डॉक्टर, तुमचा अप्रोच रिडक्शनिस्ट वाटतो!- डॉ. रुपेश पाटकर
खेड्यातील लोकांपेक्षा शहरातील लोकांमध्ये आत्महत्या जास्त होण्याचे. खेड्यात दूरदूर राहणारे लोक देखील भावनिक बंधानी जोडलेले असतात. त्या उलट शहरात बाजूच्या ब्लॉकमध्ये राहणार्या माणसाविषयी देखील ठाऊक नसते. शहरी माणूस गर्दीत देखील एकटाच असतो, मानसिक विकार आणि सामाजिक परिस्थितीवर सडेतोड मत व्यक्त केला आहे डॉ. रुपेश पाटकर यांनी.
मनोविकारतज्ज्ञ (psychologist) झाल्यापासून अनेक ठिकाणी मत मांडण्यासाठी बोलावले जाण्याचे प्रसंग माझ्यावर येतात. कधी एखादा पत्रकार एखाद्या बातमीवर तज्ञाचे मत म्हणून कोट मागतो, तर कधी एखाद्या घटनेमागील मानसिकता जाणून घेण्यासाठी चर्चासत्रात बोलावले जाते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला याचे टेन्शन येते. कधी आपण सांगितलेल्या एखाद्या मुद्द्याचा भलताच अर्थ काढला गेला आणि त्यावर वादंग झाला तर काय घ्या. किंवा एखादा मुलाखत घेणारा जरा जास्तच हुशार निघाला आणि त्याने अडचणीत आणणारा प्रश्न केला तर... आपल्याला मुत्सद्दीपणे (डिप्लोमॅटिक) बोलण्याचे ट्रेनिंग थोडेच आहे! आपली सवय कशी, तर ओपीडीत येणार्या पेशंटकडून हिस्ट्री घ्यावी, त्याला तपासावे, हिस्ट्री आणि तपासणी यावरून निदान करावे आणि उपचार करावेत. नशीब की एखाद्या विषयावर तज्ञ म्हणून जाहीर मत देताना क्वचितच अडचणी आल्यात.
एक किस्सा आठवतो. मी प्रॅक्टिस सुरू पाच-सहा वर्षे झाली होती. त्या काळात अनेक पेपरात शेतकर्यांच्या आत्महत्या येऊ लागल्या होत्या. या आत्महत्यांवर एक चर्चासत्र होते. मलाही त्यात मनोविकारतज्ज्ञ म्हणून बोलावले होते. माझ्याशिवाय त्यात सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, शेतीतज्ञ वगैरे मंडळी होती. मला वाटले होती की सगळ्यात शेवटी मला समारोपाची मांडणी करायची असेल. पण सूत्रसंचालन करणारीने सत्राची सुरवात माझ्याच मांडणीने करायची ठरवली. अर्थात मला त्यामुळे फारसा फरक पडणार नव्हता कारण मी काही इतरांचे ऐकून माझे मत देणार नव्हतो. त्यामुळे इतर काहीही बोलले तरी मला माझ्या मांडणीत काही फरक करायचा नव्हता. आत्महत्येची कारणे, निराशेचे आजार, व्यसनांचे आजार, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय, मेंटल हेल्थ क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची कमतरता, त्याला पर्याय म्हणून थोड्याशा प्रशिक्षणाने स्थानिक मंडळीतून भावनिक प्रथमोपचार देणारी मंडळी तयार करणे वगैरे मुद्दे मी मांडले.
