कोविड नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल

करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. या संकटाला आपण कसं तोंड देऊ शकतो? करोनामुक्त राज्य बनवण्यासाठी नेमकं काय करावं? यासंदर्भात डॉ. प्रदीप पाटील यांनी तयार केलेला ‘कोविड नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल’... नक्की वाचा आणि कृतीत आणा...

Update: 2021-04-27 11:02 GMT

सध्या राज्यातील सर्व भागात करोना आजाराची दुसरी लाट सुरु आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण येणे स्वाभाविक आहे. या आजाराच्या रुग्णांवर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या स्पष्टपणे लक्षात येते आणि ती म्हणजे या आजाराचे ७० टक्केहूनही अधिक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. ज्यांना ऑक्सिजन लागतो किंवा व्हेंटीलेटर लागतो, आय सी युची गरज भासते अशा रुग्णांची संख्या ही अवघी ९ ते १० टक्क्यांच्या आसपास आहे. याचाच अर्थ या आजाराचे बहुसंख्य रुग्ण हे घरगुती विलगीकरणात बरे होणे शक्य आहे. अर्थात यासाठी आपल्याला समाज म्हणून काही जबाबदारी उचलावी लागेल आणि या आजाराचे बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी किंवा कोविड केअर सेंटरमध्ये बरे होण्यात आपण हातभार लावू लागलो तर रुग्णालयावरील ओझे कमी होऊन ज्यांना ऑक्सिजन लागतो किंवा आय सी यु उपचाराची गरज आहे त्यांना बेड सहजपणे मिळू शकतील, रुग्ण आणि रुग्णालये मोकळा श्वास घेऊ शकतील.

• कोविड नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल -

करोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. यासाठी आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅंडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचे काटेकोर पालन करावे लागेल.

आपल्याला प्रत्येक कोविड रुग्णास वेळेत उपचार मिळावेत, या करिता गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात साधारणपणे प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे. राज्यात एकूण १०,५०० पेक्षा अधिक उपकेंद्रे आहेत. आजच्या घडीला राज्यात सात लाखाच्या आसपास कोविडचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील सुमारे सत्तर टक्के रुग्ण हे शहरी भागात आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागात प्रत्येक उपकेंद्र स्तरावर २० ते २५ पेक्षा अधिक रुग्ण नाहीत. अर्थात काही भागात हे प्रमाण कमी जास्त असू शकते. हे रुग्ण ग्रामीण भागामध्ये चांगले सूक्ष्मनियोजन करुन हाताळणे सहजशक्य आहे. राज्यातील अनेक गावांनी गावक-यांनी एकत्र येऊन अशी कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत.

• ग्रामीण भागातील कम्युनिटी मॉडेल आणि सूक्ष्मनियोजन –

ग्रामीण भागातील ज्या कोविड बाधित व्यक्तींना सौम्य स्वरुपाचा आजार आहे त्यांना घरच्या घरी वेगळे करुन उपचार करणे शक्य आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणच्या खाजगी डॉक्टरांना यात सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. तथापी काही वेळा आजार जरी सौम्य असला तरी घरात पुरशी जागा नसते म्हणून गावपातळीवर छोटी छोटी कोविड सेंटर उभा करणे गरजेचे आहे. गावातील जाणत्या लोकांच्या पुढाकाराने हे शक्य आहे.

ग्रामीण भागातील डॉक्टरांची यादी करुन त्या नुसार किमान प्रत्येक उपकेंद्र स्तरावर किंवा जी मोठी गावे आहेत, ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो अशा मध्यवर्ती गावांमध्ये कोविड केअर सेंटर उभा करणे. या प्रकारे ग्रामीण भागात एका तालुक्यात सरासरी ३० ते ५० छोटी छोटी कोविड केअर सेंटर ( १० ते २० खाटांची) उभी करणे शक्य आहे.

✓ ग्रामीण भागातील खाजगी दवाखाने, समाज मंदिर, शाळा अशा जागांचा वापर कोविड केअर सेंटर म्हणून करण्यात यावा.

✓ कोविड केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर उपलबद्ध करण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी ॲन्टीजन तपासणीची सोयही उपलब्ध असावी.

✓ अनेकदा संसर्गाची तीव्रता समजण्यासाठी रक्ताच्या इतर काही तपासण्या करणे आवश्यक असते. याकरिता तालुका पातळीवरील प्रयोगशाळांना ही सेंटर्स जोडावीत. या प्रयोगशाळेतील कर्मचारी गरजेनुसार या कोविड केअर सेंटरमधील रक्तनमुने संकलित करतील.

✓ या कोविड केअर सेंटरचे फोन नंबर परिसरातील गावांमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वांना कळवावेत.

