तरी भाजपवाल्यांची माणुसकी जागी होत नाही ?

राहुल गांधी मणिपूरमधील जिचे मूल मारले गेले आहे अशा महिलेच्या भेटीची कहाणी सांगत होते. तेव्हा भाजपचा कोणी खासदार झूठ असे ओरडला. ग्रामपंचायत किंवा नगरपालिकांमध्ये देखील लोकसभेपेक्षा बरे वातावरण असते. लोकसभेतील गदारोळावर भाष्य करणारा राजेंद्र साठे यांचा हा लेख वाचायलाच हवा…

Update: 2023-08-10 03:59 GMT

लोकसभेतील अविश्वास ठरावावरची चर्चा पाहणं हा अत्यंत हताश आणि निराश करणारा अनुभव आहे. नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. खरे तर ते प्रश्नांची उत्तरे देण्यापुरतेच त्यांनी लोकसभेत बोलायला हवे. पण ते ठाकरे गटाची औकात काढत होते. सर्वच मराठी खासदारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा धोबीघाट थाटला होता. अपवाद सुप्रिया सुळे यांचा.

बुधवारी कहर झाला. राहुल गांधी मणिपूरमधील जिचे मूल मारले गेले आहे अशा महिलेच्या भेटीची कहाणी सांगत होते. तेव्हा भाजपचा कोणी खासदार झूठ असे ओरडला.

राहुल यांना विरोध ठीक आहे. पण इतका मस्तवालपणा? दंगलीत गोळी लागून मेलेल्या मुलाच्या प्रेताशेजारी आई बसून होती हा प्रसंग ऐकूनही भाजपवाल्यांमधली माणुसकी जागी होत नसेल तर पृथ्वीवरचा नरक हमीन अस्त, हमीन अस्त, हमीन अस्त.

मणिपूर जळते आहे. पण लोकसभेतील सगळी चर्चाच त्या झूठ असे ओरडण्याइतकीच बेरहम वाटते आहे.

याला विरोधकही तितकेच जबाबदार आहेत. त्यांची भाषणेही भरकटलेली होती. मणिपूरबाबत त्यांनी तपशील देऊन ठोस सवाल करणे अपेक्षित होते. गौरव गोगोईंनी ते केले. पण विरोधक एक टीम म्हणून भाषणांचे नियोजन करायला हवे होते. ते दिसले नाही.

राहुल हेदेखील भाजपला खिजवण्याच्या भूमिकेत बराच काळ राहिले. शिवाय, मणिपूरमध्ये भाजपने भारतमातेची हत्या केली आहे असे भावनात्मकच अधिक बोलले.

मोदींना बोलायला लावायचे इतकेच उद्दिष्ट ठेवून विरोधकांनी ही आखणी केली. जणू मोदी मणिपूरवर बोलले की तोच आपला विजय असेल असे त्यांना वाटते आहे. विरोधक त्यातच फसले. मणिपूर किंवा हरियाणा इत्यादींबाबत नेमकेच दहा-पंधरा प्रश्न उपस्थित करून मोदींनी फक्त त्याचीच उत्तरे द्यावीत असे केले असते तरी अधिक उपयोग झाला असता.

आता उद्या मोदी बोलतील. त्यात बहुदा मणिपूर कमी आणि बाकीच्या गोष्टी अधिक असतील. नेहरू, इंदिरा, काँग्रेस इत्यादींची जुनी पापे काढतील. तेव्हा भारतमातेची हत्या झाली नव्हती का वगैरे सवाल करतील. टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मिडिया तेच उचलून धरेल. बाकी लाभार्थी हेच माझे कवचकुंडलं आहेत वगैरेही असेलच.

पंतप्रधानांनी अविश्वास ठरावाला उत्तर दिल्यावर त्याचा प्रतिवाद करता येत नाही. त्यामुळे शेवटचा शब्द मोदींचा असेल. अर्थात तसा तो नसता तरीही माध्यमे आणि भाजपचे भक्त यांनी मिळून मोदींचाच विजय जाहीर केला असताच.

मणिपूरला श्रध्दांजली.

Tags:    

Similar News