कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार – श्रीमंत कोकाटे
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे 'रेनेसाँ स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' हे पुस्तक सध्या वादात सापडले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणारा मजकूर यामध्ये असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. या पुस्तकातील दाव्यांना आक्षेप घेणारा लेख श्रीमंत कोकाटे यांनी लिहिला आहे. लोकसत्ताला त्यांनी आपला लेख पाठवला , मात्र त्यांनी तो छापला नाही असा आरोप श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. हा लेख मॅक्समहाराष्ट्र छापत असून वादविवादासाठी खुला करत आहे.;
'रेनिसां 'ही व्यापक संकल्पना आहे. पंधराव्या शतकात रोमन साम्राज्यात रेनिसां झाला. त्यामुळे कला, शिल्पकला, साहित्य, विज्ञान, संगीत, चित्रकला यांचा विकास झाला. धार्मिक गुलामगिरीला आव्हान दिल्यामुळे अनिष्ट रूढी, परंपरा याविरुद्ध लढा उभारला गेला. ग्रंथप्रामाण्य नाकारून बुद्धिप्रामाण्यवादाला चालना मिळाली. धर्मगुरूंच्या आणि धर्मग्रंथांच्या जाचातून मुक्त होऊन युरोपमध्ये नवविचारांचा उदय झाला. त्यातूनच युरोपमध्ये औद्योगिक आणि आर्थिक क्रांती झाली. हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जखडलेल्या जनतेला प्रबोधन चळवळीमुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. रेनिसांमुळे त्यांना नवनिर्मितीची संधी मिळाली. वैचारिक क्रांती झाली. त्यातून कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञानाचा उदय आणि विकास झाला. धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून पोसलेल्या कर्मठ, सनातनी परंपरेला शह दिल्यामुळे युरोपमध्ये रेनिसां झाला.
'रेनिसां' याचा अर्थ धार्मिक, सांस्कृतिक, सनातनी गुलामगिरी नाकारून नवविचारांना चालना देणे; आणि त्यातून नवनिर्मिती करणे व समाजाचा सर्वांगीन विकास साधणे. .
युरोपमधील 'रेनिसां' हा शब्दप्रयोग वापरून गिरीश कुबेर यांचे रेनिसां स्टेट ह्या शीर्षकाचे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. इंग्रजी भाषेतल्या ह्या पुस्तकातील आशय पाहिल्यास त्यात 'रेनिसां'च्या विचाराशी पूर्णतः फारकत घेतलेली दिसते. 'नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा' अशी गत ह्या पुस्तकाची झाली आहे. कुबेर यांनी पुस्तकात संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. परंतु, पुस्तकातील मजकुराला विशेषत: वादग्रस्त बाबींना संदर्भ दिलेले नाहीत. त्यामुळे सदर पुस्तक संदर्भहीन ठरते. स्वतः कुबेरच मनोगतात लिहितात, "This book is not an academic study of Maharashtra history" म्हणजे सदर पुस्तक अकॅडमिक नाही, असे स्वतः लेखक सांगतात. त्याऐवजी 'सदर पुस्तक प्रचारकी आहे,' अशी कबुली दिली असती, तर थोडा तरी प्रामाणिकपणा दिसला असता. परंतु, अनैतिहासिक, संदर्भहीन लेखन करून, कुबेर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैर उपभोग घेतल्याचे स्पष्टपणे दिसते.
