इंडिया टुडे चॅनेलचा अजेंडा उघड, सोयीनुसार भारत-इंडियावर घडवली चर्चा

सध्या आपल्या देशाचं संबोधन भारत की इंडिया असं करायचं यावरून वाद सुरू आहे. यामध्ये माध्यमांकडूनही जोरदार वार्तांकन केलं जातंय. मात्र, माध्यमांकडून तज्ज्ञांची मतं ही छेडछाड करून दाखवली जात असल्याचा मुद्दा प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक यांनी उपस्थित केलाय. त्यासाठी त्यांनी इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनी आणि लल्लनटॉप या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिलाय.

Update: 2023-09-07 13:50 GMT

देवदत्त पटनायक यांची भारत की इंडिया या विषयावर इंडिया टुडे या चॅनेलला मुलाखत हवी होती. त्यासाठी त्यांनी पटनायक यांना एक प्रश्नावली पाठवली. त्याच्या उत्तरादाखल पटनायक यांनी प्रत्येक प्रश्नांचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून इंडिया टुडे या चॅनेलला पाठवले. त्याचप्रमाणे लल्लनटॉप या युटुयब चॅनेलनंही पटनायक यांना प्रश्नावली पाठवली, त्यालाही पटनायक यांनी छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं दिली. साधारणपणे चॅनेल्स किंवा वृत्तपत्रात अशाच पद्धतीनं मुलाखती घेतल्या जातात. लल्लनटॉप नं त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं तो इंटरव्हूय केलाय.

इंडिया टुडे नं हा इंटरव्ह्यू अनैतिक मार्गानं दाखवला. ही मुलाखत दाखवतांना मात्र पारदर्शी असल्याचा भास निर्माण करण्यात आला. इतिहासकार संजीव सन्याल यांचा देखील या डिबेटमध्ये समावेश होता. एडिटिंगच्या सहाय्यानं त्यांनी या डिबेटला जणू युद्धाचं स्वरूपच दिलं. या डिबेटमध्ये मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना संजीव सन्याल यांनी उत्तरं दिल्याचं दाखविण्यात आलं, असं देवदत्त पटनायक यांचं म्हणणं आहे. मात्र, इंडिया टुडे चॅनेल काल्पनिक गोष्टींचं इतिहासात रूपांतर कसं करू शकतो ? आता मुळात हाच मुद्दा आहे की डिबेटमध्ये दोन्ही व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित पाहिजेत. मात्र, एका व्यक्तीचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आणि दुसरी व्यक्ती थेट लाईव्ह डिबेटमध्ये सहभागी झाली. याला लाईव्ह डिबेट कसं म्हणायचं, असा प्रश्नही देवदत्त पटनायक यांनी उपस्थित केलाय. संजीव सन्याल यांच्या वरिष्ठांना कदाचित अमिष त्रिपाठी हे थोर इतिहासकार आणि रोमीला थापर या कदाचित काल्पनिक कादंबरीकार वाटत असाव्यात, असा टोमणाही पटनायक यांनी इंडिया टुडेला लगावलाय.

संजीव सन्याल यांनी उपस्थित केलेले मुद्दे कसे काल्पनिक आहेत, हे सांगण्यासाठी पटनायक यांनी एक सविस्तर ट्विटच केलंय. यात त्यांनी राजकीय पक्षांच्या आयटी सेल आणि बिंदी ट्रोलर्सचंही लक्ष वेधलंय. इंडिया टुडे चॅनेलचा एकांगीपणा, खोटारडेपणा पटनायक यांनी कसा उघडा पाडलाय तो बघा...

संजीव सन्याल : दहा राजांची लढाई ही पुरूष्णी किंवा पाकिस्तानमधील पश्चिम पंजाबच्या रावी नदीच्या काठावर झाली होती.

वस्तुस्थिती : ही लढाई रवी नदीच्या काठावर सुरू झाली होती, पण नंतर अंतिम टप्प्यात यमुना नदीच्या तीरावर ही लढाई पोहोचली. या लढाईनंतर कुरू राज्याची स्थापना झाली. जी कुरूक्षेत्राशी संबंधित आहे.

संजीव सन्याल : उत्तरेकडील वेंकट हिल्स आणि दक्षिणेकडील कुमारी यांच्यामध्ये राहणारी लोकं भारताच्या वैदिक व्याख्येशी जुळतात अशी तमिळ लोकांची व्याख्या टोल्कप्पियम यांनी केली आहे.

वस्तुस्थिती : टोल्काप्पियम यांनी ही व्याख्या वेदांपासून प्रभावित होऊन केलेली आहे. मात्र, ऋग्वेदामध्ये कुठेही भारताच्या भौगोलिक अस्तित्वाची व्याख्या करण्यात आलेली नाही. आधुनिक काळातील हरियाणा आणि पंजाबमध्ये राहणाऱ्या जमातीच्या रूपात त्याचा उल्लेख आहे. इ.स.पूर्व ४ थ्या शतकात पाणिनी च्या अष्टाध्यायी मध्ये भारताच्या भौगोलिक-राजकीय अस्तित्वाचा उल्लेख नाहीये. अष्टाध्यायीमध्ये फक्त तत्कालीन मगध प्रांत वगळून उत्तर भारताचा उल्लेख करण्यात आलाय. त्यानंतर खारावेला यांनी भारतवर्ष संकल्पनेचा वापर पहिल्या शतकात केला. त्यातही फक्त उत्तर भारताचाच समावेश होता. कलिंगा आणि मगध प्रांत त्यातून वगळण्यात आला होता. लोकं यासाठी विष्णूपुराणाचाही दाखला देतात. टोल्काप्पियम च्या व्याख्येचा विचार केला तर त्याचा अर्थ भारत असा होत नसून तामिल्काकम असा होतो. फक्त उत्तरेकडील वेंकट टेकडीपर्यंत पसरलेला आहे जो तिरुमलाशी संबंधित आहे आणि हिमालयाशी नाही, असा त्याचा अर्थ होतो.

