"भुकेला धर्म नसतो, माणसांची भूक हाच माणसांचा धर्म”

हिंदू-मुस्लीम मुद्दा पेटवणाऱ्यांनो ‘अर्थकारण’ नेमकं कसं चालतं समजून घ्या आनंद शितोळे यांच्या लेखातून... वाचा

Update: 2024-07-06 07:49 GMT

उपवासाला लागणारी फळ उत्पादन करणारे शेतकरी बहुसंख्येने हिंदू आहेत. फळबागांचे मालक, फळबागेत काम करणारे शेतमजूर, वाहतूक करणारे वाहन व्यवसायिक, खत औषध बियाणं विकणारे हिंदू आहेत.

फळांचा व्यापार करणारे बहुतांशी बागवान समाजाचे मुस्लीम आहेत. त्यांच्याकडून घाऊक फळ विकत घेऊन रस्त्यावर किरकोळ फळ विकणारे पथारी, हातगाडी, फेरीवाले हिंदू आहेत. उपवासाला फळ विकत घेणारे हिंदू आहेत तसेच रमजान महिन्यात फळ विकत घेणारे मुस्लीम आहेत.

पोल्ट्री व्यवसाय करणारे बहुसंख्य हिंदू आहेत. आपापल्या दुकानात अंडी ठेवणारे हिंदू मुस्लीम सगळे आहेत आणि मटणाच्या दुकानात अंडी विकायला ठेवणारे मुस्लीम आहेत.शेळी मेंढी पालन करणारे पशुपालक हिंदू आहेत, हिंदू शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतात, बकरी ईदच्या काळात बोकड विक्री चांगली होते, आलेल्या पैशातून शेतकरी बियाणे, खत खरेदी करतात, पेरणीला हेच पैसे उपयोगी पडतात.

नाताळमध्ये केकला मोठी मागणी असते. बेकरी धंद्यात पूर्वी प्रामुख्याने मुस्लीम कारागीर होते आता अन्यधर्मीय सुद्धा आहेत. नाताळमध्ये केकची मागणी ख्रिश्चन समाजाकडून येते. नाताळ-आषाढी-बकरी ईद हि प्रातिनिधिक उदाहरण, कुठल्याही धर्माच्या सणाला बाजारात होणारी उलाढाल आणि पैसा सगळ्याच्या हातात खेळतो.

“पैशाला, धंद्याला धर्म नसतो, जात नसते, पैशाचा धर्म फक्त पैसा.”

लोकसंख्येचा हिशोब बघितला ७५ टक्के हिंदू लोकसंख्या आणि २० टक्क्याच्या आसपास असलेली मुस्लीम लोकसंख्या. मांसाहारी मुस्लिमांच्या पेक्षा संख्येने मांसाहारी हिंदू संख्येने जास्त भरतील.

ग्रामीण अर्थकारण एकमेकांच्या सहकार्याने चालत. बागवान हिंदूची फळे विकायची नाही म्हणाले तर उपाशी मरतील.

हिंदू शेतकरी फळ बागवान व्यापाऱ्याला द्यायची नाहीत म्हणाले तर फळ नासून सगळाच नाश होईल. हिंदू शेतकरी कुर्बानीला बकर विकायचं नाही म्हटले तर एवढे बोकड कुठं पोसायचे आणि काय करायचे या चिंतेने मरून जातील.

कुर्बानीला हिंदू शेतकऱ्यांच्या बोकडाची कुर्बानी द्यायची नाही असं मुस्लीम म्हणाले तर बकरी ईद साजरी होणारच नाही. छोट गाव, तालुका, शहर, जिल्हा ,राज्य, देश काहीही घ्या, अर्थकारण एकमेकांच्या हातात हात घालून चालले तरच सुरळीत चालते. ज्यांची पोट बिनकष्टाने, बापाच्या आयत्या पैशावर भरलेली आहेत त्यांच्या ढुंगणात हे आर्थिक बहिष्कार घालण्याचे येडे किडे वळवळ करतात.

शहाण्या लोकांनी या मठ्ठ आणि बेअक्कल लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रपंचाकडे लक्ष देणे आणि व्यवसाय व्यापार यामध्ये धर्म-जात न आणणे हेच योग्य आहे.

Tags:    

Similar News