गिरीश कुबेर यांनी सदर पुस्तकात अनेक अनैतिहासिक, निराधार, प्रचारकी बाबी मांडलेल्या आहेत. उदाहरणार्थ, मराठी भाषेबद्दल ते लिहितात "This language Maharashtri an offshoot of sanskrit, " (पृष्ठ क्र.2) मराठी भाषा ही संस्कृत भाषेची शाखा आहे. पण त्याला ते संदर्भ देत नाहीत. संस्कृत भाषेचा पहिला शिलालेख इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील रुद्रदामनचा गिरनार येथे मिळाला; तर प्राकृत मराठीचा पहिला शिलालेख इसवीसन पूर्व पहिल्या शतकात पाले तालुका मावळ जिल्हा पुणे येथे मिळाला आहे. तो प्राकृतात आहे. तो मराठीचा पहिला शिलालेख मानला जातो. म्हणजे संस्कृतच्या शिलालेखापूर्वी मराठीचा शिलालेख दोनशे वर्षांपूर्वीचा आहे. थोर भाषातज्ञ डॉ. अशोक केळकर, डॉ. घाटगे, डॉ. अशोक राणा इत्यादी अभ्यासकांनी ''मराठी भाषा ही प्राकृत पासून विकसित झालेली आहे, संस्कृतपासून नाही,'' असे संशोधनात्मक पुरावे देऊन सांगितले आहे. त्यात ''प्राकृत मराठीचा उदय संस्कृत भाषेतून झालेला नाही,'' ह्या बाबतचाही पुरावा आहे. थोर नामवंत भाषातज्ञ विश्वनाथ खैरे हे मराठीचा सहसंबंध 'द्रविडियन भाषा' गटाशी जोडताना, 'मराठीचा संबंध संस्कृत भाषेशी नाही,' असे ते सांगतात.
धर्मशास्त्र, इतिहास आणि भाषाशास्त्राचे नामवंत, प्रगल्भ अभ्यासक राजारामशास्त्री भागवत असे म्हणतात की "प्राकृत आणि संस्कृत हे भाषेचे दोन वेगळे प्रवाह असून प्राकृत हा प्रवाह खूप प्राचीन आहे, मराठी भाषेचा अनुबंध हा प्राकृतशी आहे, संस्कृतभाषेशी नाही." त्यामुळे कुबेर यांनी मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेपासून झाला, असे सांगणे हा धादांत खोटारडेपणा आहे.
मराठी ही 'अभिजात भाषा' आहे. कुबेर म्हणतात, तशी ती संस्कृत भाषेची शाखा नाही. संस्कृत भाषेच्या उदात्तीकारणासाठी मराठी भाषेचे महत्त्व कमी करणे, हा खोडसाळपणा आहे. संस्कृत भाषा महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ, ती मराठीची जननी आहे, असे नव्हे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्यास काही अडथळे आहेत, त्यापैकी कुबेरांसारखे काही अर्धवटराव आहेत. हे त्यांच्या
'रेनिसां स्टेट' पुस्तकातील मराठी भाषेची स्वतंत्र ओळख पुसण्याच्या निराधार खटपटीतून स्पष्ट होते.
ह्या पुस्तकात कुबेर हे सातवाहन आणि वाकाटक राजघराण्याची यादी देतात. मात्र, त्यामध्ये अत्यंत कर्तृत्ववान असणाऱ्या सातवाहन राणी 'नागनिका' आणि वाकाटक राणी प्रभावती गुप्ता यांचा साधा नामोल्लेख देखील करत नाहीत. (पृष्ठ क्र. ४) तसेच, होळकर घराण्यातील कर्तृत्ववान महाराणी अहिल्याबाई होळकर यांचाही उल्लेख ते करत नाहीत. यातून कुबेर यांचा सनातनी पुरुषसत्ताक दृष्टीकोन दिसतो.
सातवाहन राणी 'नागनिका' ही अत्यंत कर्तृत्ववान होती. त्यांचा शिलालेख नाणेघाटात आहे. वाकाटक राणी प्रभावती गुप्ता देखील कर्तृत्ववान होती. त्यांचाही एक ताम्रपट आहे. तर महाराणी अहिल्याबाई होळकर या तर अत्यंत शूर, बुद्धिमान, दानशूर,उत्तम शासक आणि लोककल्याणकारी होत्या. त्यांचा साधा नामोल्लेख देखील प्रस्तुत पुस्तकात नाही. महाराष्ट्राच्या 'रेनिसां'मध्ये नागनिका, प्रभावती आणि अहिल्याबाई यांचे काही योगदान नव्हते का? की, कुबेरांनी सोवळं सांभाळण्यासाठी त्यांना टाळले?
