मंदिरातील बलात्कार आणि जुमल्यांची मंदिरे...
आपल्या देशात एखाद्या स्रीवर झालेल्या अत्याचार देखील धर्माच्या नजरेतून पाहणारा ‘नारिंगी परकरातला नेता’ कोण? वाचा ज्येष्ठ लेखिका मुग्धा कर्णिक यांचा धर्म सत्तेबरोबरच राज सत्तेचा बुरखा टराटरा फाडणारा लेख
आपल्या देशात एखाद्या स्रीवर झालेल्या अत्याचार देखील धर्माच्या नजरेतून पाहणारा 'नारिंगी परकरातला नेता' कोण? वाचा ज्येष्ठ लेखिका मुग्धा कर्णिक यांचा धर्म सत्तेबरोबरच राज सत्तेचा बुरखा टराटरा फाडणारा लेख
२०१८मध्ये जम्मूत आसिफा नावाच्या केवळ आठ वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर क्रूर पद्धतीने हालहाल करून खून एका मंदिरात एका पुजाऱ्याच्या मदतीने झालेला. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात उत्तर प्रदेशमधल्या एका गावातल्या मंदिरात पन्नास वर्षांच्या एका स्त्रीवर बलात्कार आणि मग निर्घृण खून झाला.
भगव्या टोळीने मुस्लिम धर्मीय गुज्जरांची बाळी असलेल्या आसिफाच्या बलात्काराला आणि खुनाला हजार फाटे फोडले आणि वाट्टेल तसे रंग दिले होते. या वेळी बलात्कार झालेली स्त्री हिंदूच होती, देवदर्शनाला गेली होती... आणि तिच्यावर पुजाऱ्यासकट इतरांनी अत्याचार केला. त्या वेळी त्या खून बलात्काराला धर्मशत्रूंवरच्या सूडाचा रंग होता. तर या वेळची स्त्री 'विशुद्ध' वासनेचा बळी होती.
गेल्या वर्षाच्या अखेरच्या खंडात, नुकतीच हाथरसच्या बलात्कारितेचे शव घाईघाईने जाळून टाकण्याची घटना घडून गेली आहे. त्यामुळे आमचे एक मित्र म्हणतात तो शब्द वापरायचा तर
'नारिंगी परकरातला नेता'
एकदम खटाखट कामास लागला आहे. हाथरस घटनेतला नादानपणाही झाकायची संधी घेतली जात आहे. बलात्कार झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत. अर्थात असे लाखो रुपये जाहीर होणे आणि प्रत्यक्षात न मिळणे ही या देशातली २०१४ पासूनची अगदीच सर्वसामान्य कहाणी आहे.
त्यामुळे प्लासिबो परिणामापेक्षा याचे महत्त्व नाहीच. पण या देशात सर्वात महत्त्वाचा इलाज म्हणजे प्लासिबो परिणाम असतो. प्लासिबो परिणाम म्हणजे काय ते माहीत नसलेल्या वाचकांसाठी थोडक्यात अर्थ असा-
खरोखरचे परिणामकारक उपाय नसताना केवळ रोग्याला आपल्याला काहीतरी उपचार मिळतो आहे आणि आपण या जिवावरच्या संकटातून वाचू शकू असे लटके समाधान मिळणे म्हणजे प्लासिबो. एक प्रकारचा जुमलाच तो.
खरे तर या दोन्ही घटनांत गुन्ह्याचे स्थान असलेली मंदिरे म्हणजे सर्वात मोठा प्लासिबो असतो- म्हणजेच जुमला. (अर्थात हेच चर्चेस, मशिदी, सिनॅगॉग्स, विहार आणि देरासर यांच्याबाबतीतही म्हणावे लागेल- पण आत्ता विषय मंदिरांचा चालला आहे). मदरसे, चर्चेसमधूनही लैंगिक अत्याचार आणि भ्रष्टाचार घडत असतो हे काही लपून राहिलेले नाही.
ही सारी संघटित धर्मांची स्थाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरुपांच्या कृत्यांना कधी ना कधी आश्रय देत असतात. याचे कारण त्यांचा वापर आणि उदोउदो करणारी माणसे धर्माच्या कर्मकांडाची जितकी पर्वा करतात. त्याच्या शतांशानेही नीतीधर्माची पर्वा करत नाहीत. मंदिरांची, चर्चेसची स्थापना, बांधणी, मूर्तीचे दर्शन, प्रसाद, देवाला वाहिलेले धन, फुले, नारळ या साऱ्या गोष्टींमध्ये भयंकर अपहार होत आले आहेत. तरीही या स्थानांना बहाल करण्यात आलेले पावित्र्याचे गुण लोक काढून घेत नाहीत.
आपण वेलंकणीचे भक्त असू की कुठल्या पीराचे की कुठल्या देवीदेवांचे, आपल्याला या साऱ्यांची भक्ती मनातल्या मनात खरे तर नक्कीच करता येते. पण शतकानुशतके पवित्र वास्तूंचे किंवा सार्वजनिक उत्सवांचे जे काही राजकारण उच्चवर्गीय किंवा उच्चवर्णीय लोकांनी उभे केले आहे ते अद्यापही लोकांच्या मानगुटीवर बसले आहे.
