...आणि आमच्या गावात ट्रेलरने बच्चन आणला

अगोदर गावात फक्त भजन किर्तन यासारखे कार्यक्रम व्हायचे. मात्र, जेव्हा गावात पतंगे ट्रेलरने बच्चन आणला आणि गावाची भाषाच बदलली कशी?;

Update: 2020-10-12 18:04 GMT

आधी आमच्या गावात अमिताभ बच्चन नव्हता. पतंगे ट्रेलरने गावात व्हिडीओ आणला, त्यातून अमिताबच्चनजितेंद्रधरमेंद्र आणि शिर्देवी जया प्रदा हेम्माल्नी आणि कादरखान शक्ती कपूर अमरिश पुरी गावात आले. तस्मात गावातली सबन् पोराटोरे शाळा नदीतल्या ढव्हात बुडवून ह्या नव्या पाव्हण्यांच्या सांगोपांग वळखी करून घेऊ लागली.

गुंड्या तुटलेली चड्डी आवळून धरून नाकाबाहेर आलेला फुगा सर्रदिशी वर ओढत 'तुम मुझे भायेर ढूंढ रह्ये थे, पीटर, हौर मै तुमारा ह्यां इंतझार कर रहा था' असं एकमेकांना सुनावतच पोरं सकाळी संडासला जायला लागली. व्हिडीओला रूपया तिकिट होतं आणि आई मला दर बाजारदिवशी आठवड्यातून एकदा खच्चून आठ आणे एवढा भरमसाट 'पाकेटमनी' द्यायची, आणि आठ आण्यात शेव चिवडा भजे गोडी शेव वगैरे पक्वान्नं छटाकछटाक क्वांटिटीच्या मापात यायची, त्याकाळातली ही गोष्ट.

मी माझ्या सूssवाच्च्य आणि सूंssदर अक्षरात व्हिडीओचे बोर्ड लिहून द्यायचो. 'सुपरहिट संगीत आणि तुफान फाईटने सजलेला 'शहेनशहा!' -कलाकार अमिताबच्चन, मीनाक्शीशेश्यांद्री आणि डाकूच्या खास भूमिकेत अम्रिशपुरी वगैरे. तेणेकरून तिकिटाचा रूपया ही मोठ्ठ्ठीच रक्कम असण्याच्या त्या युगात मला व्हिडीओत फुकट येन्ट्री असे. सबब बाकीच्या पोरांपेक्षा या पाव्हण्यांच्या आणि माझ्या वळखी ज्यास्ती घनदाट झालेल्या.

पतंगेटेलर गावात येण्याआधी आमच्या गावात करमणूक म्हणून फक्त सप्ते आणि काल्याची कीर्तनं व्हायची. व्हीडीओ आला अन् सगळ्यात भारी म्हंजे अमिताबच्चन गावात आला. काय आक्टिंग! काय आवाज ! काय हाणामारी! काय विचारायचं कामच नाही! हाणामारी तं हाणामारी सोडा; पण काय ते कभी कभी म्येरे दिल्मे खयाल आता है.. की ज्यिंदगी त्येरी जुल्फोंकी नर्म छांवोंमे गुजरने पाती तो श्यादाब हो भी सकती थी, ये रंजो गम की स्याही जो दिल्पे छ्यायी है....

अरारा! निव्वळ अरारा!

'मगर ये हो न सका और अब ये आलम है
के तू नही, तेरा गम-जुस्तजुं भी नही...'

म्हणजे नेमकं काय ते कळायला आमच्या काकाच्या तीन पिढ्या गेल्या असत्या तरी त्या वयात आम्हाला कळलं नसतं. पण आवाज म्हणजे काय आवाज तो ! सणसणीत! नीटच! रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है शहेनशहा ! हाणतिच्यामारीतिच्यामीहो ! पतंगेटेलरने व्हिडीओ गावात आणला नसता तर हे अद्भुत आम्ही कुठून बघितलं असतं? पतंगेटेलरचे आभार आणि आजरोजी अमिताबच्च्यनला लैच्या लैच ह्याप्पी बड्डे च्यूं च्यूं!

(बालाजी सुतार यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Tags:    

Similar News