'मरीआई' नावाची लस…

पुर्वी गावात साथीचा रोग आला की तिला ‘मरीआई’ रोखते म्हणायचे. मात्र, खरंच ‘मरीआई’ साथीच्या रोगाला रोखायची का? विज्ञानाचा शोध लागल्यानंतर ‘मरीआई’चं पुढं काय झालं? महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विज्ञानाचा अविष्कार कामी येतो की परंपरा? करोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर युवराज पाटील यांनी मांडलेला विचार नक्की वाचा

Update: 2021-04-08 05:39 GMT

काही परंपरेच्या उदरात किती दाट अंधार असतो... याची कल्पना मला नुकतीच आली.... मी मराठीत "परंपरा" नावाची एक शॉर्ट फिल्म बघितली... ती "पोतराज" या परंपरेवर आहे... त्यातून मला लहानपणापासूनचा पोतराज आठवला... बिऱ्या नावाचा आमचा एक लहानपणीचा मित्र लांब केस ठेवायचा... आम्ही कुतूहल म्हणून विचारायचो, तो म्हणायचा देवाचे केस आहेत...

आम्ही बिऱ्या पूर्णपणे 'देवाची केस ' म्हणून इतर पोरांची खेचायचो तसे अजिबात त्याच्या नादाला लगायचो नाही... पण एक गूढ मात्र, माझ्या मनात कायम असायचं... साला हे " केस देवाचे " म्हणजे नक्की काय भानगड असेल. प्रकरण देवाचे असल्यामुळे कोण्या मोठ्या माणसाला विचारावं तर 'तसं विचारू नये पाप लागेल' असं म्हणतील म्हणून मी कधीच विचारलो नाही... पुढे जसं जसं वाचायला लागलो तसं ते अधिक कळायला लागलं...!!

मुळात दक्षिण भारत हा पूर्णपणे शैव परंपरेच्या अधिपत्याखाली असलेला भाग... याच शैव परंपरेत शाक्त म्हणजे देवींची आराधना करणारा संप्रदाय... थोडासा अघोरीं... याच परंपरेत पोतराज ( कडक लक्ष्मी ) चे बीज रोवलेली आहेत.

सात बहिणी आणि एक भाऊ पोतुराज... बहिणी अर्थातच देवी आणि पोतुराज हा त्यांचा रक्षणकर्ता... पुढे पोतराज हा यातल्या "मरीआई " या देवीचा भक्त... दक्षिणेत आणि दक्षिणेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात "मरीआई" आणि तिचा भक्त पोतराज ही परंपरा आढळून येते. हल्ली बऱ्यापैकी त्यापासून लोकं बाजूला झाल्याचे दिसत आहे. असो तर, लोक धारणा अशी होती की, गावाच्या रक्षणासाठी ग्रामदेवी असायची, ती कोपली की, वेगवेगळे रोग येतात. उदा. जुन्या काळातील पटकी, हावळी, देवी... अशा वेळी या देवीला गावाच्या वेशीबाहेर वाजत गाजत नेलं जातं. हे काम पोतराज करत.. जाताना तो अंगावर कोरडयाचे ( आसूड ) फटके मारून घेतं... आणि आई दार उघड म्हणत. आई दार उघडलं की अंगात येई... अशी लोक धारणा होती... (कदाचित अजूनही काही गावात असेल) असे म्हणून गावाच्या बाहेर त्या देवीची प्राणप्रतिष्ठा करत... या मागच्या धारणा वेगवेगळ्या आहेत... गावात कोणतीही महामारी येऊ नये, अथवा गावातील महामारी बाहेर जावी म्हणून कोणत्याही गावाच्या बाहेर "मरीआई " चे देऊळ किंवा ओटा आजही दिसतो.

आमच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी वाजत गाजत मरीआईच्या पाया पडायला जातात... अर्थात परंपरा म्हणून... यावर डॉ. सरोजनी बाबर, डॉ. रा. ची. ढेरे यांनीही बरेचसे लिखाण केले आहे... हे सगळं लिहिण्यामागे दोन कारण आहेत...

आजची कोरोना महामारीने सोबत विज्ञान असूनही जगाची झोप उडवली आहे. त्या काळातील अशा महामारीत या धारणांचं लोकांना आत्मबळ देत असतील. मरता क्या नही करता या उक्तीतून अशा परंपरा निर्माण झाल्या असतील.

विज्ञानाचा अविष्कार झाला आणि लस निर्माण झाल्या आणि या निसर्गाच्या वेळोवेळीच्या महामारीच्या लाटा आपण थोपवू शकलो. मित्रहो आता प्रत्येकांनी लस घ्या आणि कोरोना संसार्गाची साखळी तोडू या... अन्यथा त्या खुळ्या धारणा बाळगणारी विज्ञानाचा गंध नसलेली पिढी आणि विज्ञान शिकलेली पिढी अंतर काय राहिले... मित्रहो शास्त्र सोबत आहे. त्यामुळे लसवंत व्हा...!!

Tags:    

Similar News