छत्रपती शाहू महाराजांची अंत्ययात्रा आणि धायमोकलून रडणारी जनता...
आज लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची स्मृतीशताब्दी. त्यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या अंत्ययात्रेला उपस्थित असणाऱ्या गंगाधर यशवंत पोळ यांनी त्यांच्या अंत्ययात्रेचं वर्णन लिहून ठेवलं होत... हे वर्णन डॉ. देविकाराणी पाटील यांनी आपल्या शब्दात मांडलं आहे. वाचा राजर्षी शाहूंचा अखेरचा प्रवास कसा होता ?;
आज आपल्या रयतेचा राजा शाहू छत्रपतींच्या निधनाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तर हे राजर्षी शाहूंचे स्मृती शताब्दी वर्षे आहे. राजर्षी शाहूरायांचे मुंबई येथील पन्हाळा लॉज नावाच्या राजवाड्यात ६ मे १९२२ च्या पहाटे निधन झाले. त्यांचे पार्थिव मोटारीतून कोल्हापूरला आणले गेले.
त्यानंतरच्या त्यांच्या अंतयात्रेचे वर्णन राजर्षी शाहू छत्रपतींच्यामुळे ज्या समकालीन व्यक्ती घडल्या, ज्यांनी महाराजांना जवळून पाहिले - अनुभवले इतकेच नव्हे तर जे महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे साक्षीदारही होते. अशापैकीच एक गंगाधर यशवंत पोळ यांनी लिहून ठेवले आहे. आज हे दुःखद वर्णन आम्ही आपल्या समोर मांडतोय. शंभर वर्षी पूर्वीचा काळ या वर्णनामुळे आपल्या समोर उभा राहतो.
"ता. ६ मे १९२२ रोजी श्रीशाहू महाराजांचे ब्लड प्रेशरने रक्ताच्या उलट्या होऊन मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये रात्री देहावसान झाले. त्यावेळी त्यांचे बंधू श्री बापूसाहेब महाराज कागलकर व मेहुणे खानविलकरसाहेब सोबत होते. त्यांनी कारभाऱ्यामार्फत देहावसनाची बातमी मुंबईतील लोकांना व कोल्हापुरात तारेने कळविली. तारेत प्रेत कोल्हापुरात दहन विधीस मोटारीने आणले जाईल, असे कळविले होते. प्रेत सकाळी मुंबईहून निघणार होते; पण महाराजांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांतून ताबडतोब पसरली होती. तेव्हा मुंबई ते कोल्हापूर मोटार रस्त्यावरील मोठमोठ्या गावाचे लोक महाराजांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी वाटेवर हारतुरे घेऊन घोळके करून उभे होते. त्यांनी ठिकठिकाणी मोटारी अडवून अंत्यदर्शन घेतले व पुष्पहार घातले.
वाटेत साताऱ्यास छत्रपती सरकारनी सत्कार करून दर्शन घेतले. नंतर संध्याकाळी सूर्यास्तास प्रेत कावळा नाक्यास कोल्हापुरात आले. तेव्हा लोकांचा एकच हलकल्लोळ उडाला. कावळा नाक्याहून प्रेत मोटारीने नवीन राजवाड्याकडे ताराबाई पार्क रोडने गेले. प्रेत मोटारीतून आगाशीत उतरवून दरबार हॉलमध्ये स्वतंत्र सिंहासनावर स्थानापन्न करण्यात आले. तेव्हा लोकांची अंत्यदर्शनासाठी एकच झुंबड उसळली व हाहाकार माजला. प्रेतदहनास विलंब होतो म्हणून अंत्ययात्रेची तयारी चालूच होती.
आगाशीत अखेरच्या स्नानासाठी मातीचा एक मोठा डेरा पाणी तापविण्यास ठेवला होता व शेजारी दोन मातीचे मोघे ठेवले होते. गर्दीतून घुसून मी अंत्यदर्शनाच्या लोकांच्या, शेवटच्या हालचाली पाहाण्यास अगदी जवळ आगाशीत गेलो होतो. महाराजांचे प्रेत आगाशीत एका चौरंगी पाटावर आणून स्नानास ठेविले, तेव्हा महाराजांचे ते धिप्पाड शरीर व बलदंड ताठ मान पाहून अनेक लोक ओक्साबोक्सी रडू लागले.
