कोरोनामुळे माणसाचा केमिकल लोच्या होतो का?
कोरोना हा फक्त श्वसनाचा शारीरिक आजार नाही, कुटुंबेच्या- कुटुंबे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बधीत होत असताना मानसिक पातळीवर ही मोठी लढाई लढावी लागते, अशा काळात अनेक रुग्णांमध्ये नैराश्य व वैफल्य हे डिप्रेशन येऊ शकते. कोरोनाशी लढताना मनाची लढाई कशी लढावी? या विषयी मार्गदर्शन केले आहे राजीव साने यांनी....;
नैराश्य व वैफल्य हे डिप्रेशन साठी वापरले जाणारे शब्द दिशाभूल करणारे आहेत. निराशा, विफलता, शोक हे जीवनातले प्रसंग आहेत. ते जर प्रसंगोपात्तच राहिले आणि त्यांनी मनोवृत्तीत कायमचा व सार्वत्रिक बिघाड केला नाही तर ते मानसिक विकार या सदरात मोडत नाहीत. तरीही अशा प्रसंगोपात्त आपत्तीना तोंड देण्यासाठीसुध्दा, मानसोपचार घेऊच नयेत, असे येथे अजिबात सुचवायचे नाहीये.
पण ज्याला खास करून डिप्रेशन-अटॅक म्हणता येईल असे मानसिक संकट, हे जीवनात घडलेल्या निमित्तांपेक्षा वेगळ्या कारणांनी आलेले असते. ही कारणे आपल्याला समक्ष होत नाहीत. म्हणून हे प्रकरण जास्त गांभीर्याने घेतले पाहिजे. यादृष्टीने आणि डिप्रेशनचा 'फ्रस्ट्रेशन'पेक्षा असलेला वेगळेपणा लक्षात रहावा म्हणून, वेगळा शब्द वापरण्याचा हा आग्रह. डिप्रेस्ड माणसाची व्याकूळता ही अमुक एका दुःखामुळे नसून तिचे स्वरूप वेगळे असते. आता आपण "ज्याची/जिची कशाहीपासून सुख होण्याची किंवा कशानेही सार्थकता वाटण्याची क्षमताच कायमसाठी गमावली आहे अशी व्यक्ती" बनलो आहोत, याची खात्री पटून(!) आलेली ती व्याकूळता असते. ही आत्मघातकी खात्री पटलेली असल्यामुळे, सकाळ झाली की हा दिवस कसा घालवायचा? हा प्रश्न अंगावर येतो. सकाळी जास्त अस्वस्थता आणि ती संध्याकाळपर्यंत जरा आटोक्यात येते हे डिप्रेशनचे एक खास लक्षण आहे.
कुठलाही त्रास मॅग्निफाय होतो आणि छान वाटणाऱ्या गोष्टी सपक वाटू लागतात. कशानेही किंवा अगदी उगाचच रडू येणे, सारे भोवताल मरगळलेले वाटणे, कशातच जान नाही, दम नाही, राम नाही! अस्वस्थता, सैरभैरपणा, आत्मविश्वास गेलेला, आत्मगौरव गेलेला, अशी डिप्रेशन ही एक 'वेगळीच' अवस्था असते. ज्यांना अनुभव नाही त्यांना कल्पना करणे शक्य नाही. "हाय कम्बख्त तूने पीही नही" असे अगदी उलट्या अर्थाने म्हणावे लागते. पण इतरांना कल्पना यावी म्हणून इतरांना अनुभव यावा अशी इच्छा, यातून गेलेला माणूस कधीही करणार नाही. शत्रूवरसुध्दा अशी वेळ येऊ नये असेच त्याला वाटेल.
संकट आले, दुःख कोसळले तर त्याला आव्हानमूल्य तरी असते. झगडण्याचा आवेश असतो. त्यामुळे यातनामयतासुध्दा रसपूर्ण असते. माणूस हा सुख हवे दुःख नको ह्या सोप्या सूत्राने चालणारा प्राणी नाही. रसपूर्ण असेल तर दुःखही चालेल पण नीरसता नक्की नको, हे माणसाचे खरे घोषवाक्य आहे. मानसिक ऊर्जा ही अशी गोष्ट आहे की जिचा व्यय करण्यानेच तिचे संवर्धन होते व मनाची उर्जितावस्था राखण्यासाठी आव्हाने हवी असतात.
परंतु स्वतःसाठी आव्हाने शोधण्यासाठी व ते आव्हान रसपूर्ण वाटण्यासाठी मुद्दलात जी किमान ऊर्जा लागते तीच जर ढप्प झालेली असेल तर त्या खड्ड्यातून वर यायचे तरी कसे? डिप्रेशनमध्ये अत्यंत प्रिय गोष्टसुध्दा आकर्षक वाटेनाशी होते. ध्येये दुःसाध्य नेहमीच असतात पण ती आता निरर्थकही वाटू लागतात. समोर चटकदार भेळ असूनही तोंडाला पाणी सुटत नाही, सुंदर संगीतरचना कानी पडली तरी "क्या बात है" हे उद्गार उमटतच नाहीत कारण त्यातली ती बात प्रत्ययाला येणेच थांबते.
