मी तुझी इज्जत काढतो, तु माझी काढ; त्याला किती ही घसरू देत चालूच ठेऊ हा प्रकार - डॉ. बाळासाहेब पवार
महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पर्याय शोधत आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणातील स्पेस कोण भरू शकतो? जाणून घेण्यासाठी वाचा राजकीय विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांचे विश्लेषण...
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर कधी नाही तेवढा खालवला आहे. सामान्य माणसाला राजकारण म्हणजे अतिशय घाणेरडा प्रकार वाटू लागला आहे. त्यातच हा चेष्टेचाही विषय झाला आहे. राज्यातील जनतेने अगोदर महाविकास आघाडीचा प्रयोग पहिला. तो नाट्य प्रयोग काही महिने रंगला होता. त्यानंतर कोरोना मुळे लोक तो खेळ विसरले. तोच नवीन खेळ उभा राहिला आणि एकच राळ उडवली गेली. गद्दार शब्द परिवलीचा झाला. ज्याला गद्दार म्हणले गेले नाही असा एकही नेता राज्यात नाही.
कोणी चाळीस वर्षा पूर्वी गद्दार होता तर कोणी आज. सर्व एकदम एक्सपोज झालेत. अगदी उघडे नागडे झालेत आणि जनतेला पण काही सोयरं सुतक राहिलं नाही. कारण यात आपला काही फायदा नाही हे जनतेने ओळखले आहे. अगदी राजकारण, राजकीय वक्तव्य ऐकायलाही लोक तयार नाहीत. मी तुझी इज्जत काढतो, तु माझी काढ; त्याला किती ही घसरू देत चालूच ठेव असा हा प्रकार आहे. अगदी व्यक्तीगत आयुष्यच पाटागण करून टाकलं आहे. या गोष्टींमुळे लोकांना टीव्ही सुद्धा पाहू वाटत नाही. तेच चेहरे तेच गलिछ शब्द, आरोप प्रत्यारोप बस, हेच सगळं सुरु आहे.
जनता सुज्ञ असते. आपण या लोकांना आपल्या भल्याचे निर्णय घेण्यासाठी निवडून देतो याची जाणीव त्याला असते. मात्र चालू असलेल्या चिखलफेकीत आपल्यासाठी काहीच निर्णय होत नसल्याने जणता हतबल झाल्याचे चित्र आहे. पण राजकीय निर्णय घेण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे. आता लोक व्यक्त होऊ लागले आहेत. सामान्य माणूस पर्यायाची चर्चा करू लागला आहे. त्याला नेतृत्वाबरोबर आपल्या जगण्याचा प्रश्न सोडवणारा पर्याय हवा आहे.
सध्या राज्यात असलेल्या शिवसेना या पक्षाच काय चाललंय कोणाला समजत नाही. फक्त पळवा पळावी सुरु आहे. आज समोरच्याला शिव्या द्यायच्या व उद्या त्याच्या पक्षात जाऊन झेंडा हातात घेऊन त्याच्या जिंदाबादच्या घोषणा द्यायच्या. हा खेळ सुरु आहे. हा अगदी किळसवाणा प्रकार आहे. या लोकांना लाज कशी वाटत नाही? गल्लीतील भांडण तरी बर असा मनस्ताप राज्यातील लोकांना होत आहे.
काँग्रेस पक्ष राज्यात काही बळ धरत नाही. कारण त्यांचा घराणेशाहीचा पिळ निघत नाही . ठराविक लोकांनाच घरण्याचा पक्ष राहुल गांधी यांनी किती प्रयत्न केले तरी सुधारत नाही. संघटन नाही. नियोजन नाही कित्येक जिल्ह्यात पक्षच नाही.
राष्ट्रवादी पक्ष एक सरंजमदारा सारखा आहे. एक कुटुंब त्यातील अंतर्गत कुरघोडी. त्यांचे वेगवेगळे गट आणि चालू द्या गंम्मत. घर आणि घराण्याबाहेर कोणाला संधी नाही. वेगवेगळ्या जातीचे प्रतिनिधी दाखवण्यापुरते बाकी नवीन लोक फक्त कार्यकर्ते.
भाजपा देशात मीडियातून गोंधळ घालते. राज्यात एकमेकांची जिरवा जिरव चालू आहे. भाजपची आता पक्की काँग्रेस झाली आहे. एका अनामिक दहशतीखाली जगणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यात काही उग्र संघटना व गट कधी काय करतील नेम नाही, सगळे अस्वस्थ. मग राज्याचे व जनतेचे प्रश्न कोण सोडवणार?
सर्व चार ही पक्ष कुरघोडी, आरोप प्रत्यारोपात अडकलेले राजकारण करण्यात गुंतले आहेत. पण हे राजकारण जाणार कोणत्या दिशेला आता जनता ठरवेल हे नक्की.
