भारतीय समाज आणि वाटून घेतलेले महापुरुष

प्रत्येक जातीमध्ये महापुरुष का वाटले गेले? भगवं वादळ, निळे वादळ, पिवळे वादळ, हिरवे वादळं या शब्दातून कोणता अर्थ समोर येतो. तरुणांईच्या मनामध्ये जातीयतेची बीज कशी रोवली जातात. याची जाणीव करुन देणारा चैतन्य सुनंदा शिवलाल जायभाये यांचा लेख;

Update: 2021-05-31 06:45 GMT

कोणताही समाज मागास ठरण्यासाठी त्यांची रुढीवादी कारणमीमांसा नसलेली आणि so called Orthodox विचारसरणी कारणीभूत ठरते. मीच आणि माझी जात सर्वश्रेष्ठ ही मानसिकता काहीही कामाची नसते, ताठर भूमिका प्रत्येकवेळी योग्य नसते. समाज कोणताही असो त्याला मागास करतो. तो त्याचा विचार आणि ज्यावर त्याने विश्वास ठेवला ते नेतृत्व. सांख्यिकी दृष्ट्या बरंच काही दिसून येतं पण ते न पाहता मला हवं तेच बरोबर किंवा मी बोलतो तेच बरोबर ही मानसिकता कधीही प्रगती करणारी नसते. संविधानिक मार्ग काय असतो? आणि कोणत्या आधारावर आरक्षण असतं. याचा अभ्यास आरक्षण मागणाऱ्या जातीच्या किती लोकांना आहे? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

तसे पाहता मराठा आरक्षण हा मुद्दा नाही, तो निर्माण केलेला मुद्दा आहे. हे मात्र खरं आहे. मी बोलतोय म्हणून कुण्या समाजाच्या विरोधात बोलायचा प्रश्न नाही, गावागावात अजूनही बुरसटलेली मानसिकता पाहायला मिळते. अजूनही गावात 'महारवाडा' आणि 'मांगवाडा' असे सामाजिकदृष्ट्या गावाबाहेर राहणारे गट किंवा झोपडपट्टी दिसून येते. जर खरंच सगळे एक आहेत तर मग ही दरी अजूनही का आहे? हे कळीचे मुद्दे अजूनही दुर्लक्षित आहेत.

Honour Killings? यावर तर कुणीच बोलत नाही, कथित सवर्ण आणि त्यांच्या पोटी येणाऱ्याच मुली जिजाऊंच्या लेकी आहेत का? बाकीच्यांची पोटी येणाऱ्या मुली या जिजाऊ, सवित्री रमाई च्या लेकी नाहीत का?

जिजाऊंनी खंबीर जगायला शिकवलं तर सवित्रींनी शिक्षण घेऊन ताठ मानेने चालायला शिकवलं, हे समर्पक आणि गरजेचे न घेता आपण जिजाऊ फक्त मराठ्यांपुरत्या आणि सावित्री फक्त माळ्यांपुरत्या मर्यादित ठेवल्या. मी आजपर्यंत पाहिलंय शिकून नोकरीला लागल्या पण सावित्रीचे योगदान त्यांना मान्य आहे. अश्या फार कमी स्त्रिया आहेत. परंतु बहुतांश स्त्रिया (सर्वच जागी धर्मातल्या) या फक्त जयंतीच्या post करण्याच्या व status ठेवण्याच्या निमित्ताने सावित्रीचे योगदान त्यांना दिसून येतं. बाकी वेळेस त्या माळी, मागास वगैरे असतात, हेच जिजाऊला सुद्धा लागू होतं.

जिजाऊंना, शिवरायांना, फुले, आंबेडकर, सावित्री, अहिल्याबाई यांना तर फक्त जातीपुरते म्हणवून घेऊन फक्त आमची मालमत्ता आहे. असे वागवले जाते. शाहू फुले आंबेडकर आम्ही फक्त बहुजनांचे म्हणू पण आतून माझ्या जातीचे धर्माचे कोण यालाच प्राधान्य देऊ. ही कुचकट वृत्ती दिसून येते.

