गडचिरोली ते स्पेन, स्विडन, नॉर्वे आणि आता इंग्लंड
गडचिरोलीच्या बोधी रामटेके यांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्यांना युरोपीयन युनियनची जागतिक दर्जाची नामांकित 'इरासम्स मुंडस' शिष्यवृत्ती जाहीर झाली यातून ते स्पेन, स्विडन, नॉर्वे आणि इंग्लंड या चार देशात पदव्यूत्तर उच्च शिक्षण घेणार आहेत. त्यांनी केलेल्या गडचिरोली ते इंग्लंड या यशस्वी प्रवासाची जिद्दी कहाणी वाचा त्यांच्याच शब्दात…
मला युरोपीयन युनियनची (European Union) जागतिक दर्जाची नामांकित 'इरासम्स मुंडस' शिष्यवृत्ती (Irasams Mundus Scholarship) २१ मार्चला जाहीर झाली. स्पेन, स्विडन, नॉर्वे आणि इंग्लंड या चार देशात दोन वर्ष पदव्यूत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा ४५ लाखांचा संपूर्ण आवश्यक खर्च युरोपीयन युनियनच्या प्रतिष्ठीत शिष्यवृत्तीतून होईल. या सोबतच, कॅलिफोर्निया विद्यापीठातही (California University) निवड झाली. त्यासाठी ३० लाखांची शिष्यवृत्तीही त्यांनी जाहीर केली. यासोबत 'कॉमनवेल्थ शेअर्ड' (Commonwealth Shared) या यू.के सरकारच्या प्रतिष्ठीत शिष्यवृत्तीच्या रिसर्व लिस्ट मध्येही नाव आहे. यातून इरासम्स मुंडस ही शिषवृत्ती स्वीकारली आहे. ज्या माध्यमातून चार वेगवेगळ्या देशातील विद्यापीठात पुढील कायद्याच्या शिक्षणासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसोबत काम करता येणार आहे. मी निवडलेल्या अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती जगातील फक्त १५ लोकांनाच दिली जाते. भारतातून निवड होणारा मी यंदा एकमेव आहे. आता जगभरातील विविध देशांत मानवाधिकारांवर काम करणाऱ्या अनुभवी लोकांसोबत मी शिक्षण घेणार आहे. जमिनी पातळीवरील कामापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि आता विदेशात उच्च शिक्षणाचा सुरु होणारा हा प्रवास अन् यश हे माझ्या एकट्याचे नाहीच. हे सारं चळवळीची देणं आहे. शिष्यवृत्ती जाहीर झाल्यापासून अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या; त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आभार आणि कायम ऋणाईत आहोत!
आदिवासीबहुल, नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी हे माझं गाव. घरची पार्श्वभूमी फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांच्या चळवळीची आणि बांधिलकीची. लहानपणापासून घरच्यांसोबत आंदोलने, मोर्चे, बैठकीत सहभागी व्हायचो. मला आठवते, खैरलांजी हत्याकांडाच्या (Khairlanji Murder case) विरोधात झालेल्या आंदोलनात अवघ्या आठ वर्षाचा असतांना घरच्यांनी सामील करून घेतलं होतं. मी तेव्हा जातीवादी व्यवस्थेच्या विरोधात हातात माईक घेऊन घोषणा देत निषेध नोंदवत होतो. समाज प्रबोधनासाठी बामसेफ, पे बॅक टू द सोसायटीच्या माध्यमातून गावोगावी होत असलेल्या कॅडर कॅम्पसाठी वडील ट्रेनर म्हणून जायचे; तेव्हा त्यांच्या सोबत फिरत असायचो. मा. कांशीराम साहेब हयातीत असतांना बहूजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जिल्हाभरात घरच्यांसोबत रात्री-बेरात्री फिरलो होतो. घरी रोज चळवळीतील मंडळींचं येणं-जाणं, त्यांच्या नियमित बैठका होत असत. एकंदरीत अशा वातावरणात सामाजिक जाणीवा विस्तारत गेल्या. चळवळ आणि आपलं जगणं हे काही वेगळं आहे, असं कधी जाणवलंच नाही. माझ्यातील जीवंत चळवळीने व बाबासाहेबांचा विचार कायम प्रेरणा देत असल्याने, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी झटलं पाहिजे असं कायम वाटत होतं. म्हणून कायद्याच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. निर्णय इतका पक्का होता की इतर क्षेत्रातील परीक्षेचे अर्ज देखील भरले नव्हते. कायद्याच्या क्षेत्रात कुठली परीक्षा द्यायची, अभ्यास कसा करायचा? हे काहीच माहिती नव्हतं. तो एक वेगळाच संघर्ष होता. माझ्या जडणघडणीत अजून कुणाचा महत्वाचा वाटा असेल तर तो नवोदय विद्यालयाचा. जिथे माझं १२ वी पर्यतचं शिक्षण झालं. घोट या दुर्गम भागात असलेल्या या माझ्या शाळेने मला जगायचं शिकवलं. ६ वीला असतांना निवड झाली आणि मग नंतर घर सुटलच. ७ वर्षाचा हा प्रवास होता, ज्यात मी घडत गेलो.
कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील आय.एल.एस विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. जात व्यवस्था सर्व स्तरावर नियोजितपणे काम करत असल्याने त्याचे चटके प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्वच ठिकाणी अनुभवायला मिळतात. आरक्षणावरून, कपड्यांवरून, भाषेवरून सुरुवातीच्या दिवसात टोमणे ऐकावे लागले. मात्र कधी खचलो नाही. विधी महाविद्यालयात आल्यावर बालपणापासून अनुभवलेले, बघितलेले प्रश्न आता कायद्याच्या चौकटीतून बघायला लागलो. कायद्याचे शिक्षण घेत असताना अॅड.असीम सरोदे यांच्यासोबत पुण्यात कामास सुरुवात केली. शिकत असलेले कायदे आणि प्रक्रिया यांचा सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वापर करायला लागलो. अनेक मूलभूत अधिकारांच्या व पर्यावरणाच्या संदर्भातील याचिका आयोग, हरित न्यायाधीकरण आणि उच्च न्यायालयात दाखल केल्या. याच दरम्यान इजिप्त देशात निर्वासितांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी निवड झाली. साधारण २०१८ ला 'कोरो इंडिया' या संस्थेने मी व माझ्यासोबत कायद्याचे शिक्षण घेणारे माझे मित्र दीपक चटप व वैष्णव इंगोले यांना समता फेलोशिप जाहीर केली. या फेलोशिपच्या माध्यमातून 'संविधानिक नैतिकता' हा सात दिवसीय ऑनलाइन कोर्स युवकांसाठी तयार केला. संविधान विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी दोन ते तीन हजार युवकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
या शैक्षणिक काळात कायम वाटायचं की, आपल्या शिक्षणाचा उपयोग हा दुर्लक्षित समाजाला न्याय देण्यासाठी होणे गरजेचे आहे. कायदा, संविधान शिकत असतांना जाणवायचं की आपण ज्या भागातून येतो, तिथे ज्या मूलभूत अधिकारांची आपण चर्चा करतो; ते अजून तिथल्या माणसांपर्यंत पोहचलेले नाहीत. त्यांच्या अधिकारांचे कायम उल्लंघन होत आलेले आहे. या विचारावर कृती करण्यासाठी मी, दीपक आणि वैष्णव यांच्या समवेत 'पाथ' नावाने सामाजिक चळवळ सुरु केली. या माध्यमातून प्रामुख्याने आदिवासी समाजातील मूलभूत अधिकारांच्या उल्लंघन संदर्भातील प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडविण्यासाठी सुरुवात केली. अबुजमाड मधील गरोदर महिलांचा प्रश्न असेल, किंवा आदिवासीबहुल वेंगनूर भागातील पूल व दवाखाना बांधण्यासाठीचा विषय असेल, हे प्रश्न मोफतरित्या न्यायालयापुढे मांडलेले आहेत. यासोबत अनेक विषयांना कायदेशीर वाचा फोडण्याचेही काम केले आहे.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कोलाम व माडिया या आदिम आदिवासी समुदायांचे प्रश्न समजून घेऊन, त्यांच्या न्याय-हक्कांसंदर्भातील सर्व्हेक्षण केले. त्याबाबतचा अहवाल मी इटली येथील आंतरराष्ट्रीय समर स्कूलमध्ये प्रकाशित केला. त्या अहवालामुळे पुढे काम करण्यास मदत झाली. संविधानिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी काही उपक्रम हाती घेतले. हे काम करत असतांना असे जाणवले कि समाजात कायद्यासंदर्भात मोठी असाक्षरता आहे. ती असाक्षरतेची दरी भरून काढण्यासाठी व शोषित समाजाच्या न्याय-हक्काच्या लढाईला मजबूत करण्यासाठी 'न्याय' नावाचे पुस्तक लिहून समाजापुढे मांडले.