कुबेर हे सातवाहन आणि वाकाटकांना ब्राह्मण ठरवितात. ते लिहितात "Unlike the Satavahans and the Vakatas, Who were Brahmins" (पृष्ठ क्र.६) सातवाहन आणि वाकाटक यांना ब्राह्मण ठरवण्याचा प्रयत्न सातत्याने झाला आहे. नाशिक येथील गौतमी बलश्रीच्या शिलालेखात सातकर्णीला 'एक ब्रह्मनस' म्हटलेले आहे. याचा चुकीचा अन्वयार्थ मिराशी यांनी लावला. ''यावरून सातवाहनांना 'ब्राह्मण' ठरविणे अनैतिहासिक आहे,'' असे ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकर, प्रा. पंढरीनाथ रानडे आणि इतिहासतज्ज्ञ, प्राच्यविद्यापंडित डॉ. भांडारकर यांनी म्हटले आहे.
'सातवाहन हे नागवंशी होते,' असे डॉ. केतकर यांचे मत आहे; तर डॉ. भांडारकर व डॉ. कुमारी घोष यांनी त्यांना क्षत्रिय असल्याचे सिद्ध केलेले आहे. तो काळ असा होता की, सर्वसामान्य समाजातून राज्यकर्ते झालेल्या राजांना मान्यतेसाठी ब्राह्मणांना दान द्यावे लागत असे. सर्वसामान्य घटकातून राजपदापर्यंत पोहचलेल्या राजाला एक तर ब्राह्मण ठरविणे किंवा त्याच्या गुरुस्थानी ब्राह्मण आणून ठेवणे, हे सनातनी षडयंत्र अनेक वर्षांपासून चालू आहे. यातून अनेक कर्ते राजेही सुटलेले नाहीत. सत्ता आणि अर्थसत्ता यातून जात्योन्नतीचा हा तो काळ होता. त्यामुळे कुबेर म्हणतात, तसे सातवाहन आणि वाकाटक हे ब्राह्मण असल्याचा कोणताही पुरावा नाही. मिराशींनी केलेल्या चुकीच्या अन्वयार्थाचा कुबेरांनी गैरअर्थ लावलेला दिसतो.
हिंदुत्ववाद ही आधुनिक राजकारणाची देणं आहे. "वासाहतिक काळात विकसित झालेली ही संकल्पना आहे की ज्यातून द्विराष्ट्रवाद विकसित झाला" असे जगविख्यात इतिहासतज्ज्ञ डॉ.रोमिला थापर सांगतात. "अरब लेखकांनी केलेल्या वर्णनानुसार सिंधू नदीच्या पलिकडचे लोक म्हणजेच हिंदू, या वर्णनाशी हे मिळतेजुळते होते. हिंदू ही जी मुळात भौगोलिक संज्ञा होती. तिचे पौर्वात्यवाद्यांमुळे हळूहळू एका धार्मिक व सांस्कृतिक संज्ञेत पर्यवसान झाले. एकजिनसी नसलेल्या धार्मिक गटांचे हिंदू असे शिक्कामोर्तब यामुळेच झाले" असे जमातवाद आणि इतिहास याचे नामवंत अभ्यासक प्रा. चितरंजन दास सांगतात. हिंदू ही प्राचीन संकल्पना नाही. हे मात्र निश्चित. तरीदेखील राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, शिलाहार, विजयनगर, मराठा इत्यादी राजवटींना कुबेर हिंदुत्वाशी जोडतात. हे अनैतिहासिक आहे. मध्ययुगीन काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख समकालीन कृष्णाजी अनंत 'सभासद' असा करतो की हा मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाहला ही गोष्ट कांही सामान्य झाली नाही. 'सभासद' हे शिवाजी महाराजांना मराठा पातशाहा म्हणतात. 'हिंदुपातशाहा' असा उल्लेख करत नाहीत. शिवपुत्र राजाराम महाराज हे मराठा सरदारांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात, मराठा धर्माचे रक्षण करणे हे तो स्वामी कार्य (अर्थात शिवकार्य) आहे (मराठा ही संकल्पना समूहवाचक आहे, संकुचित नाही) यावरून मध्ययुगीन काळात देखील हिंदुराष्ट्रवाद ही संकल्पना नव्हती, हे स्पष्ट असताना वाकाटक, सातवाहन, राष्ट्रकूट ,चालुक्य,शिलाहार,होयसाळ, यादव आदि राजवटींना 'हिंदूइझम'शी जोडणे, ह्यालाच इतिहासाची मोडतोड करणे म्हणतात. कुबेर लिहितात. "Rashtrakutas were equally devoted to Hinduism." (पृष्ठ क्र.८) कुबेर यांची ही मांडणी अनैतिहासिक आणि विसंगत तर आहेच. पण आजच्या सनातन राजकारणासाठी पूरक ठरावी, अशीही आहे. कुबेरांनी जर 'रामायण-महाभारता'कालीन भारतीय 'रेनिसां' लिहिला, तर ते रावण-कौरवांना मुस्लीम करतील आणि राम-पांडवांना हिंदू करतील.