"बोझ होता जो गमोका तो उठा भी लेते|
जिंदगी बोझ बनी हो तो उठाये कैसे|" अशी ती अवस्था असते. किंवा एका प्रसिध्द मराठी नाट्यगजलेचे विडंबन करून असे म्हणता येईल
"चाळा सुचे कुणाला| कंटाळतात कोणी|
मज ध्यासही न भावे| हा दैवयोग आहे|"
हे सगळे लक्षात घेता डिप्रेशनला मी 'रसग्लानी' असा शब्द योजतो. अर्थात हे झाले नमुनेदार अटॅकबाबत. इतके सगळे होऊ देऊन मग उपचार घेतले तर उपचारही कठीण व तीव्र-स्वरूपाचे लागतात. त्यांचा परिणाम जाणवायला लागेपर्यंत उपचार चालू ठेवण्यासाठी 'विज्ञानावरील श्रद्धा' निस्सीम असावी लागते. न पेक्षा एरवी अत्यंत सुखी, यशस्वी, ज्ञानवान, जबाबदार व शहाणा माणूसदेखील आत्महत्येचा मार्ग पत्करतो. मुख्य मुद्दा हा आहे की डिप्रेशनची पूर्वसूचना देणारी लक्षणे सापडताच जर उपचार सुरू केले तर बरीच पडझड आणि स्वतःला व इतराना होणारा त्रास टाळणे शक्य आहे.
वेळीच हस्तक्षेप करण्याचे महत्त्व
न्यूरॉटिक प्रकारात मोडणारे विकार म्हणजे ज्यांत 'वेगळेच भास' होत नाहीत फक्त भावनांची प्रमाणे ही प्रसंगाच्या मानाने अति-जास्त किंवा अति-कमी असतात असे विकार होत. न्यूरॉसिसचे खास वैशिट्य असे की विकारग्रस्ताला आपण विनाकारण जास्त प्रतिक्रिया देत आहोत याची जाणीव असते. आपण चुकतोय हे कळत असते. जे फार अहंकारी नसतात ते कबूलही करतात पण त्यांचा नाईलाज असतो. उदाहरणार्थ प्रसंगनिरपेक्ष किंवा विषयनिरपेक्ष अशी चिंताक्रांतता म्हणजे अँग्झायटी-न्युरोसीस होय. यात रस्ता ओलांडण्याचासुध्दा आत्मविश्वास रहात नाही, कोणतेही शारीरिक लक्षण आढळताच थेट दुर्धर व मरणांतिक आजाराचे काल्पनिक निदान प्रथम मनात येते. लक्षणांकडे जास्तच लक्ष जाऊन ती तीव्र बनतात.
वारंवार खात्री करून घेण्याच्या मिषाने विशिष्ट गोष्टीची अनावर पुनरावृत्ती किंवा आन्हिकवजा पुनरावृत्ती करण्याची ओढ म्हणजे ऑब्सेशन होय.
निद्रानाश म्हणजे इनसोम्निया.
प्रमाणाबाहेर चिडचिड होणे म्हणजे इरिटॅबिलिटी.
स्फोटक क्रोधावेग म्हणजे हिस्टेरिया.
मानसिक आजार असे नाही पण व्यक्तिमत्वातील दोषही सुप्त डिप्रेशनचे द्योतक असू शकतात. सततची पडखाऊ-वृत्ती व कोंडमारा चालू राहू देणे(सबमिसिव्ह रिझेंटमेंट). अनिर्णय आणि चालढकल (अँबिव्हॅलन्स प्रोक्रॅस्टिनेशन), झालेच तर अतिहळवेपणा(ओव्हरसेन्सिटिव्हनेस) अशी लक्षणे जर सातत्याने राहिली तर ती लक्षणे ह्या, आत्ता सुप्त असलेल्या पण नंतर येऊ शकणाऱ्या डिप्रेशनच्या पूर्वसूचना असू शकतात.
इतकेच नव्हे तर अहंगड, जगाविषयी तुच्छता, उन्माद अशी आक्रमक लक्षणांतही सुप्त-डिप्रेशन उलट्या तऱ्हेने अभिव्यक्त होत असू शकते. काही शारीरिक दिसणारे आजार हे त्या त्या टेस्ट केल्या असता निदान न होणारे व औषधांना दाद न देणारे असतात. हे खोटे किंवा काल्पनिक नसतात. कोलायटिस, असिडीटी, बीपी, दमा, ब्लॅडर-सेन्सिटिविटी, शरीरात कुठल्यातरीच एखाद्या बिंदूवर दुखणे इतकेच नव्हे तर काही दृश्य त्वचारोगसुध्दा मूलतः मनोशारीरिक (सायकोसोमॅटिक) असू शकतात. म्हणजे असे की त्या त्या खात्याचे उपचार थकतात, पण अन्य काही कारणांनी, मानसोपचार घेतल्याने हे आजार आश्चर्यकारकरित्या बरे होतात.
