लव्ह जिहाद कायदा: नेमका कोणासाठी?
उत्तर प्रदेश आणि हरयाणातली सरकारं लव्ह जिहादची 'समस्या' हाताळण्यासाठी कायदा आणण्यावर विचार करताहेत. मला प्रश्न पडलाय, हा कायदा मुलींना नेमका कशा प्रकारे मदत करेल? आणि मुलींना यातून काही मदत मिळणार नसेल, तर मग हा कायदा नेमका कोणासाठी असेल? सांगातहेत जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलच्या प्राध्यापिका डॉ. समीना दलवाई...;
पुरो शेतातून पळतेय, तिच्या कुटुंबाशी शत्रुत्व असलेल्या माणसाच्या तावडीत सापडू नये म्हणून. शेवटी तो पकडतोच तिला. उचलून त्याच्या घरी नेतो आणि तिथे ठेवतो. अर्थात तो तिला मारत वगैरे नाही किंवा वाईट वागवतही नाही. एक-दोन दिवसांनंतर तर तो तिला तिच्या घरीही जाऊ देतो. ती धावतच गावातल्या तिच्या घरी पोहोचते. पण तिला एका मुस्लिम माणसाने उचलून नेलंय ही बातमी आता सगळ्या गावात पसरलीये. ती घराचा दरवाजा ठोठावत राहते, 'मला घरात घ्या' म्हणून विनवत राहते आई-वडिलांना. ते मात्र ठाम नकार देतात. आई-वडिलांनी घरात घ्यायलाच नकार दिल्याने खचलेल्या पुरोला आता कुठे जावं समजतच नाही. शेवटी ती तिला उचलून नेणाऱ्याकडेच परत जाते. ही कथा आहे अमृता प्रीतम यांच्या 'पिंजर' या कादंबरीची. भारताची फाळणी झाली त्या काळात पंजाबमध्ये घडणारी एक कथा. स्त्रियांना सगळ्यात जास्त भोगायला लावतात ती त्यांची कुटुंबं आणि परंपरा. हेच सत्य अमृती प्रीतम यांनी 'पिंजर'मधून मांडलंय.
'लव्ह जिहाद'वरून चाललेल्या उहापोहात एक प्रश्न कुणीच विचारत नाहीये. तो म्हणजे मुलींना, स्त्रियांना नेमकं काय हवंय? 'आमच्या मुलींना' त्यांची मुलं नादी लावताहेत या कांगाव्यात एका बाबीचा सगळ्यांना विसरच पडलाय. ती बाब म्हणजे आपल्या देशात मुलींचा बळी अगदी सहज दिला जातो. मुळात मुलींना त्यांच्या घरात जो निम्न दर्जा दिला जातो, त्यामुळेच घराबाहेरचे लोक त्यांचं शोषण करण्याची हिंमत अगदी सहज करतात. डॉ. आंबेडकर यांनी मसुदा तयार केलेल्या हिंदू कोड बिलाच्या मार्गात संसदीय समितीतलेच तथाकथित हिंदू उच्चवर्णीय खोडा घालून बसले होते. या विधेयकावरून संतप्त होऊन ते विचारत होते, "आम्ही मालमत्ता मुलींना दिली, तर आमच्या मुलांचं काय होणार? याही पुढे जाऊन ते म्हणू लागले की, मुलींना मालमत्तेत वाटा मिळाला, तर त्या नवऱ्यांना अगदी सहज सोडून देतील. मग त्या लग्नाचा डोलारा कशाला सांभाळत बसतील? खरं तर आज अनेक स्त्रिया त्यांच्या मारकुट्या नवऱ्यांबरोबर दिवस काढतात त्या आर्थिक परावलंबित्व आणि कुटुंबाची तथाकथित प्रतिष्ठा या दोन कारणांमुळेच. नवऱ्याचं घर सोडण्यापेक्षा कितीतरी स्त्रिया स्वत:ला जाळून घेण्याचा पर्याय स्वीकारतात.
जळगाव वासनाकांड उघडकीला आलं तेव्हा मी किशोरवयीन होते. या वासनाकांडाने अवघ्या महाराष्ट्राला काय दाखवून दिलं? तुमचे विवस्त्र फोटो आणि व्हिडिओ कुटुंबियांना दाखवू ही धमकी देऊन मुलींना सहज ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं हेच ना? आपल्या आईला विश्वासात घेऊन सगळं सांगण्याऐवजी या तरुण मुली वर्षानुवर्षं त्या बलात्काऱ्यांकडे जात राहिल्या परत परत. यातून कोणती बाजू समोर येते आपल्या कुटुंब व्यवस्थेची?
