मला आठवतंय, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस प्रमोद महाजन अनेकदा भाजपच्या पक्ष कार्यालयात यायचे. त्यानंतर ते मिडिया शी बोलायचे. ते मिडीयाशी बोलायला उभे राहिले की त्यांच्या मागे सहसा कोणी नसायचं. जे नेते असतील ते लगेच पांगायचे. फारच वरिष्ठ नेते असतील तर ते सोबत उभे राहायचे.
त्याकाळी टीव्हीवरचा बाईट म्हणजे विशेष गोष्ट होती. आपला बाईट घेतला जावा, तो बातमीत वापरला जावा यासाठी नेतेही तयारीने यायचे. मोजकं बोलायचे. भाजप मध्ये प्रवक्त्यांना टीव्ही शी कसं बोलायचं याचं विशेष ट्रेनिंगच दिलं जायचं. त्याच्या काही क्लिप्स तुम्हाला युट्यूबवर ही बघायला मिळतील. इतर पक्षातील नेत्यांचा बाईट घेताना आम्हाला नेहमी एक त्रास व्हायचा तो म्हणजे मागे उभे असलेले कार्यकर्ते लगेच बाईट देणाऱ्याच्या खांद्यावर हनुवटी टेकवून आपलं डोकं घुसवायचे. आपण फ्रेम मध्ये दिसावं म्हणून त्यांचा आटापीटा असायचा. अनेकजण तर थेट आपल्या घरी फोन लावून आपण टीव्हीवर दिसतोय हे सांगायचे. कोणी गॉगल लावून तर कोणी पान-तंबाखू खाऊन फ्रेम मध्ये यायची धडपड करायचे. भाजपच्या पक्ष कार्यालयात मात्र जरा अधिकची शिस्त असायची. खासकरून प्रमोद महाजन यांच्यामागे कुणीही उभं राहिलेलं मला आठवत नाही. चुकून एखादा कार्यकर्ता उभा राहिलाच तर त्याची नंतर खैर नसे.
टीव्हीवर तुम्हाला जी काही २०-३० सेकंद मिळतात ती तुमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी मिळतात. हा वेळ तुम्ही जाहिरातीसारखा वापरला पाहिजे. अगदी मोजक्या शब्दात आपली भूमिका मांडली पाहिजे. एकदा भूमिका मांडली की खुलासे करण्यासाठी आणखी एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागू नये इतकी स्पष्टता तुमच्या त्या निवेदनात असायला हवी. यासाठी वक्ता किंवा पत्रकार परिषद घेणाऱ्याने तितकी तयारी ही केलेली असली पाहिजे. आसपासची लोकं केवळ वक्ता आणि कॅमेराच नाही तर ते वक्तव्य ऐकणाऱ्या प्रेक्षकांना ही विचलित करत असतात.
आता इतकी प्रस्तावना लिहिण्याचं कारण म्हणजे, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद सुरू असताना शेजारी काँग्रेसचे वरीष्ठ नेते दिग्वीजय सिंह बसले होते. साधारणतः पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदांना सामोरं जायची प्रथा आहे. मात्र अनेकदा पत्रकारपरिषदेला संबोधन करणारा वक्ता बोलायला लागला की इतर नेते भूमिकेतून बाहेर पडतात. कोणी फोन बघायला लागतं, कोणी डुलक्या घ्यायला लागतं, कोणी त्या स्टेजवरूनच पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड बोलायला लागतं, कुणाचे इशारे सुरू असतात.. एका प्लॅटफॉर्मवर हे सगळं घडत असतं. जर तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या वक्तव्याबाबत तुम्हालाच उत्सुकता, प्रेम, विश्वास नसेल तर सामान्य लोकांनी ती पत्रकार परिषद कशासाठी पाहायची, हा खरा प्रश्न आहे.
पत्रकार परिषद हा तुमचा परफॉर्मन्स आहे, त्याची आखणी जर नीट केलेली नसेल, पत्रकार परिषदेच्या ३० मिनिटांसाठी ही तुम्ही जर फ्रेश दिसणार नसाल तर तुम्हाला शेवटी जनता का फॉलो करेल? सध्या ज्या पक्षांनी स्वतःच्या माध्यम विभागात अमूलाग्र बदल केलेयत त्या पक्षांनी आपल्या प्रवक्त्यांच्या कपडेपट, केसांची ठेवण, बोलण्याची ढब या सगळ्यांवर बरंच काम केले आहे. अनेक प्रवक्ते मेकअप करून पत्रकार परिषदांना बसतात. शेवटी हा वेळ तुम्हाला फुकट मिळालेला आहे. टीव्हीवर १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत मोजावे लागतात. राजकीय बातम्या तर दिवसातून अनेक वेळा पुनःप्रसारित होत असतात. याचा अर्थ दिवसाला लाखो रूपयांचा वेळ राजकीय पक्षाला मिळत असतो. या वेळातही तुमचा लुक अँड फिल नीट नसेल तर मग इतरांना दोष देऊन काय उपयोग? आम्ही असेच आहोत, आम्हाला साधेपणाने राहायला आवडतं, वगैरे स्पष्टीकरणं ही अनेकजण देऊ शकतात. पण किमान हा साधेपणाही दाखवला गेला पाहिजे. विस्कटलेले केस सावरायला केवळ दोन मिनिटे लागतात. चेहरा धुवायला पाच मिनिटे लागतात. डोळ्यावर जर झोप असेल तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसण्याचा अट्टाहास टाळता येऊ शकतो.
प्रेस कॉन्फरन्स मधला जो काही वेळ तुम्ही ठरवलेला आहे, तो तुमच्या पक्षाचा चेहरा असतो. तो चेहरा जर आश्वासक दिसला नाही तर तुमच्या मागे कोण येणार आहे. खराब प्रॉडक्ट ही चांगल्या जाहिरातींमुळे विकलं जातं. काँग्रेस सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला याचं भान नसावं हे न पटणारं आहे.