पब्जीत लढाया जिंकणाऱ्यांना मल्हारी कधी समजणार?
मोबाईल गेमच्या या जगात मातीतल्या खेळांकडे दुर्लक्ष होते आहे, पण या मातीतील खेळांनी माणूस कसा घडतो, याचे एक उदाहरण आजही जिवंत आहे....समाजाला हा मल्हारी समजणार का, असा सवाल विचारत आहे, शिक्षक आणि डाव्या चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते मारुती शिरतोडे....;
भारतात परदेशी खेळांचं फॅड नव्हतं तेव्हा वाझरात पोरांना कुस्तीचं याड लागलं होतं. अमूल नावाचा जागतिक ब्रँड तेव्हा उदयास आला नव्हता. त्यामुळे त्याकाळात दुधाचा महापूर डेअरीत नव्हता तर प्रत्येकाच्या घरात होता. माणसं दूध विकत नव्हती, एकमेकाला पैशात मोजत नव्हती तर तेच दूध पोरांना तांब्यातांब्यानं पाजत होती. पोरं रटात येत होती. तालमीत घाम गाळत होती. खुराक खाऊन शरीर कमवत होती. तेव्हा घरात अठराविश्व दारिद्र्य असणारा एक पोरगा अचानक तालमीत येऊ लागला आणि चटणीभाकर खाऊन भल्याभल्यांना लोळवू लागला. भयंकर जिद्दीने पेटलेला आणि गरिबीशी झटलेला तो पोरगा होता मल्हारी भैरु कांबळे.
वाझर.... कुस्तीची जुनी परंपरा असलेलं येरळाकाठचं गाव. गावाला दिमाखदार भूगोल आहे तसाच देदिप्यमान इतिहासही. याच गावाला स्वातंत्र्यपूर्वकाळात कुस्तीने झपाटलेलं होतं. सुरुवातीला पांडू रामोशी या स्वातंत्र्यवीराने गावात तालीम सुरू केली आणि पंचायतीने काही कालांतराने गावातल्या पोरांसाठी नवीन तालीम बांधली. परसुदाजी, गुलाबमामा हे कसलेले वस्ताद पोरांना कुस्तीचे धडे देऊ लागले. त्यावेळी एक पोरगा त्यांच्या हाताखाली कुस्ती शिकू लागला. पहिल्याच दिवशी डाव न शिकलेलं पण व्यवस्थेने खचलेलं ते पोरगं तालमित आलं आणि भल्याभल्यांना आस्मान दावून गेलं. तेव्हापासून त्या पोराला कुस्तीचा नाद लागला. सुबराव जाधव, मारुती जाधव, शिवाजी जाधव, जगन्नाथ जाधव, आत्माराम कुंभार, परशराम साळुंखे, दौलू शिरतोडे, बळवंत शिरतोडे, आण्णा शिरतोडे, भगवान जाधव, जगन्नाथ शिरतोडे, बापु बाबर, हिंदुराव सावंत, रामचंद्र काळेबाग, विठ्ठल शिरतोडे, ईश्वर शिरतोडे, मल्हारी शिरतोडे यांच्यासोबत ते पोरगं पंचवीस किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळातील गावंच्या गावं कुस्तीसाठी पालथी घालू लागलं. पाच रुपयेपासून पन्नास रुपये पर्यंतच्या कुस्त्या करू लागलं. जत्रेतल्या माणसांचं फेटं आभाळाकडे पाठवू लागलं. आपल्यापेक्षा मुरलेल्या पैलवानांना पाच मिनिटात पाडू लागलं. बघता-बघता पंचक्रोशीतल्या लोकांच्या चर्चेचा विषय झालं. तेच पोरगं कुस्तीचा नवा आशय झालं. ते वादळं शमवणारं आणि नाव कमावणारं पोरगं म्हणजे मल्हारी.