✓ या कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्याकरिता खाजगी डॉक्टर्स, उपकेंद्रातील नर्सेस, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांची मदत घेण्यात यावी. ग्रामीण भागात प्रत्येक एक हजार लोकसंख्येला एक आशा कार्यकर्ती आहे. या कार्यकर्तींचा या कामी चांगला उपयोग होऊ शकतो. याशिवाय गावपातळीवरील तरुण कार्यकर्ते, युवक मंडळांचे सदस्य, शिक्षक, लॉकडाऊनमुळे घरी असणारे इतर शासकीय कर्मचारी, आरोग्य खात्यातील निवृत्त लोक यांना या कोविड केअर सेंटरच्या कामामध्ये सहभागी करावे.

✓ हे सारे स्वयंसेवक गावपातळीवर जे लोक घरगुती विलगीकरणात आहेत त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याचे काम करतील.

✓ जे लोक घरच्या घरी विलगीकरणात आहेत त्यांचे दैनंदिन मॉनिटरींग कोविड केअर सेंटरला जोडलेले स्वयंसेवकांचे पथक करेल.

✓ महिला बचत गट, दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अशा कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी नाश्ता, जेवण आणि इतर आवश्यक सुविधा पुरविणे शक्य आहे.

✓ तालुका पातळीवर कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्याला असे मॉडेल विकसित करता येईल.

✓ योग वर्ग, भजन , ध्यान अशा बाबींसाठी वेळ देऊन ही कोविड सेंटर्स आनंददायी आणि प्रसन्न बनवता येतील.

✓ गावपातळीवर घराच्या जवळपास ही कोविड केअर सेंटर असल्याने त्याचा रुग्ण बरे होण्यावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच असे मॉडेल आर्थिक दृष्टयाही रुग्णांना परवडणारे असेल.

• शहरी भागातील कम्युनिटी मॉडेल – कोविड ऑक्सिजन क्लिनिक

आपल्याकडे सर्वाधिक कोविड रुग्ण हे शहरी भागात आहेत. शहरी भागातही आपल्याला फिल्ड पातळीवर काही तयारी करावी लागेल तरच खूप मोठया प्रमाणावर असणारे सौम्य रुग्ण आपल्याला फिल्ड पातळीवर, घरगुती पातळीवर बरे करता येतील आणि रुग्णालयाकडे वळणारा अनावश्यक लोंढा थोपवता येईल, ज्यांना खरोखरच बेडची आवश्यकता आहे त्यांना बेड मिळण्याची शक्यता वाढून गुंतागुंत आणि मृत्यूचे प्रमाण अजून कमी करता येईल.

प्रत्येक शहरी भागात प्रत्येक २५ हजार लोकसंख्येला एक या प्रमाणे आपल्याला एक कोविड क्लिनिक उभे करावे लागेल. सध्या राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता दर दश लक्ष लोकसंख्येमध्ये ५५० रुग्ण आहेत. याचा अर्थ आपण जेव्हा दर लाख लोकसंख्येमध्ये चार कोविड क्लिनिक उभी करु तेव्हा या प्रत्येक क्लिनिकला घरगुती विलगीकरणात असलेले सुमारे १०० रुग्ण पाहण्याची जबाबदारी असेल.

शहरी भागातील फिल्ड टीम आणि कोविड क्लिनिक -

प्रत्येक फिल्ड टीम मध्ये असणारे सदस्य, साहित्य आणि त्यांचे काम याची ढोबळ रुपरेषा –

✓ फिल्ड सदस्य

किमान एक मेडिकल डॉक्टर

एक नर्स

आरोग्य कर्मचारी

५ ते १० स्वयंसेवक

✓ साहित्य

पेशंट तपासणी साहित्य

पल्सॉक्सीमिटर

थर्मामीटर

सौम्य कोविड रुग्णांना लागणारी औषधे

ऑक़्सिजन कॉन्सेट्रेटर

साधे ऑक्सिजन सिलिंडर

अपवादात्मक परिस्थितीत लागल्या तर काही ऍंटिजन टेस्ट कीट

✓ फील्ड टीमच्या कामाचे स्वरुप -

भागातील घरगुती विलग रुग्णांचे टेलिफोनिक मॉनिटरींग व उपचार

पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध

गंभीरतेकडे झुकलेल्या रुग्णांना वेळेत हॉस्पिटलला पाठवणे.

ज्या घरगुती विलग रुग्णांना बेड मिळण्याकरता अडचण येत आहे त्यांना बेड मिळेपर्यंत ऑक्सिजन सेवा

• मनुष्यबळ आणि इतर बाबींचे व्यवस्थापन –

✓ फिल्ड टीम एका क्लिनिक़ मध्ये बसेल. त्याला कोविड ऑक्सिजन क्लिनिक असे नाव असेल. या क्लिनिक़चा पत्ता आणि लॅंडलाईन नंबर तसेच इतर काही मोबाईल नंबर त्या वॉर्डातील सर्व व्यक्तींना माहित होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

✓ कोविड ऑक्सिजन क्लिनिक – हे कोणत्याही खाजगी क्लिनिक मध्ये किंवा त्या भागातील मोठया सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये स्थापन करता येईल.