कोल्हापूरचे मंदिर हे महालक्ष्मीचे मंदिर नसून, ते अंबाबाईचे मंदिर आहे, हे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी अनेक पुराव्यांनिशी सिद्ध केलेले आहे. याबाबत खूप दिवस डिबेट (वैचारिक वाद) चालला होता. (हे जागृत असणाऱ्या कुबेर यांना माहिती नसेल, तर तो त्यांचा डोळेझाकपणा ठरतो.) तरीही कुबेर यांनी अंबाबाईच्या मंदिराचा उल्लेख "Mahalaxmi temple in Kolhapur" (पृष्ठ क्र.8) असा केलाय. हा सांस्कृतिक दहशतवादाचा प्रकार आहे.
रामायण, महाभारत आणि पुराणकथा म्हणजे इतिहास नाही! तरीही, कुबेर यांनी अनेक ऐतिहासिक घराण्यांना पुराणकथाशी जोडले आहे, (पृष्ठ क्र.१०) की जे अनैतिहासिक आणि हास्यास्पद आहे.
गिरीश कुबेर यांनी रेनिसां स्टेट या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची यथेच्छ बदनामी केली आहे. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू, मार्गदर्शक, शिक्षक किंवा मदतनीस नव्हते. हे इतिहास अभ्यासकांनी व महाराष्ट्र शासनाच्या 'नामदार वसंत पुरके समिती'ने सिद्ध केले आहे. याबाबत महाराष्ट्रात २००३ ते २०१० ह्या सात वर्षात वैचारिक वाद सुरू होता. हे कुबेरांसारख्या जागृत विद्वानाला माहीत नाही, असे होत नाही. इतिहास अभ्यासकांनी सिद्ध केल्यानंतर पुणे महानगर पालिकेने लाल महालातील दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवला. महाराष्ट्र शासनाने दादोजी कोंडदेवचे नाव 'क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार'मधून वगळले. तरीदेखील कुबेर ओढून-ताणून कोंडदेवाला शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या सोबत जोडतात, कोंडदेव-रामदासाला शिवाजीराजे, जिजाऊमासाहेब यांच्यासोबत जोडणे ही विकृती आहे.हा वर्णवर्चस्ववाद आहे.कुबेरांचा हा विकृत खोडसाळपणा पुस्तकात आहे. कुबेर यांची मांडणी शिवाजीराजांची व राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणारी आहे. संशोधन खूप पुढे गेले असताना कुबेर हे ब.मो. पुरंदरे छापाचीच गरळ प्रस्तुत पुस्तकात ओकतात. "Shivaji and Jijabai in the care of his(shahaji) confidant, Dadoji Konddev." (पृष्ठ क्र. ३८,३९,४०,६७).जिजामाता याच शिवाजीराजांच्या खऱ्या मार्गदर्शक, गुरू,प्रेरणा,दीपस्तंभ आहेत हे केळुस्कर, बेंद्रे,डॉ.जयसिंगराव पवार,शिखरे या इतिहासतज्ञानी सिद्ध केलेले आहे.
