कोविड झाला असेल तर लस घेता येते का?
कोविड झाला असेल तर लस का घ्यायची आणि कधी घ्यायची ? जाणून घ्या साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे यांच्याकडून...
- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोगतज्ञ , मिरज.
भारतामध्ये जानेवारीपासून लसीकरण सुरु आहे. आणि फेब्रुवारीपासून कोविडची रुग्णसंख्या वाढू लागली. जेव्हा रुग्णसंख्या वाढते त्यानुसार करोना संसर्गाचा धोका देखील वाढतो. त्यामुळे बरेच जण पहिल्या डोसपूर्वी किंवा दुसऱ्या डोस पूर्वी कोविडमुळे आजारी पडू शकतात.
ज्यांना कोविड झाला आहे. अश्या व्यक्तीमध्ये आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते मात्र ती किती निर्माण होईल हे सांगता अथवा मोजता येत नाही. काही लक्षणविरहित रुग्णांमध्ये antibody निर्माण होत नाहीत. तसेच निर्माण झालेली इम्युनिटी पुढील आजारापासून वाचवण्याची क्षमता राखते का हेही सांगता येत नाही. त्यामुळे सरसकट लस घेऊ नये असा नियम केला तर बरेच जण रोगप्रतिकारक प्रतिपिंडे सुरक्षेसाठी अपुरी असल्याने बाधित होऊ शकतील.
मात्र लस निर्माण करताना विषाणूच्या S प्रथिनाविरुद्ध संरक्षक प्रतिपिंडे पुरेश्या प्रमाणामध्ये तयार होतील. अश्या बेताने लसीचा डोस ठरवला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये संरक्षक प्रतिपिंडे लसीमुळे तयार होतात.
म्हणून नैसर्गिक कोविड आजार झाला असेल तरी देखील लस घेणे आवश्यक आहे. मात्र पहिल्या किंवा दुसऱ्या डोसपूर्वी कोविड झाला तर लस नक्की कधी घ्यावी या बाबत संभ्रम दिसून येतो. याचे कारण विविध संघटनांमार्फत वेगवेगळे निकष देण्यात आलेले आहेत.
CDC नुसार आयसोलेशन चा कालावधी संपल्यानंतर कधीही लस घेता येते, मात्र २-३ महिने थांबून लस घेतल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. मात्र तुम्हाला प्लाज्मा दिला गेला असेल / गंभीर आजारी (आयसीयु) असाल तर मात्र ९० दिवसांनंतर लस घ्यावी असे सांगितले आहे.
भारत सरकारच्या FAQ मध्ये कोविड नंतर १४ दिवसांनी लस घेण्यास हरकत नाही असे सांगितले आहे. लसीकरणाच्या शास्त्रानुसार कोणत्याही लसीच्या दोन डोसांमध्ये कमीतकमी ४ ते ६ आठवड्यांचे अंतर असावे अशी मान्यता आहे.
त्यामुळे तुम्हाला कोविड झाला असेल तर कोविडची कोणतीही लस (पहिला किंवा दुसरा डोस) आयसोलेशन संपल्यानंतर कमीतकमी साधारण चार आठवड्यांनी घेणे संयुक्तिक राहील.
अंतर वाढते तशी लसीची परिणामकारकता देखील वाढते. याविषयी आपल्या डॉक्टरांशी देखील चर्चा करू शकता. आणि तुम्हाला किती जोखीम आहे. त्यानुसार किती आठवडे थांबून डोस घ्यायचा हे ठरवू शकाल. मात्र पुढील काळजी अवश्य घ्या.
१. कोविडची लक्षणे असतील किंवा कोविड टेस्ट positive असेल अश्या वेळी लस घेऊ नका.
>> तुम्ही लसीकरण केंद्रामध्ये बाधा पसरवू शकता.
>> आजार असताना लस घेतल्यास लक्षणे वाढू शकतात.
२. कोविड रुग्णाशी संपर्क आला असल्यास १४ दिवसांचे अलगीकरण पाळा व या कालावधीमध्ये लस घेऊ नका.
लस घेण्यापूर्वी संसर्ग झाला नाही याची खात्री १४ दिवस थांबल्याने होते. अन्यथा लस घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये कोविड होऊ शकतो.
१ मे नंतर सर्वांनी लस अवश्य घ्या. लसीमुळे गंभीर आजार टळू शकतो. लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर नियम पाळणे सोडू नका.
- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोगतज्ञ , मिरज.