समाजवादाचे जनक बुद्ध :भि.म.कौसल

लोकांना रोजगार (employment) उपलब्ध झाला नाही तर गरीबी (poverty) वाढते. त्यातून समाजात अपराध वाढतात. हे सर्व नष्ट करावयाचे असेल तर राज्याने सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च केला पाहिजे, असं सांगणारा अडीच हजार वर्षांपुर्वीचा तथागत भगवान बुद्ध (Budddha)म्हणजे राज्य समाजवादाचा पहिला जनक असल्याचं अभ्यासक भि.म. कौशल यांनी विश्लेषण केलं आहे.;

Update: 2023-05-05 11:03 GMT

जोहान्स गटेनबर्ग याने इ.स. 1450 मध्ये प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. त्यामुळे संवाद प्रक्रियेला चालना मिळून विविध संस्कृतींचा संपर्क वाढला. फ्रान्सिस्को पेट्रार्क आदी कवींनी परंपरागत प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृती आणि मूल्ये यात सुधारणा करून हे साहित्य जनतेत वितरित केले. याचा परिणाम असा झाला की, लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. यामुळे कला, साहित्य, प्रवास आणि विविध वैज्ञानिक शोधांना मोठी चालना मिळाली. राजकीय व आर्थिक विचारात सुद्धा बदल होऊ लागले. इटलीच्या फ्लोरेंस शहरापासून सुरू झालेली ही पुनरूत्थान चळवळ सर्व युरोपमध्ये पसरली. या चळवळीचा एक महत्वपूर्ण परिणाम म्हणजे मानवतावादी विचारांना प्रोत्साहन मिळाले. पुनरूत्थान चळवळीचा परिणाम म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. जी उत्पादने पूर्वी गृहउद्योगाच्या माध्यमातून होत होती ती मोठमोठ्या कारखान्यातून होऊ लागली. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या भांडवलदारांच्या या चढाओढीत जे श्रमिक अहोरात्र कष्ट करून उत्पादन वाढविण्यात हातभार लावत होते त्यांच्या मानवी हक्कांकडे दुर्लक्ष होऊ लागले. श्रमिकांचे मोठ्याप्रमाणावर शोषण होऊ लागले. या बाबींकडे कारखानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला. मात्र भांडवलदार व शासन यांच्यात युती असल्याने किंवा अनेक भांडवलदार शासनाचाच भाग असल्याने कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेले. यातून एकाधिकार भांडवलशाही उदयास आली. उत्पादनाची साधने, उत्पादन आणि वितरण व्यवस्थेवर भांडवलदारांचा एकाधिकार निर्माण झाला.

समाजवादाला चालना

या शोषण व्यवस्थेमुळे कामगारांचे अतोनात हाल होऊ लागले. त्यांना राहण्यासाठी चांगली घरे नाही, तुटपुंजे वेतन, कारखान्यात आरोग्यदायक वातावरणाचा अभाव आणि औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण व इतर समस्या यामुळे गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले. यातून हळूहळू समाजवादी विचारांना चालना मिळाली. ह्यूगन नावाच्या विचारवंताने समाजवादाची व्याख्या करतांना म्हटले आहे, समाजवाद श्रमिकांची राजकीय चळवळ आहे. जिचा उद्देश उत्पादन आणि वितरणाच्या मूळ साधनांवर सामुहिक प्रभुत्व आणि लोकशाही व्यवस्था लागू करून शोषणाचा अंत करेल, ही अशी एक राजकीय आणि आर्थिक पद्धत आहे. ज्यात साधनसंपत्ती व उत्पादनाच्या साधनांवर आणि वितरणावर राज्याचा अधिकार असतो. औद्योगिक क्रांतीतून कच्च्या मालाची वढती मागणी आणि उत्पादित मालासाठी आवश्यक बाजारपेठेच्या गरजेपोटी नवीन वसाहतीची गरज भासू लागल्याने साम्राज्यवादास प्रोत्साहन मिळाले. त्यातून शोषण वाढले. मात्र दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर साम्राज्यवादविरोधी वातावरण जगभर निर्माण झाले. लोकशाही विचारांना चालना मिळाली. बदलत्या काळाची गरज म्हणून लोकशाही समाजवाद पद्धतीला चालना मिळाली. या व्यवस्थेत उत्पादन आणि वितरण यावर सरकारचे नियंत्रण स्थापित झाले. अतिरिक्त नफ्यातून समाजातील जो शेवटचा घटक आहे, त्याच्या उत्थानासाठी खर्च होऊ लागला. अमेरिका आणि युरोपमध्ये कारखानदार सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून लोककल्याण कार्यास मदत करू लागले. जगभरात लोकशाही समाजवादी सरकारे स्थापन होऊ लागली. भारताने देखील ही राज्यव्यवस्था स्वीकारली.

