सोशल मीडियातील लोकप्रियता किती खरी किती खोटी?

देशात एकाच व्यक्तीचा डंका वाजवला जातोय. त्या व्यक्तिशिवाय मीडियामध्ये दुसरे कोणीच नसते. फक्त त्या एकाच व्यक्तीची सगळीकडे वाह वाह असते. ती व्यक्ती खरंच फेसबुकवर लोकप्रिय आहे का याची पडताळणी केली आहे कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांनी...;

Update: 2022-05-26 04:45 GMT

नेपोलिऑनकॅटच्या सर्व्हेनुसार भारतात 2021 पर्यंत 39.7 कोटी लोक फेसबुक वापरत होते. त्यातील २५ टक्के वापरकर्ते या स्त्रिया होत्या तर ७४% टक्के पुरुष होते.

आपण अंदाजे आकडेवारी म्हणून या ३९ कोटी मध्ये १० कोटी महिला फेसबुक वापरकर्त्या आहेत आणि उरलेले २९ कोटी पुरुष फेसबुक वापरकर्ते आहेत असं गृहीत धरू. यामध्ये वय वर्ष १३ पासून ते वय वर्ष ६५+ असणारे फेसबुक वापरकर्ते येतात. हे झालं भारतातील फेसबुक वापर कर्त्यांचं प्रमाण. स्वतःच्या देशातील फेसबुक वापरकर्त्या संख्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला फेसबुकवर कुठल्याही देशातील व्यक्ती फॉलो करू शकतो किंवा फेसबुकवरील कुठल्याही व्यक्तीची फॉलोअर्स संख्या खूप अधिक असू शकते! जर त्या व्यक्तीला जागतिक पातळीवर स्वीकारलं असेल तर...

सध्या आपण फक्त भारतातील फेसबुकचा वापर करणाऱ्या लोकांचा विचार करणार आहोत आणि काही तथाकथित राष्ट्रीय नेत्यांना फेसबुकवर फॉलो करणाऱ्या आकडेवारीचा आपण विचार करणार आहोत. सध्या भारतात काही तथाकथीत राष्ट्रीय नेते आहेत किंवा त्यांना आपण स्वयंघोषित किंवा पक्षघोषित किंवा सो कॉल्ड राष्ट्रीय नेते म्हणू. जे नेते सतत चर्चेचा विषय असतात ते खरंच तेवढे लोकप्रिय आहेत का? याचा आपण त्यांच्या फेसबुकवर असणाऱ्या फॉलोअर्सच्या आकडेवारीवरून अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू.

सध्या आपल्या देशात एकाच व्यक्तीचा डंका वाजवला जातोय. त्या व्यक्तीशिवाय मीडियामध्ये दुसरे कोणीच नसते. फक्त त्या एकाच व्यक्तीची सगळीकडे वाह वाह असते. ती व्यक्ती खरंच फेसबुकवर लोकप्रिय आहे का ते आपण पाहू. ती व्यक्ती तर तुमच्या लक्षात आलीच असेल, तरी पण सांगतो.

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद मोदी हे आहेत. नरेंद्र मोदी यांचे फेसबुकवर फक्त ४ कोटी ६० लाख फॉलोअर्स आहेत. म्हणजे १३८ कोटी या देशाची लोकसंख्या आहे. त्यातील फक्त ३९ कोटी लोकं फेसबुक वापरतात आणि त्या ३९ कोटी लोकांमधील फक्त ४ कोटी ६० लाख लोकं मोदींना फॉलो करतात. भारतातील ९९ कोटी जनता फेसबुक वापरत नाही किंवा त्यांना फेसबुकच माहीत नाही. यातली कुठली तरी एक शक्यता आपण खरी पकडू.

या ९९ कोटी जनतेमधील फक्त ५० कोटी जनता ही जाणीवपुर्वक फेसबुक वापरत नाहीत, असं गृहीत धरू आणि उरलेली ४९ टक्के जनतेला फेसबुकच माहीत नाही असं आपण समजू. आता इथे त्या फेसबुक वापरणाऱ्या ३९ कोटी लोकांचा ही प्रश्न नाही किंवा त्या ५० कोटी लोकांचा ही प्रश्न नाही जे जाणीवपूर्वक फेसबुक वापरत नाहीत. प्रश्न आहे त्या ४९ कोटी लोकांचा ज्या लोकांना फेसबुक माहीत नाही. म्हणजे आपण जर वरील आकडेवारी पहिली तर आपल्या लक्षात येईल की १३८ कोटी लोकसंख्या असलेला देश त्या देशात फक्त ३९ कोटी लोकसंख्या ही फेसबुक वापरते. आणि त्यातील फक्त ४ कोटी ६० लाख मोदींना फेसबुकवर फॉलो करतात. आणि उरलेले ३५ कोटी लोकसंख्या ही मोदींना फॉलो करत नाही. तळागाळातील लोकांनी जर खरंच मोदींना आपला नेता मानला आहे तर ती बाकीची उरलेली ३५ कोटी जनता मोदींना लोकप्रिय मानत नाही का?