महात्मा गांधी, शाहू, फुले, आंबेडकर सारखे सामाजिक नेतृत्व काही वेळा चुकलेही असतील. पण त्यावर बोलायला गेलं की ते आम्हाला जमत नाही. मी त्यांच्या चुका काढा असे म्हणत नाही, पण आपण इतके आंधळे झालो आहोत की, आपल्याला फक्त स्तुती आणि चांगलं बोलणं अपेक्षित आहे.

टीका टिप्पणी झाली की धार्मिक भावना दुखावल्या... याच्या नावाखाली झुंडी निर्माण करायच्या ही आपली थिल्लर मानसिकता आहे. साधी गोष्ट आहे, शिवरायांच्या जयंती सोहळे प्रसंगी कधी कुणी दलित अध्यक्ष दिसून येत नाही आणि आंबेडकर, फुले जयंती सोहळे करताना कुणी मराठा अध्यक्ष दिसून येत नाही.

काही ठिकाणी असेलही पण मग फक्त बोटावर मोजण्याइतके का असावे? हा प्रश्न आहे. मग जर सत्तर वर्षात हे संपलं नाही तर आपण अजूनही मागास विचारसरणीचे आहोत हे मात्र खरं. आपली मुले परदेशात शिकायला पाठवणे हे आपल्याला पुरोगामी वाटतं पण देशातली शिक्षण पद्धती ही बदलायची गरज आहे.

यावर आपण कधी चर्चा करत नाही किंवा शैक्षणिक बदल करू शकणारा गट निर्माण करत नाही. पण जात, धर्म, पंथ यावर आपण इतके भरभरून व्यक्त होतो की, त्यातून आपला उद्धार होणार आहे हे आपल्याला वाटतं. बरं जात धर्म किंवा त्यातील चुकांवर बोट ठेवलं की मग तू जातीवाद करतो, धार्मिक द्वेष निर्माण करतो हा ठप्पा टाकायचा आणि मोकळं व्हायचं. माझ्या मते आपण ज्या जातीचे प्रतिनिधित्व करतो किंवा ती मिरवतो. त्या जातीतल्या वाईट प्रवृत्तींना आपण जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत हे सामाजिक भेदभाव(Social Discrimination) कधीही थांबणार नाही.

वास्तव हे आहे शिकलेला असो किंवा अशिक्षित, आपण मुलांना घरात काय शिकवतो यावर मुलांची विचासारणी ठरते. त्यातून ते आपलं मत बनवतात आणि मग भविष्यात येणाऱ्या अनुभवला आपल्या पूर्वग्रह निर्माण केलेल्या मताच्या जोडीने वागण्यात दाखवतात. कोणते आई वडील आहेत. ज्यांनी आपल्या मुलाला हे सांगितलं की जात धर्म कोणताही असो त्याची शिकवण काय आहे. यापेक्षा माणूस म्हणून माणुसकीची शिकवण काय हे महत्त्वाचं आहे, असे आपल्या मुलांना मार्गदर्शन केले आहे? ही टक्केवारी फार कमी असेल हे दिसून येतंय, त्यात जाट, पटेल, मराठा नंतर धनगर आणि OBC च्या अनुक्रमे आरक्षण आणि वाढीव आरक्षण च्या मागण्याने तर सामाजिक दरी अजून वाढली आहे.

एक सांगा खुल्या प्रवर्गात MERIT वर आलेला डॉक्टर, अधिकारी जर मागास प्रवर्गाचा असेल तर त्याला कथित सवर्ण बोगस म्हणून आरक्षणाच्या जीवावर झाला म्हणून हीनवत असतील, जर खुल्या प्रवर्गातून एकदा मागास किंवा दलित उमेदवार उभा राहून तो निवडणूक हरत असेल तर कोणत्या तोंडाने बोलणार की आपण आता LIBERAL झालो आहोत? सामाजिक आणि धार्मिक दरी कमी झालेली आहे? हे फुकाचे बोल काय कामाचे जर आपल्या वागण्यातून ते दिसून येत नसतील!

