देवेंद्रजी, बिहारच्या नादात महाराष्ट्र गमवाल !

पब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत असून भाजप थेट अर्णव गोस्वामी यांना पाठींबा देत असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्णव यांची अटक आणीबाणी असल्याचं म्हटलं आहे त्यावरून ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी, बिहारच्या नादात महाराष्ट्र गमवाल असं सांगितलं आहे.....;

Update: 2020-11-04 09:32 GMT

सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे मराठी आहेत, भाजपधील आजच्या पिढीतील अत्यंत हुशार, आक्रमक, प्रशासनाची उत्तम जाण असलेले नेते आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य देखील उज्जल आहे. भविष्यात ते दिल्लीत गेले तर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो सन्मान असेल, महाराष्ट्राचे नाव दिल्लीत मोठे होणार आहे. प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी दिल्लीतील अभिमान होऊ शकत नाही. नितीन गडकरी यांना पद्धतशीरपणे संपवण्यात येत आहे. या व्यतिरीक्त अन्य  कोणी मराठी नेता दिल्लीत पाय रोवून उभा आहे, असे दिसत नाही. अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत

दुर्दैवाने, फडणवीस अशा मुद्द्यावर राजकारण करत आहेत, ज्यातून ते महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी खलनायक ठरत आहेत. ही प्रतिमा तयार होण्यात जितकी त्यांची सोशल मीडिया टीम कारणीभूत आहे, तितके ते स्वतःही आहेत. 

सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरण असो, कंगना राणावतची महाराष्ट्रद्रोही भूमिका असो किंवा आजचे अर्णब गोस्वामी अटक प्रकरण. फडणवीस यांची भूमिका, त्यांचे ट्विट हे वादग्रस्त ठरले आहेत. चुकीच्या व्यक्तींसाठी फडणवीस यांनी महाराष्ट्र हिताच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसते. यातून, त्यांची खलनायक ही प्रतिमा आणखी ठळक होण्यास मदतच झाली आहे.

सोशल मीडियाचे भूत भाजपने निर्माण केले. आज हेच भूत भाजपच्या कसे अंगलट येत आहे, हे तपासून बघायचे असेल तर देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश जावडेकर यांच्या ट्विटवर कशा शब्दात प्रतिक्रिया आल्या आहेत, ते या दोन्ही नेत्यांनी एकदा वाचाव्यात.

आपल्या ट्विटला शेकडोने like मिळाल्या, अमक्या तमक्या संख्येने आपले ट्विट हे re-tweet झाले, या समाधानात भाजपचे नेते आणि त्यांची पेड टोळी खुश असते. या मोहाला फडणवीस सारखे नेते बळी पडतात, हे दुर्दैव आहे. वास्तविक, फडणवीस यांचे भले व्हावे असे वाटणारा त्यांचा कर्मचारी - अधिकारी असेल, - जो हे ट्विटर सांभाळतो - त्याने फडणवीस यांना सल्ला द्यायला हवा की आजचे ट्विट तातडीने काढून टाका आणि झाली तेवढी स्वतःची बदनामी थांबवा.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हे कळत नसेल का की यांच्या ट्विटवर सकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक हे मराठी किंवा महाराष्ट्रीय नाहीत, तर महाराष्ट्र द्वेषाने पछाडलेले उत्तर भारतीय आहेत. फडणवीस यांनी एक बाब विसरू नये की ते दिल्लीत गेले तरी त्यांना महाराष्ट्रातूनच निवडून जायचे आहे. त्यांचे राजकीय लागेबांधे महाराष्ट्रातच आहेत, मग का म्हणून आपल्याच राज्याचा द्वेष करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे याला ते कवटाळून बसले आहेत?

महाराष्ट्राला उज्ज्वल विरोधी पक्ष नेत्यांची परंपरा आहे. राजकारण करावेच लागते, सत्ताधारी पक्षाला अडचणीच्या मुद्द्यावर धारेवर धारावेच लागते. पण, फडणवीस यांनी सकारात्मक विचारधारेतून सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणले असते, तर महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले असते.

जाता जाता - अर्णब गोस्वामी याचे नाव एका आत्यहत्या प्रकरणात घेतले गेले आहे. आत्यहत्या करणारी व्यक्ती मराठी व्यावसायिक होती. अर्णबला झालेली अटक ही पत्रकारितेवर झालेला हल्ला नाही. त्यामुळे कुठलीही पत्रकार संघटना अर्णबच्या अटकेचा निषेध करणार नाही. भाजपने आपला विवेक शाबूत ठेवून, ते कोणाची बाजू घेत आहेत याचे भान ठेवायला हवे. बिहारी लोकांना खुश करण्याच्या नादात महाराष्ट्रातील पाया कमकुवत होत नाहीये ना, याचा त्यांनी विचार करावा.

Tags:    

Similar News