राजघराण्यातील मंडळी तर धाय मोकलून रडत होती. तथापि, आईसाहेब लक्ष्मीदेवी व आक्कासाहेब महाराजांनी पाच पाच मोघे पाणी महाराजांच्या शरीरावर मोठ्या कष्टाने ओतले व न्हाऊ घातले. नंतर इतर मानकरी लोकांनीही स्नान घातले. शेवटी अर्धवट पाण्याचा डेराच महाराजांच्या शरीरावर ओतला गेला. ते पाहून मी थोडासा साशंक व आश्चर्यचकित झालो. इतर सामान्य लोकांत तांब्याच्या पातेल्यात पाणी तापवून तांब्यानेच प्रेतासही स्नान घालतात आणि छत्रपती महाराजांना असे मातीच्या भांड्यातूनच पाणी का घालावे म्हणून विशाद वाटला.
एका थोर, पोक्त गृहस्थास शंका विचारली, तेव्हा त्यांनी राजा क्षत्रिय असला, तरी अंतकाळी ' माती अससी, मातीत मिळसी, आत्म्याला हे लागू नसे', हे तत्त्व मला थोडक्यात सांगितले, तेव्हा मी स्तब्ध झालो.
स्नानानंतर शुभ्र वस्त्रावर भरजरी रेशमी कपडे घालून महाराजांचा देह सजविला व तो एका मोठ्या पालखीत बसविण्यात आला. पालखी उचलण्याकरिता प्रथम चार मानकरी पुढे येऊन पालखी आगाशीबाहेर काढली व नंतर आठ - दहा भोई म्हणजे वतनदार मासे मारणारे कोळी पालखी वाहक म्हणून पुढे येऊन त्यांनी पालखी आळीपाळीने वाहण्यास सुरुवात केली.
पालखीसमोर शिकाळीला प्रथम युवराज राजाराम महाराजांनी हस्तस्पर्श करून ती भाऊबंद भोसले सरकार चावरेकर इनामदार यांच्याकडे दिली व युवराज पालखीबरोबर अनवाणी चालू लागले. त्यांच्याबरोबर बापूसाहेब महाराज, जहागीरदार व इनामदार संबंधित श्रीमंत लोकांचा घोळका चालत होता. पालखी मिरवणुकीने शांतपणे राजवाड्याचे आवाराबाहेर पडताच सैनिक, घोडदळ, तोफखाना यांच्या लवाजम्यासह मिरवत दुःखी अंत : करणाच्या जड पावलांनी हळूहळू चालली होती. ती मिरवणूक जैन बोर्डिंगसमोरून हॉस्पिटलच्या उत्तरेस येऊन पश्चिमेकडे पंचगंगा नदीमार्गावर वळली व शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या देवळाजवळ येऊन खास छत्रपतींच्या स्मशानभूमीजवळ येऊन थांबली.
ही प्रेतयात्रा येथे पोहोचण्यास सूर्योदय होऊन गेला. यानंतर राजाराम महाराजांचा श्मश्रूकर्मविधी उरकण्यासाठी म्हणून हजामाकडून दाढी व डोईचे केस काढण्यात आले. ते दृश्य पाहून लोकांचे हृदय भरून येत होते. स्मशानात संभाजी महाराजांचे देवळासमोर कंपौंडालगत शाहू महाराजांच्या शवाच्या दहनासाठी चंदनाची लाकडे व शेणी यांचे सरण रचण्यात आले होते. त्यात एक पोतेभर खोबरे व कापरांचे अनेक पुडे फोडून टाकले होते. प्रेत सरणावर ठेवून व सुगंधी द्रव्ये व चंदनाची लाकडे झाकून श्री युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते अग्निदीपन करण्यात आले. त्याबरोबर अंत्ययात्रेस सैनिकांची सलामी होऊन एकवीस तोफांचा गडगडाट करण्यात आला व सर्व मंडळी दुःखी अंत: करणाने आपल्या घरी परतली. " राजर्षींच्या देह पंचत्वात विलिन झाला पण त्यांच्या विचारांच्या रुपात ते आजही जिवंत आहेत. चिरंजीवीत्व म्हणजे काय असते हे सांगत!!!
डाॕ. देविकाराणी पाटील,
६ मे २०२१,
कोल्हापूर.