✓ मेडिकल ऑफिसर – संबंधित परिसरातील खाजगी डॉक्टर्स, निमा आणि आय एम ए सदस्य यांना या क्लिनिकची जबाबदारी देण्यात यावी.

✓ वेळ – २४ बाय ७ सुरु असावे.

✓ रुग्णांचे वर्गीकरण - हे क्लिनिक त्यांच्या भागातील सर्व घरगुती विलग रुग्णांच्या किमान आवश्यक तपासण्या करुन घेऊन त्या नुसार कोणत्या रुग्णाला भरती करणे आवश्यक आहे आणि कोणता रुग्ण घरगुती पातळीवर उपचार करणे शक्य आहे, याचा निर्णय घेऊ शकतील. या करिता विशिष्ट प्रयोगशाळांशी समन्वय साधता येईल.

✓ सध्या अनेक महाविद्यालयीन मुले, शिक्षक, निवृत्त लोक लॉकडाऊन मुळे घरी बसून आहेत. यातील इच्छुक समाजसेवी व्यक्तींना स्वयंसेवक म्हणून घेता येईल.

✓ ऑक्सिजन सुविधा - या क्लिनिक मध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर किंवा साधे ऑक्सिजन सिलिंडर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या घरगुती विलग व्यक्तींना ऑक्सिजन लागेल त्यांना बेड मिळेपर्यंत इथे सोय होऊ शकेल.

✓ प्रत्येक निवडणुक वॉर्ड स्तरावर असे क्लिनिक उपलब्ध झाल्याने प्रत्येक २५ ते ३० हजार लोकसंख्येमागे अशी सुविधा निर्माण झाल्याने घरगुती विलग झालेल्या रुग्णांची मोठया प्रमाणावर सोय होईल.

✓ सोसायटी क्लिनिक – शहरामध्ये असणा-या मोठया सोसायटीमध्ये तेथील क्लब हाऊसला त्या सोसायटीमध्ये राहणा-या डॉक्टरांच्या मदतीनेही अशी क्लिनिक आणखी सुरु करता येतील.

✓ मोकळ्या फ्लॅटमध्ये कोविड विलगीकरण – अनेक सोसायटयांमध्ये काही फ्लॅट हे मोकळे असतात. या ठिकाणी ज्या बाधित रुग्णांच्या घरी पुरेशी जागा नाही त्यांना ठेवता येईल.

✓ किमान २ ते ४ बेड असणा-या छोटया छोट्या रुग्णालय / क्लिनिक मध्ये ही अशी सुविधा निर्माण करुन त्याची जनतेला माहिती देता येईल.

✓ निरंतर प्रशिक्षण – कमी धावपळीच्या काळात या टीमचे ऑनलाईन प्रशिक्षण प्रभाग स्तरावरुन घेता येईल. या टीमना येणा-या विविध शंकाकुशंकांबाबत मार्गदर्शन करता येईल.

✓ या व्यवस्थापनासाठी स्थानिक स्तरावरील प्रतिष्ठीत लोक, पोलिस अधिकारी, व्यापारी, रोटरी / लायंस क्लब, डॉक्टरांच्या विविध संस्था यांना सहभागी करुन घेता येईल.

आपण या प्रकारे सर्व शहरी भागात, नगरपालिका क्षेत्रात अशी व्यवस्था निर्माण करु शकतो. या व्यवस्थापनामुळे सध्या रुग्णालयांवर आलेला ताण कमी होऊ शकतो.

• स्वयंसेवी व्यक्तींना प्रोत्साहन – कोविडसाठी जी रुग्णालये राज्यभर काम करत आहेत तेथील मनुष्यबळ मागील वर्षभरात अतिकामाने, मानसिक ताणाने दमले आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, इतर मनुष्यबळ खाजगी क्षेत्रातून / स्वयंसेवी पध्दतीने पुढे येण्यासाठी तयार आहे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विशेषतः शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने अशा पध्दतीने जे स्वयंसेवी लोक पुढे येत आहेत त्यांना आपल्या आरोग्य संस्थेमध्ये काम करु देण्याबाबतची अनुमती संस्थास्तरावर तेथील प्रमुखाला देता आली पाहिजे. यामुळे मनुष्यबळाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

कल्पक आणि समाजाभिमुख पध्दतीने विचार करुन कोविड नियंत्रणाचे सर्वांगीण असे कम्युनिटी मॉडेल आपल्याला सिद्ध करणे शक्य होणार आहे. अनेक ठिकाणी ते होताना दिसतही आहे. फक्त ते सर्वव्यापक होण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन, स्थानिक पातळीवरील संसाधनांचा, गरजेचा आणि मर्यादांचा विचार करुन असे मॉडेल आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात उभे करावे लागेल. कोविडच्या या प्रचंड मोठया संकटाला आपण एकत्र येऊनच परतवू शकतो.

डॉ. प्रदीप आवटे.

Tags:    

Similar News