डिप्रेशनखेरीज अन्य न्यूरॉटिक विकार पूर्वसूचना म्हणूनही लक्षणीय असतात आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर केलेले उपचार डिप्रेशनला प्रतिबंधकही ठरू शकतात. काही नवी अँटिडिप्रेसंट्स सौम्य डोसमध्ये इतर न्यूरॉसिस बरे करू शकतात. दुर्धर आजाराचा संशय घेऊन आत्महत्या करण्यापेक्षा स्वतःतील आत्महत्याप्रवणतेचा संशय घेऊन तिचे निवारण केल्यास, समजा खरोखरीच्या दुर्धर आजार झालाच तर त्यालाही उमदेपणाने तोंड देता येते. दुर्धर आजाराचा संशय काल्पनिक निघण्याची शक्यता तर खूपच असते.
'न्यूरॉटिक मना'तील 'आशयात' चुकीचे 'सु'संस्कार, कौटुंबिक वा निकटवर्ती संबंधातील राजकारण, व्यक्तीने इतरांच्या लेखी आपण कसे ठरतो यावर आत्मगौरव अवलंबून ठेवणे, महत्त्वाकांक्षा आणि तिच्यापायी केलेली स्वतःची फरफट, अशा अनेक 'जाणीवेतील गोच्या' असतात हे खरेच आहे. जाणीवेतील गोष्टींवर काही अंशी जाणीवेतूनच प्रबोधनाने किंवा समुपदेशनाने उपायही करता येऊ शकतात. पण न्युरॉसिस हा जाणीवनिरपेक्षपणे व्यक्तीच्या पिंडातील रासायनिक दुर्भाग्याने उद्भवतो व तो जनुकीयरित्या आलेला असतो हे कदापीही विसरून चालणार नाही.
'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये 'केमिकल लोच्या' हा जो शब्द वापरला गेला आहे तो अतिशय लक्षणीय आहे. मुन्नाभाईचा लोच्या हा सायकॉटिक म्हणजेच भाससुध्दा होणारा होता आणि तो सिनेमाच असल्याने तो लोच्या सद्गुणांकडे नेणाराही ठरला, हा भाग निराळा.
पण डिप्रेशनमागे अज्ञातपणे कार्यरत असणारा केमिकल लोच्या विविध आत्मघातकी वृत्तींना (जाणीवेच्या) 'बाहेरून पाठींबा' देत राहतो. अंधश्रध्द लोक 'बाहेरची बाधा' म्हणतात ते खरेतर जाणीवेच्या बाहेरची पण मेंदूच्या आतलीच बाधा असते. एखाद्या व्हिटॅमिनची किंवा इन्शुलिन सारख्या हार्मोनची वा इतर हार्मोन्सची कमतरता असणे ही एक उणीव नक्कीच असते. पण त्यामुळे अशी उणीव असणारी व्यक्ती गर्हणीय ठरत नाही. खरे तर मनो-शारीरिक आणि तनु-मानसिक असे कार्यकारण भावाचे वर्तुळच कार्यरत असते. हार्मोनल डिस्टर्बन्सेस हे याचे उत्तम उदाहरण आहे.
अनेक रसायनांच्या कार्यावर शरीर आणि मनही कसे चालेल हे अवलंबून असते. या रसायनांचे भरण आणि क्षरण कसे व किती होईल हे व्यक्तीच्या शरीराच्या मूळघटनेवर किंवा पिंडावर अवलंबून असते. मेंदूमधील पेशींना जोडणाऱ्या रासायनिक सांध्यांमध्ये जी वाहक-रसायने असतात ती निर्माण होत असतात आणि खपतही असतात. त्याचा खप वाढला आणि कमतरता निर्माण झाली किंवा त्याचे एकमेकांशी असणारे प्रमाण बिघडले की डिप्रेशनसह अनेक मानसिक विकार निर्माण होतात. रसायनाच्या बाबतीत सामान्यतः जी सुस्थिती म्हणता येईल ती नसणे हे 'व्यक्तीचे रासायनिक दुर्भाग्य' असे म्हणता येईल.
या रासायनिक दुर्भाग्यावर आजमितीला आपण ज्या विज्ञानाच्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर, रासायनिक मातही करता येते हे मोठेच सुभाग्य आहे. असे असताना, मूलतः शरीरातून येणाऱ्या अपवर्तनांचे खापर जाणीवेतील घटना वा व्यक्तींवर थोपायचे, अपवर्तन तसेच चालू द्यायचे त्यातून स्वतःला व इतरांना बरेच ताप द्यायचे आणि डिप्रेशन-अटॅक-च्या खड्यात पडायचे, हा क्रम वेळीच हस्तक्षेप केला तर टाळता येऊ शकतो.
आपण सर्दी झाल्याने डॉक्टरकडे गेलो तर तो न्युमोनिया होईपर्यंत थांबा मगच मी उपाय करीन असे कधी म्हणेल काय? पण मानसिक विकारांना कलंक मानण्याचा जो शुध्द गाढवपणा आपण चालविलेला आहे त्या पायी आपण नेमके न्युमोनिया होईपर्यंत थांबतो किंवा न्यूमोनियाने मृत्यू आला तरी चालेल असे करत गाळात जात रहातो याला काय म्हणावे? दैव देतं आणि अ-कर्म नेतं!
