भारतातून मुस्लिम संस्कृती नष्ट केली जातेय का ?
भारतात मुस्लिम समूहाच्या सांस्कृतिक प्रतिनिधित्वावर गदा येत आहे का ? याचे कोणते विपरीत परिणाम भोगावे लागणार आहेत? वाचा अशोक कांबळे यांचा विशेष लेख..;
भारत देश हा विविध जाती,धर्मानी नटलेला देश असून त्यामुळेच या देशात प्रत्येक जाती,धर्माच्या रूढी,परंपरा वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. या जाती,धर्माच्या लोकांचे राहणीमान आणि आर्थिक स्थर देखील वेगवेगळा पहायला मिळतो. प्रत्येक जाती,धर्माची आपापली वेगवेगळी प्रतीके आहेत. या देशाचा इतिहास संघर्षमय राहिला असून हजारो वर्षापासून लढाया चालत आल्या आहेत. येथील जाती-जातीत देखील संघर्ष पहायला मिळतो. परंतु या देशात संविधान लागू झाल्यापासून सर्वांना समान अधिकार देण्यात आले. संविधानाने या देशात कोणीच उच्च आणि नीच्च असणार नाही,अशी ग्वाही दिली. आता देशाचा कारभार संविधानानुसार सुरू असून सर्व नागरिकांनी संविधानातील कायद्यांचे पालन करणे गरजेचे आहे. संविधाने सर्व जाती,धर्माच्या नागरिकांना आपापल्या धर्मा प्रमाणे राहण्याचा देखील अधिकार दिला आहे.
या देशात इतिहास काळात अनेक सत्ता होऊन गेल्या. त्यांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी विविध पातळीवर संघर्ष देखील केला. त्याचबरोबर त्यांनी या देशात असणाऱ्या विविध रूढी परंपरांना छेद देखील दिला. भारतात आलेल्या इंग्रजांनी सत्ती प्रथा बंद करून रेल्वे सारखी दळणवळणाची साधने देशाला दिली. डच,फ्रेंच यांनी देखील आपल्या कार्यकाळात सामाजिक सुधारणा केल्याच्या पहायला मिळतात. त्याचबरोबर या देशात मुस्लिम सत्ता देखील होवून गेल्या. त्यांनी देखील सुधारणा केल्याच्या दिसून येतात. त्यांनी अनेक शहरे वसवली. त्यांनी साहित्यात देखील योगदान दिले. पूर्वीच्या काळी राजांचा संघर्ष आपली सत्ता टिकवण्यासाठी असायचा तोच संघर्ष आधुनिक काळात हिंदू - मुस्लिम संघर्षात दिसून येतो. यामुळे मुस्लिम संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुस्लिम संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न होतोय का
भारत देशात अनेक मुस्लिम राजे होवून गेले. त्यांनी अनेक शहरे वसली. ताजमहाल देखील मुस्लिम संस्कृतीचा भाग आहे. मुमताज आणि शहाजहान यांची आठवण या देशाला ही वस्तू करून देते. परंतु अलीकडच्या काळात ताजमहाल शिव मंदिर असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे वाद निर्माण झाला असून येणाऱ्या काळात असले वाद आणखीन तीव्र होतील असा इतिहास अभ्यासक यांचा दावा आहे. या देशात असणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यांचे राहणीमान अलग असून त्यांच्या जेवणात देखील वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणत उद्योग व्यवसायात असून त्यांची भरभराट झाली असल्याचे दिसून येते. परंतु आजही मुस्लिम समुदायातील अनेक लोक वंचितांचे जगणे जगत आहेत. या देशात हिंदू - मुस्लिम वादाची ठिणगी 1992 साली पाडण्यात आलेल्या बाबरी मस्जिद प्रकरणात जास्त प्रमाणत दिसून येते. त्यानंतर बाबरी मस्जिदीची प्रतिक्रिया म्हणून भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सलग साखळी बॉम्बस्फोटात पहायला मिळाले. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले.
मुस्लिम अलिगढ विद्यापीठ,उस्मानिया विद्यापीठ यांच्यावर बंधने आणली गेल्याने मुस्लिम समाजात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. पाठ्यक्रमात मुस्लिम संस्कृती त्यांच्या प्रतिकांना स्थान देण्यात येत नाही. अनेक मुस्लिम राजांनी साहित्यात तसेच देशाच्या उभारणीत चांगल्या प्रकारे योगदान दिले असून त्यांचा इतिहास पुढे आणला जात नाही. फक्त रक्त रंजीत इतिहास पुढे आणला जात असल्याने इतर समुदायात मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा संदेश जात असल्याचा इतिहास अभ्यासक यांचा दावा आहे.