लोक पर्याय् शोधत आहेत या मताला आधार आहे. कदाचित हा आधार शंभर टक्के खरा नसेल पण प्रक्रिया सुरु आहे. राज्याच्या राजकारणात चार पक्ष असले तरी राजकीय पोकळी आहे. या पक्षावर भरोसा राहिला नाही. राज्यात नवीन नेतृत्व निर्माण होण्याची अजिबात शक्यता नाही. नवीन राजकारणात येणाऱ्यांना तर संधीच ठेवली नाही. तर इतक्या मोठ्या गोंधळात या पक्षातील अतिशय ताकतीचे नेते पण अस्वस्थ आहेत. तेही पर्यायच्या शोधात आहेत.
भारत राष्ट्र समिती अशाच पर्याय शोधणाऱ्या लोकांना शोधत आहे. के.सी.आर. राव यांच्या तेलंगनातील पाच घोषणा ज्या त्यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत. त्याची चर्चा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. समाजातील विचारी बुद्धीवादी लोक त्याचा विचार करत आहेत. तर प्रस्थापित नेतृत्वाला कंटाळलेले मोठे नेते पण विचारात आहेत. जस जसा जनतेचा दबाव वाढत जाईल तशी ही संख्या वाढत जाईल. त्यांनी फार सोपा फंडा केला आहे. अबकी बार किसान सरकार्. शेतकऱ्याला मोफत वीज, पाणी, पेरणी खर्च व सर्वात त्रास दायक तलाठी हा प्रकार बंद हे ग्रामीण लोकांना पसंत आहे .
राज्याच प्रस्थापितांचं राजकारण बिघडवणारा हा प्लॅन आहे. पंकजा मुंडे यांच्यासारख्या जनाधार असणाऱ्या महिला नेतृत्वाला राज्यात नेतुत्वाची संधी मिळाली तर हा पक्ष प्रचंड भरारी घेऊ शकतो. तेरा लोकसभा व किमान चाळीस विधान सभेचे गणित घडवणे बिघडवणे पंकजा मुंडे करू शकतात. परळीतील पराभव ही बाब कौटूंबिक आहे. त्यात न पडता त्या बाहेर पडल्या तर राज्याचे नेतृत्व करू शकतात. ओबीसी, धनगर व दलित नेतृत्व महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर व पंकजा मुंडे एकत्र आल्या व के.सी.राव च्या भारत राष्ट्र समितीने रसद पुरवली तर महाराष्ट्राच्या राजकारणाची गटार लोक साफ करून टाकतील. मराठा समाजातील तरुणा मधील प्रचंड असंतोषाला झाकण फिट्ट बसवले आहे हा तरुण हे झाकण कधीही उडवून लावू शकतो व वरील नेतृत्वाला सामील होऊन आपलं भवितव्य घडू शकतो. करण सर्वात जास्त फसवणूक मराठा समाजाची झाली आहे. फक्त योग्य वेळ व योग्य निर्णयाची तो वाट पाहत आहे.
विधानसभा यांनी एकत्र लढवल्या तर हे बहुमतापर्यंत पोहचतील . त्यात कमी पडले तर या सगळ्या राजकारणात बळी ठरलेले उद्धव ठाकरे सुद्धा यांच्या बरोबर जातील. सर्व वैतागले आहेत, जनता वैतागली आहे . प्रकाश आंबेडकर सर्वात खरं व स्पष्ट बोलतात. आज त्यांच्यावर कोणाचा दबाव नाही ते बुद्धीवादी लोकांना आवडतात.
पंकजा आक्रमक आहेत. त्या बाहेर पडल्या व भारत राष्ट्र समितीने रसद पुरवली तर असंतुष्ट तरुण त्यांना डोक्यावर घेईल व राज्याची हवा पालटून टाकतील. ती धमक त्यांच्यात आहे. पुरोगामी राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून भारत राष्ट्र समिती घोषणा करू शकते. राज्यातील महिला अस्मितेला साद घातल्यास नक्की परिवर्तन होईल .
एक महत्वाचा मुद्दा राज्यात मोदी व फडणवीस विरोधी लाट आहे. भाजपा नको असलेले लोक आहेत पण पर्याय नाही म.वि.आ ची खिचडी बेचव होत आहे. ही चिखल फेक पुन्हा पाच वर्ष सुरु राहिल्यास एक पिढी बरबाद होईल हा विचार अडाणी ग्रामीण माणसाला समजतो आहे. तो त्याच्या भविष्या बद्दल चिंतीत आहे. आणखी थोडा वेळ आहे. राज्याला खूप काही नवीन पहावे लागेल हे नक्की.