'The Kashmir Files' चित्रपटावर टीका करताना काय खबरदारी घ्यावी?

द काश्मीर फाईल्स चित्रपट सध्या देशभरात गाजतो आहे. पण या चित्रपटात दाखवले गेले आहे तेच सत्य आहे का? त्या काळात नेमके काय घडले, काश्मीरी मुस्लिमांनी काश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांपासून कसे वाचवले, याची माहिती देणारा आणि या चित्रपटावर टीका करणाऱ्यांनीही कोणतीही खबरदारी घ्यावे हे सांगणारा ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचा लेख....

Update: 2022-03-19 12:22 GMT

१९८९ साली व्ही. पी. सिंग यांचं केंद्रामध्ये सरकार होतं आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. व्ही. पी. सिंग सरकारला भाजपचा पाठिंबा होता. भाजपच्या आग्रहामुळे राज्यपाल म्हणून जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सत्तरच्या दशकात, दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे उपाध्यक्ष होते जगमोहन. सुंदर दिल्ली कल्पनेनुसार झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय जगमोहन यांनी घेतला होता. या झोपडपट्ट्यांमध्ये मुसलमान बहुसंख्येने होते. जगमोहन यांना १९७१ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. १९७७ साली पद्मविभूषण ही पदवी त्यांना देण्यात आली होती. एशियाड आणि अलिप्त राष्ट्र परिषदेचं आयोजन यामध्येही जगमोहन यांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली होती.

काश्मीरचे राज्यपाल म्हणून जगमोहन यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यावेळी काश्मीरातील पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी शेर ए कश्मीर, शेख अब्दुल्ला यांची कबर उखडण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीरी पंडितांना त्यांच्या गावांतून हुसकावून लावण्यासाठी त्यांच्यावर हल्ले झाले. अनेक काश्मीरी पडितांना त्यांच्या मुसलमान शेजार्‍यांनी वाचवलं. काश्मिरी पंडितांना स्थलांतर सुकर व्हावं यासाठी वाहनांची व्यवस्था सरकारने केली असेही आरोप झाले होते. काश्मिरी पंडितांना संरक्षण पुरवण्यात आणि राज्यामध्ये सलोखा निर्माण करण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपेशी ठरलं होतं.

काश्मिरी पंडित हे काश्मीरमधील जमीनदार होते. कमाल जमीन धारणा कायदा लागू करून शेख अब्दुल्ला यांनी अतिरिक्त जमिनींचं वाटप राज्यातील भूमीहीनांना केलं होतं. १९८९ मध्ये दहशतवाद्यांनी त्यांना केवळ बेघर केलं नाही तर त्यांची घरंही लुटली. मात्र काश्मीरमधील शेकडो गावांतील काश्मीरी मुसलमानांना हे पटलं नव्हतं. काश्मिरी पंडित हे काश्मिरी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत अशीच या मुसलमानांची धारणा होती. एका गावात एकमेव काश्मिरी पंडित महिला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकमताने निवडून येत होती. अनेक गांवांमधील मुस्लिम गावकर्‍यांनी हिंदू देवळांची डागडुजी केली. काश्मिरी पंडितांना गावी येण्याचं निमंत्रणही दिलं. १९८९ नंतरही. याचा साधा अर्थ असा की काश्मीरी पंडित आणि काश्मिरी मुसलमान यांच्यातील भिंत पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी उभी केली होती. आणि ही भिंत तोडण्यासाठी सर्वसामान्य काश्मिरी मुसलमान उत्सुक होते.

मात्र काश्मिरी मुसलमान हे पाकिस्तानचं आणि भारतातील सर्व मुसलमानांचं प्रतिनिधीत्व करतात, काश्मिरी पंडित हे भारतातील हिंदूंचं प्रतिनिधीत्व करतात. फुटीरतावादी, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आणि प्रचाराला भारतातील मुसलमानांचा सक्रीय पाठिंबा आहे, परिणामी भारतात हिंदूंवर अन्याय, अत्याचार होतो आहे असा विषारी प्रचार भाजप-संघ परिवाराने १९८९ पासून टिपेला नेला.

शस्त्रबळाने मुसलमानांचं दमन करूनच काश्मीर भारतामध्ये राहू शकतं अशी भावना जम्मू व उर्वरित भारतात रुजवण्याचा प्रयत्न भाजप-संघ परिवार करतो आहे. गोदी मिडीयाने या प्रचाराला हातभार लावला आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं प्रमोशन करण्याचा ठेका भाजप-संघ परिवाराने घेतला आहे.

काश्मीर या विषयावर शेकडो ग्रंथ आहेत. मात्र वस्तुस्थिती सांगणारे, वास्तवाच्या जवळ जाणारं विश्लेषण करणारे, काश्मीर प्रश्नाच्या विविध बाजू आणि गुंतागुंत सांगणारे ग्रंथ प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आहेत. भारतीय भाषांमधील ग्रंथांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र वर्तमानपत्रातील लेख, विविध राजकीय नेत्यांचे बाईटस् वा भूमिका यांचा गदारोळ सर्वाधिक आहे.

फेसबुकवरील माझ्या मित्रांच्या अनेक पोस्टमध्ये काश्मीरी पंडितांविषयी अपवादानेच सहानुभूती आढळते. हिंदुत्ववादी लोकांनी केलेली हिंदू मुस्लिम विभागणी त्यांना पटते. या विभागणीला ते जातीचा आयाम देतात. काश्मिरी पंडित म्हणजे काश्मिरी ब्राह्मण. ब्राह्मण मनूवादी असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याचं कारण नाही. अशा आशयाची मांडणी अनेक उठवळ सेक्युलॅरिस्ट वा लोकशाहीवादी करत आहेत. त्यांच्यामुळे काश्मीर नावाची एक प्रादेशिक संस्कृती नाही या हिंदुत्ववादी प्रचाराला बळ मिळतं आणि हिंदू समाजाच्या एकजिनसीकरणालाही गती मिळते.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट बघा वा बघू नका. परंतु हिंदूंच्या एकजिनसीकरणाला गती मिळणार नाही याची खबरदारी घ्या. विविधता वा बहुप्रवाहिता, प्रादेशिक भाषा व संस्कृती यांची जोपासना केल्यानेच हिंदुत्ववादी शक्तींना रोखता येईल. प. बंगाल आणि पंजाब येथील निवडणुक निकालांमध्ये प्रादेशिक संस्कृतीचा मोठा वाटा आहे.

Tags:    

Similar News