वाझरच्या दलित वस्तीतील भैरु कांबळे हातावर पोट असणारा व गावकी करणारा एक इमानदार माणूस. त्याच्या पोटी चार मुले व दोन मुली होत्या. त्यातलं शेंडेफळ म्हणजे मल्हारी. भैरू आपल्या पोरांसाठी रात्रंदिवस राबत होता. त्याकाळात मल्हारीने केलेल्या कुस्त्यावर गावचे लोक बोलू लागले. मल्हारीचे कौतुक भैरुला सांगू लागले तेव्हा भैरुने गाई पाळल्या. आपोआप त्याच्या कामात भर पडली. वडिलांनी गया राखायच्या, मल्हारीनं कामाला जायचं, आईने घरी जात्यावर दळण करून भाकर्या थापायच्या, खुराक करायचा आणि मल्हारीची पैलवानकी जपायची असा दिनक्रम सुरू झाला. गावातली सगळी पोरं आसपासच्या कुस्ती मैदानात जाऊ लागली. मल्हारी सुद्धा जोरदार कुस्त्या करू लागला. एकदा रामापूरच्या मैदानाला मल्हारी गेला. त्यावेळी कवठेपिरान हे कुस्तीत नावाजलेलं गाव होतं. त्यामुळे कवठेपिरानच्या राबलेल्या पोरांना पाडणं हे कुणा ऐऱ्यागैऱ्याचं काम नव्हतं. मल्हारी कांबळेची कवठेपिरानच्या नावाजलेल्या पैलवानाबरोबर या मैदानात कुस्ती लागली. समोरचं पोरगं रोजचं सराव करणार होतं. पण मल्हारी समोरच्याला थटवत होता. जवळ जवळ अर्धा तास कुस्ती चालली. पुढच्या पट्ट्याचा अंदाज घेऊन मल्हारीने तिसाव्या मिनिटाला निकाल काढत त्याला अस्मान दाखवलं आणि पाहणार्यांचे डोळे दिपून गेलं. त्याक्षणी आईबापाच्या प्रचंड कष्टाचं मल्हारीनं चीज केलं. कुस्तीवर नजर रोखून बसलेले कुस्ती शौकीन उठून उभे राहिले आणि टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांनी मल्हारीच्या कुस्तीला सलामी दिली.
कुस्तीचं याड लागलेल्या मल्हारीने गावात नाथाच्या देवळात पत्र्याच्या शेडमध्ये भरणाऱ्या शाळेला दुसरीतच राम राम ठोकला होता. वयाच्या नवव्या वर्षापासून मल्हारी पडेल ती कामं करू लागला होता. गावात कुणाला उलटं बोलायचं नाही आणि कुणाला नाही म्हणायचं नाही. त्यामुळे लोकांनी सांगेल ती कामं तो करत होता. कधी मोबदल्यात तर कधी विनामोबदल्यात करत होता. विहिरीवर कामाला जाणे, गुऱ्हाळावर कामाला जाणे, मातीकाम करणे अशी कामं तो करत होता. मात्र प्रत्येक फडावर कुस्ती ही तितक्याच जोमाने करत होता. अनेक मैदाने गाजवत होता वाझरच्या मैदानावरही तितक्याच जोशात झुंजत होता. त्यामुळे मल्हारी कांबळेला गावात विशेष नावलौकिक झाला होता. स्वातंत्र्यपूर्वकाळात गावागावात जातिव्यवस्थेची उतरंड घट्ट होती. अस्पृश्यतेची पाळंमुळं रुजली होती. अशा परिस्थितीत वाझरमध्ये मात्र सगळ्या जातीची पोरं गोळा होऊन कुस्त्या खेळत होती. कुस्त्याला सोबत जात होती. जातीच्या पलीकडे जाऊन मातीत एकत्र येत होती. मातीशी नाळ जोडून आभाळाकडे झेपावत होती. त्यामुळेच वाझरमध्ये मल्हारी कांबळे तयार होत होता. जो कुस्तीशी इमान राखून आपली कारकीर्द दणाणून सोडत होता.