राजकीय फायद्यासाठी हिंदू - मुस्लिम वाद उकरला जातोय
देशात हिंदू आणि मुस्लिम या दोन भिन्न संस्कृती आहेत. या देशातील इतिहास लिहत असताना चुकीचा इतिहास लोकांपुढे मांडला गेला असल्याचा दावा अनेक इतिहास अभ्यासक करतात. इतिहासाची पुन्हा एकदा नव्याने मांडणी होण्याची गरज असल्याचे अनेकांना वाटते. त्यादृष्टीने अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. या देशासमोर अनेक प्रश्न उभे असताना येथील तरुणांना इतिहासात अडकवून त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न येथील राजकारण्यांकडून केला जात असल्याचा आरोप अनेक विचारवंत करतात. या देशात बेरोजगारी उग्र रूप धारण करत असून त्यावर राजकीय लोक ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. लोकांचे जीवन जगण्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहे. देशातील जवळपास चाळीस कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. या चाळीस कोटी जनतेला यातून बाहेर कसे काढायचे यावर उपाय शोधला जात नाही. त्याचबरोबर सातत्याने महागाई वाढत चालली असून याकडे मात्र जाणुनी बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकांना वाटते. रस्ते,पाणी, गटार, लाईट याच्या समस्या,शिक्षण,सामाजिक भेदभाव यांच्या समस्या आणखीन सुटल्या नाहीत. त्यावर उपाय शोधला जात नाही. राजकीय लोक मात्र जाती,धर्म यावर बोलताना दिसतात. लोकांना जाती धर्माचे पडले नसून सर्वसामान्य लोकांच्या जीवन जगण्याच्या समस्या वेगळ्या असून त्यावर काम करण्याची गरज असल्याचे अनेकांना वाटते. परंतु राजकीय लोक भलत्याच गोष्टीवर बोलत असल्याने लोकांचे नुकसान होताना दिसत आहे.
मुस्लिम राजांची इतिहासात चुकीची प्रतीके
या देशात अनेक वर्षे मुस्लिम राजांनी राज्य केले. त्यांच्या काळात चांगल्या वाईट गोष्टी घडल्या. परंतु या राजांच्या वाईट गोष्टींचे जास्त प्रमाणात उदारीकरण करून लोकांत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संविधान लागू झाल्यापासून आणखीन ही मुस्लिम राजांचा इतिहास विस्तृतपणे मांडला गेला नाही. बाबर राजाने उत्कृष्ट असा बाबर नामा नावाचा ग्रंथ लिहला आहे. त्यामध्ये त्याने भारतात आढळनाऱ्या आंब्याच्या विविध प्रजातीवर अनेक पाने खर्ची घातली आहेत. त्याचबरोबर बाबर एक चांगल्या प्रकारचा कवी देखील होता. बाबरच्या या कामाचा कोणत्याच शालेय पुस्तकात उल्लेख सापडत नाही. बाबरचा मुलगा हुमायून ने देखील साहित्यात चांगल्या प्रकारचे योगदान दिले असून मलिक अंबर चे काम देखील इतिहासात वगळण्यात आला आहे. त्यामुळेच लोकांना इतिहासाबद्दल जास्त माहीत नाही. लोकांपर्यंत चुकीचा इतिहास गेला असल्यामुळे तरुण पिढीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरुण पिढीने इतिहास जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत इतिहास अभ्यासक सरफराज अहमद सांगतात.
हिंदू - मुस्लिम दंगलितून काय सध्या होणार
हिंदू - मुस्लिम वाद नेहमीचाच झाला असून यातून दंगल पेटविणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांची व्होट बँक फिक्स करायची आहे. भारतीय व्यवस्थेत एक राजकीय पक्ष मुस्लिमांना भीती दाखवत आहे तर दुसरा पक्ष त्यांच्या मतांचा वापर करताना दिसतो. परंतु त्यांच्या समस्या कोणी सोडवताना दिसत नाही. याही समाजाला आरक्षणाची गरज असून त्यांच्यातही प्रचंड प्रमाणात अज्ञान आहे. गरीबी आहे. मोजकाच वर्ग सुधारित दिसतो. परंतु आजही अनेक मुस्लिम झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या समस्या वेगळ्या असून याकडे शासनाची डोळेझाक होताना दिसते. हिंदू - मुस्लिम वाद सातत्याने उफाळून काढला जात असून त्यामुळे दोन्ही समाजातील मुलांचे नुकसान होत असून दंगली झाल्यास अनेकांचे जीव देखील जातात. याची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही. अनेकांना अपंगत्व येते. दंगलीत काहींचा घर संसार उद्ध्वस्त होतो. ज्या लोकांनी असुष्यभर कष्ट करून घर उभे केलेले असते. तेच घर त्यांच्या डोळ्यादेखत उध्वस्त होते. त्यामुळेच त्यांच्या भावना अनावर होतात. या दंगलीमुळे अनेक दिवस दुकाने बंद राहिल्याने अनेक व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होते. सर्वसामान्य लोकांची रोजीरोटी बंद होवून त्यांच्या आर्थिक जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी या दंगलीत न पडलेलेच बरे.