रामदास हा देखील शिवरायांचा गुरू, मार्गदर्शक, शिक्षक किंवा मदतनीस नव्हता. हे वस्तुनिष्ठ अभ्यासकांनी सिद्ध केले असताना कुबेर हे रामदासाला शिवरायांचे 'अध्यात्मिक गुरु' ठरवताना धादांत खोटे लिहितात की, "whom he considered his(shivaji) spiritual guru." (पृष्ठ क्र. ७४) शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे श्रेय हिरावून घेणे व ते श्रेय वर्चस्ववादी सनातनी व्यवस्थेला देणे, हा यामागील कुबेरांचा उद्देश आहे.
मुळात शिवकालीन जेधे शकावली, शिवभारत, राधामाधवविलासचंपू , पर्णालपर्वतग्रहख्यान ह्या महत्त्वपूर्ण समकालीन ग्रंथात कोंडदेव आणि रामदास यांचा साधा उल्लेख देखील नाही. संशोधन पद्धतीचे कोणतेही नियम न पाळता कुबेरांनी लेखन केले आहे. त्यामुळे कुबेर यांचे पुस्तक हे पुरंदरेचा इंग्लिश अवतार ठरले आहे.
कुबेरांनी छत्रपती संभाजीराजांची देखील येथेच्छ बदनामी केलेली आहे. ''शिवाजीराजे- संभाजीराजे या पिता- पुत्रात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बेबनाव नव्हता,'' असे वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, डॉ. जयसिंगराव पवार आणि प्राच्यविद्यापंडित शरद पाटील ह्या इतिहासकारांनी नाना पुराव्यांनी सिद्ध केले आहे. संभाजीराजांना शिवरायांनी पन्हाळा येथे कैदेत ठेवले नव्हते, ही वस्तुस्थिती असताना देखील कुबेर ''शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे कैदेत ठेवले होते,'' असे लिहितात. "Shivaji was in no mood to pardon his unrepentant son and jailed him again at Panhala." (पृष्ठ क्र. ६३, ७५) तसेच संभाजीराजांनी सोयराबाईंची हत्या केली, असे कुबेर लिहितात. "Sambhaji put an end to the succession issue by killing Soyarabai along with those loyal to her" (पृष्ठ क्र.७६) हे धादांत चुकीचे आहे. याउलट, संभाजीराजांनी सोयराबाईंना आणि राजाराम महाराजांना अत्यंत सन्मानाने वागविले. सोयराबाईंची हत्या नव्हे, तर मृत्यू होता. त्याप्रसंगी संभाजीराजे रायगडावर नव्हते. संभाजीराजांना ठार मारण्याचा मंत्र्यांनी तीन वेळा प्रयत्न केला होता. हे उघड झाल्यानंतरच संभाजीराजांनी त्यांना राजद्रोहाखाली तत्कालीन कायद्यानुसार शिक्षा दिलेली होती. अनेक वेळा समजावून सांगून देखील मंत्री संभाजीराजांचा द्वेष करत होते. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी या मंत्र्यांना शिक्षा करण्याशिवाय संभाजीराजांसमोर दुसरा उपाय नव्हता. अशा संभाजीराजांकडे संयम आणि मुत्सद्दीपणा नव्हता, असा आरोप कुबेर करतात. "Sambhaji lacked his father's patience and diplomatic skills." (पृष्ठ क्र.७६) हा आरोपही वस्तुस्थितीला धरून नाही.कारण संभाजीराजांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून ते शेवटपर्यंत स्वराज्यासाठी योगदान दिलेले आहे.
समकालीन इतिहासकार अबे करे म्हणतो, "संभाजीराजांसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पहिला नाही.'' समकालीन करे पेक्षा कुबेर खूप विद्वान आहेत काय? ''संभाजीराजेंनी मुस्लिम होण्याच्या बदल्यात औरंगजेबला त्याच्या मुलीची मागणी घातली,'' असे कुबेर लिहितात. (पृष्ठ क्र.७९) हेही पूर्णपणे अनैतिहासिक आणि संभाजीराजे यांची बदनामी करणारे आहे. संभाजीराजे नीतिमान होते. पण संभाजीराजेंची बदनामी करण्याच्या उद्देशानेच कुबेरांनी हा अनैतिहासिक मजकूर लिहिलेला आहे. कुबेर यांची मांडणी सनातनी विकृतीने भरलेली आहे.