माझ्यानंतर शेतीतज्ञानी किफायतशीर शेती कशी करावी वगैरे मांडणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीनी त्यांच्या पुढ्यातील समस्या मांडल्या. त्या बहुतांशी खते, बियाणे वगैरेचे वाढते दर, त्या तुलनेत शेती उत्पन्नाचे बेभरवशी दर, नैसर्गिक संकटे, पतपुरवठा वगैरे होत्या.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते उभे राहीले. मला वाटले ते सरकारच्या धोरणांवर टीका करतील, आपण केलेल्या धरणे- मोर्चे याबद्दल सांगतील, शेतकर्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या व्यथांवर बोलतील, शेती विद्यापीठानी शेतकर्यांच्या समस्या डोळ्यांसमोर ठेवून संशोधन करायला हवे असे सांगतील. पण ते काहीही न सांगता ते थेट माझ्याशीच बोलू लागले. त्यांनी मी जे मुद्दे मांडले होते त्यांचे कौतुक केले. मला जरा बरे वाटले. कारण जेव्हा अनेक वक्त्यांची भाषणे असतात तेव्हा शेवटचे भाषण सुरू होईपर्यंत बहुदा पाहिले भाषण सगळ्यांच्या डोक्यातून गेलेले असते. या माणसाने आपले भाषण बारकाईने ऐकून घेतले, त्यातील मुद्दे आपल्या भाषणात महत्त्वाचे म्हणून मांडले म्हणुन मला बरे वाटले. मीदेखील आता त्यांचे भाषण लक्ष देऊन ऐकू लागलो. पण पुढच्याच क्षणी त्यांनी म्हटले, 'डॉक्टर, तुम्ही रिडक्शनिस्ट तर नाही ना झाला?' हे ऐकून मी एकदम सावध झालो. ते आता माझ्यावर काय टीका करतात याकडे माझे लक्ष लागून राहिले. ते म्हणाले, "डॉक्टर, पेशन्ट आणि औषधे व तुमचे समुपदेशन हे एक मॉडेल झाले. पण या पलीकडे एक मॉडेल आहे." समोरील श्रोते देखील आता कान देऊन ऐकू लागले. ते पुढे म्हणाले, "मी एक उदाहरण देतो. मलेरिया तुम्हाला माहित आहे. समजा तुम्हाला मलेरिया झालाय. पण हे तुम्हाला डॉक्टरने निदान करेपर्यंत कळणार नाही. तुम्हाला फक्त थंडी वाजून हुडहुडी भरलीय आणि ताप आलाय इतकेच कळेल. मग तुम्ही डॉक्टरकडे जाल, तुमचा डॉक्टर तुम्हाला तपासेल, तुमचे रक्त तपासायला सांगेल. त्याचा रिपोर्ट बघून तुम्हाला मलेरिया झालाय हे निदान करेल. आणि तुम्हाला मलेरिया बरा करण्याची औषधे देईल. तुम्ही बरे व्हाल. पण प्रश्न असा येतो की तुम्हाला मलेरिया कसा झाला? तुम्हाला मलेरियाग्रस्त डास चावला म्हणून. तुम्हाला मलेरियाग्रस्त डास का चावला? कारण तुमच्या घराच्या आजूबाजूला पाणी साचले म्हणून. मी आणखी एक प्रश्न विचारतो. दोन माणसे आहेत. एक झोपडपट्टीत राहतो आणि दुसरा बंगल्यात. कोणाला मलेरिया होण्याची जास्त शक्यता? कोणाला डास चावण्याची अधिक शक्यता? कोणाची प्रतिकारशक्ती अधिक बिघडलेली असण्याची शक्यता? अर्थातच झोपडपट्टीत राहणाऱ्याची. समजा, डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या, पण झोपडपट्टीत राहणाऱ्या पेशन्टकडे पैसेच नसतील तर?"
हे ऐकून मी विचार करू लागलो की हे सामाजिक प्रश्न आहेत, त्यांच्याशी डॉक्टरचा काय संबंध. माझ्या मनात असा विचार येत असतानाच ते पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाले,"डॉक्टर, तुम्हाला एमिल डरखिम माहीत असेलच. तो म्हणाला होता, आत्महत्या ही वैयक्तीक कृती दिसत असली तरी तिच्यामागे सामाजिक कारणे देखील असतात. डॉक्टर, तुम्ही जे मांडलेत ते सगळे मला मान्य आहे. कोणी तात्कालिक रागाने आत्महत्येकडे वळतो, कोणी उदासीच्या आजारामुळे आत्महत्येकडे वळतो, कोणी मानसिक आजाराची सणक आल्यामुळे आत्महत्येकडे वळतो. त्यावर उपचार केले पाहिजेत हे मान्यच आहे. पण तुमचा डरखिम म्हणतो, जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण वाढते. एखाद्या देशावर युद्धासारखे आक्रमण होते, तेव्हा आत्महत्येचे प्रमाण कमी होते. ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक संप्रदायापेक्षा प्रोटेस्टंट संप्रदायात आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचे शंभर वर्षापूर्वी होऊन गेलेला डरकीम म्हणतो. तेव्हा जर साथीच्या रोगाप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत असतील तर त्याचा धोरणात्मक विचारदेखील करायला हवा." ते जे बोलले ते बरोबर होते. एमिल डरखिम नावाच्या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने 1896 साली 'आत्महत्या' या विषयावर संशोधन करून पुस्तक लिहिले होते. त्याचा उल्लेख आमच्या मनोविकारशास्त्रावरील पाठ्यपुस्तकात होता. पण परीक्षा झाल्यानंतर मी त्याला पूर्णपणे विसरून गेलो होतो. नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्याची मला गरज लागत नव्हती, त्यामुळे डरखिमच्या सिद्धांतांचे माझ्याकडून पुन्हा वाचन किंवा चिंतन झाले नव्हते.
