International Environment Day: प्लास्टिकला बाय बाय करणारा 'पनवेल वेस्ट वॅारियर्स ग्रुप'
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला आळा बसावा. प्लास्टिकचा वापर कमीत-कमी कसा करता येईल. प्लास्टिकचे धोके पाहता त्याचा पुर्नवापर कसा करता येईल? लोकांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती कशी करता येईल. या संदर्भात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत. अनेक तरुण मुलं आता प्लास्टिकचा सजगपणे वापर टाळत आहेत. अशा प्रकारे पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम पनवेल वेस्ट ग्रुप गेल्या 7 वर्षापासून करत आहे.
पर्यावरण दिनानिमित्त पनवेल वेस्ट वॉरिअर्सने मॅक्समहाराष्ट्र शी बातचीत केली. यंदा जागतिक पर्यावरण दिनी प्लास्टिकचा वापर अर्ध्याहून कमी करण्याचा निर्धार करू तसेच वापरून फेकण्यात येणाऱ्या प्लास्टिक ऐवजी पुनःप्रक्रिया करण्याजोग्या प्लास्टिकचा शक्य तेव्हा, शक्य तिथे वापर करून याची सुरुवात आपण करूया. असा निर्धार पनवेल वेस्ट वॉरिअर्सने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला आहे.
पनवेल वेस्ट वॅारियर्स ग्रुप कसं काम करतो?
वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला रोखण्यासाठी पनवेल वेस्ट वॉरियर्सचा ग्रुप दैनंदिन वापरात कमीत-कमी प्लास्टिकचा वापर करतो. त्यासोबतचं प्लास्टिकचा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कल्पकतेने बनवून पुर्नवापर केला जातो. डंपिंग ग्राउंडवर प्लास्टिक जाऊ नये, पशू पक्षी प्लास्टिक खाऊन मरु नयेत, प्लास्टिक त्यांच्या शरीरातून अन्नसाखळीत जाऊ नये म्हणून पनवेल वेस्ट वॉरियर्स ग्रुपने 2014 पासून सर्व वस्तूंच्या पुर्नवापराचे काम सुरु केले आहे.
सुरुवातीपासून हा ग्रृप स्वखर्चाने काम करत असून आता त्यांच्या कामाची दखल सर्वसामान्यांनी घेतली आहे. ते ही या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आता पुढे आले आहेत.
आता या ग्रृपची प्लास्टिक रिसायकलिंगची 11 सेंटर्स, थर्माकॉल रिसायकलिंगचे 1 सेंटर आहे. तसंच हा पर्यावरणासह शिक्षण क्षेत्रातही काम करतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शालेय पुस्तक वाटण्याचं काम हा ग्रृप करतो. सध्या या कामाची 5 सेंटर्स आहेत.