'मेंटल', 'सायकिक', 'पेशंट' या शब्दांना जो लांच्छनास्पद अर्थ चिकटला आहे तो तर चुकीचा आहेच. पण संख्यात्मकदृष्ट्यासुध्दा हे विकार अपवादात्मक नसून इतर आजारासारखेच कॉमन आहेत. हल्ली ही थेरं वाढलीत असे बोलले जाते. खरे असे आहे की पूर्वी बरेच लोक त्यांच्यातील सुप्त जनुकीय सुरुंग उडण्याच्या आधीच जन्तुजन्य रोगाने मरत असत, वेडे ठरत असत किंवा कुचंबणा सहन न होऊन हाय खाऊन मरत असत. मुख्य म्हणजे ज्या गोष्टीला मान्यता नसते तिची नोंदच घेतली जात नाही किंवा तक्रारच केली जात नाही. अर्थात 'महत्त्वाकांक्षा' हा रोग पूर्वी उच्चकुलिनांनाच राखीव होता तो आता सर्वासाठी खुला झाला आहे. हा म्हटला तर आधुनिकतेचा दोष आहे देखील.
जाणीवमार्गे उपाय हे बऱ्यापैकी सुस्थितीतच शक्य
मानसोपचारतज्ञाकडे जाणे, औषध घेणे किंबहुना घ्यावे लागणे, ही गोष्ट लांच्छनास्पद समजणारे बरेच लोक असतात. 'औषध न लगे मजला' यात अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही. डायबेटीस, ब्लड प्रेशर, रक्त पातळ ठेवण्याचे औषध ही औषधे नियमित कायमस्वरूपी घेणारे खूपच लोक आहेत. तसेच प्रासंगिक औषध घेणारेही आहेत.
उदाहरणार्थ ज्या कोणाला बस 'लागते' असे लोक एक औषध घेऊन प्रवास करतात. त्यांच्या मेंदूतले तोलेन्द्रीय आणि 'पोटातले बाहेर फेका' हा संदेश देणारे इंद्रिय ही दोन्ही फारच लगटून असतात. त्यामुळे बस वळणे घेताना, गचक्याने थांबत व गचक्यानेच सुरू होत जाताना आणि चढ उतारावर तोलेन्द्रीयाला मिळणारे संदेश चुकीने वाचले जाऊन मळमळेन्द्रीयच क्रियाशील होते. ही औषधे जितकी निष्कलंक आहेत तितकीच मानसिक विकारांवरची औषधे निष्कलंक आहेत.
परंतू याचा अर्थ असा अजिबात नाही की फक्त औषधाने मानसिक विकार बरे होतात! जर चुकीची विचारसरणी तशीच राहिली तर औषधेही निष्प्रभ ठरू शकतात. कौन्सेलिंग, रॅशनल इमोटिव्ह बिहेविअरल थेरपी, कॉग्नीटिव्ह थेरपी अशा अनेक नावांच्या संवादाधारित उपचार पद्धती निदान ऐकून माहीत असतात. तटस्थ आत्म-निरीक्षण(निवाडा न देता) यात विपश्यना किंवा अन्य ध्यानपद्धती मोडतात. या सर्वांचे उद्दिष्ट साधरणतः असे असते की आपल्याला अनावश्यकपणे समस्या वाढवून ठेवण्याच्या ज्या सवयी असतात आणि अशा सवयींना पुष्टी देणाऱ्या ज्या चुकीच्या धारणा असतात त्या आपल्या निदर्शनास आणून देणे आणि चुकीच्या गल्लीत शिरतानाच्या क्षणी जागरूकता निर्माण करणे, जेणेकरून आपण टाळता येणारे दुष्टचक्र टाळू शकू.
या पद्धतींच्या तपशीलात न शिरता काही हमखास आढळून येणाऱ्या चुकीच्या धारणांचा आणि त्यावरील उत्तरांचा येथे उल्लेख करून ठेवत आहे.
१) 'मला दुःख आहे त्या अर्थी मी दुःखी असलोच/असलेच पाहिजे'.--- दुःखे काही प्रमाणात अटळ असतात. पण दुःखाचा रंग आख्ख्या 'मी'ला चिकटविण्याची गरज नसते. मला दुःख आहे पण मी दुःखी नाही हे शक्य असते आणि तेच योग्य असते.
२) 'मी दुःखी नसेन तर मी सुधारणार कसा/कशी?'--- स्वतःला सुधारणे ही उत्साहाने आणि आनंदाने करण्याची गोष्ट आहे. सुधारण्याचा मुद्दा नेमका कळला आणि खरोखरच पटून निर्णय झाला तर दुःखी न होता सुधारता येते. किंबहुना स्वतःला भरपूर कोसत व कुरतडत रहाणारी माणसे प्रसंग येताच नेहमीची चूकच पुनःपुन्हा करतात. सुधारण्यासाठीची ऊर्जा ते स्व-पीडनात खर्ची पाडतात.
३) 'मी दुःखी नसेन तर इतर माझ्याकडे लक्ष देणार नाहीत, ईश्वर माझ्याकडे लक्ष देणार नाही, मला कसलीच मदत मिळणार नाही.'--- आपण लहानपणापासून एक धमकी वापरत आलेलो असतो "जर तुम्ही माझ्या मनासारखे केले नाहीत तर मी दुःखी होईन व त्याचे पाप तुम्हाला लागेल" ही लक्षवेधी सूचना मांडून न थांबता आपण मनोभावे ती धमकी खरी करून दाखवतो व दुःखी असण्यातला हा 'फायदा' सवयीचा बनतो.