पण त्या चर्चा सत्रातील महाशयांच्या खोचक भाषणामुळे मी आमच्या मनोविकाराच्या पाठ्यपुस्तकातील डरखिमचे विश्लेषण पुन्हा एकदा वाचून काढले. मला पुन्हा एकदा डरखिम वाचताना खूप मजा आली. कारण यापूर्वी जेव्हा मी त्याचे सिद्धांत वाचले होते, तेव्हा ते परीक्षेसाठी वाचले होते. त्यामुळे त्यावेळी त्यातील रोचक मुद्दे मला जाणवले नव्हते. किती गंमत आहे ना, वाचणं ही एकच क्रिया, पण ते का करतोय त्यानुसार गोडी बदलते.
डरखिमची मला वाटलेली पहिली रोचक गोष्ट म्हणजे 'आत्महत्या' या शब्दाची व्याख्या. त्यासाठी डरखिमने एक पूर्ण प्रकरण खर्ची घातलेय. मला वाटले 'आत्महत्या' या शब्दात न समजण्यासारखे काय आहे? कोणाही सामान्य माणसाला आत्महत्या म्हणजे काय हे ठाऊक असतेच. पण डरखिम प्रश्न विचारतो की समजा एखाद्या मानसिकदृष्ट्या आजारी माणसाने चौथ्या मजल्यावरील खिडकीतून या भ्रमात उडी मारली की खिडकीपासून तीन फुटांवर जमीन आहे तर त्याला आत्महत्या म्हणावे का? इथे त्याच्या मृत्यूचे कारण त्याची स्वतःचीच कृती आहे, पण त्याच्या मागची भावना मृत्यू व्हावा अशी नाही. डरखिम पुन्हा प्रश्न करतो की आत्महत्या म्हटले की स्वतःला फास लावणे किंवा हाताची शीर कापणे किंवा स्वतःला पेटवणे किंवा बुडण्यासाठी खोल पाण्यात उडी मारणे अशी काही सक्रीय कृती असेल. पण एखाद्याने अशी काहीच कृती केली नाही, उलट जेवण्यासारखी कृती थांबवली तर त्या प्रायोपेशनला आत्महत्या म्हणायचे की नाही? तुम्ही म्हणाल, जर त्याच्या मनात मरण्याची इच्छा आहे म्हणून ती आत्महत्या. डरखिम पुढचा प्रश्न करतो की जर एखादा माणूस जीवावर उदार होऊन काही कृती करतो ज्यात मरण्याची शक्यता आहे हे त्याला माहीत असते, पण तो मरण्यासाठी ती कृती करत नसेल आणि तो ती कृती करताना मेला तर त्याला आत्महत्या म्हणता येईल का? याचे उदाहरण म्हणून सैनिकाचा विचार करता येईल. डरखिमचा पुढचा प्रश्न असतो की समजा सैनिकाने युद्धाची आवश्यकता म्हणून 'हाराकीरी' केली तर त्याला आत्महत्या म्हणावे का? एखादा सुईसाईड बॉम्बर असेल तर त्याला माहीत असते की तो नक्की मारणार, पण त्याचे ध्येय मात्र स्वतःला मारणे हे नसते तर आपल्या गटाला विजय मिळवून द्यावे असते, तर त्याला 'आत्महत्या' म्हणायचे का? आणखी एक उदाहरण. जर एखादी व्यक्ती अब्रू वाचवण्यासाठी किंवा ठराविक मुल्यांवरील विश्वास उडू नये म्हणून स्वतःला ठार मारत असेल तर? इथे त्या व्यक्तीचा उद्देश स्वतःला संपवणे हा नाही, तर अब्रू वाचवणे हा आहे तर त्याला आत्महत्या म्हणावे का? उदाहरणार्थ, कर्ज फेडू न शकलेला माणूस दिवाळखोरीमुळे जाणारी लाज टाळण्यासाठी आत्महत्या करेल तर? इथे हेतू मरण हा नाही, तर लाज वाचवणे हा आहे.
