नेत्यांचं दैवीकरण करणं हे लोकशाहीसाठी धोकादायक

राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असताना, रोज नवे वाद उकरून काढले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेत्यांचे दैवीकरण लोकशाही पुढील धोका असल्याचं म्हटलं होतं. केतकी प्रकरणाच्या निमित्ताने कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांनी हा धोका अधोरेखित केला आहे..;

Update: 2022-05-16 07:00 GMT

केतकी चितळेमुळे आपल्या मूलभूत प्रश्नांना तर बगल दिली जात नाहीये ना ? याचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. कारण अलीकडे महाराष्ट्रातील राजकारण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की कुठल्याही पक्षाची व्यक्ती असो किंवा कुठला सिने अभिनेता/अभिनेत्री असो किंवा एखादा सामाजिक व्यक्ती असो ही सगळी लोकं प्रत्येकाने आपआपला डाव वाटून घेतल्यासारखं वागत आहेत. एकाचा झाला की एक. मध्ये खंड पडू न देता अविरतपणे ठरवून खेळला जाणारा डाव ही सर्व राजकीय पक्ष जनतेशी खेळत आहेत. आणि जनतेला असं भासवून दिलं जात आहे की हा आमक्या पक्षाचा व्यक्ती खूप नीच तो खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलतो, तो तमक्या पक्षाचा तमका लय नीच.. हा आमका पक्ष असा तो तमका पक्ष तसा. जनतेचा सगळा वैचारिक गोंधळ करून टाकला आहे. प्रत्येक जण आपआपला राखून ठेवलेला प्यादा एक एक करून बाहेर काढत आहेत. यामुळे जनतेला चर्चेसाठी , त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असली प्रकरणं सतत चालू ठेवली जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये आपले मूलभूत प्रश्न तर बाजूला सारले जात नाहीये ना किंवा त्यावरून आपलं दुर्लक्ष तर केलं जात नाहीये ना हे तपासून पाहिलं पाहिजे. सध्याची भारताची परिस्थिती इतकी बेकार झाली असताना यावरून जनतेचं लक्ष भरकटवण्याचं काम सर्व पातळीवर चालू आहे.

केतकी चितळेनी जी काव्यरूपी टिका शरद पवार यांच्यावर केली त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल झाला, तिला महिला कार्यकर्त्यांनी मारहाण सुद्धा केली. तिला खालच्या पातळीवर जाऊन शिव्या सुध्दा देण्यात आल्या. दुसर्याने केलेली कविता तिने शेअर केली होती. या टीकात्मक काव्यामुळे केतकीवर जी गौरवात्मक फुलं उधळली गेली ती या ठिकाणी देता सुद्धा येणार नाहीत. आणि वाचता सुद्धा येणार नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण तर गलिच्छ झालंच आहे पण त्यात जनतेला सुद्धा गोवण्यात आलं आहे. केतकी चितळेचा निषेध करण्यासाठी ज्यांनी फेसबुकवर अविरतपणे पोटतिडकीने पोस्ट शेअर केल्या, त्या लिहिल्या, त्याच लोकांना महागाई विरोधात असं महाराष्ट्रव्यापी निषेधात्मक काही का करता आलं नाही ?

याच लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा विषयी आवाज का उठवता आला नाही ? याची कारणं शोधण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा टिका करण्याचा मूलभूत अधिकार आहे. केतकीने तिचा लोकशाहीने तिला दिलेला अधिकार बजावला. लोकशाहीमध्ये तुम्ही टिका करण्याचे प्यारामिटर्स नाही ठरवू शकत. एखादी व्यक्ती तुम्हाला मोठा वाटत असेल याचा अर्थ असा नाही की तो दुसर्यांना ही मोठा वाटावा. या देशात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच मत व्यक्त करण्याचा, समर्थन करण्याचा , निषेध करण्याचा किंवा कुठलीच भूमिका न घेण्याचा सुद्धा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आपल्याला एखादा व्यक्ती ग्रेट वाटतो याचा अर्थ असा नाही कि तो दुसर्यांना ही ग्रेट वाटावा. एखादा समूह एखाद्याचा जय जय कार करतो याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या एखाद्या समूहाने सुद्धा त्या व्यक्तीचा जय जय कार करावा. प्रत्येक समूहाला दुसऱ्या पेक्षा त्यांचा स्वतंत्र विचार, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी मी हा विषय एका वेगळ्या पद्धतीने मांडतोय याचा अर्थ असा नाही कि मी केतकीचं समर्थन करतोय. आणि पवार साहेबांचा द्वेष करतोय. तर तसे अजिबात नाही. केतकीचा निषेधच आहे पण फक्त केतकीचाच का निषेध ? केतकी सारखेच अजून काही घटक आहेत जे महाराष्ट्राचं राजकारण दूषित करत आहे त्यांचं काय करायचं. केतकीने पवार साहेबांवर केलेल्या टिकेमुळे तिला खालच्या पातळीवर जाऊन ज्या लोकांनी शिव्या दिल्या त्या लोकांचा निषेध कोण करणार ?

