काश्मीर फाईल्स आणि हिंदू राष्ट्रवादाची सूज
काश्मीर फाईल्स या चित्रपटात मांडलेली कथा काय आहे? त्या कथेचा अर्थ काय? आणि हिंदू असो की मुस्लिम दोन्ही बाजूने होत असलेले समाजाचे एकजिनसीकरण लोकशाहीसाठी कसे घातक आहे? याविषयीचे जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचे विश्लेषण...;
काश्मीर फाईल्स या चित्रपटावरील चर्चा रोज ऐकायला वा वाचायला मिळते. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट झाला आहे. १९८९-९० या काळात काश्मीर खोर्यातील हिंदूंच्या विरोधात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मोहीम सुरु केली होती. काश्मीर खोर्यातून हिंदूंना परागंदा करून काश्मीर हे मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा त्यांचा मनसुबा होता. अनेक गावांमध्ये मशिदींतून काश्मीरातील हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराची चिथावणी देण्यात आली. भारतातील प्रसारमाध्यमांनी या घटनांना प्रसिद्धी दिली नव्हती. काश्मीरवर जेवढे पिच्चर निघाले त्यांनी या वास्तवाची दखलही घेतलेली नाही.
काश्मीर फाईल्स या चित्रपटाने पहिल्यांदा काश्मीरातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामागची धारणा अशी आहे की हिंदुस्तानात सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदूंचा छळ होतो. हिंदू समाजाने आपल्याला सुधारायला हवं असा उपदेश सेक्युलॅरिस्ट व लोकशाहीवादी करतात. मात्र हिंदू समाज हा सर्वाधिक पिडित समाज आहे. या समाजावर शेकडो वर्षं मुसलमानांनी राज्य केलं आणि दीडशे वर्षं ख्रिश्चनांनी राज्य केलं, ही बाब सेक्युलॅरिस्ट आणि लोकशाहीवादी विसरतात ही या सिनेमाची वैचारिक बैठक आहे (मला ही बैठक मान्य नाही) .
काश्मीरातील फुटीरतावादी शक्तींची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भलामण करण्याचं काम सेक्युलॅरिस्ट आणि लोकशाहीवाद्यांनी केलं. शासनसंस्थेवर व मिडियामध्ये त्यांचा वरचष्मा होता त्यामुळे १९८९ साली काश्मीरात जे काही घडलं त्याला भारतातील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली नाही. ही वस्तुस्थिती मी स्वतः पाह्यली आहे, अनुभवलीही आहे. या मागचं महत्वाचं कारण असं की सेक्युलॅरिस्ट, लोकशाहीवादी आणि डावे, भारतीय समाजाची त्यातही हिंदू समुदायाची एकात्मता नाकारतात. जातिव्यवस्थेमुळे हिंदू समाज कधीही एकात्म होऊ शकत नाही, किंबहुना त्यामुळेच हिंदू समाज दुर्बळ होता व आहे अशी मांडणी करतात. आजही फेसबुकवरील माझे शेकडो मित्र हीच मांडणी या ना त्या प्रकारे करत असतात.
१८८५ सालापासून भारतीय राष्ट्र-राज्य घडण्याची प्रक्रिया सुरु झाली. विविध वंश, धर्म, जाती, भाषा, प्रदेश असलेल्या खंडप्राय देशाचं राष्ट्र-राज्य बनण्याची प्रक्रिया कित्येक वर्षं चालते. संघर्ष आणि सहजीवन, हिंसा आणि आर्थिक विकास या प्रक्रियेतून राष्ट्र-राज्य घडत असतं. मात्र राष्ट्र-राज्याची जडण-घडण सेक्युलर मूल्यांवर आणि लोकशाही मार्गानेच करण्याला काँग्रेस नेतृत्वाने महत्व दिलं होतं. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची आर्थिक-सामाजिक स्थिती शोचनीय होती. साक्षरताही सुमारे ६० टक्के होती. अशा परिस्थितीत आर्थिक संरचना मजबूत करण्याला नेहरूंनी प्राधान्य दिलं होतं. त्यांच्यामुळेच भारतीय राष्ट्र-राज्य केवळ सेक्युलर आणि लोकशाहीवादीच नाही तर आर्थिक विकासाच्या मार्गावरही वाटचाल करू लागलं.
जम्मू-काश्मीर संस्थानात मुस्लिम बहुसंख्याक होते. मात्र या संस्थानाने भारतीय संघराज्यात सामील व्हायचा निर्णय घेतला ही अभिमानाची बाब होती. राजा हरिसिंगापेक्षा यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका शेख अब्दुल्ला यांनी निभावली होती. मात्र काश्मीर प्रश्नांची गुंतागुंत ध्यानी घेऊन शेख अब्दुल्ला कधी फुटीरतावादी मुस्लिम कार्ड खेळायचे तर कधी सेक्युलॅरिझमचं कार्ड खेळायचे. शेख अब्दुल्ला यांना त्यामुळेच पंतप्रधान नेहरूंनी गजाआड केलं होतं.
मात्र त्यावेळीही काश्मीरीयत नावाची अस्मिता होती. काश्मीरीयतमध्ये हिंदू व मुसलमान दोन्ही समुदायांचं ऐक्य होतं. त्यामुळे स्वतंत्र काश्मीरात हिंदूंनाही स्थान असेलच असा दावा केला जायचा. हिंदूंना काश्मीर खोर्यातून हाकलून देण्याची चाल म्हणूनच खेळण्यात आली. काश्मीरचं पाकिस्तानातील विलीनीकरण सुकर व्हावं यासाठीच हा कार्यक्रम आखण्यात आला होता.
देशाची आर्थिक स्थिती सुधारत गेली म्हणजे औद्योगीकरणात वाढ झाली. त्यामुळे समाजाचं एकजिनसीकरण वाढलं आणि शासनाची दमनशक्तीही वाढली. दहशतवाद असो की सशस्त्र बंडाळी या मार्गाने हे शासन उलथून टाकण्याची शक्यता दुरावत गेली.
काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मिळणार्या यशामध्ये हिंदू समाजाच्या एकजिनसीकरणाचा मोठा वाटा आहे. मात्र भारतीय समाजाची जडण-घडण स्वातंत्र्य आंदोलनात झाली आहे. भारतीय राज्य घटनेने हा देश एकात्म केला आहे. हिंदू राष्ट्रवाद ही सूज आहे. कारण हिंदू राष्ट्रवाद अन्य धार्मिक अल्पसंख्यांकांच्या द्वेषावर उभा आहे. या देशातील बहुसांस्कृतिकतेला हिंदू राष्ट्रवाद गवसणी घालू शकणार नाही. त्यामुळे काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या विरोधात पोस्टी टाकण्यापेक्षा लोकशाहीवादी आणि सेक्युलॅरिस्टांनी स्वातंत्र्य आंदोलनातील मूल्यांचं नवसर्जन कसं करता येईल यावर अधिक चिंतन करण्याची गरज आहे.