आज तर मंदिराच्या राजकारणात संपूर्ण देशातील लोकजीवनाला ओढून बौद्धिकदृष्ट्या पंगू करण्यात आले आहे.
या मंदिराच्या नावे गेल्या चार दशकांपासून प्रचंड पैसा गोळा करण्यात आला, प्रचंड दुही माजवण्यात आली, प्रचंड दंगे घडवून आणण्यात आले. या मंदिराच्या नावे खून-बलात्कार-जिवंत माणसांना जाळणे-जिवंत भ्रूणांची हत्या अशासारखी नीचतम कृत्ये घडली. ते हे मंदिरच मुळात कोणत्या नीतीतत्त्वांच्या आधारे पवित्र म्हणता येईल. असा थेट प्रश्न सर्वांना पडायला हवा.
बुद्धीशी पूर्णपणे फारकत घेतलेल्या बहुसंख्यांच्या भावना म्हणजे नीतीतत्त्वे नव्हेत. पवित्र काय, चिरंतन नीतीतत्त्वे कोणती, सत्य काय भावनांचा नीतीरहित बाजार उभ्या करणाऱ्या राजकारणात असे प्रश्न अर्थातच अंधाऱ्या कोपऱ्यात ढकलले जातील. याची जाणीव आहेच. सत्याचा शोध घेणाऱ्या थोड्यांनाच ते प्रश्न पडतील.
या हृदय विदीर्ण करणाऱ्या खून बलात्कारांच्याच आगेमागे अय़ोध्येत उभ्या रहाणाऱ्या मंदिराचा पाया शरयूच्या वालुकामय पात्राच्या भुसभुशीत जमिनीत सुरक्षित रहाणार नाही अशी बातमी होती.
खूनखराब्याची आणखी निमित्ते नकोत म्हणून एक प्रकारे नाईलाजाने अय़ोध्येतील राममंदिराला न्यायालयाने अनुज्ञा दिली. पण या मंदिराचा इतिहास कधीच पुसला जाणारा नाही. इतके नरबळी गेल्यानंतर, देशाची स्थिरता धोक्यात आणल्यानंतरही आता जे राममंदिर उभे रहाते आहे, ज्याच्या विटांसाठी आधी आणि आता दगडांसाठी पैसा ओरपला जात आहे, ते राममंदिर सुरक्षित पायावर उभे रहाण्यात विविध समस्या येत आहेत.
आत्तापर्यंत जे पायाचे काम झाले त्यात एक मीटर व्यासाचे बाराशे खांब उभे करण्यात आले. आणि मग लक्षात आले की यावर सातशे टन वजन टाकून पाहाताच भूकंप सदृश कंपन वाचता आले. या स्थितीत काम पुढे सरकू शकत नव्हते. मग कळले की तेथून जवळून वाहाणाऱ्या शरयू नदीचे पाणी आणि तिच्यातील वाळू यामुळे गर्भगृहाच्या बाजूकडचे काम स्थिरावत नाही. आता शरयूचे पाणी रोखायचा प्रयत्न होणार आहे.
जमिनीखालपासून एक भिंत बांधावी लागणार आहे. पायात झिरपणारे पाणी बंद झाले तरच हे मंदिर उभे राहू शकेल. ज्या शरयूत रामाने त्याचे शरीर संपवले त्याच शरयूचे पाणी हा जुमला उभा रहायला आडकाठी करते आहे की काय? सीतेवरच्या अन्यायाचा अतिरेक होऊन ज्या भूमीने तिला गिळले असे म्हणतात. ती भूमीच हा जुमला उभा राहू द्यायला थरकापते आहे की काय असे काव्यात्म भाषेत म्हणतील कुणी.
पण अर्थातच असं काही होऊन जुमला थांबणार नाही. कारण यात केवढी मोठी गुंतवणूक आहे सत्तेसाठीही आणि पितृसत्तेसाठीही.
मंदिरांचा आणि श्रद्धेचा संबंध घट्ट असतो. पण न्याय किंवा पावित्र्य यांच्याशी मात्र मंदिरांचा संबंध केवळ वरवरचाच असतो. कदाचित् कधीतरी आपणा सर्व भारतीयांच्या मनात हे कधीतरी झिरपेल की वरचा इमला उभा रहाण्यासाठी भुसभुशीत नीतीतत्त्वांचा पाया चालणार नाही.
२०१९ या वर्षात दर दिवशी देशात ८८ बलात्कार झाले अशी अधिकृत आकडेवारी आहे. या साऱ्या अत्याचारांकडे तुमचा सर्वसाक्षी देव मुकाट पाहात होता. कुठल्याही मंदिरात आपली भक्ती वाहाताना एवढंच लक्षात ठेवा, भावा-बहिणींनो.
डॉ. मुग्धा कर्णिक