ज्या प्रकारे पवार साहेबांना इज्जत आहे तशी ती केतकीला नाही का ? तिला तिचा मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही का ? तिला शरद पवार यांच्या वर टिका करण्याचा अधिकार नाही का? तुम्ही शरद पवार यांना मानता म्हणून तिने पण त्यांना मानावे का ? आणि तिने जर शरद पवार यांना मानले तर ती खूप चांगली नाहीतर ती खूप नालायक असं म्हणायचं आहे का भक्तांना ? भक्त सगळीकडे आहेत कुणा एका पक्षाकडे भक्तांची मक्तेदारी नाही. पवार साहेबांचा या देशाच्या प्रगतीत, महाराष्ट्राच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे. हे सर्वश्रुत आहे. ते ग्रेट आहेतच, हुशार चालाक राजकारणी आहेतच त्यात माझं कसलंच दुमत नाही. पण त्याचबरोबर त्यांचं जीवन हे सामाजिक आहे. त्यांना जनतेच्या कौतुकाला ही सामोरं जावा लागणार आहे आणि रोषाला/ टीकेला ही सामोरं जावं लागणार आहे. मोदी सरकारच्या काळात ज्या ज्या लोकांनी मोदींवर, भाजपवर टिका केली त्या सर्व लोकांवर मोदी सरकारने कारवाई केली. त्यांच्यावर केसेस केल्या. आता त्याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. मोदी सरकारवर टिका करता करता ते सुद्धा तसे वागायला लागले आहेत हे अजून त्यांच्या लक्षात आलं नाही का ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःला संविधानाचे पुरस्कर्ते म्हणवून घेतात मग त्यांना केतकीचा संविधानिक अधिकार का खुपतो ? जसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना मोदींना शिव्या देण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार केतकीला पवार साहेबांवर टिका करण्याचा नाही का?

नेत्यांचं दैवी करण करणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असते मग आपण पवार साहेबांचं दैवी करण करत नाही का ? आपल्याला पवार साहेबांवर केलेली टिका का सहन होत नाही. किंवा केतकी सारख्या लोकांचा निषेध करून स्वतःची पक्ष निष्ठा दाखवायची असते का ? ज्या ज्या नेत्यांनी देशाचं वाटोळं केलं आहे त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही आणि ज्या नेत्यांनी देशाचं हित पाहिलं आहे , जनतेचं कल्याण केलं आहे त्या नेत्यांचा गौरव इतिहास केल्याशिवाय राहणार नाही. या अस्मितेच्या , व्यक्ती निष्ठेच्या राजकारणातून आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे. त्याशिवाय आपण सुवर्णमध्य गाठू शकत नाही. हा सुवर्णमध्य गाठण्याची सर्व जवाबदारी ही "आम्ही भारताचे लोक" यांची आहे. हेच भारताचे भाग्यविधाते आहेत. हे भारताला घडवू शकतात व हेच भारताला अधोगतीला नेऊ शकतात. त्यामुळे आता यांनी ठरवायचं आहे की काय करायचं आहे ते. अस्मितेच्या, व्यक्तिनिष्ठेच्या राजकारणात गुरफटायचं कि मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करायचं!

जनतेने हे पण लक्षात घ्यावं कि महागाई वाढली असताना पवार साहेबांवर केलेल्या टिकेपेक्षा महागाईचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पेट्रोल, डिझेल, CNG चे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू महागल्या आहेत. पवार साहेबांवर केलेल्या टिकेचा निषेध तुम्ही चार पाच दिवस करताल पण महागाईमुळे खिशाला रोज बसणाऱ्या चटक्याचं काय करणार ? त्याचा निषेध कुठं करणार. कोणावर केस दाखल करणार? कोणावर शाई फेकणार ? सासू सुनेची सुद्धा एवढी भांडण होत नसतील एवढी भांडण ही महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची आपापसात चालू आहेत. याचा बंदोबस्त जनतेनी केला पाहिजे. यांचा जर बंदोबस्त होत नसेल तर जनतेने नवीन पर्याय शोधला पाहिजे.

©वैभव चौधरी

विधी विद्यार्थी, पुणे.

Email:- vaibhavchaudhari721@gmail.com

Tags:    

Similar News