४) 'दुःखी असणे हेच संवेदनशील, सहृदय व करुणावान असण्याचे लक्षण आहे' हे जर खरे असते तर संत हे सर्वाधिक दुःखी जीव असते. पण उलट ते पूर्ण समाधानी असतात. करुणा म्हणजे कृती करून इतरांचे दुःख निवारण करणे. संसर्गजन्य रोगाप्रमाणे स्वतःलाही दुःखाचे इन्फेक्शन करून घेणे नव्हे.
५) 'तुम्ही किती दुःख सोसले आहे यावर तुमची सुख प्राप्त करून घेण्याची पात्रता ठरते. आत्मक्लेशाशिवाय चित्तशुद्धी नाही.(दुःखभोगाने पापक्षय सुखभोगाने पुण्यक्षय)'--- अर्हता ही दुःख निर्माण न करण्यात आणि सुख निर्माण करण्यात म्हणजे निर्मितीत असते भोगात नव्हे.
६) 'अमुकच गोष्ट जमली नाही तर मी पूर्णतः नालायक ठरतो/ठरते'--- प्रयत्नात कसूर नाही आणि न जमल्यास त्रागा नाही हे खरे सूत्र आहे.
७) 'संतुष्ट डुक्कर असण्यापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटीस असणे चांगले'---- यात सॉक्रेटीस राहतो बाजूला आणि डुक्कर म्हणूनही असंतुष्ट ही स्थिती येते.
८) 'स्वभावाला औषध नसते'---निश्चित औषध असते. 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' खोड जातेही किंवा निदान आवरता तरी येते.
९) 'माझ्याच बाबतीत असे का घडावे?' घडणे हे नेम धरून टार्गेटेड असे नसतेच 'कोणीही' च्या जागी योगायोगाने 'मी' असतो/असते इतकेच खरे आहे.
१०) 'अमुकने दाद दिली तरच मी चांगला/चांगली'--- असे कोणीही अमुक अस्तित्वात नसून स्वतः हेच 'अमुक' रहाणे जमले पाहिजे.
११) 'मी सूड घेतला नाही तर नेभळट ठरेन'---मुद्दा सूड घेण्याचा नसून
पुढच्या हल्ल्याच्या वेळी नेभळट न राहण्याचा असतो.
१२) 'माझ्यावर प्रेम करणे हे अमुकचे कर्तव्य आहे.' कर्तव्य म्हणून केलेले प्रेम हे प्रेम राहत नाही. जे धरून ठेवावे लागते ते आपले नसते.
ही यादी अर्थातच अपुरी आहे ती भरपूर वाढवता येईल पण आतापर्यंतच्या यादीवरून अपधारणा म्हणजे काय? या विषयी काही सामान्य सूत्रे सापडावीत अशी अपेक्षा आहे.
ध्यानाचे महत्त्व असे आहे की भावना उमटणे हे घातक नसून ती विचार करून उगाळत राहणे हे घातक असते. भावना ही खूपच अल्पजीवी असते हे जर आपण क्षणोक्षणी जागरूक असू तर आपली आपल्यालाच ती ताणण्यातली कृत्रिमता व व्यर्थता 'ध्यानात' येते व भावना विरते हे ध्यानाचे महात्म्य आहे. 'मी' विषयीसुध्दा कायमचे निष्कर्ष न काढता 'आत्ता' एवढेच पाहिले तरी बरीच ओझी उतरू शकतात.
संवादाधारित उपचारपद्धतींचे काही सामान्य उपदेश असतात. उदाहरणार्थ स्वतःतला न्यायाधीश निलंबित ठेवा कारण मूळ दोष कुणाचा हा मुद्दाच नाहीये. आपण बरे होणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट. संताप कधीच सात्विक नसतो तो नैष्ठिक असू शकतो पण 'स्वास्थ्य सलामत तो निष्ठा पचास!' हल्ली मानसिक समस्या आणि जागतिकीकरण अशा छापाची सेमिनारे झडत असतात. साधरणतः 'जे काही वाईट घडते ते जागतिकीकरणामुळेच(!)' असे म्हणायचे आणि 'जागतिकीकरण थांबवणे अशक्य आहे' असेही म्हणायचे.
अशा वक्तव्यांचा मानसिक आरोग्याला शून्य उपयोग असतो. किंवा विपरीतच परिणाम घडतो कारण काहीच करता येणार नाही हाच निष्कर्ष निघतो. मुल्यचिकित्सा करू नये असे नाही. पण मूल्य-उद्घोषणेच्या भरात ऊर्मी लपवल्या जाऊ नयेत. उपचारप्रक्रियेत आपल्यामधले 'योग्य काय?' पेक्षा आपल्यामधले 'मनापासूनचे काय?' हे महत्त्वाचे असते. आपण कसे ठरतो हे बाजूला ठेवून खरोखरीचे आपण कसे आहोत हे बघण्याची तयारी नसेल, तर नेमके शल्य हे आपले आपल्याला व तज्ज्ञालाही समजत नाही. मग योग्य उपचार सापडणार कसा?