हे सगळे वाचल्यानंतर मला जाणवले की यापूर्वी आत्महत्येच्या केसेस पाहताना मी असा विचारच केला नव्हता. 'आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या' पेशंटला पाहताना माझे मन तीन गोष्टीचा विचार करत असे. एक म्हणजे यामागे तात्कालिक निमित्त आहे का? ती तात्कालिक समस्या सुटण्याचा काहीच मार्ग न दिसल्यामुळे आणि त्या समस्येचे त्या पेशंटच्या दृष्टीने प्रचंड महत्त्व असल्यामुळे त्याने असे केलेय का? दुसरी शक्यता माझ्या मनात येईल ती म्हणजे ही व्यक्ती निराशेच्या आजाराने ग्रस्त असल्यामुळे तिच्या मनात स्वतःला संपवण्याचे विचार आले का? आणि तिसरा शक्यता मनात येई ती म्हणजे या पेशंटला भास, भ्रम वगैरे आजार तर नाही ना? या तिसर्या प्रकारचे उदाहरण सांगतो. सुमारे पाच वर्षापूर्वी मला मेडिसिन वार्डमधून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणासाठी बोलावण्यात आले. मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा तो म्हणाला, "मी प्रेषित आहे. प्रेषिताला जगाच्या कल्याणासाठी बळी जावेच लागते. मी जर बळी गेलो नाही तर जगात महाप्रलय येईल." त्याला भ्रम विकृती होती. दुसर्या एका वीस वर्षांच्या मुलीसाठी मला सर्जरी वार्डातून बोलावण्यात आले होते. तिने दुसर्या मजल्यावरून उडी मारली होती.
ती मुलगी म्हणाली, "दुर्गामाता माझ्याशी बोलते. तिने मला उडी मारण्याची आज्ञा केली." तिला आवाजाचे भास होत होते. या दोन्ही केसेसमध्ये त्या व्यक्तींना सायकोसिस होता. त्यांना औषधे देऊन त्यांचे भास आणि भ्रम कमी करावे लागले. त्यांना नुसते समजावून काही फरक पडणार नव्हता.
डरखिमने आपल्या संशोधनासाठी वेगवेगळ्या देशातून आत्महत्यांच्या संख्येचा डेटा मागवून घेतला. त्याला आढळले की त्याच्या स्वतःच्या फ्रान्स देशात त्याच्या शेजारच्या जर्मन देशापेक्षा आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याने वेगवेगळ्या धार्मिक संप्रदायातील आत्महत्यांचे प्रमाण तपासले तेव्हादेखील त्याला धक्कादायक फरक आढळले. उदाहरणार्थ, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन धर्माचेच उपप्रकार. पण या दोन्हीपैकी प्रोटेस्टंट संप्रदायात कॅथलिक संप्रदायापेक्षा आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. सामान्य नागरिकांपेक्षा सैन्यातील लोकांत अधिक प्रमाण होते आणि त्यातही साध्या सैनिकांच्या तुलनेत अधिकाऱ्यांच्यात जास्त होते.
