कोव्हिड: कामगारांची काय चूक?
कोव्हिड काळात कामगारांकडून काम करुन घेत असताना त्याला जर कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? मेधा कुळकर्णी यांचा लेख वाचा आणि नंतरच कमेंट करा...;
नाना असताना केअरटेकर अंकुश आमच्याकडे होता. नाना गेल्यावर त्याला दुसरं काम मिळालं. पण लॉकडाउन सुरू झाल्यावर ते थांबलं. जूनच्या मध्यावर त्याचं तेच काम सुरू झालं. आणि त्याला तिथे २४ तास राहायला सांगितलं गेलं. ते ठीकच होतं. कारण तो ज्यांना सांभाळत होता ते ८५ वर्षांचे डिमेंशियाग्रस्त वृद्ध. कोविडपासून त्यांना जपायचं तर रोज ये-जा करणारी व्यक्ती नकोच. अंकुशचं काम आणि मिळकत सुरू झाली म्हणून बरं झालं, असंच वाटलं.
सप्टेंबरच्या सुरुवातीला या गृहस्थांचा मुलगा दुबईहून परतला. काहीच दिवसांत तो कोविडबाधित झाला. आणि त्यामुळेच ते आजोबा आणि अंकुश यांनाही कोविडचा प्रसाद मिळाला. काय करणार? घडतंच आहे सध्या असं. आजोबा आणि त्यांचा मुलगा खाजगी हॉस्पिटलला दाखल झाले. अंकुशला पालिकेच्या हॉस्पिटलात पाठवलं. सुदैवाने अंकुशला कोविडचा फार त्रास झाला नाही. आठवडाभरात त्याला डिस्चार्ज मिळाला. आणखी १० दिवस आयसोलेशनमध्ये राहायचं, लोकांत मिसळायचं नाही या अटीवर डॉक्टरनी त्याला घरी जायची परवानगी दिली.
नालासोपा-यातलं त्याचं घर लहान आणि तिथे बायको, त्याचे तीन मुलगेही. म्हणून तो बरेचसे पैसे टाकून खाजगी वाहनाने अलिबागजवळच्या त्याच्या गावी गेला. अंकुशला कोविड झाल्याचं मला केअरटेकर एजन्सीच्या मॅनेजरने कळवलं. विचारपूस करायला मी अंकुशला फोन केला, तेव्हा सगळा तपशील त्याने सांगितला. आणि म्हणाला की, हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या दिवसापासून त्या कुटुंबाने याला पैसेच दिलेले नाहीत. उद्वेगाने म्हणाला, यांच्यामुळे मला कोविड झाला. म्हणून कामावर जाऊ शकत नाही. आणि माझी चूक नसताना पैसेही कापले माझे.
खूपच संताप आला हे ऐकून. पुन्हा मॅनेजरला फोन करून म्हटलं, की त्या कुटुंबाकडून पैसे मागून घेतले पाहिजेत. तसे प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही असं मॅनेजरचं म्हणणं. गरिबांशी असं वागून काय मिळत असेल लोकांना? अंकुश केवढा धोका पत्करून त्यांच्याकडे काम करत होता. त्याचे पैसे बुडवून किती क्षुद्रपणा केलाय त्या कुटुंबाने!