१३८ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात फक्त ३९ कोटी लोकसंख्या फेसबुक वापरते आणि त्यातील फक्त ४ कोटी ६० लाख जनता मोदींना फॉलो करते यावरून मोदी खरंच देशातील लोकप्रिय नेते आहेत का? किंवा ते जाणीवपूर्वक प्रयत्न करून लोकप्रिय आहेत असं भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? असा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो भारतातील फेसबुकचा वापर करणाऱ्या आकडेवरून एक भयानक वस्तुस्थिती डोळ्यासमोर येते ती म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे त्या ४९ कोटी लोकांचं काय ज्यांना फेसबुक माहीत नाही. त्यांना फेसबुक माहीत नाही याचा अर्थ त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती खराब असणार? त्यांच्या घरात लाईट नसणार, टिव्ही नसणार, गावात चांगले रस्ते नसणार, शिक्षण नसणार. रोजगार नसणार, घरात दरिद्री असणार. त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे असणार. त्या लोकांना विकासाची चाहूल ही नसणार! त्याचबरोबर त्यांना मोबाइल , टीव्ही, वीज , गाड्या, इंटरनेट या गोष्टी अस्तित्वात आहेत हेच माहीत नसणार. तर्कवितर्क लावून असे अनेक वेगवेगळे निष्कर्ष आपण काढू शकतो. आधुनिकतेचा वारा ही न लागलेल्या अशा लोकांना मागे ठेवून आपण विश्वगुरु नाही होऊ शकत. वर काढलेला निष्कर्ष जर खरा असेल तर या लोकांना अंधारात ठेवून आपण कधीच प्रकाशित होऊ शकत नाही. असो आपला मुख्य विषय देशातील राष्ट्रीय नेते व लोकप्रिय नेते यांच्या लोकप्रियतेचा आढावा आपण त्यांच्या फेसबुकवरील फॉलोअर्सच्या आकडेवारी वरून काढणार आहोत. भारतातील फेसबुक वापरकर्त्यांपैकी फक्त १२ ते १३ टक्के लोकं मोदींना फॉलो करतात.

आता आपण त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या लोकप्रिय व महत्वाची जवाबदारी असलेल्या नेत्यांचे फेसबुकवरील फॉलोअर्स किती आहेत ते पाहू.

१. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे फेसबुकवर १ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत.

२. नितीन गडकरी यांचे फक्त १९ लाख फॉलोअर्स आहेत.

३. निर्मला सीतारमण यांचे फक्त ६ लाख ६० हजार फॉलोअर्स आहेत.

४. जे पी नड्डा यांचे ११ लाख फॉलोअर्स आहेत.

५. योगी आदित्यनाथ यांचे ७१ लाख फॉलोअर्स आहेत.

६. राजनाथ सिंह यांचे ६९ लाख फॉलोअर्स आहेत.

७. स्मृती इराणी यांचे ५३ लाख फॉलोअर्स आहेत.

८. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे ७ लाख ७८ हजार फॉलोअर्स आहेत.

आता आपण बाकी इतर पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असणाऱ्या नेत्यांचे व महाराष्ट्रात प्रकाश झोतात असतात त्या नेत्यांचे फेसबुक वरील फॉलोअर्स पाहू;-

१. शरद पवार यांना ८ लाख ४४ हजार फॉलोअर्स फॉलो करतात.

२. उद्धव ठाकरे यांचे ४ लाख ८ हजार फॉलोअर्स आहेत.

३.सुप्रिया सुळे यांचे १३ लाख फॉलोअर्स आहेत.

४. अजित पवार यांचे ६ लाख ७० हजार फॉलोअर्स आहेत.

५. नाना पटोले यांचे १ लाख ६९ हजार फॉलोअर्स आहेत.

६. नारायण राणे यांचे १ लाख ३२ हजार फॉलोअर्स आहेत.

७. नितेश राणे यांचे ३ लाख २० हजार फॉलोअर्स आहेत.

८. निलेश राणे यांचे ६७ हजार फॉलोअर्स आहेत.

९. संजय राऊत यांचे १ लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत.

१०. आदित्य ठाकरे यांचे ३ लाख ४८ हजार फॉलोअर्स आहेत.

११. राज ठाकरे यांचे १० लाख फॉलोअर्स आहेत.

१२. एकनाथ शिंदे यांचे ३ लाख ९५ हजार इतके फॉलोअर्स आहेत.

