जात नाही ती 'जात' आणि तिचा सातबारा
हिंदू (Hindu) व्यक्तीला जात ( Caste) विसरणे अत्यंत कठीण आहे आणि जसे जसे हिंदू जगभर पसरत जातील, तसे तसे जातीयवाद हा जागतिक ( Global) प्रश्न बनेल, हे भाकीत महामानव राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. त्याची प्रचिती आता पाश्चात्य जगात येत आहे. याबरोबरच जातीचा इतिहास काय आहे? जात कशी मुळ धरून आहे? आणि देशातील जाती व्यवस्था कधी संपुष्टात येईल? याविषयी सांगताहेत सुनील सांगळे...
हल्लीच अमेरिकेतील सिएटल (Cietal USA) शहराच्या कौन्सिलने जातीच्या आधारावर भेदभाव करण्यास बंदी केल्याचे जे विधेयक (Castee decrimination) पारित केले होते. त्या प्रश्नावरून तिथे वादंग सुरु झाला होता. कारण हा जो कायदा पारित झाला आहे त्याला "हिंदू अमेरिकन फौंडेशन" (Hindu American Foundation) या भारतीयांच्या संघटनेने विरोध केला आहे. ही संघटना म्हणते की "जातीभेद योग्य नाही; परंतु जातींवर आधारित भेदभावाला बंदी घालण्याचा असा कायदा करून दक्षिण आशियायी समाजाला वेगळे पडले जात आहे." या त्यांच्या प्रतिक्रियेतून काही प्रश्न उभे राहिले आहेत. एक तर जातीभेद मान्य नाही, तर त्याला कायद्याने बंदी करण्याच्या गोष्टीला विरोध का? दलितांच्या रक्षणासाठी एखादा कायदा पारित होत आहे, तर त्याला "हिंदू अमेरिकन फौंडेशन" संस्थेचा विरोध का? दलितांना हे फौंडेशन हिंदू समजत नाही का?
अति-उच्च शिक्षित, आणि धनाढ्य असलेले हे भारतीय लोक सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या विचाराचे आहेत असे चित्र यातून उभे राहिले आहे.
त्यांनंतर आता कॅनडातील टोरोंटो डिस्ट्रिक्ट स्कुल बोर्ड (Canada Toronto District school board) या संस्थेने तेथील जातीभेद मान्य करून स्थानिक मानवी हक्क संस्थेला याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना द्रष्टे का म्हटले जाते, हे या निमित्ताने पुन्हा दिसले. त्यांनी अर्ध्या शतकापूर्वीच त्यांच्या जातीसंस्थेवरील प्रबंधात लिहून ठेवले होते की हिंदू व्यक्तीला जात विसरणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे जसे जसे हिंदू जगभर पसरत जातील, तसे तसे जातीयवाद हा जागतिक प्रश्न बनेल.
जातिसंस्था एवढी चिवटपणे टिकून का आहे? त्याचे उत्तर तिच्या उत्क्रांतीत व जातींच्या उतरंडीच्या रचनेत आहे. जातीसंस्थेची उत्क्रांती जर पाहायची तर थेट सर्वात प्राचीन असलेल्या ऋग्वेदापर्यंत जावे लागते. ऋग्वेदात आपण आज ज्या अर्थाने 'जात' हा शब्द वापरतो त्या अर्थाने जातींचा उल्लेख नाही. त्यात 'ब्राम्हण' हा शब्द यज्ञाच्या वेळी मंत्रोच्चार करणारी व्यक्ती या अर्थाने वापरण्यात आला आहे. राजन्य हा शब्द त्यात राजा या अर्थाने वापरला आहे. क्षत्रिय ही जात या अर्थाने नाही. ऋग्वेदातील अनेक ऋचांचे निर्माते क्षत्रिय आहेत (उदा. भरत, अंबरीश, वसुमन) व स्त्रियाही आहेत (उदा. शची, श्रद्धा, गोरिवती). नंतरच्या वेदकाळात वैश्य हा शब्द (विश म्हणजे सामान्य लोक किंवा गृहस्थ) शेती व इतर व्यवसाय करणाऱ्यांसाठी आढळतो. शुद्र हा शब्द वेदकाळात अस्तित्वातच नाही हे विशेष! त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्नच उदभवत नाही. शूद्र हा शब्द प्रथम महाभारतात दिसतो असे अभ्यासक लिहितात. अथर्व वेदात जातींची उत्क्रांती थोडी प्रगत झाली होती.
मॅक्स मुल्लर हे वेदांवरील अधिकारी व्यक्ती समजले जातात आणि त्यांनी वेदकाळात कठोर जातीय भेदभाव असलेली जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, हे लिहिले आहे.
