राहुल गांधींना मुलींनी मिठी मारणे, चुंबन घेणे चुकीचे आहे का..?
राहुल गांधी यांचा वावर आश्वासक आणि सहज आहे. महिला, मुली त्यांना भेटत आहेत, मिठी मारत आहेत, प्रेमाने चुंबन घेत आहेत. महिला व मुलींसोबतचे असे काही फोटो सोशल मिडीयावर चांगल्या वाईट कॅप्शन सहित व्हायरल सुद्धा होतं आहेत. मॅक्स वूमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांनी राहूल गांधी यांची भेट घेतली यावेळी या सगळ्या विषयी ते बोललेच पण हे सर्व ते पंतप्रधान होण्यासाठी करत आहेत का? याचे सुद्धा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिले आहे. प्रेमाने जग जिंकायला निघालेल्या राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान नक्की काय चर्चा झाली मॅक्स वूमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांचा अनुभव नक्की वाचा भाग 1
मॅरेथॉन करायची असेल तर नुसतं धावू नकोस, असं म्हणतं त्यांनी माझे मसल्स बघण्यासाठी दंडाला स्पर्श केला. 'मसल्स वर काम कर' राहुल गांधी सांगत होते. मला मॅरॉथॉन धावायचंय असं चर्चेच्या ओघात मी बोलले आणि आमच्या फिटनेस वरच्या गप्पा सुरू झाल्या. सध्याच्या काळात फिटनेस ला खूप महत्व आहे, पण त्यातून आनंद ही मिळाला पाहिजे, असं राहुल गांधी सांगत होते. चालता चालता फिटनेस आणि मॅरॉथॉन साठी काही पुस्तकांची नावेही त्यांनी दिली. त्यांनी सांगितलेली नावे मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते हे त्यांना जाणवल्या बरोबर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला जवळ बोलवून पुस्तकाबद्दल सांगितले. आणि अवघ्या तीन मिनिटांच राहुल गांधी यांनी सांगितलेले पुस्तक E-Book च्या स्वरूपात माझ्या मोबाईच्या इनबॉक्स मध्ये येऊन विसावलं. फिटनेस बाबत हा माणूस प्रचंड जागरूक आहे, त्याचबरोबरीने हजरजबाबी आणि चतुरस्त्र ही आहे. राहुल गांधींच्या स्पीड ने चालताना थोडी दमछाक होत होती, चालचा चालता संभाषण करायचं असल्याने दरम्यान माझा हात त्यांच्या हाताला लागत होता, ते टाळण्यासाठी मी जरा आखूनच चालत होते. हे त्यांनी नोटीस करताच माझा हात सरळ करत म्हणाले, " आपण चालतोय तर हे होणारच, हाताला हात लागणारच पण पायात पाय आला तर मी पडेन.
फिटनेस वरची चर्चा संपताच मी त्यांना आधीच्या भेटीची आठवण करून दिली. "आज सर्व महिला पत्रकारांना निमंत्रित केले गेले होते, पण या आधीही आपली भेट झाली आहे" आधीच्या भेटीची आठवण करून दिल्यानंतर ते हलके हसले, तितक्यात मी थोडं पत्रकारी ट्रीक वापरून तुम्ही जेव्हा पंतप्रधान व्हाल तेव्हा पहिली मुलाखत मला हवी अशी मागणीच करून टाकली. या माझ्या ट्रिक वर जी काही भावमुद्रा त्यांनी केली ती मी कधीही विसरु शकतं नाही. दोन्ही हात खिशात टाकत एक जबरी स्माईल देत त्यांनी एक लुक दिला. म्हणजे हो पण नाही व नाही पण नाही एक खट्याळ हास्य टाकत, मी पतंप्रधान होण्यासाठी चालत नाही हे त्यांनी स्पष्ट केले. " मी ही पंतप्रधान झाल्या नंतरच म्हणते आहे" यावर ते हसले नी आम्ही शेकहॅन्ड करुन भेट आमची भेट संपली.