गडचिरोली सारख्या संवेदनशील भागात मानवाधिकारांबाबत बोलणं म्हणजे अप्रत्यक्ष गुन्हाच आहे. अशा परिस्थितीत उचललेले लहान पाऊल सुद्धा मला फार महत्वाचे वाटते. इथे आदिवासी समाजाच्या प्रश्नांचे, त्यांच्या संस्कृतीचे केवळ भांडवल केले जाते. त्या प्रश्नांना मुळासकट कुणालाच संपवायचे नाही. कारण प्रश्न असतील तेव्हाच प्रस्थापित व्यस्थेचा भाग असलेल्यांना आदिवासी समाजाचा 'मसीहा' बनता येईल. आदिवासी समाजाचे एकूणच नेतृत्व नष्ट करून, त्यांचा संपूर्ण संघर्ष क्लेम करण्याचा प्रयत्न आजवर झालेला आहे. तो आताही सुरूच आहे. हे षडयंत्र हाणून पाडत स्थानिक नेतृत्वाला येणाऱ्या काळात पुढे आणण्यासाठी मदत, सहकार्य करण्यासाठी रचनात्मक काम उभे करायचे आहे.
जमिनीपातळीवर काम करण्यासाठी आपल्याला आधी सगळ्या स्तरावर काम करून स्वतःला सक्षम बनविण्याची गरज आहे, असे जाणवले. कायद्याचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण झाल्यानंतर दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधिशांसोबत काही महिने काम केले. नंतर उच्च न्यायालयात काम करून परत सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या पदावर रुजू झालो. भविष्यात दुर्बल घटकांच्या न्याय-हक्क संदर्भात समाजाभिमुख वकिली व शोषीतांसाठी रचनात्मक काम करण्यासाठी उच्चशिक्षण फायदेशीर ठरेल असे वाटले. म्हणून त्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली.
चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसारखं माझ्याही आई-वडिलांनी बालपणापासूनच माझ्यासमोर बाबासाहेबांना शैक्षणिक आयडॉल म्हणून उभं केलं होतं. 'मोठं होऊन बाबासाहेबांसारखं व्हायचं आहे, तसंच परदेशात जाऊन शिकायचं आहे. देशासाठी काम करायचं आहे.' हे मनात इतकं कोरलं गेलेलं की आपण एक दिवस उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहोत, हे ठरलं होतच. पण मला ज्यावेळी या शिक्षणाची गरज वाटली, स्वतःला जाणवलं की मी आता विदेशात जाण्यासाठी तयार झालो आहे तेव्हाच हा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तयारी केली. शिष्यवृत्तीच्या प्रवासात शक्य होईल त्या सगळ्यांकडून मदत घेतली. विशाल ठाकरे, प्रवीण निकम, अनुराग भास्कर, राजू केंद्रे, ऑक्सफर्ड विद्यापीठातील असंग वानखेडे व मर्याम असलन, गौरव सोमवंशी या सोबतच अनेकांनी वेगवेगळ्या अर्ज प्रक्रियेत व त्या बाबतचा निर्णय घेण्यात खूप मदत केली. राजू केंद्रे यांच्या संपर्कातून पवन कुमार यांची ओळख झाली. त्यांनी इरासम्सच्या अर्जासाठी मदत केली.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मुद्दा मांडणे मला महत्वाचा वाटतो; उच्चशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे म्हणत असताना, परदेशातच जाऊनच उच्च शिक्षण घ्यावे असा पायंडा रचला जात असेल तर तो पूर्णपणे बरोबर आहे, असे मला वाटत नाही. मला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले. जेव्हा मी त्यांच्यासोबत बोललो तेव्हा त्यातील अनेकांना पुढे काय करायचं आहे किंवा परदेशात का जायचं आहे याची ध्येयनिश्चिती नाही. ज्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे त्यातला फारसा अनुभव किंवा काही प्रत्यक्ष काम सुद्धा नाही. बहुजन समाजातील मुलं बाहेर जाण्याचा विचार करत आहेत, ही अत्यंत महत्वाची बाब असली तरी परदेशी उच्च शिक्षणाचं Glorification तर होत नाही आहे ना; ज्याचा त्रास आपल्याच विद्यार्थ्यांना होईल, हा विचार केला पाहिजे. कारण विद्यापीठात निवड न झाल्याने मुलांना खचतांना, डिप्रेशनमध्ये जातांना बघितले व ऐकले आहे.
