ते गैरसमज नव्हते आणि सत्यही नव्हते! डॉ.रुपेश पाटकर
'तू डॉक्टर झालास म्हणून स्वतःला शहाणा समजतोस की काय? तुला सगळे मानसशास्त्र समजले असे वाटते की काय? तुला आध्यात्मिक शक्तीबाबत काहीही माहीत नाही, असो पत्र आल्यानंतर मानसशास्त्रज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी काय केलं? हे समजण्यासाठी हा लेख नक्की वाचा...;
माझी इंटर्नशिप संपल्यावर मी मनोविकार विभागात रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणून काम स्विकारले. तिथे सुमारे सहा महिने काम केल्यावर मला मानसिक आजारांविषयी बर्यापैकी माहीत झाले. सोबत माझे वाचन चालू होतेच. मी ज्या संस्थेत काम करत होतो, तिथे नव्यानेच पेशन्ट घेऊन येणार्या नातेवाईकांना मानसिक आजार, त्यांची लक्षणे, त्यांचे उपचार, पेशंटची काळजी कशी घ्यावी याबाबत काहीच माहित नसे. त्यामुळे अशी माहिती लोकांना सांगणे मला आवश्यक वाटले. म्हणून मी स्थानिक पेपरमध्ये एक लेखमाला लिहिली.
यातील लेख वाचलेली मंडळी जेव्हा मला भेटत तेव्हा माझ्या लेखांचे कौतुक करीत. या लेखामुळे नव्या गोष्टी कळल्याचे आणि मानसिक आजारांकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याचे आवर्जून सांगत. त्यामुळे माझ्यासारख्या नवोदिताला उमेद मिळे.
ही गोष्ट 1998 सालची. त्यावेळी मोबाईल सर्रास वापरात आले नव्हते. लँडलाईन टेलिफोन होते, पण बराचसा व्यवहार प्रत्यक्ष भेटीत किवा पत्रावाटे होत असे. या लेखमालेचे पाच लेख छापून आल्यावर मला एक पत्र आले. त्यातील मजकूर मला फैलावर घेणारा होता. आता मला शब्दशः आठवत नाही. पण त्याचा आशय थोडक्यात असा होता, 'तू डॉक्टर झालास म्हणून स्वतःला शहाणा समजतोस की काय? तुला सगळे मानसशास्त्र समजले असे वाटते की काय? तुला आध्यात्मिक शक्तीबाबत काहीही माहीत नाही. मी मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या साडेपाचशे प्रश्नांना उत्तरे देऊन गप्प केले आहे. (त्यांनी पत्रात ज्या प्रसिद्ध डॉक्टरांचा उल्लेख केला होता, ते मी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू लागलो तेव्हा आम्हाला व्याख्याने द्यायला येत.) मी सिद्ध पुरुष आहे. साक्षात परमात्मा आहे, देह मात्र श्रीमान भाऊसाहेब यांचा.' जवळपास फुलस्केपची चार पाने भरून मजकूर होता. आणि सर्व मजकूर मला फैलावर घेणारा होता. आणि शेवटी एक सल्ला होता की 'तुला जर खरे मानसशास्त्र जाणून घ्यायचे असेल तर मला येऊन भेट.'
खरे म्हणजे मी माझ्या लेखात कुठेही देव, अध्यात्म, धर्मग्रंथ याबाबत चकार उल्लेख केला नव्हता. म्हणजे टीकेचा तर प्रश्नंच नव्हता. मी ज्या केसेस लेखात दाखला म्हणून देत असे त्या मी काम करत असलेल्या संस्थेत मला भेटलेल्या होत्या. त्यामुळे मला त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे आश्चर्य वाटले आणि थोडी भीती देखील. मी ते पत्र आणि पेपरमध्ये छापून आलेले माझे लेख, ज्यांच्या हाताखाली मी काम करत होतो, त्या कन्सल्टंटना नेऊन दाखवले. वाचता वाचता ते हसू लागले आणि म्हणाले, 'हा भ्रमाचा आजार असलेला माणूस आहे! त्याला आपण देव आहोत असे वाटतेय. तो पेशन्ट आहे. त्याच्याकडे सहानुभूतीने बघ.' मी त्यांचे ऐकून थोडा रिलॅक्स झालो.
