देश जळतोय आणि माध्यमं राजकारणी 'बंगाल का बाजीगर कौन ? मध्ये पडलाय
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्र पाठोपाठ देश व्यापला असताना अजूनही माध्यमं आणि राजकारणी 'बंगाल का बाजीगर कौन ?' मधे अडकल्याचं दुर्दैवी चित्र दिसत असल्याचं मत मांडले आहे आकडेवारीसह समीर गायकवाड यांनी...
हे अत्यंत भयावह आहे, काळजात धडकी भरवेल अशी ही आकडेवारी आहे. देशभरात रोज अडीच लाखाहून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत असल्याचे आपण पाहतो आहोतच. किती लोक पॉझिटीव्ह निघाले याहून कैक अधिक पटीने महत्वाची बाब म्हणजे किती लोक कोविड ऍक्टिव्ह ( सक्रिय / उपचाराधीन ) आहेत म्हणजेच किती लोक उपचाराधीन आहेत याकडे लक्ष वेधले पाहिजे.
देशात मागच्या कोरोना लाटेत सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या गतवर्षी 17 सप्टेंबरच्या दिवशी होती. ती होती - दहा लाख सतरा हजार सातशे पाच - 1017705. देशात कोरोनाला इथेपर्यंत पोहोचण्यासाठी तीन फेब्रुवारी ते सतरा सप्टेंबर असा दोनशे सहवीस दिवसांचा कालावधी लागला.
मात्र आताच्या लाटेत दहा लाख सतरा हजार ऍक्टिव्ह रुग्णसंख्या वाढण्यासाठी केवळ केवळ अकरा दिवस लागले आहेत. खाली याची दरदिवशीची आकडेवारी दिली आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या भयानक संकटाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत.
विशेष म्हणजे दर दिवशीची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी केवळ बारा दिवस लागले आहेत. सहा एप्रिल रोजीची एका दिवसातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या वाढ 66358 इतकी होती तर अठरा एप्रिल रोजी जवळपास दुप्पट झालीय.
अठरा एप्रिल रोजी एका दिवसात 129600 इतके ऍक्टिव्ह रुग्ण एका दिवसात वाढले आहेत. आताच सगळा देश (निवडणूकवेडे सत्तापिपासू राजकारणी वगळता) हवालदिल झाला आहे.
बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, रेमडीसीविर आणि लस या सर्वच आघाड्यावर आपण कोलमडत आहोत असे दिसते आहे. मग येत्या वीस दिवसात हीच संख्या आणखी दुप्पट झाली तर आपल्या ताटात काय वाढून ठेवले असेल याचे भेसूर चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहील...
मागच्या वर्षी 17 सप्टेंबरच्या दिवशी जेंव्हा ऍक्टिव्ह रुग्णसंख्या हायस्ट लेव्हलवर पोहोचली होती तेंव्हा त्या दिवशीची ऍक्टिव्ह रुग्णवाढ केवळ 7820 इतकीच होती हा फरक इथे लक्षात घेण्याजोगा आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे धक्के वीस मार्चपासून तीव्र झाले.
त्या दिवशीची एका दिवसातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या वाढ चौदा हजार इतकी होती. आठवड्यानंतर 27 मार्च रोजी एकदिवसीय ऍक्टिव्ह रुग्णवाढ वीसहजार इतकी झाली तर अकरा एप्रिल रोजी एक दिवसीय ऍक्टिव्ह रुग्णवाढ तीस हजार झाली, तर कालच्या दिवशी ही वाढ 22455 अशी कमी झाल्याचे दिसते.
आगामी दोन आठवड्यात महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह रुग्णवाढ याच परिघात दिसून येईल त्या नंतर ती घटत जाईल. हेच सूत्र देशपातळीवर लावले तर देशभरात रुग्णवाढीची तीव्रता मागच्या आठवड्यापासून जाणवू लागली असल्याने पुढचे चार आठवडे अत्यंत कठीण जाणार हे स्पष्ट आहे.
तरीही वृत्तवाहिन्या आणि आपले काही नेते 'बंगाल का बाजीगर कौन ?' यात अडकून पडल्याचे दुर्दैवी चित्र दिसते. मागच्या कोरोना लाटेच्या वेळेस मध्यप्रदेशमधले सरकार पाडून शिवराजसिंगांचा राजतिलक करावयाचा असल्याने अक्षम्य दिरंगाई झाली होती, यंदा तर निवडणुका आणि कुंभ असा डबल बार आहे.
याहून अधिक दुर्दैव हे की पुढच्या वर्षीच्या कोरोना लाटेच्या आरंभ काळात राजकारण्यांच्या जिव्हाळयाच्या 'युपी'मधील निवडणुका असणार आहेत, तेंव्हा हे बेफिकीर लोक काय करतील ?
तेंव्हा आपला जीव प्यारा असेल तर स्वतःची काळजी घ्या, नियम पाळा.
_____________________________________
ऍक्टिव्ह रुग्णसंख्येचे कोष्टक -
तारीख ऍक्टिव्ह रुग्णसंख्या (एकदिवसीय वाढ)
7 एप्रिल - 9,05,026
8 एप्रिल - 9,74,231 (69205)
9 एप्रिल - 10,41,041 (66810)
10 एप्रिल - 11,02,370 (61329)
11 एप्रिल - 11,95,948 (93578)
12 एप्रिल - 12,59,013 (63065)
13 एप्रिल - 13,60,998 (101985)
14 एप्रिल - 14,66,054 (105056)
15 एप्रिल - 15,63,677 (97623)
16 एप्रिल - 16,73,189 (109512)
17 एप्रिल - 17,94,277 (121088)
18 एप्रिल - 19,23,877 (129600)