अनेक विद्यार्थी हे ही विचारत होते की विदेशातल्या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी मी काय काम करणं अपेक्षित आहे? मला वाटते की ही काही स्पर्धा परीक्षा नाही, की ज्यात कुठल्या पदासाठी ठराविक Syllabus वाचून आपली यासाठी निवड होईल. उच्च शिक्षण एक प्रक्रिया आहे. त्याची गरज आहे की नाही हे स्वतःला जाणवत असते. आपण काहीतरी ठराविक काम करून मग ही शिष्यवृत्ती आपल्याला मिळेल म्हणून आपण ते काम करावे असं वाटत असेल तर आपण चुकतोय असं वाटते. आपण आधीपासून एखाद्या विषयाच्या अनुषंगाने करत असलेले काम, त्यातून मिळालेला अनुभव आणि पुढची ठरत असलेली दिशा आपल्याला या उच्च शिक्षणासाठीच्या नामांकित विद्यापीठ किंवा शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी मदत करत असते. आपल्याला का जायचे आहे, हे क्लिअर असेल तर मग काही अडचण नाही. माझे कायद्याचे शिक्षण झाल्यावर मला या प्रक्रियेबद्दल थोडीफार माहिती होती. त्या भरोशावर मी अर्ज सुद्धा केला असता. पण मी त्यासाठी तयार आहे, असे मला अजिबात वाटले नाही. मी दोन वर्षे अनुभव घेतला. मगच या दृष्टीने विचार केला. मला आलेला अनुभव आणि त्यातून आलेला हा विचार आहे. तो पूर्णपणे बरोबरच असेल असे काही माझे मत नाही. पण त्यावर विचार व्हावा, एवढी अपेक्षा मात्र नक्कीच आहे. आपल्याकडे प्रचंड पोटेन्शीअल आहे. व्यवस्थेने संधी नाकारली म्हणून आपण बऱ्याच जागी मुकलो. आता आपल्याकडे माहितीचे ऍक्सेस आहे म्हणून उपलब्ध असलेल्या नवनवीन संधी माहिती होत चालल्या आहेत. ते आपल्या विद्यार्थ्यांनी नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजे. फक्त ते कसं करायचं याची योग्य स्ट्रॅटेजि ठरवणे गरजेचे आहे. करायचं म्हणून करायचं असेल तर त्याला काही अर्थ नाही.
ऑगस्ट महिन्यात मी स्विडनला जाणार आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेकांनी मदत केली. ठामपणे उभे राहण्याचे बळ दिले. प्रामुख्याने समाजाभिमुख काम करतांना घरच्यांनी कधीही थांबवले नाही. माझ्या प्रत्येक कार्याला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. राउंडटेबलच्या माध्यमातून मिळालेल्या मित्रांमुळे वैचारिक जडणघडणीत मदत झाली. चळवळीतील सहकाऱ्यांनी सुद्धा कायमच प्रोत्साहन दिले. माझं हे यश प्रत्येकाला आपलंस वाटू लागलं, यापेक्षा मोठी उपलब्धी कुठली असू शकत नाही.
येणाऱ्या काळात शोषित, पीडित, वंचित घटकांना अनेक अंगानी सक्षम करण्यासाठी काम करायचं आहे. व्यवस्थेच्या नियोजित शोषणाचे षडयंत्र मोडीत काढण्यासाठी रचनात्मक काम उभं करून स्ट्रॅटेजिकली लढायचं आहे. त्यासाठी आधी मला स्वतः तयार होणे गरजेचे आहे. या सगळ्या दृष्टीने पुढील प्रवास दिशा ठरविण्यासाठी आणि स्वतःला सक्षम बनविण्यासाठी महत्वाचा असेल असे वाटते. या प्रवासात फुले, शाहू, आंबेडकर कायमच प्रेरणास्रोत म्हणून सोबत होते आणि राहतीलही. आपण ठेवलेला विश्वास आणि व्यक्त केलेल्या अपेक्षेवर खरा उतरण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहील. जय भीम!