राहुल गांधी यांच्या आसपास असलेल्या महिला, राहुलनी किंवा त्या महिलांनी त्याचा हात हातात घेणं, महिलांनी राहुलला मिठी मारणं, जवळ घेणं, कपाळाचं चुंबन घेणं याचे अगणित फोटो सोशल मिडीयावर चांगल्या वाईट कॅप्शन सहित व्हायरल आहेत. मला भारत जोडो च्या दरम्यान दोन वेळा राहुल गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली. मला त्यांच्याच सहजता जाणवली. मी काही कुठल्या राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची समर्थक नाही. कुठल्याही नेत्या बरोबर फोटो काढुन हुरळून जाण्यातली मी नाही, कारण पत्रकार व राजकीय नेते यांच्या भेटीगाठी-चर्चा हा नित्याचाच कामाचा भाग आहे. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर एक गोष्ट तर नक्की जाणवली ती म्हणजे संवाद करण्याच त्यांचं माध्यम इतर नेत्यापेक्षा अतिशय वेगळ आहे. बोलण्यातला, स्पर्शातला सहजपणा हे अवघड काम आहे, इतर नेत्यांना हा पारदर्शकपणा, सहजपणा हाताळता येणार नाही. राहुल गांधींचा हा सहजपणा संवाद घडवतो.
आजवर कामानिमित्त मी अनेक राजकीय नेत्यांना भेटली आहे, पण राहुल गांधी यांचा वावर आश्वासक आणि सहज आहे. ते उगीचच आश्वासनं देत नाहीत, जास्त बोलत नाहीत, जास्तीत जास्त ऐकून घेतात. प्रत्येकाचं म्हणणं लक्ष देऊन ऐकतात, त्यावर संवाद करतात, कंटाळा करत नाहीत. आजवर त्यांच्यावर मीमर्स आणि आयटीसेल वाल्यांनी अन्यायच केलाय असं मला वाटलं. त्यांना पप्पू म्हणून जी हीन वागणूक दिली गेली त्याचं वाइट वाटचं. मात्र त्यांचा वावर त्यांच्यावरचे सगळे आरोप आपोआप खोडत चालला आहे. महिलां वरुनही राहुल ट्रोल होताना दिसताय. हात पकडायची गरज काय, गळ्यात हात घालायची गरज काय इ. इ पोस्ट ना उत आलाय. मात्र या या सर्वांत त्या महिलांना आश्वासक वातावरण दिलं जातंय हा मुद्दा सर्वस्वी विसरला जातोय. अनेक नेते काय, पुरुषही हात मिळवतात तेव्हा त्या स्पर्शातून त्या नजरेतून खोटे भाव ते लपवू शकत नाहीत. ओंगळवाणा स्पर्श , लादलेला स्पर्श नी ,प्रेमाचा स्पर्श, तो कम्फर्ट चा स्पर्श यातला फरक कळण्या इतका प्रगल्भ आपला आजचा समाज नसेल पण महिलांना मात्र स्पर्शाचे अर्थ लगेच कळतात.
या यात्रे नंतर राहुल यांच्या राजकीय कारकीर्दी वर अनेक लोक विश्लेषण करतांना दिसतात मात्र या यात्रेमुळे भारतीय राजकारणांचे डायमेन्शन बदलु शकतील हे नक्की. मध्यंतरी माझा एक मित्र रवांडा येथील नरसंहाराच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारल्या गेलेल्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आला. रवांडामध्ये झालेल्या नरसंहाराच्या यातना तिथली लोकं अजूनही विसरलेली नाहीत. तिथली लोकं आवर्जून सांगतात की, तुम्ही जर गांधी मारला नसता तर रवांडात असं हत्याकांड झालं नसतं. जगाला गांधी कळलाय, त्यांचं तत्वज्ञान कळलंय. अहिंसेचं महत्व कळलंय. त्याच गांधींच्या देशात आज भीतीचं वातावरण आहे, द्वेषाचं वातावरण आहे, या वातावरणामुळे अस्वस्थ झालेले लाखो लोक आज राहुल गांधी यांच्या मागे चालतायत. त्यांना कुठलीही निवडणूक जिंकायची नाही. वर्चस्व प्रस्थापित करायचं नाही. प्रेमाने जग जिंकता येतं. आज राहुल गांधी प्रेमाने जग जिंकायला निघालेयत. हा इतिहास घडताना आपण बघतोय. दिवसरात्र ज्या माणसाला हिणवलं जातंय, तो माणूस आज जमीनीवर पाय रोवून उभा आहे... संयम ढळू न देता, तोल जाऊ न देता तो जगाला शांतीचा संदेश देतोय.. त्याच्या सोबत चालताना तो आपला मित्र वाटू लागतो.. हवा का रूख बदलने वाला राहुल..