१३. चंद्रकांत पाटील यांचे २ लाख ५२ हजार फॉलोअर्स आहेत.

१४. डॉ. अमोल कोल्हे यांचे ४ लाख १७ हजार फॉलोअर्स आहेत.

१५. रोहित पवार यांचे ४ लाख ९० हजार फॉलोअर्स आहेत.

१६. निलेश लंके यांचे २ लाख १२ हजार फॉलोअर्स आहेत.

१७. राजेश टोपे यांचे १ लाख ६४ हजार फॉलोअर्स आहेत.

१८. देवेंद्र फडणवीस यांचे ९० लाख फॉलोअर्स आहेत.

१९. रामदास आठवले यांचे ३९ हजार फॉलोअर्स आहेत.

२०. मायावती यांचे ४ लाख ३१ हजार फॉलोअर्स आहेत.

२१. डॉ. मनमोहन सिंग यांचे ५ लाख ९ हजार फॉलोअर्स आहेत.

२२. भगवंत मान यांचे २७ लाख फॉलोअर्स आहेत.

२३. प्रियांका गांधी यांचे ४६ लाख फॉलोअर्स आहेत.

२४. असासुद्दीन ओवैसी यांचे ३२ लाख फॉलोअर्स आहेत.

२५. ममता बॅनर्जी यांचे ४८ लाख फॉलोअर्स आहेत.

२६. महुआ मॉइत्रा यांचे ३ लाख २४ हजार फॉलोअर्स आहेत.

२७. कन्हैय्या कुमार याचे १ लाख ५४ हजार फॉलोअर्स आहेत.

२८. अरविंद केजरीवाल यांचे ९१ लाख फॉलोअर्स आहेत.

२९. राहुल गांधी यांचे ४७ लाख फॉलोअर्स आहेत.

वरील प्रमाणे आपण देशातील व महाराष्ट्रातील नेत्यांचे फेसबुकवर असलेले त्यांचे फॉलोअर्स यातून त्यांची लोकप्रियता ही आभासी आहे कि वास्तविक आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी यांना जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे कोणत्याच नेत्यांना नाही. देश पातळीवर तर इतर नेत्यांच्या तुलनेत नरेंद मोदी हे सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. तर महाराष्ट्रात इतर नेत्यांच्या तुलनेत देवेंद्र फडवणीस हे लोकप्रिय नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर दुसरा कोणी लोकप्रिय नेता महाराष्ट्रात असेल तर तो नेता राज ठाकरे हे आहेत.

वरील आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्ष्यात येईल कि अभिनेता किंवा अभिनेत्री यांना जेवढे फॉलोअर्स असतात त्यांच्या तुलनेत राजकीय नेत्यांना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. भारतीय लोकांना राजकीय नेत्यांपेक्षा अभिनेता किंवा अभिनेत्री अधिक महत्वाची वाटतात. याचा अर्थ असा होतो की भारतीय जनतेला राजकारणापेक्षा मनोरंजनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. यातून असा निष्कर्ष निघतो की भारतीय तरुणांना, जनेतला राजकीय विचार नाही. त्यांची कुठलीच राजकीय भूमिका नाही. भारतीय जनतेला राजकीय विचार नसणं, तरुणांना राजकारणात इंटरेस्ट नसणं ही भारताच्या लोकशाहीसाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही निवडक लोकांचा किंवा काही निवडक क्षेत्रांचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर कोणत्या क्षेत्रातील लोकांना किंवा कोणत्या क्षेत्राला सोशल मीडियावर जास्त फॉलो केले जाते किंवा त्या क्षेत्राला किती फॉलोअर्स आहेत यातून आपल्याला आपल्या देशातील जनतेचा, तरुणांचा कल ओळखता येऊ शकतो. त्यांचा इंटरेस्ट ओळखता येऊ शकतो. असा एखादा तुलनात्मक अभ्यास होणं गरजेचं आहे. ज्यातून आपण उपायात्मक असं काहीतरी करू शकू. आणि जी लोकसंख्या मुख्य प्रवाहात नाही त्याचं काय करायचं ? त्यांच्यावर सुध्दा संशोधन केले पाहिजे. १३८ कोटी देशाची लोकसंख्या असताना फक्त ३९ कोटी जनता फेसबुक वापरते. बाकीची ९९ कोटी जनता कुठे आहे. त्यातील ५० कोटी जनता जाणीवपूर्वक फेसबुक वापरत नाही असं आपण गृहीत धरू पण मग उरलेली ४९ कोटी जनता कुठे गायब आहे. तिचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेतले पाहिजेत, तिचा शोध घेतला पाहिजे. आणि त्या जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Tags:    

Similar News