समाजात सर्वप्रकारची समता असावी आणि सर्वांचा सारखा विकास व्हावा, या हेतूने लोकशाही व्यवस्था स्वीकारण्यात आली. सर्वप्रकारची विषमता नष्ट करणे व मानवी समाजाला विकसित करणारी व्यवस्था निर्माण करण्याचे काम या व्यवस्थेत आहे. लोकशाही यासाठीही स्वीकारण्यात आली की, पूर्वीची शोषण व्यवस्था ज्यामुळे मानवी समाजाची हानी झाली, नष्ट झाली पाहिजे. सर्वसमावेशक विकास हे या व्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्य आहे. लोकशाहीत केवळ मानवी विकासच नाही तर तर बुद्धिमत्तेचा विकास (Development of Personality)होणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे विचार करण्याचे वातावरण समाजात निर्माण झाले पाहिजे. कोणीही दुसऱ्या माणसाचा गुलाम नाही, हे लोकशाहीचे मूल्य आहे. यातून सर्व प्रकारची मुभा मिळते. कोणत्याही प्रकारची बंधने न येता सर्वांना समान संधी प्राप्त होते. मात्र अमेरिका, युरोपसारखी ती भारतात यशस्वी होऊ शकली नाही. कारण भारतात जातीवर आधारित विषमता व शोषण आहे.

लोकशाहीवादी बुद्ध

भारतात वैदिक काळापासून सुरू झालेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेने इ.स.पू. सहाव्या शतकापर्यंत अतिशय उग्र रूप धारण केले होते. सामाजिक नितीमत्ता अधोगतीला पोहचली होती. अशा या कालखंडात बुद्धाचा उदय होतो. बुद्ध हे पहिले इतिहास पुरुष आहेत. ज्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्त्वाला आपल्या धम्माचा मुख्य आधार बनविले. कारण बुद्धाच्या पूर्वीच्या वैदिक काळात वर्ण आणि जातीच्या आधारे बहुजनांना प्रगतीपासून वंचित करण्यात आले होते. व्यापक जनकल्याण लक्षात घेऊन बुद्धाने समाज निर्मितीचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मनुष्या मनुष्यात कोणताही जातीय भेदभाव नाही, हे सांगणारा मज्झिम निकायातील वासेट्ठ सुत्तातील बुद्धाचा विचार वैज्ञानिक आधारावर मांडलेला आहे. तसेच मज्झिम निकायातील अश्वलायन सुत्तात मांडलेला बुद्धाचा विचार खरोखर मानवी अधिकारांचे घोषणापत्र आहे. समाजातील शोषित आणि पददलित लोक या ना त्या कारणाने अपमान व शोषणाचे बळी ठरलेले आहेत. त्यांना अधिकार बहाल करण्याचा मुद्दा सर्वप्रथम बुद्धाने मांडलेला आहे. समाजाच्या नैसर्गिक विकासाचा जो विचार त्यांनी मांडला त्याला इतिहासात तोड नाही. बुद्धाच्या विचाराचे जनवादी स्वरुप पाहता आश्चर्य वाटायला नको की जनता (The People) या शब्दाचा वापर सर्वप्रथम बौद्ध साहित्यात झाल्याचे आढळते. कारण पूर्वी जनतेला कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना प्रजा असे संबोधण्यात येत होते. प्रजा या शब्दातून बरोबरीचा नाही तर दुय्यम दर्जाचा बोध होतो. राजा आणि पुरोहित सांगेल ते सत्य मानावे अशी लोकांची अवस्था होती. वैशाली येथील कुटागारशाळेत वास्तव्य असताना मगध आणि कोशल देशातील काही लोक भेटण्यासाठी आले असता त्यांच्या आगमनाची सूचना देताना बुद्धाचा एक शिष्य म्हणाला लभतं एसा जनता भगवन्तं दस्सनाय (भन्ते चांगले होईल जनतेला भगवंताचे दर्शन होईल). ज्ञान प्राप्ती नंतर धम्म प्रचाराविषयी अल्प उत्सुकतेचा भाव बुद्धाच्या मनात उत्पन्न झाल्यावर सहंपती ब्रह्माने बुद्धाला प्रार्थना केली की, सोकावतिन्नं जनतं अपेत सोको अवेक्खसु जातिजराभिभूतं (हे शोक रहित जन्मजराने शोकमग्न जनतेकडे पाहावे). यावरुन एक बाब स्पष्ट होते की बुद्धाचा विचार वर्ण जाती विरहित जनतेच्या कल्याणाचा मार्ग आहे. त्यात लहान मोठा असा भाव नसून सर्व मनुष्य समान दर्जाचे आहेत सर्वांना समान अधिकार आहेत, हे यातून स्पष्ट होते.