संजीव सन्याल : ऋषभ राजाला एक मुलगा होता त्याचं नाव नाभी होतं. त्यानंतर नाभीवर्ष हा शब्द प्रयोगात आला.

वस्तुस्थिती : नाभी हा ऋषभचा वडील होता.

संजीव सन्याल : हिंदू आणि जैन परंपरा या ऋषभ आणि त्यांचा मुलगा भरत याला मान्यता देतात.

वस्तुस्थिती : ऋषभला जैन परंपरेत पहिला तीर्थंकर आणि त्याच्या मुलाला पहिला चक्रवर्ती म्हणून महत्त्व आहे. या परंपरेत, ते इक्ष्वाकू घराण्यातील आहेत, ज्यामध्ये दशरथ आणि राम देखील आहेत. तर दुसरीकडे वाल्मिकी च्या रचनेत ऋषभ किंवा त्यांचा मुलगा भरत असल्याचा कुठलाही उल्लेख इक्ष्वाकू घराण्यात आढळत नाही. हिंदू आणि जैन दोन्ही परंपरांच राजवंशावर एकमत आहे. मात्र, भरत आणि ऋषभ यावर एकमत दिसत नाही. शिवाय कुठल्याही ब्राह्मणवादी ग्रंथांमध्ये या दोघांच्या नावांचा कुठंही उल्लेख आढळत नाही. फक्त त्रिशष्ठिलक्षण महापुराण आणि आदिपुराण या दोन पुराणांमध्ये ऋषभचा उल्लेख आहे. ९ व्या शतकात आणि विष्णुपुराणमध्ये इक्ष्वाकू घराण्याचा उल्लेख आहे. मात्र, तिथंही ऋषभ किंवा भारतचा उल्लेख नाही.

संजीव सन्याल : दहा राजांच्या लढाईनंतर सुडास हा पहिला चक्रवर्ती झाला होता.

वस्तुस्थिती : जैन आणि ब्राह्मण परंपरा भारतवर्ष यावर सहमत असल्याचेही सन्याल आवर्जून सांगतात. मात्र, जैन परंपरेत सुडासचा संदर्भ सापडत नाही. जैन आणि ब्राह्मण परंपरेचा पहिला चक्रवर्ती हा भारत असून तो ऋषभचा मुलगा असल्याचं ते सांगतात.

संजीव सन्याल : लोहयुगापर्यंत संपूर्ण भारतीय उपखंड स्वतःला भारत म्हणवत होता.

वस्तुस्थिती : हत्तीगुंफा शिलालेख भारतीय लोहयुगाच्या बऱ्याच कालावधीनंतर आलाय. शिवाय भारतवर्षच्या व्याख्येमध्ये मगध किंवा कलिंगा यांचा समावेश नसल्यामुळे हे खरे नाही. त्यामुळं लोहयुगापर्यंत संपूर्ण भारतीय उपखंड स्वतःला भारत म्हणत होता, हे खरं नाहीये. इ.स.पूर्व ३५० मध्ये पाणिनीच्या व्याख्येमध्येही पूर्व भारताचा समावेश नाहीये. टोल्काप्पियम यांनी कुठल्याही स्वरूपात भारत नावाचा उल्लेख केला नाही.

संजीव सन्याल : ऋग्वेदातील शेवटचे स्तोत्र (जप) भारतीय असण्याच्या कल्पनेचा परिचय देते जे कालांतराने सप्तसिंधूमध्ये विकसित होते. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरीची भूमी म्हणून पुन्हा परिभाषित केली जाते.

वस्तुस्थिती : ऋग्वेदातील शेवटचे स्तोत्र भारताच्या अधिपत्याखाली अनेक जमातींना एकत्र आणण्याचे काम करते. तथापि, त्यात विंधच्या दक्षिणेकडील किंवा बंगालच्या पूर्वेकडील भागाचा समावेश असल्याचे कोणतेही संकेत देत नाही. सन्याल जे सांगत आहेत ते 10.191 च्या चार श्लोकांमध्ये कोणतेही आधार नसलेले शुद्ध व्यक्तिनिष्ठ अनुमान आहे. पुरावा म्हणून त्यांनी दिलेल्या मंत्राला मंत्रस्नान असे म्हणतात आणि ते फक्त स्कंद, विष्णू आणि शिव या तीन पुराणांमध्ये आढळते - यापैकी एकही पुराण इसवी सणाच्या तिसऱ्या शतकापेक्षा जुना नाही.

Tags:    

Similar News