दिल्लीतल्या आघाडीच्या रुग्णालयांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलगे अधिक संख्येने जन्माला येतात. एखाद्या बेकायदा क्लिनिकमध्ये जाऊन आपल्या गर्भातल्या बाळाचं लिंग जाणून घेतल्यानंतर 'मुलगा' असेल त्या गरोदर बाईला कुटुंबातले लोक महागड्या रुग्णालयात बाळंतपणासाठी आणतात. कारण ती मुलगा जन्माला घालणार असते. गर्भात मुलगी असेल तर तिची 'काळजी' घेतली जाते दुसरीकडे कुठेतरी. मग २०१९ साली झालेल्या सर्वेक्षणात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या केवळ ९२४ आढळली, तर त्यात आश्चर्य काय आहे? जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशात गर्भाचं लिंग सांगण्यापासून डॉक्टरांना मनाई केली जात नाही, आपल्याकडे मात्र ती करणं भाग आहे. यातच सगळं आलं.
आपण कुटुंबावर ओझ्यासारख्या आहोत, कारण, आपल्यासाठी भरभक्कम हुंडा मोजावा लागणार आहे हा भार छातीवर घेऊनच मुलगी लहानाची मोठी होते. तिचा शिक्षणावरचा, आरोग्यावरचा अगदी आईच्या दुधावरचा अधिकारही दुय्यम मानला जातो आणि याचं समर्थनही तिच्यासाठी पुढे मोजाव्या लागणाऱ्या हुंड्याच्या नावाखाली सहज केलं जातं. मी ग्रामीण भागात काम करत होते तेव्हा नकुशा नाव असलेल्या कितीतरी स्त्रियांना भेटले आहे. या नावाचा अर्थच 'नकोशी, नको असलेली' असा आहे. हे नाव या मुलींना त्यांच्या आई-वडिलांनीच दिलेलं आहे. किंवा मग या मुलींची लग्न वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या पुरुषांशी, दुसरेपणावर, दारुड्यांशी किंवा गावातल्या अगदी मूर्ख समजल्या जाणाऱ्या माणसांशी करून टाकली जातात. यातून त्यांना ज्या हिंसाचाराला, लैंगिक छळाला तोंड द्यावं लागतं, ते त्यांचं नशीब म्हटलं जातं. बालविवाहाला कायद्याने मनाई असली तरी, १८ वर्षं हे लग्नाचं किमान वय गाठण्यापूर्वीच कितीतरी मुलींची लग्नं करून दिली जातात.
भारतात तरुण मुली सासरघरी मृत्यू पत्करण्याऐवजी माहेरी परत का येत नाहीत? रुग्णालयांमधले जळीत वॉर्ड्स स्त्रियांनी भरलेले असतात, त्यातल्या बहुतेक सुना असतात. मुलगी जिवंत असताना हतबल, असहाय्य असलेले आईवडील मुलीचे प्राण गेल्यानंतर मात्र आक्रमक होतात. मग त्यांना कायदेशीर खटला भरायचा असतो सासरच्या लोकांवर, भरपाई हवी असते, दिलेला हुंडाही ते परत मागू लागतात. मुलगी जिवंत असताना मात्र ते तिला सगळं काही सोड आणि तुझ्या घरी अर्थात माहेरी परत ये असं सांगत नाहीत. का?
या सगळ्या पार्श्वभूमीवर, जेव्हा एखादी मुलगी प्रेमात पडते, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच तिला तिच्याकडे लक्ष देणारा पुरुष भेटलेला असतो. तिला सहानुभूती दाखवणारा किंवा तिला खायला आणून देणारा. आत्तापर्यंत जगाने केलेल्या उपेक्षेच्या पार्श्वभूमीवर, असे लाडबिड करणारा कोणी भेटला तर मुलगी त्याच्या 'अक्षरश: प्रेमात पडण्याची' शक्यता साहजिकच दाट असते. अनेकदा तो पुरुष तिच्यासाठी लायक नसतो, काही वेळा तर तो अगदी दुष्टही असतो. एकदा का ती त्याच्यासोबत पळून गेली की, सगळी सूत्रं पूर्णपणे त्याच्या हातात येतात. कधी तो तिला थेट वेश्यावस्तीत विकतो किंवा धर्म बदलायला भाग पाडतो. लग्नासाठी धर्म बदलायला लावणं चांगलं नाहीच. म्हणजे मुलीचा धर्म मुलाच्या धर्माहून श्रेष्ठ वगैरे आहे म्हणून नव्हे, तर प्रेम किंवा लग्न यांसाठी मुलीला तिची ओळख पुसून टाकण्यास भाग पाडण्याचा हा प्रकार आहे म्हणून. खरं तर मुलीला प्रेमासाठी किंवा लग्नासाठी काहीच सोडण्याची गरज भासू नाही, तिचं नाव किंवा आडनाव, नोकरी किंवा मित्रमंडळी, यापैकी काहीच सोडायला लागू नाही. पण तिला हे सोडावं लागतं आणि अगदी सगळीकडे हे घडताना दिसतं. तशी अपेक्षाही केली जाते.
डॉ. समीना दलवाई