ग्रामपंचायत निवडणूक: देवेंद्र फडणवीस यांना गावांनी का नाकारलं? : संजय आवटे

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ज्या गावांनी स्वीकारलं, तिचं गावं आता विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना नाकारत आहेत का? वाचा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचं विश्लेषण

Update: 2021-01-19 05:56 GMT

मोदींच्या नव्या भारतात ग्रामपंचायत निवडणुकाही पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. आणि, 'वन नेशन, वन पार्टी'' चा नारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दुमदुमला. ग्रामपंचायत निवडणुकीला भाजपने दिलेले हे वलयच आज त्यांना महागात पडले आहे.

महाराष्ट्रातल्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचे निकाल आज लागले. ग्रामपंचायती पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्या स्थानिक मुद्द्यांवरच लढवल्या जातात. तरीही, स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा अनेक ठिकाणी पणाला लागते. यापूर्वी या निवडणुकीला पक्षाशी जोडले जात नसे. भाजपने, त्यातही देवेंद्रांनी ही सवय लावली. आणि, आता त्यामुळे त्यांचीच गोची झाली आहे. कारण, या निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाला आहे. आणि, ही निवडणूक 'युती' वा 'आघाडी' म्हणून लढवली गेली नसली तरी, महाविकास आघाडीनं बाजी मारलीय. आकडे हे अगदी स्पष्टपणे अधोरेखित करतील.

'जनतेतून सरपंच' नसल्याने आणि सरपंच कोण होणार, हेच निश्चित नसल्याने, या वेळच्या निवडणुका अधिक रंगतदार झाल्या. शिवाय, व्यक्तिगत वलयातून बाहेर पडल्या. 'कोरोना'मुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. तरूण पोरा-पोरींनी अनेक ठिकाणी विकासाच्या आणि परिवर्तनाच्या मुद्द्यावर जुन्या खोडांना झोपवले.

ग्रामीण भागातल्या या निवडणुकीवर सहकारी संस्था, स्थानिक शिक्षण संस्था आदींचा प्रभाव असतो. कॉंग्रेस वा राष्ट्रवादीचे असे जाळे आहे. मात्र, शिवसेनेचे असे जाळे नसतानाही त्यांना मिळालेले नेत्रदीपक यश महाराष्ट्राचा कौल स्पष्ट करणारे आहे. सुमारे दीड कोटी मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले. एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून अधिक पंचायती महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी जिंकल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

मागील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अशी तुलना केल्यास भाजपची हार लक्षणीय आहे. तर, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावण्यासारखा हा कौल आहे. पुणे सोडून कोल्हापूरला निघालेले चंद्रकांत पाटील स्वतःच्या गावच्या निवडणुकीतही पराभूत होणे त्यांना परवडणारे नाही! मुख्यमंत्री देवेंद्रांना ज्या गावांनी स्वीकारले होते, ती गावे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्रांना मात्र का नाकारत असतील, हाही मुद्दा आहे. कोणताच निकाल अंतिम नसतो. हाही नाही. पण, तो जो काही आहे, तो असा आहे! 

Tags:    

Similar News