पण मेडिकल कॉलेजच्या नेहमीच्या स्टाईलने कन्सल्टंटनी विचारले की
"भ्रमाची व्याख्या काय?"
'भ्रम' शब्द मी अर्थातच त्यापूर्वी अनेकदा ऐकला होता. मला त्याचा अर्थ 'गैरसमज' असावा असे वाटे, त्यामुळे मी म्हणालो, 'गैरसमज!' त्यावर त्यांनी विचारले, 'गैरसमज ठीक करता येतो का?' मी थोडा विचार केला आणि म्हणालो,
'हो.' त्यावर कन्सल्टंट विचारले, 'म्हणजे भ्रम देखील ठीक करता येईल ना?'
'हो,' मी उतरलो.
'कसा?'
'ज्याला भ्रम झालाय त्याला त्याच्या विरुद्ध पुरावा देऊन,' मी म्हणालो.
'समजा तुला पत्र लिहिणारे महाशय तुला भेटायला आले आणि म्हणाले की मी देव आहे किंवा देवाचा अवतार आहे तर तू त्यांच्या या म्हणण्याच्या विरुद्ध पुरावा काय देशील?' कन्सल्टंटनी विचारले.
त्यांनी असे विचारल्याने माझ्या लक्षात आले की माझे उत्तर चुकले आहे. मी ओशाळल्यागत हसलो. ते म्हणाले, 'गैरसमज आणि भ्रम यात फरक आहे. Misunderstanding वेगळे आणि delusion वेगळे. गैरसमज असेल तर तो पुरावा देऊन दूर करता येतो. पण भ्रम असेल तर त्या भ्रमाच्या विरुद्ध कितीही पुरावा दिला तरी तो जात नाही.'
मी हसलो, पण माझ्या मनात अजूनही शंका होती.
त्याच दिवशी राऊंडच्या वेळी ते म्हणाले, 'जर पेशंटला वाटणारी गोष्ट तो ज्या सामाजिक किंवा सांस्कृतिक परिस्थितीतून आलाय तिच्याशी सुसंगत असेल तर तो भ्रम म्हणता येणार नाही. पाचशे वर्षापूर्वी इंग्लंडमधल्या बहुतेक लोकांना चेटकीणी असतात असे ठामपणे वाटत होते. एखाद्या व्यक्तीला चेटकीण समजून ठार मारले तर ते त्यावेळच्या कायद्याला चुकीचे वाटत नव्हते. आज मात्र इंग्लंडमधील व्यक्ती 'चेटकीण असते' असे म्हणेल तर तो भ्रम असेल. त्यातही ती व्यक्ती जर जगाच्या अशा भागातून आली असेल ज्या भागात 'चेटकीणी असतात' असा बहुतांशी लोकांचा विश्वास असेल तर त्याला भ्रम म्हणता येणार नाही.'
