येरे येरे पावसा तुला देतो पैसा

जून संपत आला तरी अजूनही पाऊस पडलेला नाही. याचे परिणाम शेती बरोबरच देशातील इतर क्षेत्राला देखील भोगावे लागू शकतात. पाऊस लांबण्याची कारणे मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप यावर परखड भाष्य करणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा हा लेख नक्की वाचा…;

Update: 2023-06-24 10:46 GMT

भारत हा कृषिप्रधान देश असून या देशात जवळपास सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. शेती क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. भारताची लोकसंख्या सध्या 141 कोटीच्या आसपास पोहचली असून या लोकसंख्येची भूक भागवण्याचे काम शेती क्षेत्र करीत आहे. असे असतानादेखील दिवसेंदिवस शेती क्षेत्र अडचणीत येत आहे. याला निसर्गाचा लहरीपणाही कारणीभूत आहेच पण राज्यकर्त्यांचे धोरण देखील जबाबदार आहे. शेती क्षेत्र घटण्याची अनेक कारणे आहेत. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटण्याची अनेक कारणे आहेत. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून भारतात दाखल होत असतो. परंतु मान्सून पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या असून शेतकरी वर्ग आभाळाकडे आस लावून बसला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी हवालदिल झाला असून खरीप हंगाम वाया जातो की,काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. आजची स्थिती पाहिली तर शेतकऱ्याला येरे येरे पावसा तुला देतो पैसा..पैसा झाला मोठा पाऊस झाला खोटा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

जून महिना संपत आला तरी पडेना पाऊस

शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर खरीप पेरणीची तयारी करून ठेवली आहे. खरीप पेरणीसाठी आवश्यक असणारी जमिनीची मशागत त्याने केलेली असून तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागलेला असल्याचे दिसून येतो. बळीराजावर एकामागून एक संकटे आदळत असल्याने तो अडचणीत आला आहे. पाऊस अचानक पडत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. हवामान खात्याचे अंदाज देखील अनेकदा फेल जातात. त्यात स्वयंघोषित हवामान तज्ञ पंजाब डख यांचे सुद्धा पावसाचे अंदाज फेल गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पंजाब डख यांच्या भरवश्यावर अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. आता त्याच्यावर राज्यातून टीकेची झोड उठू लागली असून सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पैसा झाला मोठा पाऊस झाला खोटा

मानवाने अमाप भौतिक प्रगती केली असल्याचे सांगितले जाते. परंतु त्याने ही प्रगती निसर्गाची हानी करून केली आहे. त्याने हे सर्व पैशासाठी केले असून एकीकडे मानव निसर्गाची अगणित अशी हानी करत आहे आणि दुसरीकडे पाऊस वेळेवर पडला पाहिजे असे त्याला वाटते. आजच्या काळात पैशासाठी मानव अमाप अशी जंगल तोड करत असून त्याचबरोबर डोंगर पोखरण्याचे काम देखील करत आहे. त्याच निसर्गाच्या कुशीत सिमेंची मोठ मोठी जंगले देखील उभी राहत आहेत. त्याचा परिणाम ऋतूमानावर झाला असून पाऊस वेळी अवेळी पडतोय. आजच्या काळात मानवासाठी पैसा सर्वस्व झाला असून पैशासाठी तो काहीही करू लागला असून त्याने अनेक ठिकाणीच्या नद्यांचे प्रवाह देखील बदलले आहेत. ओढे,नाले विकासाच्या नावाखाली गायब झाले आहेत. पूर्वीच्या काळी पाऊस पडल्यानंतर हेच ओढे,नाले तुडूंब भरून वाहत असायचे. परंतु आता हेच नाले गटार गंगा झाले आहेत. राहिलेल्या ओढ्यांची देखील तीच स्थिती झाली आहे. निसर्गाचे मानवाने अमाप असे नुकसान केल्याने त्याच्यावर पावसाची वाट बघण्याची वेळ आली आहे.

वाढते औद्योगिकीकरण आणि शेती

राज्याच्या अनेक भागांत औद्योगिकीकरण वाढत चालले आहे. या औद्योगिकीकरणातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडत असून त्याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहण करण्यात येत असून त्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. या औद्योगिक वसाहती वसवत असताना झाडे तोडली जातात. त्याचबरोबर डोंगर पोखरले जात आहेत. त्याचाही परिणाम ऋतू चक्रावर झाला असल्याचे पर्यावरण तज्ञ सांगतात. ऋतू चक्राचे मुख्यतः तीन ऋतू मानले जातात. त्यामध्ये उन्हाळा,हिवाळा,पावसाळा यांचा समावेश होतो. परंतु अलीकडच्या काळात कोणत्या ऋतुचा हंगाम सुरू आहे हेच लक्षात येत नाही. उन्हाळ्यात ही दिवसा कडक उन्हं असते तर रात्री थंडी. परंतु बदलत्या जीवनशैलीचा निसर्ग आणि मानवावर परिणाम झाला असल्याचे तज्ञ सांगतात.

पावसाअभावी शेतकरी चिंतेत

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पहात असून त्यामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तूर,सोयाबीन,मटकी, हुलगे यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली असून कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक समस्याना सामोरे जावे लागेल. हवामान तज्ञांच्या मते,शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी घाई करू नये. राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात थोड्याशा प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी पाऊस लांबल्यास खरीपाचा हंगाम वाया जातो की,काय अशी भीती शेतकऱ्यातून व्यक्त केली जातेय. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी कसोटीचा असणार आहे.

Tags:    

Similar News