निषेध करतो .व जे शब्द बोलला आहात ते मागे घेऊन माफी मागा अशी मागणी केली आहे.
महाराज सचिन पवार म्हणतात, माझे मित्र शरद तांदळे यांनी वारकरी कीर्तनकारांबद्दल, संप्रदायाबद्दल काही आक्षेपाहार्य विधाने केले आहे. सकाळी आदरणीय ह.भ.प. पुरूषोत्तमदादा पाटील यांच्या पोस्टमुळे मला शरदरावची हि विधाने समजली. लगेच शरद तांदळेंना फोन केला व त्यांच्या चुक लक्षात आणुन दिली. त्यांनीही चुक मान्य केली व दिलगीरी व्यक्त करणारी पोस्ट तातडीने करतो असा त्यांनी पुरूषोत्तम दादा व मला शब्द दिला होता. हि घटना दुपारी एकच्या दरम्यानची मात्र रात्रीचे साडेदहा होवुनही त्यांची कोणतीही दिलगीरीची पोस्ट मला दिसलेली नाही.
वारकरी संप्रदायात खळबळ उडाल्यानंतर शरद तांदळे यांनी यावर स्पष्टीकरण समाज माध्यमावर दिले असून ते म्हणतात,
काल पासून एका व्हीडीओचा तुकडा सोशल मिडीयावर पसरवत.. काही विशिष्ट लोकांनी मी संप्रदायाची बदनामी केल्याचा खोटा आरोप केला आहे.
या ठराविक लोकांनी वारकरी संप्रदायाचा राजकीय वापर करू नये. ही हातपाय तोडण्याची भाषा काही सहिष्णू व विनयशील वारकऱ्यांची नाही. यात राजकीय लोक आहेत.
हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वीचा आहे. त्यामागचा संदर्भ माहित नसताना असे आरोप माझ्यावर केले जातायेत. मुळात मी तरूण असताना व्यवसाय करण्याच्यादृष्टीने वेगवेगळे विचार करत होतो. त्यावेळी सामान्य तरूणांना वाटतात अशे विचार माझ्याही मनात यायचे, तेच मी प्रामाणिकपणे मांडले. यात हेतु शुद्ध होता. माझेही कुटुंब वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारे आहे.
यात मी वारकरी संप्रदायाला काहीच बोललो नाही. फक्त काही विशिष्ट किर्तनकारांविषयीचे मी मत व्यक्त केले.
केवळ मला बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी वारकरी संप्रदायाच्या आडून हे षडयंत्र चालवलेले आहे. कालपासून जे निष्ठावंत वारकरी माझ्यासोबत उभे राहिले त्या सर्वांचा मी कायम ऋणी आहे.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानयिले नाही बहुमता...
जय हरी विठ्ठल...
शरद तांदळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर समाजमाध्यमांमधे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तांदळे यांनी आपली वक्तव्यं मागे घेऊन माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. तर काहींच्या मते तांदळे यांनी वस्तुस्थिती मांडली असून वारकरी संप्रदायाने आत्मपरीक्षण करावे असे म्हटले आहे.
- शरद तांदळे