मूडीजी, जोतीराव जाकिटवाले, युक्रेन आणि स्टेट बँक..
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्याचे संपूर्ण श्रेय भाजपचे नेते, कार्यकर्ते पंतप्रधान मोदींना देत आहेत. तर दुसरीकडे सरकारला कुणी जनहिताचे सवाल विचारले तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. देशातील या राजकीय परिस्थितीचा विडंबनात्मक पद्धतीने समाचार घेतला आहे सुनील सांगळे यांनी...;
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्याचे संपूर्ण श्रेय भाजपचे नेते, कार्यकर्ते पंतप्रधान मोदींना देत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह इतरही मंत्री परतणाऱ्या नागरिकांना मोदींमुळे हे शक्य झाल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे सरकारला कुणी जनहिताचे सवाल विचारले तर त्याला देशद्रोही ठरवण्याची नवीनच पद्धत रुढ झाली आहे. देशातील या राजकीय परिस्थितीचा विडंबनात्मक पद्धतीने समाचार घेतला आहे. सुनील सांगळे यांनी...
"काल स्टेट बँकेत मी पासबुक अपडेट करायला गेलो होतो. त्या बँकेचे व्यवस्थापक आहेत मिस्टर मुडी, आणि एक सहव्यवस्थापक आहेत मिस्टर जोतीराव जाकिटवाले आणि एक मिस्टर हिरण्यकश्यपू जोशी! तर मी बँकेत असतांना अचानक बँकेच्या लॉकर रूममध्ये काही लोक अडकले आहेत आणि तिथे दोन साप आहेत असा आरडाओरडा सुरु झाला. बँकेतल्या सगळ्या ग्राहकांनी त्या ग्राहकांना वाचावा असा ओरडा सुरु केला.
पहिले प्रथम तर सहव्यवस्थापक हिरण्यकश्यपू जोशी, जे कर्नाटकातून नुकतेच बदलून आले होते, यांनी तर ग्राहकांना झापायला सुरवात केली. ते म्हणाले "ते लॉकर-रूम मधले ग्राहक बँकेत आलेच कशाला? त्यांना त्यांचे दागिने त्यांच्या घरातच ठेवायला काय झाले होते? आता इथे आले तर आले, वर आम्हाला लॉकर-रूम मधून बाहेर काढा असे ओरडत आहेत हा माज का?" यावर अख्ख्या बँकेतले ग्राहकच ओरडायला लागल्यावर दोघेही सहव्यवस्थापक लॉकर-रूम पर्यंत गेले आणि त्यांनी अडकलेल्या ग्राहकांना सांगितले की तुम्ही लॉकर-रूमच्या दरवाजाबाहेर या, म्हणजे आम्ही तुम्हाला वाचवतो! शेवटी बिचारे अडकलेले ग्राहक जीव मुठीत धरून लॉकर-रूम बाहेर आले. त्याबरोबर त्यांचे जोतीराव जाकिटवाले यांनी त्यांचे गुलाब देऊन स्वागत केले आणि त्यांना सांगितले की व्यवस्थापक मिस्टर मूडीजी यांच्या कार्यक्षमतेमुळेच त्यांना वाचविण्यात यश आले. लगेच जाकिटवाले यांनी त्यांना "भारतमाता की जय",, "वंदे मातरम", "मूडीजी जिंदाबाद" अशा घोषणा द्यायला लावल्या आणि त्यांना बँकेच्या दरवाजापर्यंत सोडून येऊन, हे ऑपरेशन किती शिताफीने आम्ही पार पाडले याच्या मुलाखती आधीच बोलावून ठेवलेल्या सगळ्या चॅनेल्सना दिल्या.
या सगळ्या गोंधळानंतर, बाकी ग्राहक आपल्या कामाला लागले. माझे पासबुक मी अपडेट करायला दिले. त्या ४/५ एंट्री घेतल्यावर ते काम करणाऱ्या क्लार्कने लगेच उभे राहून "भारत माता की जय", "मूडीजी झिंदाबाद", अशा घोषणा उभे राहून दिल्या आणि त्याच्याबरोबरच सगळं बँकेचा स्टाफ सुद्धा उभा राहून त्याच घोषणा देत होता. असा प्रकार प्रत्येक बँक कर्मचाऱ्याने ग्राहकाला पैसे देण्याचे काम केल्यावर, पैसे भरणा करून घेण्याचे काम केल्यावर, नवीन पासबुक दिल्यावर, वगैरे नेहेमीची कामे केल्यावर सुरु होता. एकंदर संपूर्ण बँक दर दोन मिनिटांनी या घोषणांनी दणाणून जायची आणि सगळे चॅनेल्स हे या प्रकारचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते लाईव्ह दाखवत होते.
शेवटी मी एका कर्मचाऱ्याला विचारले, तुम्ही ही रोजचीच कामे तर करताय आणि याचसाठी तुम्हाला नेमलेले आहे आणि त्याचाच तर तुम्हाला पगार मिळतो, मग ही कामे करण्याची एवढी बोंबाबोंब का करताय? आमची हीच कामे वर्षानुवर्षे तर अशीच होत होती, आता त्यासाठी एवढ्या घोषणा का देताय?
तो कर्मचारी म्हणाला, "अहो साहेब, आमचे यापूर्वीचे व्यवस्थापक सिंग नावाचे गृहस्थ होते. ते तर १८ तास काम करायचे, केबिनच्या बाहेर देखील यायचे नाहीत आणि असे चॅनेल्सना बोलावून, घोषणा देऊन व्हिडीओ पण बनवायचे नाहीत. पण त्यामुळे ते काम करायचे हेच कळायचे नाही. आता ही आमच्या नव्या भारतातले नवी बँक आहे. त्यामुळे रोजचीच कामे आम्ही घोषणा देऊन करतो आणि सगळ्यांना वाटते की आम्ही जबरदस्त कार्यक्षम आहोत. बोला! भारत माता की जय!"