छत्रपती राजाराम महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य टिकविले- वाढविले, याबाबत डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजाराम चरित्रात विस्ताराने मांडलेले आहे. तरीही कुबेर लिहितात, ''राजारामाकडे योग्यता नव्हती.'' "Rajaram lacked the qualities of his father and his brother" (पृष्ठ क्र. ८0)
'संभाजीराजे पुत्र' छत्रपती शाहू महाराजांनी गेलेले स्वराज्य पुन्हा मिळवून दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत वाढविले. अनेक शूरवीरांना संधी दिली. ते मुत्सद्दी, शूर, दूरदृष्टीचे होते.ते उत्तम संघटक,दयाळू होते. त्या शाहू महाराजांना कुबेर दर्जाहीन ठरवितात. "Shahu's lack of vision prevented him." (पृष्ठ क्र.८३,९५).बाजीरावाचे उदात्तीकरण करणे आणि संभाजी महाराज यांना बदनाम करणे, हे सनातनी षडयंत्र आहे. बाजीराव हे शाहूंच्या प्रशासनातील अनेक सरदारांपैकी एक पेशवा होते. पण ते 'शिवाजीराजे' नव्हते. तरीही कुबेरांनी बाजीरावाची तुलना शिवाजीराजांशी केलेली आहे. "If there is anyone in history who matches up to Shivaji, it is Peshwa Baji Rao" (पृष्ठ क्र.८८,९१) बाजीरावाची तुलना शिवाजी महाराजांशी करणे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही. ती करुन कुबेरांनी पेशवाईचे उदात्तीकरतानात शिवाजी महाराजांना दुय्यय ठरविण्याचा हेतू जाहीर केलाय. ज्या होळकर-शिंदे यांनी उत्तर भारतात पराक्रम गाजवून स्वराज्याचा विस्तार केला, त्यांच्याकडे दूरदृष्टी नव्हती, असे कुबेर म्हणतात (पृष्ठ क्र. ९८)
जे कुबेर रामदास, टिळक, सावरकर, छत्रे, हेडगेवार, गोळवलकर इत्यादींचे विस्ताराने कौतुक करतात; माहिती देतात, पण सर्वज्ञ चक्रधर, बसवण्णा, संत तुकाराम महाराज, महाराणी अहिल्याबाई होळकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, अण्णाभाऊ साठे यांचा पुस्तकात साधा नामोल्लेख देखील करत नाहीत. महाराष्ट्राच्या 'रेनिसां'मध्ये त्यांचा काहीही वाटा नाही, असे कुबेरांना वाटते काय?
जातीय द्वेषभावनेने भरलेल्या ह्या पुस्तकात पानापानावर कुबेरांची विकृत बौद्धिक घमेंड ओसंडून वाहत आहे. संशोधन पद्धतीला तिलांजली देऊन त्यांनी हे सनातनी विचारांचे चोपडे लिहिले आहे. यावर महाराष्ट्र शासन काय कारवाई करणार आहे, ते स्पष्ट होणे आवश्यक आहे. कुबेरांकडे थोडाफार सुसंस्कृतपणा असेल तर त्यांनी स्वतःहून या पुस्तकातील विकृत, बदनामीकारक, अनैतिहासिक, आक्षेपार्ह मजकूर वगळावा व पुस्तक मागे घ्यावे.
न्या. महादेव गोविंद रानडे यांचा हवाला देऊन कुबेर म्हणतात की, "The political success the legendory king shivaji achieved in the seventeenth century was manifestation of religious and social movements that began with Dnyaneshwar" (पृष्ठ क्र.१४) ''शिवाजीराजांनी ज्ञानेश्वरापासून सुरू झालेल्या धार्मिक आणि सामाजिक सेवेचा उपयोग सतराव्या शतकात करून घेतला,'' असे विधान करणे विसंगत आहे. मुळात वारकरी संप्रदायाची स्थापना संत नामदेवांनी केली. संत चोखामेळा, संत सावता महाराज, संत गोरोबाकाका, संत जनाबाई इत्यादी संतांनी ती वृद्धिंगत केली. शिवाजीराजांना वारकरी संप्रदायाचा उपयोग झाला. तसाच सुफी, महानुभाव, लिंगायत इत्यादी संप्रदायाचाही झाला. ह्या संप्रदायतील संतांनीही महाराष्ट्र भूमी वैचारिकदृष्ट्या सुपीक केलेली होतीच. विशेषत: संत तुकाराम महाराज यांच्या विचाराने मोठे परिवर्तन झाले, असे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे देखील सांगतात. असे असताना कुबेर शिवरायांच्या सतराव्या शतकातील क्रांतीला तेराव्या शतकातील फक्त संत ज्ञानेश्वर यांना श्रेय देतात. हे अनैतिहासिक आहे. यातून कुबेर यांचा जातीयवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो.