लोकांना रोजगार (employment) उपलब्ध झाला नाही तर गरीबी (poverty) वाढते. त्यातून समाजात अपराध वाढतात. हे सर्व नष्ट करावयाचे असेल तर राज्याने सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च केला पाहिजे, असं सांगणारा अडीच हजार वर्षांपुर्वीचा तथागत भगवान बुद्ध (Budddha)म्हणजे राज्य समाजवादाचा पहिला जनक असल्याचं अभ्यासक भि.म. कौशल यांनी विश्लेषण केलं आहे.या लेखाच्या सुरुवातीला समाजवादी विचाराचा विकास कसा झाला? याची आपण चर्चा केलेली आहे. त्यावरून समाजवाद किंवा राज्य समाजवाद ही संकल्पना एकोणिसाव्या व विसाव्या शतकाची देण आहे, असा समज निर्माण होतो. मात्र पाली साहित्याचा विशेषतः सुत्तपीटकातील दीघनिकाय या ग्रंथाचे अवलोकन केल्यास त्यातील कुटदंत सुत्तात बुद्धाने राज्य समाजवाद या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे, असे आपल्याला दिसते. बुद्ध एकदा मगध देशातील खाणूमत नामक गावातील आम्रयष्टिका(अम्बल्ट्ठिका) येथे विहार करीत असता कुटदंत नामक ब्राह्मणाशी त्यांचा जो संवाद झाला. त्यावेळी बुद्धाने राज्य समाजवादाची कल्पना मांडली आहे. बुद्ध कुटदंत ब्राह्मणाला एक गोष्ट सांगतात. ती अशी महाविजित राजाला एकदा महायज्ञ करण्याची इच्छा झाली. तेव्हा त्याने पुरोहिताला ही बाब सांगितली. त्यावर पुरोहित म्हणतो, महाराज राज्य संकटात आहे. डाकू सर्वत्र लूटमार करीत आहेत. तरीही आपण कर वसूल करीत आहोत. अशा स्थितीत राज्यात शांती स्थापित करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. तेव्हा राजा म्हणतो डाकूंचा बंदोबस्त करण्यात यावा. पण हे स्थायी समाधान नाही हे राजाला सांगितले जाते. त्यावर स्थायी समाधानासाठी जो उपाय सांगण्यात आला तो असा

तेन हि भवं राजा ये भोतो रञ्ञो जनपदे उस्सहन्ति कसिगोरक्खे तेसं भवं राजा बीजभत्तं अनुप्पदेतु । ये भोतो रञ्ञो जनपदे उस्सहन्ति वाणिज्जाय तेसं भवं राजा पाभतं अनुप्पदेतु । ये भोतो रञ्ञो जनपदे उस्सहन्ति राजपोरिसे तेसं भवं राजा भत्तवेतनं पकप्पेतु ।

अर्थ - राजा हे तेव्हा शक्य आहे जेव्हा कोणी आपल्या राज्यात निवास करण्याच्या हेतुने आला आणि तो कृषी आणि पशू संवर्धन कार्य करू इच्छितो त्याला बी- बियाणे द्यावे. जो कोणी व्यापार करू इच्छितो त्याला धन(पाभृत) द्यावे. जो कोणी शासकीय नोकरी करू इच्छितो त्याला सन्मानित जीवन जगण्यायोग्य वेतन द्यावे.

या कथेच्या माध्यमातून बुद्धाने जो विचार मांडला तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यात जी अशांती पसरते किंवा समस्या निर्माण होतात त्याला कारण लोकांना सन्मानजनकरीतीने जीवनयापन करण्यासाठी पुरेशा प्रमाणात साधने उपलब्ध नसल्यामुळेच. हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणे, हे राज्याचे कर्तव्य आहे. जनतेकडून जो कर वसूल केला जातो. तो राज्यकर्त्यांच्या मौजमजेसाठी नसून जनतेच्या कल्याणासाठी उपयोगात यावा, हे बुद्धाला सूचित करावयाचे आहे.