संवादाधारित म्हणजेच जाणीव-मार्गे उपचार ही गोष्ट महत्त्वाचीच आहे पण हे उपचार बऱ्यापैकी सुस्थितीतच शक्य असतात. खरे म्हणजे हे उपाय प्रतिबंधक उपाय म्हणून व ग्रस्तता गेल्यावर निगराणीचे(मेंटेनन्स) उपाय म्हणून जास्त शक्य असतात. क्रायसिस मध्ये त्यांचा उपयोग नसतो कारण ग्रस्त व्यक्ती ही अलिप्तपणे आत्म-निरीक्षण करण्याच्या मनस्थितीतच नसते. कबीरांचे एक वचन फार महत्त्वाचे आहे. "दुखमे सुमिरन सब करै| सुखमे करै न कोय| जो सुखमे सुमिरन करै| दुख काहेका होय|".याचा इहवादी अर्थ असा की "क्रायसिसमध्ये आत्मचिंतन करायला गेलात तर काही हाती लागणार नाही. क्रायसिस नसताना आत्मचिंतन केलेत तर क्रायसिस येणार नाही."
जुनाट धोपटमार्गी 'सदु'पदेश दुर्लक्षित करा
"सगळे मनाचे खेळ असतात हो आपण दुर्लक्ष करायचं." काही खेळ हे चिंताजनक असतात आणि ते थांबवता येतात पण दुर्लक्ष करून नव्हे. पुनःपुन्हा नको तिथे लक्ष का जातंय या कडे आवर्जून लक्ष देण्याचा हा प्रश्न असतो. "आपण पक्का निर्धार केला तर कशातूनही बाहेर पडू शकतो." हे जर खरे असते, म्हणजेच प्रश्न फक्त निर्धार करण्याचाच असता तर जग एव्हाना नैतिक-स्वर्ग झाले असते. कळतं पण वळत नाही हाच तर मुख्य प्रश्न नव्हे काय?
निर्धाराचे महत्त्व नक्कीच आहे पण ते विकार आवाक्यात आल्यानंतर! आवाक्यात आणणे यालाच डॉक्टर लागतात नंतर तुमचे तुम्हीच सांभाळायचे असते. पण डॉक्टरांकडे न जाणे आणि विशेषतः औषधे न घेणे यात उगाचच अभिमान बाळगला जातो. एकूणच दोष कबूल करण्यात लाज बाळगणे हे घातक असते. दुसरे असे की दोष आहे म्हणजे स्वतःच काहीतरी अपराध केला आहे असे नसते. इतकेच नव्हे तर अपराध केला असला तरी असा अपराध पुन्हा आपल्याकडून घडू नये यासाठी काही कायमस्वरूपी पाऊले उचलणे महत्त्वाचे की अपराधभावनेत कुढत रहाणे?
सायकीयाट्रीवर अनेक अनाठायी आक्षेप घेतले जात असतात. औषध ही गोष्ट कृत्रिम असते हा एक नमुनेदार आक्षेप. आपण ठाकून ठोकून समाज-योग्य बनविले जातो. ही गोष्ट तरी 'नैसार्गिक' असते काय? व्यक्तीला सामाजिक कृत्रिमता सुसह्य व्हावी यासाठी शारीरिक-रासायनिक हस्तक्षेप केला तर बिघडते कुणाचे? कोणी म्हणते मानसवैद्यकामुळे आपण तडजोडवादी बनतो. मानसवैद्यकाअभावी आपण तडजोडवादी नसतो की काय? किंबहुना ग्रस्त व्यक्ती फालतू बाबतीत अत्यंत आग्रही राहून महत्त्वाच्या बाबतीत भयंकर तडजोडी करत राहते.
औषधांच्या साईडइफेक्ट्सबाबत अवाजवी काहूर माजवले जात आहे. औषध न घेण्याचे जे भयानक इफेक्ट्स असतात त्यांच्यापुढे हे साईडइफेक्ट कमी हानिकारक असतात. इतकेच नव्हे तर वाढत्या संशोधनाबरोबर साईडइफेक्ट अधिकाधिक नगण्य होत जात आहेत आणि जाणार आहेत. साधे रस्ता ओलांडणेसुद्धा अशक्य होऊन बसणे ही मानसिक अपंगता एकीकडे आणि 'घशाला किंचितशी कोरड पडणे' असा एखादा साईडइफेक्ट यात वट्ट फायदा (ट्रेड-ऑफ) कोणत्या बाजूला पडतो?
आपले बधीरीकरण होते हेही खोटे आहे. काही औषधांशी शरीर अडजस्ट होताना अगदी तात्कालिक 'बधीर' वाटू शकते पण हे लवकरच नाहीसे होते. नव्या पिढीच्या औषधात तर असे जाणवणारे फरक पडतही नाहीत. मानसोपचारांची औषधे ही अजिबात 'नशीली' नसतात. मेडिसनला ड्रग हा शब्द वापरूच नये.औषधाची सवय लागते हा एक नेहमीचा आक्षेप आहे. एकतर लक्षण गेले तरी 'चटक' रहाणे आणि लक्षणच कायमस्वरूपीचे असल्याने मेंटेनन्स डोस लागणे यात फरक केला पाहिजे. इन्शुलीनची चटक लागली आहे असे कोणी म्हणेल काय? दुसरे असे की चटक लागण्याचा प्रश्न निवडक शामक (पॅलिएटिव्ह) औषधांबाबत असला तरी एकदा निवारक औषध सापडले की शामक औषध क्रमाक्रमने बंद करता येते. जेव्हा जोरदार लक्षणे असतात तेव्हा सवय कशी काढायची हे नंतर बघता येते. काही शुभ साईडइफेक्ट्सही असतात जसेकी पार्किन्सनिझम ला प्रतिबंध!