महादेव गोविंद रानडे न्यायाधीश होते. ते काँग्रेसचे मोठे पदाधिकारी होते. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी विधवेशी विवाह करायला नकार देऊन एका बालिकेशी विवाह केला होता. कुबेर म्हणतात "Justic Ranade was undoubtedly one of the Indians' foremost scholar reformers" (पृष्ठ क्र.११८). रानडेंनी एक निकाल फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या विरोधात देखील दिलेला होता. अशा रानडेंना ते समाजसुधारक म्हणतात. परंतु महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना ते विसरतात.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांना शाळेत प्रवेश नाकारला होता. त्या कर्वे यांचे कुबेरांनी भरभरून कौतुक केले आहे. परंतु, सर्व जातीधर्मियांना मोफत शिक्षण देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुबेरांनी संपूर्ण पुस्तकात नामोल्लेखही केला नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी "रयत शिक्षण संस्थेची" स्थापना करून शिक्षण तळागाळापर्यंत विशेषतः गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेले. त्यातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, कलाकार, संगीत, नाट्य, साहित्य, विज्ञान, शिल्पकला, चित्रकला इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व गाजविले. हा खरा महाराष्ट्राचा 'रेंनीसां' आहे.
टिळकांनी मुलींच्या शिक्षणाला आणि आरक्षणाला विरोध केला होता. अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावावर सही करायला नकार दिला होता. अशा टिळकांना कुबेर म्हणतात. "He (Tilak) spoke and stood for entire nation and not for any particular Community or region." (पृष्ठ क्र.१३५) तसेच ते टिळकांना "The maker of modern India" असे म्हणतात. (पृष्ठ क्र.१३६) विषमतावादी टिळक हे कुबेरांना सर्वमान्य व आधुनिक भारताचे शिल्पकार कसे काय वाटतात? हे कुबेर यांचे लेखन पक्षपाती आहे. वर्णवर्चस्ववादी आहे. ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी १९१८ साली मुंबईत अस्पृश्यता निर्मूलन परिषद घेतली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी अस्पृश्य वस्तीत जाऊन राहिले. देशभर खूप मोठे कार्य केले. त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे साधे नाव देखील घेण्याचे सौजन्य कुबेरांनी दाखवलेले नाही. कुबेर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माहीत नाहीत, असे वाटत नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात सर्वांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाचा पाया घातला. परंतु टिळकांनी अथणीच्या सभेमध्ये आरक्षणाला विरोध केला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता ही अमानुष पद्धत बंद केली. गंगाराम कांबळे यांना हॉटेल टाकून दिले. ते हॉटेल चालावे व त्या हॉटेलला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी शाहू महाराज कांबळे यांच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी शाहू महाराज खंबीरपणे उभे राहिले. माणगाव परिषदेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला. सोनतळी कॅम्पवरती स्नेहभोजन आणि सन्मान केला. टिळकांनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावावर सही करायला विरोध केला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मुलांप्रमाणेच मुलींना देखील शिक्षण दिले. टिळकांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केला होता. असे जातीयवादी-प्रतिगामी- टिळक कुबेरांना आधुनिक भारताचे शिल्पकार कसे काय वाटतात? . क्रांतिकारक शाहू महाराजांचा पुसटसा उल्लेख करून कुबेर हे टिळकांना मात्र आधुनिक भारताचे शिल्पकार ठरवितात यातून कुबेराची सडकी मनोविकृती स्पष्ट होते.