निर्धनता ही अनेक सामाजिक समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे समाजात अपराध वाढतात. अपराध मुक्त समाज निर्माण करावयाचा असेल तर राज्याने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सल्ला बुद्धाने दिला आहे. याबाबतचा उल्लेख दीघनिकायातील चक्रवर्ती सिंहनाद सुत्तात आढळतो. बुद्ध मगध देशातील मातुला नामक गावात विहार करीत असता भिक्खूंना संबोधित करीत असता या मुद्यावर विचार मांडले आहेत. बुद्ध म्हणतात, एकदा राजाने चक्रवर्तीव्रत पालन विधिविषयी अधिनस्थ मंत्र्यांना विचारले. त्यांनी राजाला ती सांगितली. ते ऐकून राजाने धार्मिक बाबींची पूर्तता तर केली मात्र नो च खो अधनानं धनमनुप्पदासि । अधनानं धने अननुप्पदीयमाने दालिद्दियं वेपुल्लमगमासि । दालिद्दिये वेपुल्लं गते अञ्ञतरो पुरिसो परेसं अदिन्नं थेय्यसङ्खात आदियि ।

अर्थ - परंतु त्याने(राजाने) निर्धनांना धन दिले नाही. निर्धनांना धन न दिल्यामुळे (राज्यात) दरिद्रता(गरीबी) फारच वाढली. अशाप्रकारे दरिद्रता वाढल्यामुळे लोक एकदुस-यांच्या वस्तूंची चोरी करु लागले. न दिलेली(वस्तू) उचलू लागले.

नगररक्षक अशा लोकांना पकडून राजापुढे हजर करुन सांगू लागले की या व्यक्तीने दुस-याची वस्तू चोरली. राजाने त्या माणसाला विचारले तू खरोखर वस्तू चोरली आहे. त्यावर तो म्हणाला - सच्चं, देवा ति । किंकारणा ति ? न हि देव जीवामी ति ।

अर्थ - होय देव खरोखर ! कारण काय ? त्याशिवाय(रोजगार) जीविका चालविणे कठीण झाले.

त्यावर राजाने त्याला धन उपलब्ध करून दिले व म्हणाला, यातून तू व्यापार वाढव आणि आपली व कुटुंबाची उपजीविका चालव.

बुद्धाला यातून हेच सांगायचे आहे की, लोकांना रोजगार उपलब्ध झाला नाही तर गरीबी वाढते. त्यातून समाजात अपराध वाढतात. हे सर्व नष्ट करावयाचे असेल तर राज्याने सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च केला पाहिजे.

बुद्धाच्या या विचारांचा बाबासाहेब डॉ.आंबेडकरांच्या विचारांवर खूप प्रभाव पडलेला आहे. या देशातील अस्पृश्य हे भूमिहीन आहेत. रोजगाराच्या या हक्काच्या साधनापासून ते वंचित आहेत, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी 15 मार्च 1947 रोजी संविधानसभेला सादर केलेल्या निवेदनात शेतीचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो. आर्थिक शोषणाविरुद्ध अस्पृश्यांचे संरक्षण करावयाचे असेल तर कृषी उद्योग हा राज्याचा राष्ट्रीय उद्योग असावा, असे ते सूचवितात. यासाठी ते सामूहिक शेतीची संकल्पना मांडतात. याशिवाय जे मूलभूत उद्योगधंदे आहेत ते राज्याच्या मालकीचे राहतील. हे उद्योग राज्य किंवा राज्यपुरस्कृत महामंडळातर्फे चालविण्यात येतील. शेतीकरीता किंवा उद्योगधंद्यांना आवश्यक असलेले सर्व भांडवल पुरविण्याची जबाबदारी राज्याच्या खांद्यावर राहिल. उद्योगांचे राष्ट्रीयीकरण झाल्यास त्यातून निर्माण होणा-या रोजगारामुळे बेरोजगारीवर मात करण्यास मदत होईल आणि शेतीवर जो लोकांचा अतिरिक्त भार आहे, रोजगार उपलब्ध होऊन शेतीवरील भार कमी झाल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून लोकांची आर्थिक भरभराट होईल, असे बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते.

बाबासाहेब डॉ.आंबेडकर राज्य समाजवादाचा पुरस्कार यासाठी करतात की, या देशातील सत्ताधारी आणि प्रशासन राबविणारे लोक जातीय मानसिकतेने ग्रस्त आहेत. आर्थिक विषमता टिकून राहावी या मानसिकतेचे आहेत. त्यासाठी लोकशाही समाजवाद पुरेसा नाही. समाजवाद तुमच्या मर्जीवरचा नको तर आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करण्याच्या तरतुदी ह्या संविधानातच समाविष्ट असाव्या, असे बाबासाहेबांचे मत होते.

जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करुन स्वस्थ समाजाची निर्मिती करण्याचा हा विचार बुद्धाने आजपासून 2568 वर्षापूर्वी मांडला. समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मांडलेला हा विचार आजही किती प्रासंगिक आहे, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते.

Tags:    

Similar News