आयुर्वेदिक औषधांना साईडइफेक्ट नसतात हे अगदी खोटे आहे. ब्लडप्रेशरसाठी सर्पगंधा घेऊन तीव्र डिप्रेशनमध्ये गेलेल्या केसेस आहेत. निश्चित माहीत असलेला रेणू आणि एखाद्या वनस्पतीतले सगळेच रेणू यात जास्त अनिश्चितता कुठली? अनेक आयुर्वेदिक मानसिक औषधे ही पंचवीस तीस वनस्पतींची मिश्रणे असतात. त्या सगळ्यांचे काय काय परिणाम होतील हे सांगणे महाकर्मकठीण आहे.
मानसवैद्यकात जेव्हा औषधे नव्हती अशा जुन्या काळात, प्रदीर्घ काळ 'अंतर्मन' बरेच उलगडून बालवयातील प्रसंग शोधून काढणे ही फ्रॉइडप्रणित पद्धती कधीतरी अस्तित्वात होती. इतिहास खणून काढून काही उपयोग नसतो हे सिद्ध झाल्याने ही कार्यपध्दती आता बाद झालेली आहे व ती परवडणेही अशक्य आहे. तासंतास असंबध्द बोलत रहायला आणि ते ऐकून गूढ उकलत रहायला न पेशंटला वेळ आहे ना डॉक्टरला.
मानसोपचारतज्ज्ञ हे मूल्यात्मक बाबीत किंवा नैतिक मुद्द्यावर तटस्थ राहतात हे खरेच आहे. पण अन्यायग्रस्ताला स्वतःच्या बाजूने उभे करणे आणि सक्षम करणे या द्वारे ते अन्यायकर्त्यांवर नकळत अंकुश ठेवतात. स्वतः त्रास करून घेणारे पेशंटच डॉक्टरकडे जातात( व अजून बरेच जावेतही.) इतरांवर आक्रमक असणारे पेशंट स्वतःला नॉर्मलच समजतात.
डॉक्टर निवडणे आणि डॉक्टरबरोबर योग्य नाते राखणे
डॉक्टर निवडताना प्रथितयशच (यश आहे 'प्रथा' ज्याची) निवडला पाहिजे हा आग्रह सोडण्याची गरज आहे. जो नवीन असतो तो नम्र असण्याची जास्त शक्यता असते. तसेच त्याच्यावर ओव्हरलोड नसल्याने तो आपल्याला जास्त वेळ देऊ शकतो. "बारीकशी शंका असेल तर फोनवर विचारली तर तुम्हाला चालेल का?" हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण प्रत्येक शंकेसाठी आख्खी अपॉइंमेट, एकवेळ फी म्हणून परवडेलही, पण ट्रीटमेंट चालू असताना आलेला एखादा ऑड अनुभव हा ओके (अपेक्षित) आहे ना? की काही बदल हवा आहे? हे लगेच कळण्याने पुढील आठवडा किंवा जो असेल तो काळ, चिंतेत घालवणे टळते, हा मोठा फायदा असतो. इमेल सुध्दा चालेल. पण फक्त 'रिसेप्शनिस्टशीच संपर्क आणि तोही पुढची अपॉइंटमेंट घेण्यासाठीच' असा चिलखतात गडप होणारा डॉक्टर नको.
इनअक्सेसिबल जीनियसपेक्षा अक्सेसिबल कॉमनसेन्सवाला बरा! काही डॉक्टरांची जीवनशैलीबाबत किंवा मूल्यप्रणालीबाबत आग्रही मते असतात. खरे तर डॉक्टरची प्रथम भूमिका 'कामयेत् दुःखतप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम्' ही असायला हवी. क्रायसिस सुटल्यानंतर सदुपदेश करायला हरकत नाही. पण काही मताग्रही डॉक्टर चेहेऱ्यावर 'यू डिझर्व टु सफर' (तुमची लायकी त्रास भोगण्याचीच आहे) असा भाव घेऊन बसलेले असतात. वैद्यकातील ठराविक पध्दतींवर त्यांचा जोर किंवा रोष असतो. अशा न्यायासनावर बसण्याच्या वृत्तीपेक्षा, क्षमता थोडी कमी असली तरी परवडते.
त्वरीत शामक औषध सुरू करून एकीकडे निवारक औषधाचा शोध घेणे आवश्यक असते. निवारक औषध सापडताना विकाराचे निदान आणि व्यक्तीचा निरनिराळ्या औषधांना प्रतिसाद यात काही प्रायोगिक टप्पा अनिवार्य असतो. हे चालू असताना एकीकडे डॉक्टरांना महत्त्वाची वाटेल अशी शारीरिक, जनुकीय, प्रसंगविषयक, स्वभावविषयक माहिती शक्यतो लेखी पाठवत रहावी म्हणजे प्रत्यक्ष भेटीतला वेळ जास्त नेमकेपणाने वापरता येतो.
