राजीव गांधींची हत्या

स्वतंत्र भारताच्या इतिहासात राजकीय व्यक्तींच्या राजकीय कारणांनी अनेक हत्या झाल्या. महात्मा गांधी, पंडित दीन दयाळ उपाध्याय, प्रतापसिंह कैराँ, ललीत नारायण मिश्र यांच्यासारखे अनेक नेते राजकीय अतिरेक्यांच्या गोळ्यांचे शिकार ठरले. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी केलेली हत्याही बराच काळ चर्चेचा विषय बनली. त्याच धर्तीवर त्यांचे सुपुत्र राजीव गांधीसुद्धा राजकीय अतिरेक्यांचे बळी ठरले, राजू गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी...;

Update: 2021-05-21 03:03 GMT

Courtesy -Social media

आजच्याच दिवशी 1991 साली तामीळनाडूत श्रीपेरुंबुदूर या गावात भरसभेत दाक्षिणात्य एलटीटीई या संघटनेच्या आत्मघातकी कार्यकर्त्यांनी बाँम्बस्फोट घडवून आणून राजीव गांधी यांची निघृण हत्या केली, तेव्हा सारे जग दु:खावेगाने नि:स्तब्ध झाले. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा विक्रम करणारे राजीवजी वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन निघून गेले.

व्यवसायाने पायलट असलेले राजीवजी अपघातानेच राजकारणात आले व घातपातामुळे आयुष्यच गमावून बसले. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू म्हणुन जन्माला आलेले राजीवजी नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणून वाढले. त्यांनी विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेऊन पायलट म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. विमान उड्डाण करत असतानाच इटालियन नागरिक सोनिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्यांना राहुल आणि प्रियांका ही दोन मुले झाली.

राजकीय कुटुंबातील असूनही राजीव व सोनिया राजकारणापासून अलिप्त असेच जीवन जगत होते. पण 1980मध्ये त्यांचे धाकटे बंधू व तेव्हाचे काँग्रेसचे सरचिटणीस संजय गांधी यांचे अपघाती निधन झाले व राजीवजींच्या आयुष्याने वेगळेच वळण घेतले. आईला राजकारणात मदत करण्यासाठी ते नाखुशीनेच राजकीय जीवनात उतरले व भावाच्या अमेथी मतदारसंघातून निवडून आले. त्यांना लवकरच काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले.

राजकारणाच्या धकाधकीचा अभ्यास करत असतानाच 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिराजींची हत्या झाली आणि रातोरात राजीवजी पंतप्रधान बनले. त्यावेळी त्यांचे वय जेमतेम 40 होते व राष्ट्रीय प्रशासनाचा कोणताही अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा दिल्लीत शीखविरोधी दंगल पेटलेली होती.

नंतर दोनच महिन्यांत राजीवजींनी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या व इंदिराजींच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेवर आरुढ होत काँग्रेसने 542पैकी 411 जागा जिंकून विक्रम स्थापन केला. एका पक्षाला इतक्या जागा त्यापूर्वी व त्यानंतरही कधी जिंकता आल्या नाहीत.

राजीवजींची पंतप्रधानपदाची पाच वर्षांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. भोपाळ गॅस गळती, शहाबानो पोटगी प्रकरण, बोफोर्स लाच प्रकरण अशी प्रकरणे सतत गाजत राहिली व त्यामुळे त्यांच्या व काँग्रेसच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली; इतकी की, डिसेंबर 1989मध्ये झालेली लोकसभा निवडणूक काँग्रेस हरली व राजीवजी विरोधी पक्षनेता बनले.

1991मध्ये पुढील लोकसभेच्या निवडणुका चालू होऊन दोन फेऱ्यांचे मतदान पार पडले असताना तामीळनाडूत निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी ते दौऱ्यावर असतानाच त्यांची हत्या झाली. त्याच वर्षी त्यांना मरणोत्तर `भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला.

राजीवजींची कारकीर्द वारंवार वादांच्या भोवऱ्यात अडकत गेली, कारण त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात वारंवार बदल करणे चालू ठेवले. त्यामुळे मंत्रिमंडळाला कधी स्थैर्य लाभलेच नाही. पाच वर्षांत त्यांनी 51 वेळा मंत्रिमंडळात फेरबदल केले, असे म्हटले जाते. `इंडिया टूडे'ने त्यांच्या राजवटीचे वर्णन `व्हील ऑफ कन्फ्युजन' अशा टीकात्मक शब्दांत केले.

21वे शतक उजाडायच्या आधीच त्यांचे निधन झाले, हे खरे असले, तरी त्यांनी सतत `21व्या शतकातील भारत' हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळेच सॅटेलाईट, टेलिकॉम या क्षेत्रांत प्रचंड प्रगती झाली. त्यांनी मतदानाचे वय 21 वरून 18 वर आणले, तसेच पक्षांतर बंदी कायदाही लागू केला.

असा हा मनाने व बुद्धीने काळाच्या पुढे व जगाच्या बरोबरीने विचार करणारा व वागणारा नेता राजकीय पटावरचे डावपेच खेळण्यात मात्र सतत चुकाच करत राहिला. त्याचे चटके त्यांना स्वत:ला व काँग्रेसलाही जाणवत राहिले. त्यांच्या हत्येने तर देशाचा इतिहासच बदलला.

राजीवजींच्या स्मृतींना श्रद्धांजली!

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News