झुंड मधील नागराज अण्णाच्या 'गड्डीगोदाम'ने भिरकावलाय संघर्षाचा फुटबॉल...!

झुंड चित्रपट खरंच समाजाचा आरसा आहे का? सरकारच्या चुकीच्या धोरणावर हा चित्रपट खरंच प्रहार करतो का? झुंड कोणाचं प्रतिनिधीत्व करतो वाचा अशोक बनकर यांचा लेख;

Update: 2022-03-08 02:39 GMT

आटपाट नगरातून विस्तवा सारख्या वास्तवाला जगासमोर जसं च्या तस उतरवण्याच कसब नागराज अण्णामध्ये आहे हे आपण पिस्तुल्या,फॅन्ड्री, सैराट या चित्रपटामधून बघत आलोय आणि हे वास्तव रोजच्या जगण्यातून तुम्ही,आम्ही अनुभवतोय देखील. म्हणुन असलं जीवन जगणाऱ्या माझ्या तमाम दोस्तांना नागराज अण्णा सखा वाटतो.

'झुंड' मधून तर माझ्या सख्याने माञ, कहरच केला. व्यवस्थेच्या कानफाडात अशी मारली की जाळ अन् धूर संगच काढला. ह्या प्रस्थापित चित्रपटाच्या दुनियेत नेहमी नटून थटून अभिनय करणाऱ्या रंगीबेरंगी रंगात रंगलेल्या मराठी व बॉलिवुड इंडस्ट्री ला विसर पडलेल्या बेरंग म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या कलाकारांना आपलं कसब जगासमोर मांडत अभिमानाने पुढं आणणे हे माञ नागराज अण्णाच करू शकतो.

ज्या अमिताभ ला बॉलिवूड चा 'बिग बी' म्हटलं जातं त्याला झोपडपट्टीत जन्मलेला अंकुश आणि ही सर्व झुंड कशी 'बिग बी' आहे हे दाखवून दिलं. नेते मंडळींनी ही झोपडपट्टी विकासाच्या नावावर फक्त वोटबँक म्हणून नेहमी वापरली. आणि निवडणुकांचा खेळ रचत तरुणाईच्या हातात पेन ऐवजी दारूची बॉटल दिली आणि व्यसनाच्या खाईमध्ये त्यांचं भविष्य कुस्करून टाकलं. हया कुस्ककरलेल्या आयुष्याना संघर्षाची वाट दाखवीत शिव, फुले, शाहू आंबेडकर सांगत संघर्षमय ' जय शिवाजी जय भीम' ची हाक दिली.

एप्रिल महिना लागला की सकाळी सकाळी 'भिम अमृतवाणी' वाजण्याचा आवाज कानी पडतो. साऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लहानथोराचां एकच विषय तो म्हणजे यंदाची भीमजयंती लै जल्लोषात साजरी करायची..

अन् मग चर्चा होतात. वर्गणी जमा करण्यासाठी एक टीम फिरते. भीम जयंती उत्सव समिती चा अध्यक्ष आपण काहीतरी नवीन करावं म्हणून इचारात असतो. गावच्या येशीच्या आत राहणाऱ्या पेक्षा सरस जयंती आपल्या बापाची व्हावी म्हणून चुरस लागलेली असते. मिरवणूक अख्ख्या गावातून काढायची,गाण्यावर ताल धरून आनंदाने बाया बापड्या पासून ते सगळी चिले पिले नाचतात.

हा सगळा माहोल नागराज अण्णाने अजय अतुलच्या 'लफडा झाला' या गाण्यातून उभा केला. पण याच माहोला बरोबर विचारांची जयंती साजरी व्हावी म्हणून तुम्हा आम्हाला प्रश्नही विचारलाय की महापुरुषांची जयंतीला फक्त वर्गणी देऊन महापुरुषांचे विचार घराघरात पोहचणार आहे का.?

अलीकडे नागरिकता सिद्ध करणारे फतवे सरकार काढत होती. हया प्रश्नावरून अख्खा देश पेटला होता मुस्लिम समुदायाने यात प्रामख्याने भूमिका साकारून गाव खेडी ते शहराशहरात शाहीन बाग नावाचं जन आंदोलन उभं केेलं होतं. देशासाठी नागरिकता कायदा करणाऱ्या सरकारच्या डोक्याला थाळ्यावर आणण्यासाठी एका छोट्या चिमुकल्या लेकराने केलेल्या प्रश्नातून 'ये भारत क्या है' म्हणत वार केलाय. इथला आदिवासी, दलित,मुस्लिम जगण्या मरण्याच्या प्रश्नांचा आजही सामना करतोय त्याला कुठं कागदपत्रांपर्यंत ह्या व्यवस्थेने पोहचू दिलंय आणि जो पोहचतो त्याला सतराशे साठ लांडगे आडवे येतात जसं की चित्रपटात दाखवलेल्या पोलिस पाटील...!

त्या पोलिस पाटलाच्या नजरेतून गावाचा नागरिक नसल्याचा फैसला सूनवणाऱ्या अशा प्रत्येक मानसिकतेला ठोस सवाल विचारत सरकारच्या विखारी धोरणावर बोट ठेवलंय...

झुंड मधील कलाकारांनी अभिनय तर एकदम खराखुरा केलाय तो झोपडपट्टीतला करारी आवाज, नेहमी भेदक नजर घेऊन जगणारी हे माझे सवंगडी आहेत. अण्णा एका सवांगड्याची कमी माञ राहिलीय असं मला वाटतंय तो म्हणजे

झोपडपट्टीला अभ्यासू मुलगा हे कॅरेक्टर जर असतं तर अजुन भन्नाट दिशा आली असती असं मला वाटतं.

बाकी माय झोपडपट्टी तू आम्हाला डरकाळी फोडणारा पँथर दिला

तसाच आमचं जगणं मांडणारा नागराजही दिला

झुंड तर आहेच पण आता टीम च्या दिशेने संघर्षाचा प्रवास सुरू झालाय...!

(टीप:- चित्रपट गृह हाऊसफुल्ल व्हावा म्हणून झुंडीने जा आणि एक मजबूत टीम बनून बाहेर...)

अशोक बनकर

Tags:    

Similar News