निवारक औषध सापडल्या नंतर त्याचा परिणाम दिसायला वेळ लागतो. हा काळ सुसह्य व्हावा म्हणूनच शामक औषध वापरावे लागते. डोसही नेमका सापडण्यासाठी फाईन ट्युनिंग करावे लागते. नेहमी डॉक्टरकडे जाताना आपल्याला विचारण्याचे पॉइंट्स लिहून न्यावेत कारण ऐनवेळी विसरतात. आपले आख्खे कथानक ऐकणे डॉक्टरांना शक्य नसते व त्यांना प्रस्तुत वाटेल असेही नसू शकते. विशेषतः दोष हा कुणाचा? हा मुद्दा नसून आपल्यावर झालेला परिणाम कोणत्या स्वरूपाचा हे त्यांना प्रस्तुत वाटते. डॉक्टरांनी ऐकून घ्यावे हेही खरे आहे पण म्हणून आपण त्यांना पीळ मारून बोअर करावे असे नव्हे. खरेतर डॉक्टर आणि पेशंट यात मध्यस्थ मित्र असणे ही सर्वात उत्तम रचना आहे.
डॉ. हमीद दाभोलकर यांनी 'आरोग्यमित्र' म्हणून सामान्य माणसांना प्रशिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम चालवला आहे. डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. आनंद नाडकर्णी (आणि मला माहित नसलेल्या इतरांनीही) आंतरक्रिया-गट चालू केलेले आहेत.
पेशंटची सर्वाधिक काळजी घेणाऱ्या व्यक्तींना पेशंटचे विचित्रपणे व त्याला क्लेश भोगताना पहाणे या गोष्टी सोसाव्या लागत असतात. यातून निकटवर्तीयांची जी मानसिक झीज होत असते ती हाताळण्या साठी त्यांनासुध्दा डॉक्टरच्या मदतीची गरज असते. म्हणजे सांभाळून घेणारेच कोसळू लागले तर वाढते अरिष्ट निर्माण होऊन सगळेच प्रकरण फसू शकते. याचे भान डॉक्टरांनीही बाळगले पाहिजे त्यांनी एकाच व्यक्तीपुरता विचार करून भागणार नाही. तसेच पेशंट कडून मिळणारा प्रतिसाद आणि निकटवर्तीयाकडून मिळणारी माहिती या दोन्हीचा उपयोग डॉक्टरांना करून घेता येतो.
डॉक्टरांशी वागताना आणखी एक पथ्य पाळणे फार आवश्यक आहे. इंटरनेट आणि पुस्तके वाचून जी माहेती मिळते ती फारच ढोबळ असते. उदाहरणार्थ प्रत्येकाची नॉर्मल रेंज काय? प्रपोर्शन्स कशी? हे त्यात मिळत नाही. संभाव्यता-गणितात क्वचित येणारी संभाव्यता ही काळ्या दगडावरची रेघ समजण्याचा धोका अति-माहितीमुळे होऊ शकतो. तसेच एखादे उदाहरण म्हणजे सिद्धांत सिद्ध होणे नव्हे हेही भान सुटू शकते.
डॉक्टरांचा अनुभव, कौल-क्षमता(जजमेंट), साकल्याने विचार करणे याची जागा उठवळ माहिती-शलाका कधीच घेऊ शकत नाहीत. इंटरनेटचा वापर आपण डॉक्टरांना मुर्खात काढण्यासाठी करू लागलो तर ते म्हणतील मग उपचारही नेटवरच घ्या!
विकारग्रस्त व्यक्तीने कुणावरतरी श्रद्धाच ठेवली पाहिजे. कोणते वाचन करू नये हेही महत्त्वाचे आहे. अगदी मेडिकल स्टुडंटसुध्दा जसजशी लक्षणे शिकतात तसतशी ती त्यांना स्वतःतच दिसू लागतात हा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे भित्यापाठी ब्रह्मराक्षस लावू नये. विशेषतः डिप्रेशनच्या काळात नकोसे वाटत असूनही स्वतःला सतत सक्रीय ठेवणे हे एक पथ्य असते. नेहमीपेक्षा हीन अभिरुचीचे साहित्य अशा काळात जास्त उपयोगी येते. मुख्यतः थ्रिलर्स आणि फार्स! शारीरिक खेळ, पोहोणे, बागकाम, स्वयंपाक, निरर्थक कोडी सोडविणे, वेगळ्याच ठिकाणी जाऊन रहाणे अशा गोष्टी कराव्या लागतात.
जीवनाला अर्थ आहे का? असे प्रश्न वर्ज्य केले पाहिजेत. एकतर अर्थ हा असलाच तर जीवना-'त' असतो, जीवना-'ला' नव्हे. तो बराचसा आपणच भरलेला असतो आणि काहीसा सापडलेलाही असतो. तत्त्वज्ञान ही जशी भरल्या पोटी करण्याची गोष्ट आहे तशीच ती (न्युरोट्रान्समीटर्सनी) भरल्या मेंदूने करण्याची गोष्ट आहे!