राष्ट्रीय दुखवट्यात ध्वजाचे नियम काय आहेत?

देशामधील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,पंतप्रधान, लोकसभेचे सभापती यांसह कॅबिनेटमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांचं निधन झाल्यास राष्ट्रीय दुखवटा पाळताना ध्वजाचे काही नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहे का?

Update: 2021-09-04 03:44 GMT

देशातील अति महत्त्वाच्या व्यक्तिचं निधन झाल्यानंतर देशामध्ये काही दिवस एक किंवा एकापेक्षा अधिक काळ देशामध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. अशावेळी देशाचा राष्ट्रध्वज, ध्वजदंडाच्या अर्ध्यावर फडवला जातो. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या पदावर असणाऱ्या व्यक्तिचं जेव्हा निधन होतं तेव्हा सर्व देशभरातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.

मात्र, इतर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचं पदावर असताना जेव्हा निधन होतं तेव्हा सर्व देशभरात ध्वज अर्ध्यावर घेतला जात नाही. त्या व्यक्तीच्या पदानुसार ध्वज विशिष्ट ठिकाणी अर्ध्यावर घेतला जातो. त्याचे काही नियम आहेत. ते नियम पुढील प्रमाणे...



 


लोकसभेचे सभापती, भारताचे सरन्यायाधीश, केंद्रीय राज्यमंत्री व उपमंत्री यांचा मृत्यू झाल्यास देशाची राजधानी दिल्ली येथील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो. केंद्रीय मंत्री मंडळातील मंत्र्यांचं जेव्हा निधन होतं अशावेळी देशाची राजधानी दिल्ली येथील तसचं राज्यांच्या राजधान्यांतील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.

आता राज्यस्तरावरील अति महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झाल्यास असणारे नियम राज्यामध्ये राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल, नायब राज्यपाल कारभार पाहत असतात. हा कारभार पाहत असताना राज्यपाल, नायब राज्यपाल यांचा मृत्यू झाल्यास संबंधित संपूर्ण राज्यात व संबंधित संपूर्ण संघराज्य प्रदेशात ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.

राज्याचा अथवा संघराज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाल्यास संबंधित संपूर्ण राज्यात ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो. राज्यातील मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर असलेल्या मंत्र्यांचा मृत्यू झाल्यास संबंधित राज्याची राजधानीतील ध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.

ध्वज कधी आणि किती काळ अर्ध्यावर फडकवला जातो?

जर व्यक्तीच्या मृत्यूची बातमी दुपारी मिळाली (जर दुपारी मृत्यू झाला तर) अशावेळी त्यादिवशी आणि सदर व्यक्तिवरती दुसऱ्या दिवशीही सूर्योद्यपूर्वी अंत्यसंस्कार झाले नसतील तर दुसऱ्या दिवशीसुद्धा सदर ठिकाणांवर ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो. तसेच सदर व्यक्तिवर अंत्यसंस्कारच्या दिवशी ज्या गावी अंत्यसंस्कार होत आहेत, तेथे ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो.

जर व्यक्तीच्या मृत्यूसाठी राष्ट्रीय शोक पाळावयाचा असेल तर त्या पूर्ण कालावधीत व्यक्तीसाठी संपूर्ण देशभर आणि राज्यातील किंवा संघराज्य प्रदेशातील व्यक्तीसाठी संबंधित संपूर्ण राज्यात, संघराज्य प्रदेशात ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. परदेशी व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय शोक पाळायाचा असेल अथवा ध्वज अर्ध्यावर उतरवावयाचा असेल तर त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय विशेष आदेश पारित करतील.



 


राष्ट्रीय सणांच्या वेळी जर एखाद्या अति महत्त्वाच्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर अशा वेळी इतर वेळेप्रमाणे नियम वापरले जात नाही. प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी जयंती, राष्ट्रीय सप्ताह, भारत सरकारने सूचित केलेला राष्ट्रीय आनंदाचा दिवस किंवा राज्याच्या बाबतीत राज्यस्थापनेचा वार्षिक दिन या दिवशी घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ध्वज अर्ध्यावर उतरविला जात नाही. मात्र, सदर व्यक्तिचा मृतदेह ज्या इमारतीत असेल त्या इमारतीवरील ध्वज अर्ध्यावर उतरविला जातो व मृतदेह तेथून हलविल्यावर ध्वज पूर्ण ध्वजदंडावर लावला जातो.

जर ध्वज असलेल्या संचलनामध्ये किंवा मिरवणुकीमध्ये शोक पाळवयाचा असेल तर तलम काळ्या कापडाच्या दोन निरुंद लांब पट्ट्या ध्वजदंडावर लावण्यात येतात. तसचं ध्वज अर्ध्यावर लावण्यापूर्वी तो क्षणभर पूर्ण ध्वजदंडावर लावण्यात येईल व नंतर तो अर्ध्यावर उतरविण्यात येईल. मात्र त्या दिवशी ध्वज उतरवावयाच्या अगोदर पूर्णपणे वर नेवून फडकवला जाईल.

कर्तव्य निभावत असताना राज्य, सैनिकी, केंद्रीय अर्ध सैनिकी दलातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारच्या वेळी ध्वज शवपेटी किंवा तिरडीभोवती गुंडाळला जातो. ध्वज गुंडाळताना केशरी रंग सदर मृत व्यक्तीच्या डोक्याच्या बाजूकडे असतो. सदर ध्वज कबरीमध्ये उतरविला जात नाही, तसेच शवपेटी, तिरडीभोवती असलेला ध्वज सदर व्यक्तीला अग्नि देण्यापूर्वी किंवा दफनविधी पूर्ण करण्यावेळी नियमानुसार काढून घेण्यात येतो.



 

परदेशाच्या राष्ट्रप्रमुखाचे किंवा सरकारच्या प्रमुखाचे निधन झाल्यास त्या देशातील भारतीय दूतावासासमोर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतो. जरी तो दिवस प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी जयंती, राष्ट्रीय सप्ताह किंवा भारत सरकारने राष्ट्रीय आनंदाचा दिवस घोषित केला असला तरी ध्वज अर्ध्यावर घेण्यात येतो. परदेशातील इतर व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्या देशातील परदेशी दूतावासामधील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरावे, अशी स्थानिक प्रथा किंवा संकेत असेल तरच राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. अन्यथा अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. आवश्यकतेनुसार ही माहिती दूतावास विभागाचा मुख्य अधिकारी ही माहिती देतो.

Tags:    

Similar News