हिंदूत्ववादी किडे गुरूजीमुळे सावरकरांना गांधी नेहरूंच्या रांगेत बसवू पाहातायत- विश्वंभर चौधरी
फडणवीस म्हणतात कोणत्याच राष्ट्रपुरूषाचा अपमान सहन करणार नाही. गेले काही दिवस बरेच हिंदुत्ववादी गांधी-सावरकर अशा कोणत्याच राष्ट्रपुरूषाचा अपमान सहन करणार नाही असं म्हणून सावरकरांना गांधी नेहरूंच्या रांगेतले राष्ट्रपुरुष बनवू पाहत आहेत. हे हास्यास्पद आहे. सध्या चालू असलेल्या राजकीय गोंधळावरील विश्वंभर चौधरी यांचा सविस्तर लेख नक्की वाचा..
सावरकरांना मी राष्ट्रपुरुष मानत नाही कारण राष्ट्रपुरुष असण्याच्या काही कसोट्या असतात. सावरकर त्या कसोट्या पूर्ण करू शकत नाहीत.
राष्ट्रपुरुषांच्या सावल्या परदेशात सुद्धा पडल्या पाहिजेत. गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या सावल्या सगळ्या जगावर पडत असतांना, नेहरूंनी अंगिकारलेल्या 'पंचशील' तत्त्वाच्या सावल्या जगावर पडत असतांना सावरकरांच्या सावल्या देशाबाहेर म्हणणं अतिशयोक्त होईल, संपूर्ण भारत देशावर सुद्धा पडू शकत नव्हत्या. दक्षिण भारत, पूर्व भारत आणि पूर्वोत्तर भारतात तेव्हा तर सोडा, आजही सावरकर माहीत नसतात.
'असा माणूस पृथ्वीवर झाला यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत' असं खुद्द आईन्स्टाईन गांधींबाबत म्हणतो, 'जगात ज्या लोकांना शांतता आवडते त्या लोकांना नेहरू आवडणारच' असं राणी एलिझाबेथ म्हणते तसं बाहेरच्या जगात सावरकरांवर कोणी काही बोलल्याचा पुरावा नाही.
मुळात सावरकर जो विचार देतात त्याला जागतिक मानवतावादात कोणतंही स्थान नाही. एका भूभागावरच्या एका धर्माच्या लोकांवर होणाऱ्या तथाकथित अन्यायाविरुद्ध त्या धर्मातील मूठभरांना जागे करणे एवढीच सावरकरांच्या राजकीय कामाची व्याप्ती आहे.
सावरकर विज्ञानवादी म्हणताना त्यांच्या मर्यादा लक्षात घ्या. हिंदू असो की मुस्लीम सगळ्यांची ॲनाटाॅमी आणि रक्तगट सारखेच असतात हे तरी सावरकरांना मान्य आहे का अशी शंका येते. गाय कापून खाण्याचा प्राणी आहे, पूजा करण्याचा नाही या वाक्याला विज्ञानवादी म्हणणे भारतात शक्य आहे, ज्या युरोपात विज्ञानाचा जन्म झाला तिथे हे वाक्य उपयुक्ततावादी असून विज्ञानवादी नाही.
अस्पृश्योधारात त्यांना राष्ट्रपुरुष म्हणायचं असेल तर अस्पृश्यांना आहेत त्याच मंदिरात प्रवेश द्या असं साने गुरूजी एकीकडे म्हणत असतांना 'दलितांसाठी वेगळी पतितपावन मंदीरं' उभारा असं सावरकर का म्हणतात याची संगती लागत नाही.
गांधी, नेहरू, आंबेडकर संपूर्ण देशासाठी पूरक अशा अर्थशास्त्राची मांडणी करतात. समजा तुम्हाला पंतप्रधान केलं तर सगळ्या देशवासियांना सामावून घेणारं कोणतं अर्थशास्त्र तुमच्या कडे आहे असं सावरकरांना विचारलं गेलं असतं तर सावरकरांनी काय उत्तर दिलं असतं?