कुबेरांनी सर्कसवाले विष्णूपंत छत्रे यांचेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (पृष्ठ क्र. १४८,१५०) परंतु, महाराष्ट्राच्या रेंनीसांमधील संगीत नाटककार,कलावंत, गायक केशवराव भोसले, तमाशा सम्राट काळू- बाळू, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा साधा नामोल्लेख देखील केलेला नाही.
कुबेरांनी टिळक, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर यांची सविस्तर माहिती दिली आहे. परंतु महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, शाहिरी परंपरेत, स्वातंत्र्यलढ्यात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर यांचा साधा नामोल्लेख देखील केलेला नाही.
अण्णाभाऊ साठे यांनी डफावर थाप मारून महाराष्ट्र जागा केला. कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या हितासाठी शाहिरी केली. त्यांच्या साहित्याची तुलना रशियन साहित्यिक दोस्तावोस्की यांच्याशीच होऊ शकते, असे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, ''शाहीर अमर शेख यांच्या पहाडी आवाजाने मुंबईसह महाराष्ट्र संघटित झाला. त्यांना शाहीर गव्हाणकर यांची साथ मिळाली. त्यातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.'' त्यांचा साधा नामोल्लेख देखील कुबेरांनी केलेला नाही. कदाचित, कुबेर यांच्या अभ्यास कक्षेत अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर येत नसावेत.
महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांचे कार्य आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे. रयत शिक्षण संस्था, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांना त्यांनी मोलाची मदत केली आहे. महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, प्रबोधन इत्यादी चळवळीमध्ये सयाजीरावांनी मोठ्या हिमतीने आणि दिलदार वृत्तीने कार्य केलेले आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तर सर्वश्रुतच आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी आपल्या देशात सामाजिक, राजकीय परिवर्तन घडविले.त्यांनी शेतकरी-कष्टकरींसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचा पुसटसा उल्लेख कुबेर करतात आणि ब्राह्मणी प्रतीकांचे मात्र मुक्तकंठाने कौतुक करतात. त्यामुळे कुबेर यांचे हे पुस्तक Brahminal renaissance ठरते.
कुबेरांनी त्यांच्या पुस्तकात सनातनी प्रतीकांचे उदात्तीकरण केले आहे. सनातनी विचारधारा जोपासणारांचे मुक्तकंठाने कौतुक केलेले आहे. पुरोगामी विचारधारा प्रकर्षाने मांडणाऱ्या प्रतीकांना अनुल्लेखाने मारणे, किंवा पुसटसा उल्लेख करणे, ही हातचलाखी कुबेरांनी दाखवली आहे.
कुबेर हे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील अनेक महामानवांना हिंदुत्वाशी जोडतात. ते अनैतिहासिक आणि विसंगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो हिंदूराष्ट्रवादाचा सनातनी अजेंडा आहे; त्या अजेंड्याला पुढे घेऊन जाणारी, मांडणी कुबेरांनी ह्या पुस्तकातून केली आहे. कुबेरांच्या पुस्तकाचा उद्देश सनातनी विचारधारा अधिक मजबूत करणे, हा आहे.
'रेनिसां'चा अर्थ प्रतिगामी विचारधारेकडून पुरोगामी विचारधारेकडे जाणे व अनेक कलागुण वाढविणे, हा आहे. हेच युरोपमध्ये घडले. परंतु, कुबेर हे पुरोगामी विचारधारा गाडून प्रतिगामी विचारधारेचे उदात्तीकरण करतात. यावरुन स्पष्ट होते की, कुबेरांच्या पुस्तकाचा उद्देश हा सनातनी विचारधारा अधिक मजबूत करणे हा आहे, त्यांचे पुस्तक हे 'सनातनी रेनेसां' आहे. महाराष्ट्राची प्रगल्भता मांडण्याइतकी प्रगल्भता कुबेराकडे नाही! ह्याचा पुरावाच 'रेनिसां स्टेट' हे पुस्तक देते.
-डॉ श्रीमंत कोकाटे