मल्हारी सर्वच कामात तरबेज असणारा गडी होता. विहीर खोदणे यापासून ते पाट्या टाकण्यापर्यंत मल्हारीचा नाद कोणीच करत नव्हतं. मल्हारी वाझरपासून आपल्या कुळस्वामीला म्हणजे मंगसुळीला जवळजवळ 90 किलोमीटर अंतर सायकलवरून जात होता तर कोल्हापूरच्या ज्योतिबाला चालत जात होता. कष्टाची अवघड काम करत होता. मोठ्या पैजा लावत होता आणि तितक्याच उमेदीने जिंकत होता. त्यामुळे गावात त्याचा गवगवा झाला होता. त्याकाळात वाझरमध्ये शिप्याच्या मळ्यात, दत्तू अण्णांच्या मळ्यात रामतात्याच्या मळ्यात आणि मधल्या माळावर गुऱ्हाळं होती. या गुऱ्हाळात मल्हारी कामाला जात होता. एकदा तो राम तात्याच्या फडात ऊस तोडायला गेला होता. नुकताच मिलिटरीतून आलेला लालू काळेबाग याने मल्हारीशी पैज लावली. शंभर उसाची मोळी उचलून खांद्यावर घ्यायची अशी ती पैज होती. मल्हारीने होकार दिला. कणाकण 100 उस तोडले. त्याची एक मोठी मोळी बांधली आणि हा हा म्हणता ती मोळी उचलून खांद्यावर घेतली तेव्हा लालू काळेबाग आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे बघतच राहिला. मल्हारीने जर मुंबईला जाऊन प्रशिक्षण घेतले असते तर मला वाटते की, मल्हारीने सुद्धा वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक आणले असते. गावागावात असे कित्येक मल्हारी आहेत की, ज्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांना लढ म्हणण्याची गरज आहे.
मल्हारीला दुसरा एक महत्त्वाचा नाद म्हणजे बैलगाड्यांच्या शर्यती. दहा वर्ष त्याने बैलगाडी पळवली व कित्येक मैदानं मारली. त्याने पांड्या नावाचा बैल कुंडलमधून साडेबारा हजार रुपयाला घेतला होता. त्याला इतका तयार केला होता की, कष्टाची कामं करून त्याला वैरण विकत घातली जायची. शर्यतीच्या काळात स्वतःच्या शेतातील 12 पोती गहू त्याने एकट्या बैलाला चारले होते. तो बैल एवढा पळत होता की, अशी अनेक मैदानं मारून बैलाने मल्हारीला लाखात बक्षीस मिळवून दिले होते. स्वतःच्या उतरत्या काळात सुद्धा मल्हारी ताकदीने या पांड्या बैलाला अडवत होता. हा पांड्या जेव्हा वारला तेव्हा मल्हारी धाय मोकलून रडला. बैलावर जीवापाड प्रेम करणारा मल्हारी इतका बैलप्रेमी माणूस मी आयुष्यात कधीच पाहिला नाही.
मल्हारी तत्वनिष्ठ होता. त्याकाळात घरच्या परिस्थितीमुळे मल्हारी मोठा पैलवान व्हायला कोल्हापूर किंवा पुण्याला गेला नाही. तो हिंदकेसरी किंवा महाराष्ट्र केसरी झाला नाही. पण मल्हारी त्यापेक्षा निश्चितच कमी नव्हता असे गावातील जुने जाणते लोक सांगतात. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारा हा मल्हारी जितका त्याकाळात प्रामाणिक होता तितकाच आजही आहे. आजही हा माणूस लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना दिसेल तिथे नमस्कार घालतो. शेतातील कामे मोठ्या उत्साहाने करतो. निरोगी आयुष्य जगतो. अत्यंत नम्र म्हणून हा माणूस गावात प्रसिद्ध आहे. या माणसाने उभ्या आयुष्यात एकदाही आपल्या दाढीला वस्तारा लावला नाही. जे बुद्धीला पटेल आणि मनाला योग्य वाटेल तेच करणारा हा माणूस आहे. आपला मुलगा जेव्हा ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून आला, नातू मिलिटरीत गेला व वाझरच्या यात्रेत आयुष्यात पहिल्यांदाच चौकातल्या डिजिटलवर स्वतःचा फोटो झळकला तेव्हा नव्वदीकडे झुकलेल्या मल्हारीला आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद झाला. अशा माणसांचा आनंद जपणं हे आजच्या पिढीचं काम आहे. कारण या माणसांनी मातीतल्या कुस्तीत अनेक लढाया जिंकल्या आहेत हे आजच्या पब्जीत लढाया जिंकून आयुष्य वाया घालवणाऱ्यांना कधी कळणार? हा तुमच्या-आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
-मारुती शिरतोडे