भाजपचे हिंदुत्व बाटगे नाही याचा पुरावा ठेवा: तुषार गायकवाड

महाराष्ट्र भाजपच्या शैक्षणिक संस्था चालक नेतेमंडळीनी तातडीने राज्य सरकारच्या मान्यता, अनुदान व निधींचा लेखी त्याग करत धर्मकार्यासाठी आपल्या शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात तातडीने भगवद्गीतेचा समावेश करुन महाराष्ट्र भाजपचे हिंदुत्व हे बाटगे हिंदुत्व नाही याचा पुरावा देशासमोर ठेवा असं परखड मत लेखक तुषार गायकवाड यांनी मांडले आहे.;

Update: 2022-03-20 02:34 GMT

'भगवद्गीता' हा फक्त धर्मग्रंथ नसून जगण्याचे सार आहे. कर्म हाच अधिकार, कोणाचाही द्वेष करु नका, कर्म करणे अत्यावश्यक, इंद्रीया वरील नियंत्रण आणि सयंमाची गरज व श्रध्दा सबुरी यांसारखे तत्वाज्ञान देणारी भगवद्गीता शैक्षणिक अभ्यासक्रमात येणार असेल तर स्वागतच! पण भारतीय संविधानातील कलम २८ चे उल्लंघन करुन केवळ राजकीय पोळी शेकण्यासाठी भगवद्गीतेचा आधार घेणे हा जाणीवपूर्वक ध्रुवीकरणासाठी आणलेला मुद्दा आहे. त्यामुळे घटनेतील कलम २८ काय? ते पाहूया.

  • कलम २८: काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक सूचना किंवा धार्मिक उपासनेला उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य.
  • २८(१): संपूर्णपणे राज्याच्या निधीतून चालवल्या जाणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.
  • २८(२): खंड (१) मधील कोणतीही गोष्ट राज्याद्वारे प्रशासित असलेल्या परंतु कोणत्याही देणगी किंवा ट्रस्टच्या अंतर्गत स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला लागू होणार नाही ज्यासाठी त्या संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देणे आवश्यक आहे.
  • २८(३): राज्याद्वारे मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत उपस्थित राहणाऱ्या किंवा अशा संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणासाठी किंवा अशा संस्थेमध्ये किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यासाठी राज्य निधीतून मदत मिळवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही. ती व्यक्ती, किंवा ती अल्पवयीन असल्यास, त्याच्या पालकाच्या पूर्व परवानगीची आवश्यकता आहे. कारण त्याने तशी संमती दिलेली नाही.

अतिशय साध्या व सोप्या भाषेत, भारतीय संविधानाच्या कलम २८ नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. पण ज्या शैक्षणिक संस्थाना राज्य सरकारद्वारे मान्यता, अनुदान व निधी दिला जातो, अशा संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण, पूजा-अर्चा, क्रियाकर्म करण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर (व्यक्तींवर) करता येणार नाही. परंतू, संबंधित शिक्षण संस्था धार्मिक संस्था असतील. आणि त्यावर केवळ राज्याचे नियंत्रण असेल अशा संस्थामध्ये या गोष्टी अनिवार्य असतील.

त्यामुळे अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश ही केवळ पोकळ घोषणा आहे. अश्या घोषणा याआधी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघेला तसेच दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यान यांनीही केल्या आहेत. पण अशी अंमलबजावणी देशभरात कुठेही झालेली नाही!!

महाराष्ट्र भाजपच्या शैक्षणिक संस्था चालक नेतेमंडळीनी तातडीने राज्य सरकारच्या मान्यता, अनुदान व निधींचा लेखी त्याग करत धर्मकार्यासाठी आपल्या शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमात तातडीने भगवद्गीतेचा समावेश करुन महाराष्ट्र भाजपचे हिंदुत्व हे बाटगे हिंदुत्व नाही याचा पुरावा देशासमोर ठेवावा.

हॅश्टॅग - हा सूर्य हा जयद्रथ

© विचारी हिंदू तुषार गायकवाड.

Tags:    

Similar News