ते असे सांगत असताना माझ्या मनात प्रश्न आला की आपल्या समाजात बहुतेक लोक देव मानतात. देवाचा माणसामध्ये संचार होतो असे देखील मानतात. मग मला पत्र लिहिणाऱ्या भाऊसाहेबांना भ्रम झाला आहे असे का म्हणावे? मी तसे कन्सल्टंटना विचारले. त्यावर ते म्हणाले, 'तुझ्या त्या भाऊसाहेबांनी फक्त देव आहे असे म्हटलेले नाही तर आपण देव आहोत असे म्हटलेले आहे. दुसरे तुझा भार येण्याविषयीचा प्रश्न बघू. आपल्या समाजात भार येतो अशी मान्यता आहे. पण केव्हा भार येतो? देवळात किवा एखाद्या पारंपरिक जागी, तेही विशिष्ट दिवशी. तो देखील, फक्त मर्यादित काही वेळ. तसे त्यांचे आहे का? नाही. त्याना आपण अवतार असल्याचे वाटतेय. आणि एक, त्यांनी त्यांच्या पत्रात आपण मुंबईतील सायकीयॅट्रीस्टच्या साडे पाचशे प्रश्नांना उत्तरे दिल्याचे लिहिले आहे. त्यांना सायकीयॅट्रीस्टकडे का नेण्यात आले असेल? कोणी सहजच सायकीयॅट्रीस्टकडे जातो का? त्यांच्या घरातल्यांना त्यांच्यात काही प्रॉब्लेम जाणवत असेल म्हणूनच ते गेले असतील ना.'
त्यानंतर काही दिवसांनी भाऊसाहेबांना घेऊन त्यांचे नातेवाईक आमच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी त्यांची चिडचिड चालू होती. त्यांना अॅडमिट करण्यात आले. वॉर्डात असताना त्यांनी अनेक पेशंटना विभूती लावून त्यांची सगळी पिडा नाहीशी केल्याचे जाहीर केले.
1999 च्या जूनात हाऊसपोस्ट करायला मी मुंबईत गेलो. माझ्या हाऊसपोस्टच्या काळात एक दिवस संध्याकाळी मला वॉर्डातून सिस्टरचा काॅल आला. सिस्टर जाम वैतागली होती. मला तिच्या वैतागण्याचे कारण समजेना.
'सिस्टर, रिलॅक्स! काय झाले?'
'तुम्ही असे पेशन्ट इथे नका अॅडमिट करत जाऊ. हे जनरल हॉस्पिटल आहे. त्यांना सांगा मेंटल हॉस्पिटलमध्ये जा म्हणून,' सिस्टर म्हणाली.
'पण झाले तरी काय?'
'तीन नंबर बेडवरचा पेशन्ट. त्याने काल अॅडमिट झाल्यापासून दोन वेळा कपड्यात संडास केलाय,' सिस्टर म्हणाली.
मी त्याच्या बेडकडे गेलो. दुर्गंधी येत होती. मी सिस्टरचा त्रागा समजू शकत होता.
आदल्याच दिवशी पंचवीशीचा जितेश ॲडमिट केला होता. त्याला स्किझोफ्रेनिया होता. मी त्याच्याजवळ जाऊन विचारले, 'पोटात बिघडले आहे का?'
तो म्हणाला, 'नही तो!'
'संडास होईल हे आधी कळत नाही का?'
'नही तो!'
'फिर कपडे मे संडास कैसे होता है?'
त्यावर त्याने मलाच विचारले, 'संडास किया तो नरक मे जाता है ना?'
तितक्यात त्याची वयस्क आई म्हणाली, 'उसे लगता है की संडास किया तो इन्सान नरक मे जाता है. इसलिये वो संडास करने नही जाता. फिर कपडे मे होता है.'
'संडास केला तर नरकात जावे लागते' हाच त्याचा भ्रम होता. त्याचा तो भ्रम औषधांनी नियंत्रणात यायला आणखी आठ दिवस गेले.
2002 च्या ऑगस्टात मी गावी परत आलो आणि प्रॅक्टिस सुरू केली. माझ्या प्रॅक्टिसला जेमतेम दोन महीने झाले असतील. एक दिवस आपल्या 30 वर्षांच्या नवर्याला घेऊन जवळच्या खेडेगावातील एक बाई माझ्या ओपीडीत आली. तिचा नवरा तिच्यावर चारित्र्यवरून संशय घेई. कितीही पटवून दिले तरी त्याचा तिच्यावरचा संशय जात नसल्याचे तिने सांगितले. तिच्यासोबत तिची सासू आणि नऊ वर्षांचा मुलगा देखील आला होता. तिच्या सासूनेदेखील आपल्या मुलाचा संशय निर्रथक असल्याचे आणि तो उगीचच कारण नसताना संशय घेत असल्याचे सांगितले.