अविवाहित किंवा घटस्फोटित किंवा कुटुंब गमावलेल्या, एकट्या रहाणार्या लोकात विवाहित लोकांपेक्षा आत्महत्येचे प्रमाण अधिक होते. शिवाय मुले नसणार्या लोकात मुले असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रमाण होते. हा एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्या किंवा वेगवेगळ्या सामाजिक गटातील फरक झाला. पण याशिवाय डरखिमने एकाच देशातील वेगवेगळ्या काळातील प्रमाण तपासले तेव्हा देखील त्याला धक्कादायक फरक दिसले. इतिहासात रोमन साम्राज्य कोसळण्याच्या जरा आधी आत्महत्याचे प्रमाण वाढले होते. ऑटोमन साम्राज्य कोसळताना देखील हेच दिसत होते. जेव्हा जेव्हा एखाद्या देशावर आर्थिक संकटे कोसळली होती तेव्हा तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. आणखी एक गमतीशीर निरीक्षण डरखिमने नोंदवले आहे. 1848 मध्ये युरोपभर जेव्हा क्रांतीचे लोण पसरले तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण चक्क कमी झाले होते.
या अभ्यासातून डरखिमने आत्महत्यांची तीन गटात विभागणी केली. एक गटाला त्याने इगोइस्टिक आत्महत्या नाव दिले, दुसर्या गटाला ऑल्ट्रीस्टीक आत्महत्या नाव दिले तर तिसर्या गटाला अनाॅमिक आत्महत्या नाव दिले. मी जेव्हा गटांची ही नावे पहिल्यांदाच वाचली तेव्हा ती माझ्या डोक्यावरून गेली होती. कारण हे शब्द नेहमीच्या वापरातले नव्हते.
डरखिमच्या 'इगोइस्टिक आत्महत्या' म्हणजे अशा लोकांच्या आत्महत्या जे इतरांना भावनिक दृष्ट्या दृढतेने जोडलेले नाहीत, जसे अविवाहित व्यक्ती, घटस्फोटित व्यक्ती. मुले असतील तर अधिक घट्ट भावनिक बंध तयार होतात त्यामुळे मुले असणार्या लोकात आत्महत्या कमी आढळतात असे डरखिमचे म्हणणे होते. हेच कारण असते खेड्यातील लोकांपेक्षा शहरातील लोकांमध्ये आत्महत्या जास्त होण्याचे. खेड्यात दूरदूर राहणारे लोक देखील भावनिक बंधानी जोडलेले असतात. त्या उलट शहरात बाजूच्या ब्लॉकमध्ये राहणार्या माणसाविषयी देखील ठाऊक नसते. शहरी माणूस गर्दीत देखील एकटाच असतो.
डरखिमच्या 'ऑल्ट्रीस्टीक आत्महत्या' म्हणजे अशा माणसांच्या आत्महत्या ज्या त्यांनी त्यांच्या गटाच्या भल्यासाठी केलेल्या आहेत. याची उदाहरणे म्हणून हाराकीरी करणारे जपानी सैनिक किंवा एलटीटीई चे सुईसाईड बॉम्बर्स सांगता येतील. इथे इगोइस्टिक आत्महत्यांच्या विरूद्ध स्थिती असते. इथे व्यक्तीचे गटाशी असलेले भावनिक बंध घट्ट असतात.
डरखिमच्या 'अनाॅमिक आत्महत्या' म्हणजे अशा लोकांच्या आत्महत्या ज्यांचे समाजातील स्थान अस्थिर झाले आहे. याचे उदाहरणे म्हणजे आर्थिक संकटामुळे घडणार्या आत्महत्या. मी ज्या परिसंवादात भाग घेतला होता त्या शेतकर्यांच्या आत्महत्या या अनाॅमिक गटात मोडणाऱ्या होत्या.
आर्थिक संकटाना कारण ठरवताना एखादा व्यक्ती असा प्रश्न उपस्थित करू शकते की 'आर्थिक अडचणीमुळे ज्या लोकांनी आत्महत्या केल्या, त्यापेक्षा भीषण आर्थिक परिस्थिती कायमची भोगणारे का आत्महत्या करत नाहीत?'
इथे प्रश्न फक्त गरिबीचा नाही, अचानक झालेल्या बदलाचा आहे.
अचानक अस्थिर झालेली परिस्थिती, त्यामुळे ढासळलेले सामाजिक स्थान हे सवयीच्या जास्त वंचिततेपेक्षा जास्त भावनिक परिणाम घडवून आणते हे विचारात घ्यायला हवे.