गांधी, नेहरूंच्या पुस्तकांची एकाच वेळी तेवीस तेवीस भाषांमध्ये भाषांतरं होत असतांना त्याकाळी सावरकरांच्या किती पुस्तकांची किती भारतीय भाषांमध्ये झाली याचं उत्तर सावरकरांच्या अभ्यासकांकडे तरी आहे का?
अखिल भारतीय असा बेस सावरकरांच्या हिंदू महासभेला नव्हता तसाच तो त्यांच्या अभिनव भारत या संघटनेलाही कधीच नव्हता. टिळक संपूर्ण भारताचे नेते झाले ते सावरकरांना कधी शक्य झालं नाही.
काळ्यापाण्याची शिक्षा झाली म्हणून राष्ट्रपुरुष म्हणायचे असेल तर तीच शिक्षा त्याच कारणासाठी भोगणाऱ्या हजारो भारतीय बंदीवानांनाही राष्ट्रपुरुष का म्हणू नये?
सावरकरांचं प्रभावक्षेत्र नाशिक-मुंबई-पुणे पट्ट्याबाहेर महाराष्ट्रातही फारसं नव्हतं, देशाची गोष्ट दूरच.
गांधींना भारतभर सर्व जाती धर्मांचे अनुयायी मिळाले, सावरकरांना मुख्यतः सवर्ण अनुयायीच का मिळाले? हिंदुत्ववादी सावरकरांना किमान हिंदूमधल्या सगळ्या जातींचे तरी अनुयायी का मिळाले नाहीत असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. महाराष्ट्रात त्यांचे मराठा अनुयायी दाखवता येत नाहीत तसेच हरियाणात जाट अनुयायी दिसत नाहीत. महाराष्ट्रात ब्राह्मण अनुयायी म्हणाल तर कोणत्याही काळात महाराष्ट्रीय ब्राह्मण असलेल्या सावरकरांपेक्षा गुजरातच्या मोंढ वाणिया असलेल्या गांधीजींना जास्त महाराष्ट्रीय ब्राह्मण अनुयायी होते.
सावरकर एका धर्माच्या एका वर्गाला तेही एका राज्याच्या represent करतात म्हणून माझ्या मते ते राष्ट्रपुरुष असू शकत नाहीत.
राष्ट्रपुरुष पंडीत नेहरूंसारखा स्वयंपूर्ण आणि निर्भय असावा लागतो जो मुसोलिनीची बायको विमानतळावर 'लंच डिप्लोमसी' म्हणून जेवणाचा डबा घेऊन आलेली असतांना तिची भेट नाकारू शकतो, दुसरीकडे सावरकरांचे समविचारी मुंजे हे आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्या अशी विनवणी करायला मुसोलिनीला जाऊन भेटत असतात.
सध्या हिंदूत्ववादी किडे गुरूजीमुळे पूर्णतः बॅकफूटवर गेलेले असतांना संकटात संधी शोधून सावरकरांना गांधी नेहरूंच्या रांगेत बसवू पहात आहेत. हे असंच चालू दिलं तर उद्या हेडगेवार-गोळवरकरही राष्ट्रपुरुष ठरवले जातील आणि परवा भिडे- पोंक्षेला तुमच्या बोकांडी राष्ट्रपुरुष म्हणून लादलं जाईल. सबब हे आत्ताच थांबवलं पाहिजे.
राष्ट्रपुरुष तो असतो जो राष्ट्रातल्या बहुसंख्य नागरिकांना आपला नेता वाटतो, जो संपूर्ण देशावर स्वतःची पदचिन्ह सोडतोच पण आंतरराष्ट्रीय समुदायातही त्याचं नैतिक वजन असतं. सावरकर या कसोट्या पूर्ण करत नाहीत.
- विश्वंभर चौधरी