#Russia_Ukrainविश्वगुरु ते विश्वविदूषक...: तुषार गायकवाड
#Russia_Ukrain संघर्षाच्या निमित्ताने भाजपा सोशल मीडिया आणि गोदी मीडियाच्या माध्यमातून एक प्रपोगंडा पसरवला जात आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांची चिकित्सा केली आहे तुषार गायकवाड यांनी...
ANCHOR: Russia Ukrain संघर्षाच्या निमित्ताने भाजपा सोशल मीडिया आणि गोदी मीडियाच्या माध्यमातून एक प्रपोगंडा पसरवला जात आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांची चिकित्सा केली आहे तुषार गायकवाड यांनी...
दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततावाद स्विकारला. राजकीय दृष्टीने अलिप्तता म्हणजे तटस्थता नव्हे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्तता आणि तटस्थता यांत फरक केला जातो, केला पाहिजे.
अनेक प्रकारच्या परराष्ट्रीय धोरणांपैकी अलिप्तता हे एक स्वतंत्र धोरण आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय गटांपासून व लष्करी संघटनांपासून अलग राहणे म्हणजे अलिप्तता होय. जागतिक पातळीवर या अलिप्ततेच्या धोरणाचे प्रवर्तक जवाहरलाल नेहरु होते.
युध्यमान राष्ट्रांच्या संदर्भात युद्धात सहभागी नसलेल्या राष्ट्राने निःपक्षपाती भूमिका घेणे याला 'तटस्थता' म्हणतात. युध्यमान राष्ट्रांच्या न्याय्य अगर अन्याय्य कृतीचा विचार तटस्थतेत अप्रस्तुत असतो.
नेहरुंनी जागतिक पटलावर अलिप्तता स्पष्ट करताना म्हटले की, 'भारत कोणत्याही लष्करी गटात सामील होणारा नाही. दोन गटांत संघर्ष निर्माण झाल्यास शांततामय मार्गाने संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न भारत करील; परंतु संघर्ष अटळ ठरल्यास आपल्या हितासाठी अगर जागतिक शांतेतच्या दृष्टीने योग्य वाटेल ती भूमिका घेण्यास भारत स्वतंत्र राहील.'
नेहरुंच्या याच भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय साठमारीत विकसनशील भारत जगात 'विश्वगुरु' बनला होता. म्हणून तर नेहरुंचे अलिप्तता धोरण तब्बल ३५ राष्ट्रांनी अंगिकारले.
आता वर्तमान काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या तिजोरीतील पैसा खर्च करुन दरबारी खुशमस्कऱ्या गोदी मेडीया (न्यूज चॅनेल) आणि आयटी सेल करवी स्वतःला विश्वगुरु म्हणवून घेतात. उत्तर प्रदेश राज्यातील निवडणूकांमध्ये व्यस्त असल्याने पंतप्रधानांना युक्रेन मध्ये अडकलेल्या सुमारे १८००० भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करता आले नाहीत.
अडकलेल्या भारतीयांनी सोशल मेडीयाचा वापर करुन भारतीय दूतावास आणि सत्ताधारी मोदींच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली. मग प्रधान प्रचारकांनी आयटी सेल आणि गोदी मेडीया करवी भारतीय विद्यार्थ्यांची बदनामी मोहीम हाती घेतली. उत्तर प्रदेश निवडणूकीत युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे नांवे मतांचा भीक मागायला सुरुवात केली. तरीही सरकारचा उघडं पडलेल नाजूक अंग सरकारला काही केल्या झाकता येईना.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर न्हाणीघरातून बाहेर निघायला तयार नाहीत. हे तेच विद्वान परराष्ट्र मंत्री आहेत जे काँग्रेसच्या सत्ताकाळात परराष्ट्र सचिव होते. बक्कळ पैसा कमावल्यानंतर २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. आणि परराष्ट्र मंत्री म्हणून जहागीरी पदरात पाडून घेतली. परराष्ट्र मंत्री पद मिळाल्यानंतर कर्तृत्व काय? तर नेहरुंच्या अलिप्ततावाद धोरणावर कडाडून टिका केली.
अर्थात अशी बाष्कळ विधाने करण्यासाठीच त्यांना मंत्री केले. शिवाय त्यांना मंत्री म्हणून स्वतंत्र अधिकारही नाहीत. परराष्ट्र मंत्री लपून बसलेले असताना त्यांच्या ऐवजी शिंदुर्गाचे कोलंबस आणि मध्य प्रदेशचे मनसबदार राजे सिंधीया यांना जागतिक पातळीवर भारताची अब्रू चव्हाट्यावर मांडायला पुढे केले.
सामान्य लोक इतिहास घडवतात. असामान्य राणेंनी नवा भूगोल घडवला. त्यांनी ओमानिया या नव्या राष्ट्राचा व बुखारीया या राजधानीचा शोध लावला. मनसबदार राजेंना रोमानियाच्या एका महापौरांनी अभियोग्यता दाखवून दिली. जोडीला तिसऱ्या एक विदूषी दिल्या. त्यांच्याबद्दल आम्ही पामराने काय बोलावे? 'जातीची शिंदळी, तिला कोण वळी?'
तर असो, हे कमी म्हणून की काय? 'माझीच लाल' वाल्या शेठनी गोदी मेडीया करवी खार्किवमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन-रशिया ६ तास युद्ध थांबवणार असल्याच्या बातम्या पेरल्या. महाराष्ट्रात सकाळ आणि एबीपी माझा यात आघाडीवर होते. ट्विटरवर तर महाराष्ट्र भाजपा आणि भाजपचे विवेकबुद्धी विकून मोबाईल घेतलेले भंपकजण आघाडीवर होते.
प्रत्यक्षात असा असा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला. The Quint ला यावर फॅक्टचेक म्हणून स्वतंत्र रिपोर्ट करावा लागला. (लिंक पहिल्या कमेंटीत) उत्तर प्रदेशची निवडणूकीत प्रचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेका मारण्याने जगभरातून या सगळ्या ओंगळवाण्या किळसवाण्या प्रकाराची चेष्टा सुरुय.
मोदींची लाज जातेय याबद्दल किंचीतही दुःख नाही. व्यक्ती म्हणून मोदी निर्लज्जच आहेत. पण देशाची अब्रू मोदींनी चव्हाट्यावर मांडलीये याचे अतीव दुःख होतेय!
जगाला अहिंसा आणि अलिप्तता शिकवणाऱ्या विकसनशील विश्वगुरु भारताची प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'विश्वविदूषक' करुन ठेवलीय. याची भारतीय म्हणून लाज वाटते.
मणिशंकर अय्यर आणि सुब्रमण्यम स्वामींना वंदन...