गंज कशी लावतात ?

ताटं,आळाशी ,पेंडी ,पांचुदा ,खुबडी ,गर ,बुचाड ,कातरा हेल,सुडी आणि गंज ही म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का ? ही नावं तुम्ही कुठे ऐकली आहेत का ? जाणून घ्या ग्रामीण साहित्यिक लक्ष्मण खेडकर यांच्याकडून….;

Update: 2023-02-21 08:51 GMT

ज्वारीच्या किंवा बाजरीच्या ताटं एकत्र काढून जमिनीवर आडवी टाकली की त्यांची आळाशी तयार होते. तिला आळा घातला की त्याचे पेंडी होते. पाच पेंड्या एकत्र ठेवल्या की त्याचा पांचुदा होतो. तो उभा केला की त्याला खुबडी म्हणतात. शेंडा न काढता अनेक पांचुदे एकाला एक पेंडी लावून उभे केले की त्याची गर होते. गरीचा शेंडा काढला की त्यांचे बुचाड होते.

हेच जमिनीवर आडवं उभं एकावर एक रचले की त्याचा कातरा होतो. याच पेंड्या कुंकवाच्या करंड्याच्या आकारात रचल्या तर त्याला सुडी म्हणतात. गाडीत रचल्या तर त्याला हेल म्हणतात. कणसं खुडून झाल्यावर रचल्या जाणा-या वैरणीला गंज किंवा वळही म्हणतात. गर आणि कातरा सोडता बाकी सगळ्याची रचना कणसासहित असलेलं गुड किंवा वैरण पावसात भिजू नये अशा पद्धतीने केलेली असते.

कापुस, तूर ,मुग, मका ह्या सारखी नगदी पिकं आल्यापासून ह्यातल्या ब-याचशा गोष्टी आज केल्या जात नाहीत. पीक बदलली ,बाजरी ज्वारीच्या पेरीचं क्षेत्र घटलं, आम्ही शेवटीची सुडी लावलेली पंधरासोळा वर्षे झाले असतील आता कुठं ही सुडी दिसत नाही. मी ही रचायचो सुडी. खूप कौशल्याचं काम सुडी लावणं. गावात खूप कमी लोकांना जमायचं. ज्यांना जमायचं त्यांना वयोमानानुसार बँलन्स करण अवघड होयचं आणि सुडी लावण ते थांबवायचे.

गंज वळही लावलेली दिसते सध्या कुठ कुठं? गेल्या दोन वर्षात आम्ही ती ही लावली नाही. गंज लावण्याऐवढी वैरणच नाही ठेवली आम्ही. काही दिवसानंतर हळू हळू एक एक करीत ह्या सगळ्या गोष्टी आणि बैलं ही हद्दपार झालेले दिसतील शेतशिवारातून.

Tags:    

Similar News