डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस कॅनडात 'समता दिन' म्हणून घोषित

Update: 2020-04-11 03:02 GMT

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मात्र यावेळी कोविड-19 या महमारीने संपूर्ण जग त्रस्त आहे आणि त्याचे सावट डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर देखील आहे. त्यामुळे यावेळी सर्वांच्या वतीने घरातच जयंती साजरी करण्याचे आवाहन सर्व स्तरांतून करण्यात येतंय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जशी भारतात साजरी होते तशीच ती इतर अनेक देशात देखील साजरी होते. गेली अनेक वर्ष ज्या देशात आंबेडकर जयंती साजरी होते त्यात अमेरिका, इंग्लंड, दुबई, मलेशिया, न्यूझीलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्ट इंडीज आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे.

यावेळी मात्र परदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा 'समता दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय कॅनडा येथील ब्रूनाबे (Burnaby) या शहरातील महापालिकेने घेतला असून त्यासंदर्भातील आदेश (Proclaim) तेथील महापालिका प्रशासनाने महापौर माईक हेरले यांच्या सहीनिशी काढले आहे.

या आदेशात महापालिका म्हणते की, कॅनडा हे विभिन्न संस्कृतीक विविधता असलेले शहर आहे. आम्हाला जगातील विषमतेविषयी चिंता वाटते. आजही जगात अनेक ठिकाणी विषमता अनुभवयास मिळते, ती घालवण्यासाठी जेथे कुठे प्रयत्न होत असतील त्यांना पाठींबा देण्याची गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली एका अस्पृश्य समाजात झाला. ते मोठया कष्टाने प्रगती करत, भारतीय राज्यघटनेच्या मसूदा समितीच्या अध्यक्षपदापर्यंत पोहचले. त्यांनी देशाला राज्यघटना देण्यात भरीव योगदान दिले.

भारतीय राज्यघटना ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असून ती २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारून लागू करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अथक परिश्रम आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या दृष्टीच्या गौरव आणि सन्मान केवळ भारतातच नाही तर इतर देशांनी देखील केला आहे. म्हणून बाबासाहेबांचा जन्मदिवस समता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचं ब्रूनाबेचे महापौर माईक हुरले यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. बाबासाहेबांचा परदेशात होणारा हा गौरव प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलवणारा आहे

Similar News