"तुम्हाला काही त्रास आहे का?" मी त्याला विचारले.
"हो. बायकोच्या वागण्यामुळे मला टेन्शन येते. शांतपणे झोप पण लागत नाही," तो म्हणाला.
त्याची तक्रार बायकोच्या वागण्यामुळे टेंशन येत असल्याची होती. मी तोच दुवा पकडून त्याला औषध घेण्यास राजी केले. पंधरा दिवसांनी तो बायकोसोबत फॉलोअपला आला. त्याच्या वागण्यात खूप चांगला बदल झाल्याचे त्याच्या बायकोने सांगितले. त्यानंतर सहा महिन्यांनी त्याची बायको जुना केसपेपर घेऊन आली. ती म्हणाली की 'दुसर्या भेटीनंतर त्याने औषध थांबवले. चार महिने व्यवस्थित होता. त्यानंतर पुन्हा त्याचे संशय घेणे सुरू झाले. ती विहिरीवर पाणी भरायला गेली तरी मागून येई.' मी तिला जेवणात मिक्स करून द्यायचे औषधाचे ड्रॉप लिहून दिले. चारच दिवसात ती पुन्हा आली.
'काय झाले?'
'तो माझ्या हातचे काहीच खात नाही. त्यामुळे औषध देणे अशक्य आहे. खूपच त्रास करतो. तुम्ही त्याला अॅडमिट करा,' ती काकुळतीला येऊन म्हणाली.
माझ्याकडे ॲडमिशनची सोय नव्हती. त्याला मॅजिस्ट्रेट ऑर्डरने मेंटल हॉस्पिटलला अॅडमिट करणे हाच उपाय होता. मी तिला पोलिसांची मदत घेऊन त्याला मॅजिस्ट्रेटच्या पुढ्यात नेऊन ऑर्डर घेण्यास सुचवले. मी तिला माझे सर्टिफिकेटदेखील दिले आणि पोलिसात द्यायचा अर्जदेखील लिहून दिला.
दुसर्या दिवशी तिने मला कॉल केला. पोलीसांनी तिचा अर्ज घेतला नाही आणि वर हे घरगुती मॅटर असल्याचे सांगून तिला परत पाठवून दिले. मी तिच्यासोबत पोलिसांना भेटण्याची तयारी दाखवली आणि तिला दुसर्या दिवशी बोलावले. ती आली नाही. मीदेखील हा विषय विसरून गेलो.
त्यानंतर आठवड्याने पेपरात बातमी आली. तिचा तिच्या नवर्याने खून केल्याची ती बातमी होती. मला कसेसेच झाले. ज्या दिवशी तिचा खून झाला, त्या दिवशी चादर विकणारा फेरीवाला तिच्या घराजवळून गेला. नवरा म्हणाला, तो त्याच्याकडे बघून कुत्सित हसला. म्हणजे तिचे आणि त्या फेरीवाल्याचे संबंध असणार. तिने परोपरीने नवर्याला सांगितले. पण त्याचा विश्वास बसेना. त्याने तिला देवार्यातील फुल उचलून शप्पथ घ्यायला सांगितले. तिने फुल उचलून शप्पथ घेतली. पण त्याचे समाधान झाले नाही. त्याने तिला तुळशीच्या पुढ्यात साष्टांग नमस्कार करायला सांगितले. तिने तसे करताच त्याने तिच्यावर तडाखा दिला. त्याची काठी तिच्या मानेवर बसली आणि ती वारली.ही टाळण्यासारखी गोष्ट होती. पोलिसांनी तिच्या अर्जाची दखल घेतली असती तर ती वाचली असती.