अहो एक भान असायला हवे, जर भगवं वादळ असेल तर आपसूक निळे, पिवळे हिरवे वादळं निर्माण होणार; आपण जर बहुसंख्य असू तर आपल्याला झुंडशाही करायची काहीच गरज नसते. पण जर ते आपण करणार तर मग अल्पसंख्यांक असणारे लोक सुरक्षिततेच्या भावनेने आपोआप गटातटाने राहतील. मोठा म्हणून जसे आपण घरातल्या लोकांना समजूतदारपणे वागावे ही अपेक्षा धरतो तर मग सामाजिक दृष्ट्या आपण हेच विचार का करू शकत नाही?

मुद्दे खूप आहेत, ते खोडता सुद्धा येतात पण मुद्द्यावर बोलणे. आजकाल समाजविघातक, धार्मिक द्वेष, जातीभेद अशी विशेषणं लावून त्याचं तोंड बंद करायला भाग पाडले जाते. आणि हीच आपल्या सर्व जाती धर्माच्या समाजाची खरी मानसिकता आहे.

बदल हवा असेल तो आधी आपल्यातून करायला कुणीच धजत नाही, पण समोरच्याने मात्र नक्की केला पाहिजे ही भावना म्हणजे निव्वळ स्वार्थी आहे. यात कुणाचं दुमत असावं? छत्रपती म्हणजे फक्त मराठा नाही, फुले म्हणजे फक्त माळी नाहीत, आंबेडकर म्हणजे फक्त दलित नाहीत तर ते सर्वसमावेशक होते. हे आपण कधी ध्यानात घेणार? बरं त्यांच्यावर मालकी हक्क गाजवणारे सर्व अनुयायी आपल्या आयुष्यात त्यांच्या विचाराचे किती अनुसरण करतात?

छत्रपतींसारखी दाढी मिशी वाढवून, फुले आंबेडकर यांचे फोटो घरात, status, Facebook वर ठेवून किंवा आंबेडकर यांची सही, छत्रपती सरकार/शासन, भीमा तुझ्या जन्मामुळे, सवित्रीच्या लेकी, भगवे झेंडे, निळे अशोक चक्र, मराठा सरकार/ शासन हे असले गाड्यांवर रेडियम ने चिटकवून साध्य काय होणार आहे? ही खरी झुंडशाही आहे, ज्याने फक्त दहशत निर्माण करणे पोकळ जातीवाद, धार्मिक प्रेम व्यक्त करणे प्रतीत होतं.

सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी स्वतःच्या आयुष्यात बोलण्या वागण्यापासून बदल करावा लागतो. गांधी होणे सोपे नाही. पण गांधीला नाव ठेवणे फार सोपे आहे. त्याला कर्तृत्व लागत नाही, त्याग, अहिंसा याचं प्रतीक होण्यासाठी सगळं असूनही आयुष्यभर धोतरावर राहणे आणि आपल्या ठरवलेल्या तत्वांवर कुठलंही compromise न करता वागणे याला फार संयम आणि क्षमता लागते.

सर्वच जाती धर्मातल्या वाईट प्रवृत्तीमुळेच आपण इथपर्यंत आहोत, नाहीतर कोणत्याही वाईट प्रथा, सवयी आणि विचारांचं उच्चाटन करायला आपल्याकडे जास्त वेळ लागणार नाही, कारण भारत हा विविधतेने नटलेला आहे. ज्यात असंख्य संस्कृती, धर्म, जाती आहेत आणि त्या आपापल्या परीने नेहमी समृद्ध आहेत.

- चैतन्य सुनंदा शिवलाल जायभाये

Tags:    

Similar News