वेदकाळ संपल्यावरचे 'ब्राह्मण्ये' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साहित्यात मात्र जातिसंस्थेचे चांगलीच वाढ झालेली दिसते. नंतर सूत्रकाळात (कात्यायन, बौद्धयान, हिरण्यकेशी, आपस्तंब, गौतम, इत्यादी) आणि स्मृतीकाळात मात्र जातिसंस्था त्यातील भयंकर भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या कलंकासह संपूर्ण विकसित झाली आणि ती त्यानंतर अडीच हजार वर्षे टिकली.
जाती संपूर्णपणे कधी नष्ट होतील? किमान १५०/२०० वर्षे असे उत्तर या प्रश्नाला दिले तर लोकांना धक्का बसतो. खरे तर किमान दोन हजार वर्षे उत्क्रांतीचा इतिहास असलेल्या जातिसंस्थेच्या बाबत दोन शतके मोठा कालावधी नाही, कारण हा कालावधी साधारण दोन पिढ्या इतकाच मर्यादित आहे.
आजही भारतीय समाजात तुरळक अपवाद वगळता सर्व विवाह जातिअंतर्गतच होतात (खरे तर बऱ्याचदा पोटजाती अंतर्गतच) तिथे जाती लगेच संपतील, असे म्हणणे दिवास्वप्न आहे. आंतरजातीय विवाहांची संख्या वाढत आहे, असे म्हटले जाते, पण त्याची आकडेवारी उपलब्ध नसते. त्यामुळे त्याबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नसला, तरीही अजूनही जातीअंतर्गत विवाह हा नियम, आणि आंतरजातीय विवाह हा अपवाद आहे असे म्हणायला वाव आहे. याशिवाय गल्लोगल्ली आढळणारी विवीध 'ज्ञातीची' वा 'समाजाची' मंडळे, जातीनिहाय विवाह मंडळे, ज्ञाती बांधवांच्याच विकासासाठी असलेल्या 'हितवर्धक' इत्यादी संस्था, टाइम्स ऑफ इंडियासारख्या प्रतिष्ठित दैनिकात येणाऱ्या विवाहोत्सुक तरुणाईच्या जाहिराती, इत्यादी पाहिले तरी जातींच्या चिवटपणाची कल्पना येऊ शकते; फक्त डोळे उघडे हवे.
या विषयाची आठवण आज होण्याची दोन कारणे आहेत. एक तर खत खरेदीसाठी जात सांगणे बंधनकारक असल्याची बातमी आज विधानसभेत गाजली. दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्रात दहा मागासवर्गीय विकास महामंडळे आधीपासूनच अस्तित्वात होती. त्यात आता अर्थसंकल्पानुसार पाच अधिक जातनिहाय महामंडळांची नवीन भर पडलीय.
जातीनिहाय अशी महामंडळे असावीत की नसावीत? हा स्वतंत्र विषय होईल. पण यामुळे विविध जातींची ओळख पुसली जाईल की अधिक ठळक होईल? याचे उत्तर कठीण नाही. आजच महापुरुषांना वाटून घेऊन त्यांच्या जयंत्या/पुण्यतिथ्यांवर वेगवेगळ्या जातींनी एकाधिकार मिळविल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक रंगदेखील आता जातीनिहाय वाटून घेतलेले दिसतात. तीच गोष्ट संत आणि साधुपुरुषांची! हे महापुरुष, संत आणि रंग कोणते हे सांगण्याचीही गरज नाही इतके ते सर्वज्ञात आहेत. खरे सांगायचे तर ३०/४० वर्षांपूर्वी ह्या जातीय अस्मिता एवढ्या टोकदार नव्हत्या असे जाणवते.
त्यामुळे पुढील ५० वर्षांत जाती कोणत्या जादूच्या फॉर्म्युलाने अचानक हवेत गायब झाल्याप्रमाणे नष्ट होतील अशी आशा कोणी करू नये! नागरीकरण, शिक्षण, आंतरजातीय विवाह इत्यादी अनेक घटक जातीयवादाची तीव्रता कमी करण्यासाठी कार्यरत आहेत. परंतु ते समाजावर हळूहळू परिणाम करत) आहेत. एखाद्या पाण्याच्या प्रवाहाने खडकाची हळूहळू झीज व्हावी तशी ती प्रक्रिया आहे आणि ती त्याच गतीने होणार!
(या लेखाचे लेखक सुनिल सांगळे सामाजिक व राजकीय अभ्यासक असून त्यांची "जातीव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती" हे मराठी व "Caste System in India : Origin, Evolution, Influence & Future” हे इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.)