त्या नंतर भ्रमचा त्रास असलेले अनेक पेशंट मला भेटले. त्यातील राकेशचा भ्रम खूपच वेगळा होता. अठ्ठावीस वर्षांच्या राकेशला घेऊन त्याचे आईवडील अशी तक्रार घेऊन आले की त्याने आदल्या दिवशी घरातला टीव्ही फोडला. घरात कोणीही त्याला त्या दिवशी त्रास दिला नव्हता. त्याला राग येईल असे कोणीही वागले नव्हते, असे त्याचे आईबाबा सांगत होते.
'काय झाले राकेश?' मी विचारले.
त्यावर तो म्हणाला, 'टीव्हीवर माझ्याचबद्दल बोलतात. म्हणून रागाने फोडला टीव्ही.'
राकेशच्या भ्रमाला 'डिल्यूजन ऑफ रेफरन्स' म्हणतात. यात पेशंटला टीव्ही रेडीओ वगैरेवर आपल्याच उद्देशून बोलतात असे वाटते. हा राकेश भौतिकशास्त्रात मास्टर डिग्री केलेला मुलगा होता. पण तरीही त्याला त्याच्या भ्रमातील अतार्किकता समजत नव्हती.
आणखी एक भ्रम आहे, ज्याला 'डिल्यूजन ऑफ मिसआयडेंटीफीकेशन' म्हणतात. सीमाला हा भ्रम होता. मला ती म्हणाली, 'माझे आईबाबा हे खरे नाहीत. ते माझ्या खऱ्या आईवडिलांची रूपे घेतलेले कोणी वेगळेच लोक आहेत.'
आईवर जिवापाड प्रेम करणारी सीमा आईला आपल्या खोलीत येऊ देईना. येरवी वडिलांशी गप्पा करणारी सीमा आता त्यांना पुढ्यातही बघून घेत नसे.
काही महिन्यापूर्वी 22 वर्षांच्या एम.ए. करणार्या अशोकला घेऊन त्याचे बाबा माझ्याकडे आले. त्या दिवशी खूप पेशन्ट होते. त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहून तो रिक्षेतून उतरेना. शेवटी त्याच्या बाबांनी त्याला रिक्षेतून उतरवले. पण तो व्हरांड्यात न येता माझ्या घराच्या मागच्या पडवीत जाऊन बसला. सगळे पेशन्ट गेल्यावरच तो पुढे आला. त्याला त्याचे बाबा आत घेऊन आले. त्याच्या चेहर्यावरून तो एकदम भांबावलेला आहे हे कळत होते. तो माझ्या समोरील खुर्चीत बसुन रडू लागला. 'बाबा, घरी जाऊया,' असे एखाद्या छोट्या मुलासारखे तो म्हणू लागला.
'काय त्रास होतो?' मी विचारले.
माझ्या प्रश्नावर त्याने आपल्या बाबांकडे पाहिले. त्याला आश्वासित करत ते म्हणाले, "सांग डॉक्टरना. ते तुला बरे करतील.
"माझ्या मनातले इतरांना कळते. म्हणून मी कोणाच्याच पुढ्यात जात नाही," तो म्हणाला.
"असे शक्य नाही, हे सांगून सुद्धा त्याला पटत नाही. तो घरातून बाहेरच पडत नाही. गेल्या महिन्यापासून तो कॉलेजमध्येही गेलेला नाही. कोणी पाहुणे आले तरी बाहेर येणार नाही. डॉक्टर, असे आपल्या मनातले कधी दुसर्याला काळू शकते का? काहीतरीच याचे."
अशोकच्या भ्रमाला 'डिल्यूजन ऑफ ब्रॉडकास्टिंग' म्हणतात.
गेल्या वर्षी मी गोव्यातील हॉस्पिटलमध्ये जाॅब करत असताना मिस्टर जॅकना त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरनी रिफर केले होते. ते त्या डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन आले. चिठ्ठीत जॅकना टेन्शन आणि डिप्रेशनचा त्रास असल्याचे म्हटले होते. मी जेव्हा जॅकना काय त्रास आहे म्हणून विचारले तेव्हा ते म्हणाले,"जे मला वाईट बोलतात, त्यांचे वाटोळे होते. त्यामुळे मी कोणाशीच बोलायला जात नाही. मी घरी एकटाच असतो."