'अनाॅमिक' या शब्दात डरखिम सामाजिक अस्थिरतेचा, जीवन मूल्यांबाबतच्या संभ्रमाचा देखील समावेश करतो. आज आपण अशाच अस्थिर कालखंडात आहोत.
समाजातील वंचित घटकांबाबत एक प्रश्न मला इथे आठवतोय, तो म्हणजे "इतकी भयानक वंचितता असताना लोक बंड का करत नाहीत? अशा लोकांत काही करण्याचा उत्साह का दिसत नाही?"
त्याचे मार्टीन सेलिग्मनने दिलेले उत्तर आहे, 'लर्नड् हेल्पलेसनेस' (learned helplessness)! सेलिग्मनने एक गमतीशीर प्रयोग केला होता. त्याने कुत्र्यांना शॉक द्यायला सुरवात केली. काहीही केले तरी त्यांना शॉक बसणारच. सुरवातीला कुत्रे शॉक बसू लागला की सुटकेसाठी प्रयत्न करत. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे 'शॉक बसू नये' म्हणून केली जाणारी कुत्र्यांची धडपड कमी होत गेली. शेवटी तर ते काहीच करेनासे झाले. काहीही केले तरी शॉक थांबवणे आपल्या हातात नाही, आपण असहाय्य आहोत, हे ते शिकले. वंचित समाज घटकांना सातत्याने अपयश सहन करावे लागले तर सेलिग्मनच्या प्रयोगाप्रमाणे ते 'हेल्पलेसनेस' शिकतात. त्यावर मात करायची असेल तर त्यांना छोटेसे का होईन यश मिळू शकते असा अनुभव द्यावा लागेल.
माझ्याकडे मोटीवेशनसाठी आणण्यात आलेल्या एका मुलाने मला अनपेक्षित उत्तर देत गप्प केले. तो म्हणाला, "सर, माझे आईवडील मला मेडिकलला जाण्यासाठी सतत सांगत असतात. मी अनेक मोटीवेशनल स्पीकर्सचे व्हिडिओ ऐकलेत. तुम्ही देखील मला तेच सांगताय. पण मी कितीही अभ्यास केला तरी मला मेडिकलला ॲडमिशन मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती? मेडिकलच्या जागा काही हजार असतील पण मेडिकलला जाण्यासाठी प्रयत्न करणारे लाखात असतील. मग जिथे शक्यताच कमी आहे, तिथे जाण्यासाठी रॅटरेसमध्ये भाग घेऊन मी माझी मानसिक शांती का विचलित करू?"
अशाच प्रकारचे मत माझ्या एका मित्राने मांडले होते. कुमारवयिन मुलांशी बोलताना, त्यांनी मेडिकलच्या किंवा आयआयटीच्या प्रवेश परीक्षांत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी मी मोटीवेट करत असल्याचे एका मित्राला अभिमानाने सांगितले. त्यावर तो म्हणाला, "तू जर याला तुझे सामाजिक योगदान म्हणत असशील तर तो तुझा गोड गैरसमज आहे. तुझ्या या कामाला मी पत्ते पिसण्यापलिकडे दुसरे काही समजत नाही."
"कसे काय?"
"मेडिकल किंवा आयआयटी च्या देशभरातील जागा ठरलेल्या असणार. त्या काही रिकाम्या राहत नाहीत. त्यामुळे तू कोणाला मोटीवेट करण्याआधी आणि मोटीवेट केल्यानंतर डॉक्टरांची किंवा आयआयटीयन ची संख्या वाढेल का? नाही. जास्तीत जास्त असे होईल की तू मोटीवेट केलेला एखादा विद्यार्थी तिकडे प्रवेश मिळावेल. पण त्यामुळे सामाजिक बदल काय होईल? म्हणून म्हणालो तुझे काम पत्ते पिसून पाने बदलण्यासारखेच आहे." त्याच्या मुद्द्यावर मी आणखी काही बोलू शकलो.
अशी मला गप्प करणारी माणसे अधून मधून भेटतंच असतात. ती जेव्हा मला पराजित करतात, तेव्हा मला वाईट वाटते हे खरे, पण त्यामुळे ती विचार करण्याचा दुसरा मार्ग दाखवून मला समृद्ध करतात, हे देखील खरे!
......
डॉ. रुपेश पाटकर