"तुमचे कुटुंबीय?"
"बायको बदफैली होती. त्यामुळे मी तिला घालवून दिले. ती मुलीला घेऊन गेली."
"तुम्हाला उद्देशून वाईट बोलणार्याचे नुकसान होते, असे तुम्हाला का वाटते?"
"मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करी, तेव्हा माझ्यासोबत एक शिक्षक होता. तो कम्युनिस्ट होता. एक दिवस तो मला वाईट बोलला. त्याची शिक्षा म्हणून सोविएत युनियन कोसळले."
पुष्पाताईचा भ्रम आणखी वेगळा होता. त्यांना घेऊन त्यांचे यजमान आले. त्यांना इएनटी स्पेशालिस्टने म्हणजे कान-नाक-घसा यांच्या तज्ञाने रिफर केले होते. आतापर्यंत केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट पुढे करत त्या म्हणाल्या, 'डॉक्टर, माझ्या कानातून चार पाच बारीक भुंगुर्डे (पतंग) मेंदूत गेले आहेत. त्याचा त्रास आहे.'
त्यांचे रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांचा एमआरआय देखील करण्यात आला होता. तोदेखील नॉर्मल होता. पण त्यांना ठामपणे असे वाटत होते की ते पतंग तिथेच आहेत.
'ते तसे असते तर एमआरआयमध्ये दिसले असते ना. आणि कानातून मेंदू पर्यंत वाट नसते,' मी म्हणालो. पण तिला पटतच नव्हते. औषधोपचार सुरू केल्यानंतर मात्र त्यांचा तो भ्रम कमी होत गेला.
पुष्पाताई भेटल्या त्याच काळात एक जोडपे माझ्याकडे आले. ते सोबत एक रेफरन्स पत्र घेऊन आले होते. त्यांनी ते माझ्या हातात दिले. मी ते उघडून बघताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते रेफरन्स पत्र कोणाही डॉक्टरकडून आले नव्हते. तर एका धार्मिक बाबांकडून आले होते. त्यात लिहिले होते की "मी या पेशंटचा जो काही दैवी त्रास होता त्यावर उपाय केलेला आहे. तुम्ही तुमचे औषधोपचार करा. त्यांना तुमच्या हातगुणामुळे बरे वाटेल." माझ्यासाठी हे खूप सुखद होते. पण मुळात त्यांच्याकडे गेलेल्या पेशंटला त्यांनी माझ्याकडे का पाठवले, याचे मला कुतूहल वाटत होते. त्यासाठी मी त्या बाबांना भेटायचे ठरवले. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की "आमच्या गावातील एक पेशन्ट ज्याला असा भ्रम होता की त्याच्या डोक्याच्या कवठीत मेंदू नाहिये, ती रिकामी आहे. मी त्याचे दैवी दोष काढून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो बरा झाला नाही. नंतर
तो तुमच्याकडे आला आणि बरा झाला."
मला त्या बाबांचे कौतुक वाटले. कारण मला भेटलेले हे पहिलेच धार्मिक बाबा होते, ज्यांना मानसिक आजारांच्या कारणांबद्दल 'गैरसमज' होता, पण 'भ्रम' नव्हता. म्हणूनच जेव्हा त्यांना त्यांच्या मताच्या विरुद्ध पुरावा मिळाला, तेव्हा त्यांनी आपला गैरसमज दूर केला आणि हे त्यांच्या कृतीतून दिसले.
आजच्या जगात जिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले जातात अशा काळात एक धार्मिक बाबा आपली मर्यादा स्वीकारण्याचा प्रांजळपणा दाखवतात, ही आश्वसक बाब आहे!